lp01lp07एखाद्या प्रश्नाबाबत काहीतरी घडायला हवं असं अनेकांना वाटत असतं. पण ते काय आणि कोण करणार, हा प्रश्न असतो. काही माणसं मात्र समाजातला असा एखादा प्रश्न हे आपल्या आयुष्याचंच काम आहे, इतक्या ठामपणे उभे राहतात, त्या कामासाठी झोकून देतात. आपल्या कामाच्या झपाटय़ातून समाजात बदल घडवून आणतात. कारण त्यांना एकच गोष्ट माहीत असते, ‘केल्याने होत आहे रे.. आधी केलेचि पाहिजे!’ ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त अशा कार्यव्रतींना ‘लोकप्रभा’चा हा मानाचा मुजरा!

भारतात शिल्पकलेला सुरुवात झाली इसवी सन पूर्व कालखंडात. त्यातील सर्वात महत्त्वाची दोन ठिकाणे म्हणजे सांची आणि भारहूत. भारतीय शिल्पकलेच्या अभ्यासाची सुरुवातच या दोन प्राचीन ठिकाणांपासून होते. एवढे महत्त्व या दोन ठिकाणांना आहे. त्यातही भारहूत अनेक बाबतीत वेगळे आहे. या ठिकाणी असलेल्या यक्ष-यक्षिणींच्या शिल्पकृतींपैकी सहा शिल्पकृतींची नोंद सरकार दरबारी व्यवस्थित होती. त्यावर अनेकांनी संशोधनही केले होते. सातवी शिल्पकृतीही असल्याची चर्चा होती, पण त्याविषयी फारसे कुणाला काही माहीत नव्हते. ना त्याचा काही संदर्भ सापडत होता वा त्याचा शोध कधी कुणी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रा. डॉ. किरीट मनकोडी या भारतीय पुरातत्त्व संशोधकाने भारतातून होणाऱ्या प्राचीन शिल्पकृतींच्या ठेव्याच्या तस्करीचा सातत्याने जोरदार पाठपुरावा केला. भारतीय पुरातत्त्व खात्याशी केलेल्या सततच्या पत्रव्यवहारानंतर त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाला. दरम्यान त्यांनाही लक्षात आले, की पुरातत्त्व खाते हे काही पोलिसी खाते नाही, की जे या तस्करीचा शोध घेऊन छडा लावेल. मग त्यांनीच या साऱ्याच्या मागे हात धुऊन लागण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीस सर्व पुरातत्त्वतज्ज्ञ आणि या विषयातील तज्ज्ञांना ई-मेल्स पाठविली. संबंधित सरकारी खात्यांना पत्रे पाठविली. अर्थात या साऱ्याचा काही परिणाम झाला नाही. त्याचवेळेस त्यांना लक्षात आले की, भारतातून तस्करी केलेल्या या शिल्पकृती युरोप-अमेरिकेच्या बाजारपेठेत विकल्या जातात. अखेरीस मग त्यांनी अमेरिकेच्या गृहखात्याला, ओबामा प्रशासनाला पत्र लिहिले. विशेष म्हणजे भारतात ज्या पत्रांची कुणी दखल घेतली नाही, त्याच पत्रांची दखल ओबामा प्रशासनाने मात्र तात्काळ घेतली आणि तस्करी केलेल्या भारतीय शिल्पकृतींची माहिती घेऊन संबंधित दलालांच्या साठेघरांवर छापे घातले आणि अब्जावधींची किंमत असलेल्या भारतीय शिल्पकृती जप्त केल्या. केवळ तेवढय़ावरच न थांबता डॉ. मनकोडी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक अमेरिकेच्या गृहखात्याने केले. कारण डॉ. मनकोडी यांनी पुरातत्त्वीय माहिती पुराव्यांसह पोलिसी पद्धतीचा अभ्यास करून त्यानुसार ओबामा प्रशासनाला पाठविली होती. त्यामुळेच केवळ त्यांना कारवाई करणे शक्य झाले होते. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच अखेरीस अमेरिकेच्या गृहखात्याने प्रा. डॉ. मनकोडी यांना कळवले की, कोणत्याही देशाच्या पारंपरिक ठेव्याची अशी तस्करी आमच्या भूमीवर बेकायदेशीरच आहे. भारतासंदर्भातील अशा बाबी उघडकीस आणण्यास आम्हाला मदत करा.
त्यानंतर प्रा. डॉ. मनकोडी यांनी भारतातून गायब झालेल्या शिल्पकृतींची माहिती, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ांच्या प्रतींचा अनुवाद, त्यासोबत त्याचे पुरातत्त्वीय पुरावे स्पष्ट करणारे टिपण आदी तयार करून ते अमेरिका आणि ब्रिटन सरकारच्या गृह खात्यांना पाठवून दिले. त्या माहितीच्या आधारे अमेरिकन गृहखात्याला सापडली ती भारहूतची यक्षिणी. जिची उंची तब्बल साडेसहा फूट होती. तिची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत होती, तब्बल एक अब्ज रुपये! ती सापडली तेव्हा ती कोणती शिल्पकृती आहे, याची कल्पना अमेरिकन गृहखात्यास नव्हती. त्यांनी प्रा. डॉ. मनकोडींना मदतीची हाक दिली. त्याची छायाचित्रे पाठवली. ती भारहूतची सातवी शिल्पकृती असल्याचे प्रा. डॉ. मनकोडी यांनी शोधून काढले. त्याची माहिती काढण्यासाठी ते घटनास्थळी गेले. तेव्हा लक्षात आले की, भारहूतचा स्तूप सर अलेक्झांडर कनिंगहॅमनी शोधून काढला तेव्हा त्याची नोंद केलेली होती. मात्र ती कोणा एका जमीनदाराच्या घरात देवी म्हणून स्थानापन्न असल्याची नोंद होती. मग डॉ. मनकोडींनी तो जमीनदार शोधून काढला. तेव्हा ती कालीमातेची मूर्ती काही वर्षांपूर्वी चोरीला गेल्याचे त्यांना लक्षात आले. सुदैवाने त्या संदर्भात पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली होती. त्या शिल्पकृतीच्या हाताने पकडलेल्या फांदीवर ब्राह्मी लिपीमध्ये दानकर्त्यांची माहिती कोरलेली होती. ही सारी माहिती पुरावा म्हणून डॉ. मनकोडी यांनी अमेरिकन प्रशासनाला पाठवली. आता त्या संदर्भातील खटल्यात डॉ. मनकोडींनी दिलेला पुरावा महत्त्वाचा मानला गेला असून ही शिल्पकृती परत भारतात येण्याच्या बेतात आहे. आता तर त्या जमीनदारालाही त्या शिल्पकृतीचे मूल्य लक्षात आले असून त्याने भारतातील संग्रहालयाला ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
lp08राजस्थानातील घटेश्वर मंदिरातील मंडपात कोरलेल्या छतावर असलेली आम्रवृक्षाखाली उभ्या असलेल्या महिलेची ११ व्या शतकातील शिल्पकृतीही अशीच अचानक एके दिवशी गायब झाली. ती गायब झाली हे कुणाच्याच लक्षात आले नाही. कारण काही गावकरी आणि दोन-चार पुरातत्त्वतज्ज्ञ वगळता इथे एरवी जाणारे कोणीही नव्हते. शिवाय छतावरील बाबी कधीच कुणाच्या नजरेत नव्हत्या; मात्र एका पुस्तकामध्ये ती शिल्पकृती थेट डेनेव्हरच्या संग्रहालयात समाविष्ट झाल्याचे डॉ. मनकोडींना कळले आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी ती शिल्पकृती प्रत्यक्ष भेटीत त्या मंदिरात पाहिली होती. मग त्यांनी त्या शिल्पकृतीचाही असाच पाठपुरावा त्या संग्रहालयाकडे केला. भारतातून तस्करी झालेली ही शिल्पकृती संग्रहालयात आलीच कशी, असा सवाल करून; तस्करीच्या मार्गे आलेल्या शिल्पकृतीला डेनेव्हरसारख्या प्रतिष्ठित संग्रहालयाने आश्रय देणे योग्य नव्हे, असेही त्यांनी संग्रहालयाला कळवले. शिवाय त्याची माहिती अमेरिकन प्रशासनालाही दिली. सोबत पारंपरिक वारसा लाभलेल्या भारतीय स्थळांच्या यादीत तस्करी झालेल्या शिल्पकृतीचे स्थळ कसे आहे, भारतीय कायद्याने त्याला संरक्षण कसे देण्यात आले आहे, भारतीय कायदा आणि त्याआधारे डेनेव्हरच्या संग्रहालयाकडून झालेला गुन्हा अशा साऱ्या बाबी त्यांनी संग्रहालयाला व अमेरिकन प्रशासनाला कळवल्या. ही शिल्पकृती कुणा संग्राहकाने संग्रहालयाला भेट म्हणून दिल्याचे संग्रहालयाने सांगितले आणि डॉ. मनकोडी यांनी दिलेले पुरावे पाहून ती शिल्पकृती भारत सरकारला परत करण्याची तयारी दर्शविली. आता भारतात परत येणाऱ्या शिल्पकृतींमध्ये या शिल्पकृतीचाही समावेश असेल. अशा एक ना दोन, अनेक सत्यकथा आपल्याला प्रा. डॉ. मनकोडी यांच्याबद्दल ऐकायला मिळतात. आता अमेरिकेतील भारतीय दूतावासामध्ये अमेरिकन प्रशासनाने छाप्यामध्ये पकडलेल्या अशा अब्जावधी किमतीच्या अनेक शिल्पकृती एकत्र करून ठेवण्यात आल्या आहेत. त्या भारतात परत आणण्याची जबाबदारी मात्र भारत सरकारची आहे. त्यासाठीही प्रा. डॉ. मनकोडी यांनी पुरातत्त्व खात्याकडे भरपूर पाठपुरावा केला. मात्र या शिल्पकृती परत आणण्यासाठी खात्याकडे पैसे नाहीत, पुरेसा निधी नाही, अशी उत्तरे त्यांना देण्यात आली. ही उत्तरे ऐकून थांबतील तर ते डॉ. मनकोडी कसले? त्यांनी पुढची पायरी गाठली आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले. त्या वेळेस नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार होते. खरोखरच जाज्वल्य भारतीयता दाखवायची असेल तर या देशाचा अमूल्य ठेवा असलेल्या या भारतीय शिल्पकृती येताना परत घेऊन या, असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले. त्या पत्राची मात्र दखल घेण्यात आली. अमेरिकेतील वास्तव्यामध्ये मोदी यांनी भारतीय दूतावासातील त्या शिल्पकृती पाहिल्या आणि त्या येत्या सहा महिन्यांत परत येतील, असे आश्वासन डॉ. मनकोडी यांना दिले. शिवाय डॉ. मनकोडी यांनी हाती घेतलेले हे कार्य म्हणजे अनोखी देशसेवाच आहे, असे सांगून त्याबद्दल त्यांचे देशाच्या वतीने आभारही मानले.
आपण एकटे काय करू शकतो, असा प्रश्न स्वत:लाच विचारून; एकटा माणूस काहीच करू शकत नाही, असे त्याचे नकारार्थी उत्तर देणाऱ्या सर्वासाठी डॉ. किरीट मनकोडी हे एकहाती यशस्वी लढा देण्याचे मोठेच उदाहरण ठरावे.
कुणी म्हणेल की, ते पुरातत्त्वतज्ज्ञ असल्यामुळे त्यांना हे लक्षात आले. पण त्या युक्तिवादातही काही अर्थ नाही. कारण असे पुरातत्त्वतज्ज्ञ भारतात बरेच आहेत. पण त्यातील किती जणांनी हे असे तस्करी रोखण्याचे आणि ठेवा परत मिळवण्याचे काम केले आहे?
प्रा. डॉ. किरीट मनकोडी यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात पदवी ग्रहण केली. त्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पुरातत्त्वविज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी अर्थात एमए करून नंतर संशोधनांती पीएचडीही मिळवली. सुरुवातीस ते अमेरिकन अकादमी ऑफ बनारस आणि नंतर भोपाळच्या प्राच्यनिकेतनमध्ये याच विषयात अध्यापनही करत होते. गेली अनेक वर्षे ते फ्रँको-इंडियन फार्मास्युटिकल्सच्या प्रोजेक्ट फॉर इंडियन कल्चरल स्टडीजचे संशोधन संचालक होते तर आता वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ते या संस्थेचे सल्लागार म्हणून काम पाहात आहेत.
‘लोकप्रभा’शी संवाद साधताना डॉ. मनकोडी सांगतात, पुरातत्त्वतज्ज्ञ म्हणून किंवा अभ्यासाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी भारतात फिरणे व्हायचे. त्या वेळेस लक्षात यायचे की, भारतात गावात, गावाबाहेर अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्या सर्वाच्या संरक्षणासाठी यंत्रणा उभारणे ही कठीण बाब आहे, पण किमान त्यावर आपले लक्ष तरी असले पाहिजे. सरकारी यंत्रणा तरी किती काय करणार, असाही प्रश्न पडायचा. नंतरच्या भेटीत काही शिल्पकृतींची चोरी झाल्याचे लक्षात यायचे. आपल्याच डोळ्यासमोर, आपल्या देशातील ठेवा चोरीला जातोय, याचे शल्य मनात होते. अखेरीस कुणीच काही करत नसले तरी आपण तरी आपल्याला जमेल तेवढे करावे, नागरिक म्हणून आणि पुरातत्त्वीय तज्ज्ञ म्हणूनही ते आपले कर्तव्य आहे, असे वाटले आणि म्हणून कामाला लागलो.
lp09मग लक्षात आले की, तपासी यंत्रणांना माहिती पुराव्यासह लागते. ते पुरवेही विशिष्ट पद्धतीने मांडणी केलेले असावे लागतात. म्हणून पुराव्यांची मांडणी त्या पद्धतीने केली. शिल्पकृतींचे तस्करी प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावरील होते. म्हणून प्रथम तस्करी झालेल्या शिल्पकृतींची माहिती भारतीय पुरातत्त्व खात्याकडून घेतली. त्याची यादी केली. पुरावे जोडले. मग पुरातत्त्वीय पुराव्यांची वेगळी यादी केली, असे सांगून डॉ. मनकोडी म्हणाले, आपण एकटे कुठे पुरे पडणार? मग तंत्रज्ञानाची मदत घ्यायचे ठरवले आणि http://www.plunderedpast.in  नावाचे संकेतस्थळ सुरू केले. भारतातून तस्करी झालेल्या शिल्पकृतींची पूर्ण माहिती या संकेतस्थळावर टाकली. त्यांची छायाचित्रेही सोबत दिली. उद्देश एकच होता की, जगभरात कुणालाही भारतातील शिल्पकृतींच्या तस्करीची माहिती मिळाली तर ती ताडून पाहण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय स्तरावर डेटाबेस उपलब्ध असावा.
‘‘खरे तर असा डेटाबेस तयार करणे हे सरकारचे काम आहे ना?’’ असा प्रश्न विचारता डॉ. मनकोडी सूचक हसतात आणि म्हणतात, आता मी केलाय की तयार हा डेटाबेस! केवळ हा डेटाबेस तयार करूनच ते थांबले नाहीत तर तो अपडेट करण्याचे कामही ते करतात. शिवाय आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमधूनही तस्करीच्या संदर्भातील विषय मांडून त्यावरही जनजागृती करण्याचे कामही ते करीत आहेत.
त्यांच्या जागरूकतेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शिल्पकृतींची तस्करी करणाऱ्या दलालांनी तर आता धसकाच घेतला आहे. अमेरिकेच्या गृहखात्यातील तपासी यंत्रणांचे काम पाहणाऱ्यांचीही आता त्यांच्या भेटीसाठी मुंबईवारी होत असते. तपास काम करणारी टीम त्यांची भेट घेऊन अधिक माहिती सातत्याने घेत असते. ही प्रकरणे एकामागोमाग एक उघडकीस आणल्यानंतर एका दलालाने स्वत:च त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याकडे आलेली मूर्ती ही नियत व्यापारातून आली, आपण तस्करी केलेली नाही. पण याची तस्करी झाल्याचे लक्षात आल्यानंतर आता ती स्वत:हून स्वखर्चाने परत करत असल्याची माहिती डॉ. मनकोडी यांना दिली. मात्र त्याच्या दुर्दैवाने तत्पूर्वीच अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने छापे घालून ती शिल्पकृती ताब्यात घेतली. राजस्थानातील एका मंदिराच्या पट्टीकेवरील मिथुन शिल्पेही अशीच अनुक्रमे २००९ सालच्या एप्रिल महिन्यात व सप्टेंबर महिन्यात गायब झाली. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे २०१० साली एका आंतरराष्ट्रीय मासिकात ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही कोटी अमेरिकन डॉर्लसना विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. ही जाहिरात पाहताच डॉ. मनकोडी यांना प्रकरण लक्षात आले. आता त्यांच्याच प्रयत्नाने आणि अमेरिकन प्रशासनाच्या सहकार्याने या शिल्पकृती परत येण्याच्या बेतात आहेत. एकटय़ा डॉ. मनकोडी यांच्यांच प्रयत्नाने भारतात येणाऱ्या या ठेव्याची किंमत आता अब्जावधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
‘‘अद्याप बराच ठेवा भारतात परत येणे बाकी आहे. हा आपला अमूल्य ठेवा आहे, तो परत यायलाच हवा. अखेरच्या श्वासापर्यंत हे काम निश्चितच करणार,’’ डॉ. किरीट मनकोडी सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निग्रह स्पष्ट दिसत असतो. याच त्यांच्या निग्रहाने भारतीय समाजासमोर त्यांच्या कर्तृत्वाने एक वेगळा आदर्श ठेवला आहे. समस्त भारतीय कायम त्यांचे ऋणी असतील, असे काम त्यांनी केले आहे, ते करत आहेत आणि करत राहतील!
विनायक परब