25 February 2021

News Flash

‘प्रभारी’ लय भारी!

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि क्रिकेट विश्लेषक इयन चॅपेल यांनी फार आधीपासून रहाणेमधील नेतृत्वगुण हेरले होते.

अजिंक्य रहाणे

सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

येथून पुढे प्रत्येक वेळी भारताचा संघ पूर्ण ताकदीनेच मैदानात उतरावा, अशी मनोमन प्रार्थना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रशासन आणि क्रिकेट विश्लेषकही करू लागले असतील! कारण पहिल्या पसंतीचा संघ जवळपास तीन सामन्यांत उतरवता न येऊनही, भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियाला खिंडीत गाठून दाखवले. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताचा मेलबर्न कसोटीमध्ये खेळलेला संघ थोडा कमकुवत मानता येईल, कारण कर्णधार व प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि एक प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी त्यात नव्हते. सिडनी कसोटीपासून भारतीय संघाला पडलेल्या छिद्राचे भगदाड झाले. चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ ब्रिस्बेनला गॅबा मैदानावर उतरला, तो ‘अ’ नव्हे, तर ‘ब’ संघ होता यावर विश्लेषकांच्या पैजा सुरू होत्या. त्यांतील काही गोलंदाज थ्रो-इन सहायक होते. यांचे काम प्रमुख फलंदाजांसाठी नेटमधील सरावादरम्यान चेंडू फेकणे इतकेच. मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या सर्व गोलंदाजांच्या नावावर मिळून चार कसोटी सामने ब्रिस्बेन सामन्यापूर्वी नोंदवले गेले होते. त्यांनी या सामन्यांमध्ये मिळून १३ बळी घेतले होते. त्यांच्या समोर होते ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जॉश हेझेलवुड आणि नेथन लायन, ज्यांची एकत्रित बळीसंख्या होती १०३३!

१९३३ नंतर प्रथमच भारतीय संघ इतका अननुभवी गोलंदाजीचा ताफा घेऊन उतरला होता. त्यातही सामन्यातील बहुतेक काळ नवदीप सैनी जांघेच्या दुखापतीमुळे १०० टक्के फिट नव्हताच. दुखापतींची वेगळीच कहाणी. या मालिकेत भारताने २० खेळाडू उतरवले, जो एक वेगळा विक्रमच ठरावा. प्रत्येक सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान एक-दोन क्रिकेटपटू जायबंदी होतच होते. त्यामुळे अ‍ॅडलेडमध्ये भारतीय संघाचे पानिपत-पानशेत झाल्यावर ऑस्ट्रेलिया ४-० अशी जिंकणार या शक्यतेवर पैजाही घ्यायला कुणी तयार नव्हते!

पण असे घडले नाही! प्रत्येक सामन्यात, प्रत्येक डावात, प्रत्येक सत्रामध्ये भारताला कोणी ना कोणी तारणहार सापडतच होता आणि असा एखादा किंवा दोघे दर वेळी भारतीय नौका खवळलेल्या समुद्रातून किनारी आणत राहिले. हे सगळे निव्वळ योगायोगाने किंवा नशिबाने घडत होते असे समजणे एका व्यक्तीवर विशेष अन्याय करणारे ठरते. ती व्यक्ती म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे. विख्यात माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि क्रिकेट विश्लेषक इयन चॅपेल यांनी फार आधीपासून रहाणेमधील नेतृत्वगुण हेरले होते. ऑस्ट्रेलियन संघ एकदा भारतात आला होता, त्या मालिकेत पुण्यातील कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने १-० अशी अनपेक्षित आघाडी घेतली. मग बंगळूरुतील सामना जिंकून भारताने बरोबरी साधली. रांचीतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने अनिर्णित राखला. त्यामुळे १-१ अशी कोंडी न फुटल्यामुळे धरमशालेतील चौथा सामना निर्णायक ठरला. पण त्या सामन्यात विराट खेळू शकणार नव्हता. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी रहाणेवर आली. त्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने कुशल नेतृत्व केले. म्हणजे काय केले? तर सकारात्मक आणि आक्रमक निर्णय घेतले. ऑस्ट्रेलियन फलंदाज वरचढ ठरत होते, त्या वेळी कुलदीप यादवसारख्या नवख्या फिरकी गोलंदाजावर विश्वास दाखवला. ३५व्या षटकात १ बाद १४४ अशा सुस्थितीत ऑस्ट्रेलिया होती. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ आत्मविश्वासाने खेळत होते. दिवसअखेरीस किमान साडेतीनशे धावा जमवायच्या. दुसऱ्या दिवशी साडेचारशे किंवा पाचशे धावा काढून भारतावर मोठय़ा धावसंख्येने दडपण आणायचे अशी साधारण योजना होती. त्या सामन्यात कुलदीप कसोटी पदार्पण करत होता; पण त्याने स्थिरावलेल्या वॉर्नरचा बळी घेतलाच, शिवाय पीटर हँड्सकोम्ब आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाही त्रिफळाचीत करून ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावांत आटोपला. चौथ्या डावात विजयासाठी शंभरेक धावा हव्या असताना सुरुवातीला भारताची थोडी पडझड झाली; पण रहाणेने आक्रमक खेळून भारताला विजयापर्यंत पोहोचवले. परवाच्या मालिकेत मेलबर्न कसोटीपासून भारताचे नेतृत्व उर्वरित मालिकेत रहाणेने केले. मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात भारताची अवस्था ४ बाद ११६ अशी झाली होती; पण रहाणेने अत्यंत मोक्याच्या क्षणी शतक झळकावले आणि भारताला १३१ धावांची घसघशीत आघाडी मिळाली, जी निर्णायक ठरली. खरे तर त्या खेळीमुळे मालिका फिरली असे म्हणता येऊ शकते. कारण विजयापेक्षाही कैक पटीने महत्त्वाचा असलेला निडर आत्मविश्वास भारतीय संघाला त्या वेळी मिळाला आणि पुढे प्रत्येक नवीन संकटाचा सामना भारताच्या नवागत संघाने अपयशाची भीती न बाळगता केला. मेलबर्न कसोटीतही चौथ्या डावात माफक धावांचे लक्ष्य विजयासाठी होते; पण अ‍ॅडलेडच्या आठवणी ताज्या होत्या. अशा वेळी खंबीरपणा दाखवून रहाणेनेच विजयाकडे भारताला नेले.

संपूर्ण मालिकेचा विचार करायचा झाल्यास, मेलबर्नमधील त्या शतकाव्यतिरिक्त रहाणेला मोठी खेळी उभारता आली नाही; परंतु त्याच्या संयमी आणि कल्पक नेतृत्वामुळे ड्रेसिंग रूम किंवा प्रत्यक्ष मैदानात आपला संघ दडपणापासून दूर राहिला. कधी हनुमा विहारी, कधी मोहम्मद सिराज, कधी शार्दूल ठाकूर, कधी वॉशिंग्टन सुंदर हे नवखे भिडू ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघासमोर बिनधास्त उभे राहिले. शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा या गुणवानांना बळ मिळाले. चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा हे अनुभवी क्रिकेटपटू मोक्याच्या वेळी योगदान देत राहिले. या मालिकेत भारताच्या दृष्टीने काय कमी चढ-उतार आले? अशा वेळी विराट कोहली कर्णधार असता, तर तो कशा पद्धतीने व्यक्त झाला असता? विराट कोहली फलंदाजी, क्षेत्ररक्षण, फिटनेस यांमध्ये परिपूर्णोत्तम (परफेक्शनिस्ट) आहे. परंतु हे गुण तो आक्रमकपणे देहबोलीतून वागवतो. त्यामुळे त्याच्याविषयी दरारा असतो. या दराऱ्यातून प्रत्येक वेळी सहकाऱ्यांची कामगिरी १०० टक्के होईलच याची शाश्वती नसते. कोहली खेळतो तेव्हा कोहलीच ‘भारत’ असतो. त्याच्याशी पंगा म्हणजे भारताशी पंगा. परिपूर्णतेचा असा सोस दर वेळी वैयक्तिक किंवा सांघिक पातळीवर सर्वोत्तम किंवा ईप्सित कामगिरी करवून घेईलच असे नव्हे. याउलट रहाणेच्या देहबोलीतूनच ‘इट इज जस्ट अ गेम’ हा भाव स्रवत असतो. त्यामुळे शतकाचा अत्यानंद नाही किंवा शून्यावर बाद होणे ही शोकान्तिका नाही. यशाचा दंभ नाही आणि अपयशाची भीती नाही. तरीही आपण निव्वळ ‘प्रभारी’ कर्णधारच आहोत हे तो पुरेपूर जाणतो. पण इतकी ‘लय भारी’ कामगिरी करूनही प्रभारी कर्णधार हा शिक्का त्याने का वागवायचा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे मिळवलेले विजय या स्वतंत्र यशोगाथा ठरतात. हे विजय ज्या पाश्र्वभूमीवर मिळाले, ते पाहता हे यश अभूतपूर्वच ठरते. यात नि:संशय रहाणेच्या नेतृत्वगुणांचा वाटा आहेच आहे. म्हणूनच कर्णधार अजिंक्य रहाणेबाबत दीर्घकालीन विचार आता तरी व्हायलाच हवा.

ही चर्चा अशा रीतीने विराट कोहलीच्या नेतृत्वापाशी येऊन थांबते. कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हे कोहलीसाठी निव्वळ ‘प्रभारी’ ठरू शकत नाहीत; तर ते त्याही पलीकडे जाणारे उत्तम कर्णधार ठरू शकतील. हे दोघेही आपापल्या परीने नेतृत्वगुणांमध्ये कोहलीपेक्षा उजवे आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने पाच वेळा अजिंक्यपद मिळवले, त्या प्रत्येक वेळी निराळा संघ रोहितच्या हाताखाली खेळला. या विविध संघांनी मिळवलेले यश केवळ योगायोग ठरूच शकत नाही. अशा वेळी आयपीएलमध्ये दर वेळी वेगळा संघ असल्यामुळे ही स्पर्धा कोहलीला जिंकता येऊ शकली नाही हे समर्थन लंगडे ठरते. कोहलीला सतत काही तरी करून दाखवायचे असते. कोणासाठी? रहाणे किंवा रोहितला असे काही करायची गरजच भासत नाही. त्यांच्याकडे कोहलीसारखा अ‍ॅथलीटला लाजवेल असा बांधा नाही. त्यांच्यावर कोहलीइतका कॅमेरा फोकसही नसतो. कारण मैदानावर असल्या गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. समोरच्या संघाला नेस्तनाबूत करण्याचे डावपेच आखायचे असतात. परिस्थिती कसोटीत तासागणिक आणि टी-२० मध्ये काही मिनिटांगणिक बदलत असते. प्रत्येक सहकाऱ्याची क्षमता वेगळी, त्याचा प्रतिसाद वेगळा. प्रत्येक जण विराट कोहलीसारखी फलंदाजी करू शकत नाही, याचे भान असावे लागते. विराट कोहली उत्तम कर्णधार असेलही, पण उत्तम कर्णधाराने सामने नव्हे, तर स्पर्धा जिंकून द्याव्या लागतात. मोठय़ा स्पर्धा जिंकून द्याव्या लागतात. ते अद्याप तरी दिसलेले नाही. अशा वेळी निव्वळ एक खेळाडू म्हणून तो खेळू लागल्यास त्याचा तिन्ही संघांना (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) फायदा होणार नाही का? दडपणाविना खेळणारा कोहली सध्यापेक्षा किती तरी अधिक विध्वंसक आणि संहारक ठरू शकतो. अशा वेळी या रचनेच्या आड कोण येतो? खुद्द कोहली आणि कदाचित त्याचा ‘इगो’? कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० मधील अनेक मुले आज चमकत आहेत, हा नि:संशय ‘कोहली इफेक्ट’! कारण खुद्द कोहलीला कसोटी क्रिकेट प्रचंड आवडते; पण अशाच प्रकारे आवड, अभिमान, आत्मविश्वास रहाणेकडूनही मिळू शकतो आणि मिळतोदेखील. ऑस्ट्रेलियामधील या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयमालिकेचे वाटेकरी अनेक; पण त्यांचा म्होरक्या केवळ आणि केवळ अजिंक्य रहाणेच. तो आणखीही मालिकांमध्ये दिसल्यास इतरत्रही असेच पराक्रम दिसू लागतील. आहे तयारी?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 7:06 am

Web Title: ajinkya rahane india cricket team captain and india test series win over australia coverstory dd70
Next Stories
1 पाठलाग ही सदैव करतील !
2 #ट्रेण्डिंग २०२१
3 २०२० : वाईटातही चांगलं!
Just Now!
X