‘संवादाच्या अभावाचे परिणाम..’ हा महेश सरलष्कर यांचा लेख (‘लालकिल्ला’, ६ एप्रिल) वाचला. खरे तर आपल्याकडे फेब्रुवारीतच करोनाच्या भविष्यातील संकटाची चाहूल लागली होती. त्याच वेळी जर्मनीसारख्या देशांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली होती. टाळेबंदी जाहीर करण्यापूर्वीच पंतप्रधानांनी देशातील सर्व विरोधी पक्षांशी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करायला हवी होती. महाराष्ट्रासारख्या बिगरभाजप सरकार असणाऱ्या राज्याने केंद्राच्या अगोदर शहाणे होऊन संचारबंदीसारखा पर्याय अवलंबला होता. परंतु त्या काळात केंद्राने महाराष्ट्र सरकारशी बातचीत केल्याचे चित्र दिसले नाही. शिवाय पंतप्रधान मोदींनी करोनाच्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना राज्यनिहाय जबाबदारी दिल्यानंतरही महाराष्ट्रात नितीन गडकरींनी राज्य सरकारसोबत मिळून काय काम केले, हेही दिसलेले नाही. करोनासारख्या भयंकर संकटाच्या काळात खरे तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. टाळेबंदी केल्यानंतर जवळपास दोन आठवडय़ांनी होणारा पंतप्रधानांचा विरोधी पक्षांसोबतचा संवाद जर १५ दिवसांपूर्वीच झाला असता तर कदाचित करोनाविरुद्धच्या लढय़ाला सामूहिक बळ मिळाले असते. पंतप्रधानांनी आता तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन करोनाविरुद्धचा लढा विरोधी पक्षांना सोबत घेऊन तीव्र करावा.

– सज्जन शामल बिभिषण यादव, उस्मानाबाद</p>

मरकज प्रतिनिधींवर खापर फोडणे निषेधार्हच

‘संवादाच्या अभावाचे परिणाम..’ हा लेख वाचला. दिल्लीतील मरकज मेळावा काही अचानक भरवलेला नव्हता. परदेशांतून येणाऱ्या प्रतिनिधींनी व्हिसा घेतला असणार. आपल्या वकीलाती तसेच गुप्तहेर संस्थांकडून प्रतिनिधींची माहिती घेता आली असती. हे सारे देशात आले तेव्हा तर करोनाचे ढग जगतावर दाटून आले होते. तेव्हा त्यांची तपासणी झाली होती काय, यांसारखे प्रश्न आता विचारणे सोपे आहे. परंतु मरकजच्या वेळी प्रशासनाच्या पातळीवर अक्षम्य चुका झाल्या हे मान्य न करता, मुस्लीम समाजावर किंवा आलेल्या प्रतिनिधींवर खापर फोडण्याचा प्रयत्न तितकाच निषेधार्ह आहे. एकंदरीत हा प्रवास पाहाता आपली वाटचाल अराजकाकडे होते आहे की काय, असा प्रश्न पडतो.

– शैलेश न पुरोहित, मुलुंड

पराजयाचा उत्सव!

‘उजेडामागचा अंधार’ हा अग्रलेख (६ एप्रिल) वाचला. आपल्याकडे हिंदी चित्रपट बनविताना प्रेक्षकांचे सरासरी बौद्धिक वय चार ते पाच वर्षे असल्याचे गृहीत धरले जाते असे म्हणतात. अर्थात, प्रेक्षक म्हणजे सर्वसामान्य जनता. अशा चित्रपटातला नायक मग समोरच्या प्रेक्षकांच्या बुद्धीला पटतील, पेलवतील असे वेडेचाळे (यालाच काही सुजाण लोक निर्बुद्धपणा म्हणतात!) करून त्यांना रिझवीत असतो आणि आपले नायकपद अधिकच घट्ट करीत असतो. हे फक्त चित्रपटांच्या बाबतीतच नव्हे, तर अवघ्या देशाच्या बाबतीतही खरे आहे असे वाटते.

टाळ्या आणि थाळ्या वाजवणे, विज्ञानाचा आविष्कार असलेले विजेचे दिवे मालवून तेलाच्या पणत्या पेटवणे असले प्रकार जनतेला करायला लावणारे आपले राज्यकत्रे कुठे आणि पूर्ण विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून करोनाचा यशस्वीपणे मुकाबला करणाऱ्या जर्मनीच्या अँगेला मर्केल कुठे? आपल्याकडे सर्वसामान्य माणसाच्या हाती भरमसाट पसा खुळखुळू लागल्यामुळे घराघरांत माणसाची कामे सोपी करणारी वैज्ञानिक उपकरणे आलीत, पण वैज्ञानिक दृष्टिकोन काही लोकांमध्ये रुजला नाही. भौतिक समृद्धीतल्या या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव करोना काळात भारतीय जनतेने दाखवून दिला. अशा खुळचट गोष्टींना विरोध करणाऱ्यांना नास्तिक, संस्कृती माहीत नसलेले ठरवून हिनवण्यात व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातले विद्वान तर फारच आघाडीवर आहेत.

‘बहुसंख्य प्रजा जेव्हा निर्बुद्ध असते तेव्हा राजा आपल्या पराजयाचा उत्सवही धुमधडाक्यात साजरा करतो,’ असे ओशोंचे एक वचन आहे! आता आपणही एखाद्या ‘अँगेला मर्केल’ची आपल्या देशात जन्माला येण्याची वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे.

– मुकुंद परदेशी, धुळे

सत्तर वर्षांतील लसीकरण मोहिमेमुळे करोनाप्रसार कमी

‘उजेडामागचा अंधार’ या अग्रलेखात जर्मनीने करोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. सध्या जगभरातील करोनाग्रस्त तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर काही ढोबळ निष्कर्ष निघतात. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने प्रगत व स्वच्छ पर्यावरण/ हवामान आणि उत्तम आरोग्यव्यवस्था असलेल्या देशांमध्ये या विषाणूचा प्रभाव अधिक आहे. याचे एक कारण म्हणजे तेथील लोकांमध्ये या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारशक्ती कमी दिसते. उदाहरणार्थ, युरोप आणि अमेरिका. तर कमी प्रगत आणि तुलनेने अधिक दूषित पर्यावरण व अधिक उष्ण हवामान असलेल्या (विशेषत: उष्णकटिबंधीय) देशांमध्ये या विषाणूचा प्रभाव बराच कमी आहे. उदाहरणार्थ, भारत व आशिया, आफ्रिकेतील अनेक देश. कारण मलेरिया, कॉलरा, टायफॉइड, अतिसार यांसारख्या रोगांचा या प्रदेशांमध्ये खूप प्रादुर्भाव असल्यामुळे येथील लोकांमध्ये अशा रोगांशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती अधिक प्रमाणात दिसते.

भारतात तर गेली अनेक दशके (साधारणपणे १९५० सालापासून) रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठय़ा प्रमाणात राबवली जात आहे. मूल जन्मल्याबरोबर एका विशिष्ट कालमर्यादेच्या आत लगेच त्याला रोगप्रतिबंधक लसी दिल्या जातात. त्यामुळे भारतीयांमध्ये रोगप्रतिबंधक सुरक्षिततेची पातळी इतर देशांमधील लोकांच्या तुलनेत अधिक आहे. आपल्याकडे करोना विषाणूचा जोर अजून तरी आटोक्यात दिसतो आहे, यामागील हेही एक मुख्य कारण असू शकते.

– हर्षवर्धन दातार, ठाणे

ऐक्य दर्शविण्यासाठीच्या आवाहनानंतरचा दुभंग

‘उजेडामागचा अंधार’ या अग्रलेखात- जर्मनी हा एकमेव देश कसा काय या विषाणूच्या डोळ्यात डोळा घालून उभा राहू शकतो हा एकमेव प्रश्न जगातील अनेक राजसत्तांना पडलेला दिसतो, असे विधान केले आहे. परंतु तो प्रश्न आपल्या देशातील राजसत्तेला कधीही पडला नाही आणि पडणारही नाही, असे आपल्याकडे ज्या पद्धतीने करोना संकट हाताळले जात आहे त्यावरून दिसून येते. कारण आपल्या समोर विज्ञानाधारित तर्कशुद्ध दृष्टिकोन दाखविणारे देश नसून टाळ्या वाजवणारे, दिवे पेटवणारे देश आहेत. तसेच कोविड-१९ या गेल्या वर्षी जन्म घेतलेल्या विषाणूला ‘मारण्यासाठी’ पौराणिक भाकडकथा, आयुर्वेद यांमध्ये उपाय असल्याचा दावा केला जात आहे. अजून वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध न झालेले ‘गोमूत्र हे औषध आहे’ असा दावा करून ते पाटर्य़ा करून प्राशन केले जात आहे. टाळ्या-थाळ्या वाजवणे, मेणबत्त्या, ‘गो करोना गो’ मंत्र, गायत्री मंत्र यांच्यामुळे हवेत उठणारे तरंग, सकारात्मक लहरी यामुळे करोना ‘मरतो’ असे भावनिक व तर्कदुष्ट नवीन शोध लागत आहेत.  एवढेच नव्हे, तर यांचा अतिरेकी दुराग्रहदेखील होत आहे. याविरुद्ध लिहिणे किंवा बोलणेसुद्धा आता ‘देशद्रोह’ ठरत आहे. ऐक्य दर्शविण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केल्यानंतर तर देश ‘दिवे लावणारे’ व ‘दिवे न लावणारे’ असा दुभंगला गेला आहे.

सध्या आपल्या देशासमोर कोविड-१९ हा प्रश्नच नसून टाळ्या वाजवाव्यात की नाही, दिवे लावावेत की नाही, हेच आता जीवनमरणाचे प्रश्न आहेत असेच वातावरण निर्माण झालेले दिसते. आपल्याकडे तर कोविड-१९लाच धर्माची व अंधश्रद्धेची लागण झाली आहे, हे भीषण वास्तव काही घटनांवरून समोर येत आहे. अशा प्रसंगी देशाच्या नेतृत्वाने नागरिकांना भावनिक आवाहन करण्याऐवजी जर्मनीने वापरलेला तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

– उत्तम जोगदंड, कल्याण (जि. ठाणे)

आपत्तीवर ‘इव्हेंट’ने नव्हे, विज्ञानानेच मात करता येईल

‘उजेडामागचा अंधार’ हे संपादकीय (६ एप्रिल) वाचले आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांचे कौतुक वाटले. एखाद्या देशाच्या प्रमुखपदी जर अशी जबाबदार आणि विज्ञानवादी व्यक्ती असेल, तर तो देश कितीही मोठे संकट आले तरी कशी मात करू शकतो, याचे जर्मनी हे उत्तम उदाहरण वाटते. भारतीय राज्यघटनेच्या ‘भाग चार-क’मधील मूलभूत कर्तव्यांत स्पष्ट उल्लेख आहे : ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.’ परंतु करोनाच्या संकटकाळात ‘दिवे लावा आणि एकी दाखवा’ अशा प्रकारचे ‘इव्हेंट’ करून आपण राज्यघटनेतील वरील कर्तव्य जाणीवपूर्वक विसरले आहोत किंवा विसरायला आपल्याला भाग पाडले जात आहे, याचा प्रत्यय आला. करोनासारख्या आरोग्य आपत्तीवर हे असे ‘इव्हेंट’ करून आपण मात करू शकतो का? ही गंभीर आरोग्य आपत्ती आपण फक्त विज्ञानाच्या बळावरच जिंकता येईल. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. अन्यथा दिव्याखाली फक्त अंधार आहे!

– दीपाली सुनंदा राजेंद्र गायकवाड, नेवासा (जि. अहमदनगर)

शर्थीने मिळवले, ते दिव्याने पेटवले..

श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तसेच उत्साह आणि अतिउत्साह यांच्यामध्ये न दिसणारी पारदर्शक लक्ष्मणरेषा असते. या रेषेचे महत्त्व एवढे मोठे आहे की, तुम्ही रेषेच्या अलीकडच्या भागामध्ये करत असणारी सगळी चांगली कामे रेषा ओलांडून गेल्यास विध्वंसक रूपात फलित होतात. हे न होण्यासाठी शहाण्या माणसांकडे एकच उपाय असतो आणि तो म्हणजे या रेषेपासून चार हात मागे राहून कार्य करीत राहणे. याला कारण म्हणजे अधिकारी पुरुषांचे भक्त आणि अनुयायी हे त्यांच्या पुढे जरी गेले तरीसुद्धा लक्ष्मणरेषा पार होत नाही आणि कार्ये विहीत स्वरूपात पूर्ण होतात. पण जेव्हा कर्ता पुरुषच लक्ष्मणरेषेच्या जवळ जाऊन आपल्या कार्याच्या आरोळ्या द्यायला लागतो, तेव्हा मात्र अतिउत्साही भक्त आणि अनुयायी ही लक्ष्मणरेषा पार करून जातात. अशा वेळी चूक जरी भक्तांकडून झाली असेल, तरी त्याचा दोष मात्र कर्त्यां पुरुषांनाच लागतो. एकुणात, सद्य:करोना काळात शर्थीने मिळवले ते दिव्याने पेटवले असे व्हायला नको.

– अजित नगरकर, मुंबई