‘पुलंचा आठव..’ हा खरोखरच पुलकित करणारा अग्रलेख (८ नोव्हेंबर) आहे. विनोदाला केंद्रस्थानी ठेवून पुलंनी विपुल लेखन केले. अनेकांच्या रेवडय़ा उडवल्या; परंतु दर्जा आणि पातळी कधीच सोडली नाही. ‘बटाटय़ाची चाळ’ असो, नाही तर ‘व्यक्ती आणि वल्ली’; हे नुसते विनोदी प्रकरण नाही. लोकोत्तर प्रबोधन आणि आपली अस्मिता व संस्कृती जपणे हेच त्यांचे सांगणे होते. आपलेपणा जागोजागी जपत एक पिढी कशी जगते, हे त्यांनी दाखवले. तुलना करायची नाहीये; पण आचार्य अत्रे यांचे फटाके आज पाहिजे होते. विनोदाने शरसंधान करीत त्यांनी सगळी राजकीय परिस्थिती उलटून टाकली असती. दोघेही गुरुकुल आहेत. दोघांनाही आदरांजली. – दिनेश कुलकर्णी, नाले गाव (जि. अहमदनगर)

विनोद थिटा पडू लागला आहे!

‘पुलंचा आठव..’ हे संपादकीय वाचले. पुलंचा विनोद आजही तितकाच टवटवीत, अभिजात आणि निर्वैर हास्य फुलवणारा आहे. सध्या खूप गोंधळ माजला आहे, वैचारिक तसेच मानसिकही. समाजातला मोकळेपणा आक्रसून जात आहे. उत्तम विनोद करणे आणि तो कळणे हे बुद्धिचातुर्याचे निदर्शक आहे. विनोदाने बाष्कळपणा किंवा तेढ वाढू नये, याची दक्षता घेतली पाहिजे. आता विनोद कुणावर करायचा, याचा हिशेब ठेवला जातोय. भावना फार स्वस्त होऊ पाहत आहेत. भावना दुखावल्या जाण्यामुळे सामाजिक रोष पत्करण्याची हिंमत या वातावरणात नाही. झपाटय़ाने बदलणारे आणि ढवळून निघणाऱ्या राजकीय, सामाजिक वातावरणात आजचा विनोद थिटा पडू लागला आहे. अपमानाची भावना तीव्र होऊन मनाचा उमदेपणा, दुसऱ्याला माफ करण्याची शक्तीच नामशेष होऊ लागली आहे.  दुर्दैवाने पुलंनी म्हटल्याप्रमाणे, ‘द्वेषाच्या झेंडय़ाखाली गर्दी वाढते’ असे चित्र महाराष्ट्रात आहे. एकेकाळी विवेकाची कास धरून आपण वाटचाल करत होतो. हळहळू निर्नायकी अवस्थेप्रत येऊ लागलो आहोत. पुलंसारख्या साक्षेपी लेखक-कलावंताचे स्मरण अशा वेळी प्रकर्षांने होते, यातच त्यांचे अमाप कर्तृत्व सामावले आहे. – डॉ. संजीव व. देशपांडे, पिंपरी (जि. पुणे)

‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ ही उक्ती कृतीत यावी

‘रखडलेले प्रकल्प; रेंगाळलेला निर्णय!’ हे ‘अन्वयार्थ’ टिपण (८ नोव्हेंबर) वाचले. या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत आणि त्यातील अतिशय महत्त्वाचा म्हणजे-घर खरेदीसाठी घेतले गेलेले कर्ज! आज असे कित्येक लोक दिसतील, की ज्यांनी कर्ज काढून बिल्डर अथवा विकासकाला भली मोठी रक्कम दिली आहे, परंतु घराचा पत्ता नाही.  घेतलेल्या कर्जाचे मोठमोठे हप्ते दर महिन्याला पगारातून कापले जात आहेत आणि अशा ग्राहकांच्या विवंचना वाढत आहेत. योगायोगाने, ‘सरकारी बाबूंना लाच देण्यासाठी हवी रोकड’ या बातमीतून (लोकसत्ता, ८ नोव्हें.) आणखी एक भीषण वास्तवही समोर आले आहे. असेही प्रकल्प आहेत, जिथे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे; हत्ती गेला पण शेपूट राहिले, अशी अवस्था आहे. परंतु ‘आर्थिक कारणांपायी’ छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी मंजुरी मिळत नाहीये. अशा परिस्थितीत केवळ रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी उभारणे पुरेसे नाही, तर ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ ही उक्ती कृतीत आली पाहिजे, तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. – अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

स्वहित आणि पक्षहितापुढे जनहिताचा विसर

‘नसून अडचण.. असून खोळंबा!’ हा राजेंद्र सालदार यांचा लेख (‘अर्थशास्त्राच्या बांधावरून..’, ७ नोव्हेंबर) वाचला. अवकाळी पावसामुळे झालेल्या खरीप पिकांच्या आणि फळबागांच्या नुकसानीची पाहणी करून ठोस निर्णय घेऊन आर्थिक मदत करण्याऐवजी स्वहित व पक्षहितापुढे जनहिताचा विसर पडलेल्या युतीच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांची सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. इकडे महाराष्ट्राचा पोशिंदा शेतकरी मात्र ऑक्टोबरऐवजी एक महिना रब्बी पेरणीस उशीर झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे होऊन मदत मिळेपर्यंत वाट पाहावी की मशागत करून रब्बी पिकाची पेरणी करून अन्नधान्य पिकवावे, या विवंचनेत मदतीची आतुरतेने वाट पाहत आहे. – शिवाजी लिके, पुणे

पु.ल. गांधीजींच्या विचारांचे पाईक

‘पुलंना ‘ग्लोबल’ करण्याच्या नादात..’ या पत्रावरील (‘लोकमानस’, ७ नोव्हेंबर) ‘छोटेखानी चरित्र लिहिले म्हणून पु.ल. गांधीभक्त?’ आणि ‘नथुरामद्वेषापोटी तार्किक मांडणीला मूठमाती’ या प्रतिक्रिया (८ नोव्हें.) वाचल्या. पुलंनी ‘गांधीजी’ एवढेच ‘छोटेखानी पुस्तक’ लिहिले आहे आणि त्यांची साधी राहणी ही फक्त मध्यमवर्गीय मानिसिकतेने आली आहे, हे विधान करण्याआधी सुनीताबाई आणि पुलंचे स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्य समजून घेण्याची गरज आहे. सुनीताबाई या तर १९४२ च्या चळवळीत गांधीजींच्या सांगण्यावरून ‘छोडो भारत’ आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पुलंचा ‘वंदे मातरम्’ हा चित्रपट हा गांधी विचार मांडतो. सेवा दलासाठी लिहिलेल्या ‘पुढारी पाहिजे’मध्येही तेच जाणवते. पुलंनी गांधीजींविषयी एका कोकणातल्या माणसाचा तार्किक विचार जसा मांडला; तसेच ‘एक शून्य मी’ या पुस्तकातील ‘गांधीयुग आणि गांधी युगान्त’, ‘गांधीजींचे घडय़ाळ’ या लेखांत गांधीजींविषयी फार आदराने आणि उच्च असे विचार मांडले आहेत. ‘गांधीजींचे घडय़ाळ’ या लेखात ते म्हणतात, ‘एखादा गांधी येतो, परावर्तित प्रकाशात आमची जीवने उजळतात. मूळ प्रकाश नाहीसा झाला की पुन्हा अंधारून येते. ’ ‘खिल्ली’मधल्या ‘एका गांधी टोपीचा प्रवास’ या लेखात ‘शत्रू की मित्र’ हा किस्सा सांगून पुलंनी तथाकथित स्वयंसेवकांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. पुलंच्या घरात जसे चार्ली चॅप्लिनचे छायाचित्र होते, तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचेही होते-ज्यांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी दिली होती! आपण कोणाच्या नावाने कोणाला पुरस्कार देतो आहे, याचे तारतम्य आयोजकांनी बाळगणे गरजेचे आहे. ‘महात्मा गांधी हिंदुत्ववादी होते,’ असे म्हणणाऱ्यांचा पुलंनी चांगला समाचार घेतला असता. पुलंनी फॅसिस्ट विचार कधीही मान्य केले नसते. महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर सुनीताबाईंनी सरकारच्या ठोकशाहीवर कशी टीका केली होती, ते आठवून पाहावे. पुलं कधीच कुठल्याही विचारसरणीचे किंवा व्यक्तीचे भक्त नव्हते आणि यातच त्यांचे मोठेपण आहे. पण ते खरे गांधी विचारांचे पाईक होते, हे विसरता येणार नाही. ज्यांना पुरस्कार मिळतो आहे, त्यांचे विचार अगदी उलट आहेत, हे आपण जाणतोच!

– मयूर कोठावळे, पुणे

loksatta@expressindia.com