‘शेट्टी यांनी राजीनाम्याचा विचार बदलला’ ही बातमी (लोकसत्ता, ७ जुलै) वाचली. ‘‘ब्रिटिश हे ख्रिश्चन असल्याने भारतातील कॅथलिक समाज इतर समाजांसारखा मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाला नाही,’’ असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.

शेट्टी यांनी आपले मूळ विधान फिरवून, ख्रिश्चनांऐवजी आता कॅथलिक असा बदल केला आहे. त्यामुळे त्यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. वास्तविक ब्रिटिश हे प्रॉटेस्टंट (अँग्लिकन) होते आणि त्या काळी कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यात विस्तव जात नव्हता. म्हणजे शेट्टींची समीकरणे ग्राह्य़ धरायची तर, कॅथलिकांनी त्यांना विरोधच करायला हवा होता! धर्माच्या नावाने नव्हे तर राष्ट्रप्रेमामुळे ख्रिस्ती लोक स्वातंत्र्यलढय़ात ओढले गेले होते. राजकीय विधान करताना आपण काय बोलतो याचे भान शेट्टी यांना राहिलेले दिसत नाही. सर्वच ख्रिस्ती लोकांनी भारतीय स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले आणि आठवे (१८८५ व १८९२) अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे ख्रिस्ती होते. ख्रिस्तोदास पाल यांनी १८७४ साली ‘हिन्दू पेट्रिऑट’ या नियतकालिकात लेख लिहून भारतात होमरूल लीगची मागणी केली. कालिचरण बॅनर्जी यांनी १८८७ साली स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ‘कलकत्ता ख्रिस्तो समाज’ची स्थापना करून, ब्रिटिशांशी संघर्ष केला. दक्षिण भारतातील ख्रिश्चनांनीसुद्धा ब्रिटिशांना विरोध केला होता.

मिशनऱ्यांनी काढलेल्या शाळांमुळे, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतीयांना अमेरिकन, फ्रेंच, आयरिश स्वातंत्र्यलढय़ांची ओळख झाली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला खतपाणी घातले गेले, ही गोष्ट नजरेआड करता येत नाही.

गोपाळ शेट्टी यांचा महाराष्ट्राचा इतिहासही कच्चा दिसतो. उत्तन (भाईंदर) येथील बॅरिस्टर जोसेफकाका बॅप्टिस्टा हे लोकमान्य टिळकांचे सहकारी होते. ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळविणारच’ या घोषवाक्याचे ते जनक होते. त्यांनी लोकमान्यांचे आणि हिंदुत्व-विचाराचे प्रवर्तक स्वा. सावरकर यांचे वकीलपत्र घेतले होते. लोकांना एकत्रित करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याच्या कल्पनेला त्यांचा पाठिंबा होता. शेट्टींच्या माहितीसाठी, ते कॅथलिक होते. वसईतील कॅथलिकांनीही स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला होता. निर्मळ येथील समाजसेवक स्व. जोसेफ दालमेत यांचे आजोबा इतूर ऊर्फ काल्या दुमा दालमेत हे ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत वसईतील कॅथलिकांनी लाठय़ाकाठय़ा खाऊन तुरुंगवास भोगला आहे. पर्यावरण रक्षणासाठी झालेल्या हरित वसई आंदोलनात येथील कॅथलिक आघाडीवर होते.

जात, धर्मावरून उणीदुणी काढून समाजात गैरसमज पसरविण्याऐवजी एकदिलाचा संपन्न, सबळ भारत निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याची आज नितांत गरज आहे.

– फा. फ्रान्सिस दिब्रिटो, गिरीज (वसई)

लोहियांना गोव्यात आणणारे ते मेनेझिस!

राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्या सन्मानार्थ गोवा सरकारने ७ जुलै रोजी आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना राष्ट्रपती कोिवद यांनी एक छोटीशी गफलत केली. गोवा मुक्तिलढय़ाचा उल्लेख करताना त्यांनी डॉ. त्रिस्तांव बी. कुन्ह यांना अभिवादन केले. पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की, डॉ. कुन्ह यांनी गोव्यातील पोर्तुगीज पारतंत्र्यावेळी प्रख्यात समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांना गोव्यात एका जनसभेला संबोधित करण्याकरिता बोलावले व १८ जून १९४६ रोजी झालेल्या त्या सभेची आठवण म्हणून गोव्यात आजही १८ जून रोजी ‘गोवा क्रांती दिवस’ आयोजित केला जातो.

वास्तविक, लोहिया यांना गोव्यात येण्याचे निमंत्रण डॉ. जुलियाव मेनेझिस यांनी दिले होते. लोहिया हे मेनेझिस यांच्या असोळना (दक्षिण गोवा) येथील घरी सुट्टीसाठी आले असता पोर्तुगीज गुलामगिरीत होणाऱ्या अत्याचारांच्या घटना ऐकून १८ जून रोजी त्यांनी मडगाव येथे सभेला संबोधित करून पोर्तुगीजांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर लादलेली बंधने झुगारून लावली. डॉ. टी. बी. कुन्ह यांनीही गोवा मुक्तिसंग्रामात महत्त्वाचे योगदान दिले असले तरी डॉ. लोहिया यांना गोव्यात निमंत्रित करणारी व्यक्ती डॉ. जुलियाव मेनेझिस होती. राष्ट्रपती कोिवद यांच्याकडून तपशिलाची ही चूक अनवधानाने झाली असली तरी त्यांचे भाषण लिहिणाऱ्या व्यक्तीने आधी नीट अभ्यास करणे गरजेचे होते.

– विकास कामत, आके (मडगाव, गोवा)

भाकरी कुठूनही मोडता येते, पण..

‘एक दांव लगा दे’ हे संपादकीय (९ जुलै) वाचल्यावर ‘भाकरीचा तुकडा कुठूनही मोडता येतो’ या म्हणीची आठवण झाली. तर्कशुद्ध वाटणाऱ्या, भासणाऱ्या मांडणीने काहीही सिद्ध करता येते, पण ते हिताचे असतेच असे नाही. दारूबंदीमुळे बेकायदा दारू गाळण्याचा धंदा सुरू होतो, हातभट्टीची दारू किंवा खोपडी वगैरे पिऊन गरीब माणसे मरतात, हे सर्व टाळण्यासाठी दारूबंदी रद्द करा, इत्यादी इत्यादी, हे सर्व पटण्यासारखेच आहे. आता तसाच काहीसा युक्तिवाद जुगाराबाबत केला जात आहे. जुगार, दारू याप्रमाणेच इतर अवैध गोष्टी बंद पाडण्यात अपयश येते. त्या बंद पडणारच नाहीत म्हणून त्या नियमित करा, त्यांच्यावर कर बसवा, असे म्हणत त्यांना एका अर्थाने सरकारमान्यता देणे हे तर्कशास्त्र अजब वाटते. गाइड्स, कोचिंग क्लासेस याबाबत कदाचित शासन जे करत आहे ते समजू शकते, पण जुगाराबाबत तोच न्याय पटत नाही. लॉटरी चालू करून काय साधले त्याचाही या संदर्भात पुनर्वचिार व्हावा. अमक्या गोष्टीने सरकारी तिजोरीत भर पडेल आणि तो पसा समाजकार्यासाठी वापरता येईल हे म्हणणे तर भाबडेपणाचे वाटते.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)

..मग विरोध करावाच कशाला?

‘एक दांव लगा ले..’ हा अग्रलेख (९ जुलै) वाचला आणि पूर्णपणे खटकला. ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नाहीत त्या गोष्टी नियमित करायचा निर्णय चुकीचा आहे. रस्त्यावर उलटय़ा (चुकीच्या) बाजूने वाहनचालक वाहने चालवतात, पोलीस नियंत्रित करू शकत नाहीत, मग ते नियमित/ अधिकृत करायचे का? लाचखोरी/ पैसे खाणे यांवर सरकार नियंत्रण आणू शकत नाही, मग ते नियमित/ अधिकृत करायचे का? बिल्डर अनधिकृत जागेवर इमारती बांधतात आणि त्या कालांतराने नियमित होतात.. याला तरी पर्यावरणरक्षण वगैरेसाठी विरोध का करायचा?

खून, मारामाऱ्या, बलात्कार, असभ्य बोलणे यावरही कुणाचे नियंत्रण नाही, मग ते नियमित/ अधिकृत करायचे का?

– पंकज महाडिक, पुणे</strong>

जुगाराला राजाश्रय नकोच

‘एक दांव लगा ले’ (९ जुलै) या संपादकीयातले पहिलेच वाक्य असत्य आहे. जुगार ही मानवाची नैसर्गिक प्रेरणा कधीच नव्हती. मानव निर्णय घेण्यासाठी माहिती कमी पडली आणि ती मिळविण्याची साधने नसली वा असली तरी ती प्राप्त करून घेण्याचा आळस केला की अपुऱ्या माहितीवर आधारित नशिबावर हवाला ठेवून निर्णय घेतो. हाच जुगार. त्यामागे अगतिकता तरी असते किंवा आळशीपणा तरी. त्यामुळे तिला तहान, भूक, स्वसंरक्षण या वर्गात मोडणाऱ्या नैसर्गिक प्रेरणेत बसवणे ही शास्त्रीय चूक ठरते. रोखे बाजाराला अगदी अलीकडेपर्यंत सट्टा बाजार म्हणत असत; पण वॉरेन बफेसारख्या अनेक यशस्वी गुंतवणूकदारांनी रोखे बाजाराचा बारीक अभ्यास करून योग्य निर्णय घेता येतात आणि माहितीपूर्ण निर्णयांवर आधारित यश प्राप्त करता येते हे सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यातून अंधारात गोळी मारणे म्हणजे जुगार ही व्याख्या अधिक सिद्ध होते.

विरंगुळा किंवा खेळ म्हणून स्वीकारलेला जुगार (उदा. सापशिडीसारखे खेळ) यात होणाऱ्या हारजीतीने कोणाचे आयुष्यभराचे नुकसान होण्याचा संभव नसतो. पण तेच खेळ ‘जिंकणाऱ्याला अमुक एक रक्कम मिळेल’ या प्रलोभनापायी खेळले गेले तर खेळाडूंची काय वाताहत होते ते सुस्पष्ट आहे. अग्रलेखात ‘काही यशस्वीदेखील होतातही’ असे प्रतिपादन आहे, पण त्या लोकांचे यश हे ज्या इतर अनेकांच्या हरण्यावर उभे असते त्यांचे काय? लॉटरीसारख्या जुगारात प्रामाणिकपणे जिंकण्याची गणिती शक्यता (प्रोबॅबिलिटी) किती असते? मग पुढे असल्या जुगारांमधून होणारे मॅचफििक्सगही जुगाराचाच एक भाग मानावे अशी (अधिक उदारमतवादी!) मागणीही मान्य करावी काय?

समाजात ‘युटोपियन’ आदर्शवादीपणा रुजणे अशक्य आहे; हे मानवी स्वभावांच्या विविधतेनुसार खरेच आहे. पण त्याचा अर्थ असा नक्कीच नव्हे की, सर्वच दृष्टय़ा अधोगतीकडे नेणाऱ्या जुगारासारख्या गोष्टीला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळावा. जुगारावर नियंत्रण शक्य नाही हेही सत्यच. पण जुगाराच्या नादी लागून नष्ट होणारी मानवी आयुष्ये पाहिली तर तो युद्धाइतकाच विनाशकारी ठरतो. फक्त युद्धासारखा तो उघड दिसत नाही इतकेच. मारिओ पुझो धर्म आणि व्यवसायाला (अनुक्रमे) विध्वंसक आणि अनैतिक का म्हणतात ते अनाकलनीय आहे. हे विधान एका स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने ते सरसकट खरे नाही एवढेच येथे म्हणणे योग्य ठरेल.

– सचिन बोरकर, मुंबई

अवहेलना करताना लाज नाही वाटत?

‘काँग्रेसने लोकशाही टिकवली म्हणून चहावाला पंतप्रधान झाला’ (बातमी : लोकसत्ता, ९ जुलै) हे तुम्ही तुमच्या पहिल्या पानावर छापता? चहावाला म्हणून अशी अवहेलना करताना जरासुद्धा लाज वाटत नाही? देशाचे पंतप्रधान आहेत आपले. देशात आणीबाणी आणली तेव्हाच जनतेची ताकद काय असते ती दाखवली आहे काँग्रेसला. विसरले वाटते खरगे. स्वबळावर निवडणूक लढवूनच दाखवा हिंमत असेल तर.

– मधुकर मु. ढापरे, डोंबिवली