‘स्वच्छ क्रिकेट अभियान!’ हा अग्रलेख (६ जाने.) वाचला. यासंदर्भात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेत आयपीएलविषयी मांडलेली मते विशद करणे आवश्यक ठरते. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘आयपीएलमुळे पहिल्या दर्जाचे क्रिकेट खेळण्यासाठी शेकडो नवोदित खेळाडूंना दारे उघडी झाली. तसेच आयपीएलमुळे बीसीसीआयकडे मोठय़ा प्रमाणात पसा उपलब्ध झाला. त्याचा उपयोग जुन्या खेळाडूंना निवृत्तिवेतन मिळण्यात तसेच क्रिकेटसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात झाला. त्याआधी क्रिकेटची नवी मदाने उभारण्यासाठी बीसीसीआयकडून दोन ते तीन कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य चार वर्षांत टप्प्याटप्प्याने मिळत असे. परिणामी ही मदाने रेंगाळत पडायची. आयपीएलमधून पसे आल्यावर प्रत्येकी थेट ५० कोटी रुपये देण्यात आले. यातून देशभरातल्या अनेक शहरांत उत्तम दर्जाची क्रिकेटची मदाने उभी राहिली. तसेच या पशांतून अन्य क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला २५ कोटी रुपये निधी देण्यात आला.’’ आयपीएलमधील बाजारूपणा, भपकेबाजी या गोष्टी सहज निदर्शनास येतात, पण त्याच आयपीएलमुळे आलेली भारतीय क्रिकेटची संपन्नता नजरेआड करून चालणार नाही.

विराज भोसले, मानवत (परभणी)

 

शाळांमधून विज्ञानविषयक उपक्रम राबवावेत

‘विज्ञान-तंत्रज्ञान संस्थापुढील आव्हाने’ हा लेख (८ जाने.) वाचला. काही महिन्यांपूर्वी ‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती यांनी भारतात वैज्ञानिक तयार होत नाहीत यावर चिंता व्यक्त केली होती. भारतीय शिक्षण पद्धत अजूनही जुन्या विचारधारेवर अवलंबून आहे. तेच ते अभ्यासक्रम, तीच ती अध्यापनाची पद्धत त्यामुळे नवीन असे काही नाही. पं. जवाहरलाल नेहरू यांनी उच्च शिक्षण आणि विज्ञान-तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले; परंतु त्यात म्हणावी अशी प्रगती नाही.भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ १४० वैज्ञानिक तयार होतात हे येथील शिक्षण व्यवस्थेचे अपयश. आपली शिक्षण व्यवस्था ही सध्या ‘घोका आणि ओका’ अशी झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत विज्ञानाची आवड लागेल असे खूप कमी उपक्रम आहेत. त्यातली एक म्हणजे ‘इन्स्पायर्ड अ‍ॅवॉर्ड’यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली. यासारखे अजून उपक्रम शाळेत राबवले पाहिजेत. आज चीन भारताच्या चारपट खर्च विज्ञान तंत्रज्ञानवर करतो, तर अमेरिका ७५ पट.  भारताने आपले वैज्ञानिक भारतात घडवावेत आणि ते भारतात राहून भारतासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी संशोधन करतील अशी व्यवस्था करावी. जे वैज्ञानिक होऊ इच्छितात त्यांनी अब्दुल कलाम, रघुनाथ माशेलकर यांचा आदर्श घेऊन भारतात वैज्ञानिक क्रांती घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. अजून एक गोष्ट म्हणजे भारतीयांची अंधश्रद्धा. त्यामुळे जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत केला पाहिजे. त्यासाठी समाजप्रबोधन आवश्यक आहे.

सिद्धांत खांडके, हातोला (बीड)

 

नेट परीक्षेचे अजब नियम

चालू वर्षांपासून राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)ची धुरा आणि आयोजनाची जबाबदारी (सीबीएससी)ने घेतली; पण सीबीएससीने लागू केलेल्या नवीन नियमांमुळे परीक्षार्थ्यांची अवस्था भांबावल्यासारखी झाली. आजपर्यंत कुठल्याही परीक्षेचे नियम इतके कडक नव्हते. ते नियम नेट परीक्षेत अवलंबिले गेले.  सीबीएससीने आयोजित केलेल्या नेट परीक्षेत विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावरच त्यांच्याजवळील पेन, पेन्सिल व इतर साहित्य काढून घेण्यात आले. काय तर म्हणे, विद्यार्थ्यांना सीबीएससी स्वत: पेन पुरवणार, पण त्या पेनचा दर्जा तरी नीट द्या. हलक्या दर्जाचे पेन पुरवून सीबीएससीने काय साध्य केले? त्यात भर म्हणजे  परीक्षार्थ्यांकडील रुमाल, घडय़ाळ काढून घेण्यात आले, की ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना वेळेच्या नियोजनासाठी होतो. आमच्यावर प्रचंड अविश्वास दाखवणे गैर आहे, असे सर्व विद्यार्थ्यांचे मत झाले.  या नियमात शासनाने सुधारणा करावी. प्रत्येक वर्गात मोठे चालू स्थितीतील घडय़ाळ  तरी बसवावे.

प्रा. सतीश वाळके, लासलगाव

 

प्रणवला भारतीय संघातच घ्यावे

‘हारांचा भर  नको’ हा ‘उलटा चष्मा’ (७ जाने.) वाचला.  माझे तर मत असे आहे की, प्रणवला भारतीय संघात थेट प्रवेश द्यावा. क्रिकेट जगतात कोवळ्या वयातच कसोटीत खेळण्याची संधी मिळाल्याची उदाहरणे खूप आहेत. (आपला सचिन आहेच की!) प्रणवची ‘हजारी’ खेळी तर अद्भुतच म्हटली पाहिजे. तब्बल ३२७ चेंडू खेळताना त्याला एखादे जीवदान वगरे मिळाल्याचे वाचनात आले नाही. तेव्हा ‘जास्त कौतुक नको’ किंवा ‘डोक्यात हवा जाऊ दे नको’ असा सूर काढण्यापेक्षा त्याला ताबडतोब राष्ट्रीय संघात संधी दिली पाहिजे.

मििलद रामचंद्र देवधर, गिरगाव (मुंबई)

 

शाबासकी द्या, पारितोषिक नको

क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर याचे नाव अजरामर आहे. ज्यांनी क्रिकेटच्या रणभूमीत दमदार प्रदर्शन केले ते आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. खेळ वा शैक्षणिक परीक्षा तिथे स्पर्धा ही होणारच. फरक इतकाच, स्पध्रेत यश मिळाल्यानंतर हुरळून न जाता वा गर्वष्ठिपणा मनाला चिकटू न देता स्पध्रेत सातत्य टिकवणे गरजेचे आहे; अन्यथा अपयशाच्या वाटा फुटायला वेळ लागत नाही. त्यासाठी यश मिळवणाऱ्यांना शाबासकी द्या, एकदम प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नको. प्रणवने मिळवलेले यश ही त्याच्या कारकीर्दीची सुरुवात आहे. या त्याच्या कारकीर्दीला उंचावर नेण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अर्थात आíथक मदत इथवर ठीक आहे;

नीलेश पांडुरंग मोरे

loksatta@expressindia.com