सिद्धार्थ खांडेकर

मर्यादित षटकांच्या क्रिकेटने या खेळाला पूर्णपणे वेगळी दिशा दिली. व्यावसायिक आयाम दिले. पण या क्रिकेटचा जन्म झाला काहीशा अपघाताने. योगायोग म्हणजे पहिला कसोटी सामना खेळवला गेला तो मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर. एकदिवसीय क्रिकेटचा जन्मही झाला, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरच!

क्रिकेटच्या खेळात जगज्जेते म्हणून मिरवता येते, ते केवळ आणि केवळ ५० षटकांच्या किंवा एकदिवसीय क्रिकेटच्या प्रकारामध्येच. नवीन सहस्रकात पहिल्या दशकात उत्तरार्धात टी-२० प्रकाराचा उदय झाला आणि काही वर्षांतच टी-२० क्रिकेटमुळे एकवेळ कसोटी क्रिकेट नव्हे, तरी एकदिवसीय क्रिकेट संपुष्टात येईल अशी भाकिते वर्तवली गेली. शास्त्रीय संगीताप्रमाणे कसोटी क्रिकेटचा एक अभिजात चाहता वर्ग असतो, शिवाय तीन-चार दिवस कसोटी सामना चालल्यामुळे गेट-रिसिट्स ते टीव्ही प्रक्षेपणादरम्यान जाहिराती अशा उत्पन्नाच्या विविध स्रोतांवर पाणी सोडण्यास कोणतेही मंडळ कधीही तयार होणार नाही. परंतु साडेसात तासांची गंमत साडेतीन तासांमध्ये आटोपती घेता आली, तर खर्च कमी होऊन उत्पन्नही कदाचित तितकेच किंवा अधिकच असे गणित मांडले जायचे. खरे तर क्रिकेटच्या अस्सल आणि निस्सीम चाहत्यांसाठी ५० षटकांचे क्रिकेट म्हणजे टी-२०मधील मारधाड क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधील नियोजनबद्ध आणि कौशल्यसज्ज क्रिकेटचा अप्रतिम मिलाफच. पाटा खेळपट्टय़ांवर पुचाट फलंदाजांकडून दर्जेदार गोलंदाजांचा घोर अपमान करून टाळ्या मिळवणाऱ्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये या खेळातील गांभीर्य आणि पावित्र्य अशा दोहोंचे तीनतेरा वाजतात हे वास्तव आहे. हल्ली टी-२० क्रिकेटच्या प्रभावाखाली येऊन ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांत ३५० ही धावसंख्याही असुरक्षित ठरू लागली आहे. पण समोरच्या फलंदाजाकडून तुडवले जातानाही किमान ५-६ आणि कमाल १० षटकांची संधी गोलंदाजांना मिळतेच ना? एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्ष्य निर्धारित करताना आणि लक्ष्याचा पाठलाग करताना नियोजनाची गरज भासते. सर्वच क्रिकेटपटूंकडे कसोटी क्रिकेटसाठी लागणारी एकाग्रता, सबुरी आणि तंदुरुस्ती असतेच असे नाही. पण किमान ७-८ तास हे गुण नक्कीच सादर करता येतात. ही सगळी जंत्री मांडायचे मुख्य कारण, मर्यादित षटकांच्या क्रिकेटला ५ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. सध्याच्या करोनाग्रस्त परिप्रेक्ष्यात या महत्त्वाच्या वाटचालबिंदूचे विस्मरण होणे तसे साहजिकच. मर्यादित षटकांच्या क्रिकेटने या खेळाला पूर्णपणे वेगळी दिशा दिली. व्यावसायिक आयाम दिले. पण या क्रिकेटचा जन्म झाला काहीशा अपघाताने. योगायोग म्हणजे पहिला कसोटी सामना खेळवला गेला तो मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर. एकदिवसीय क्रिकेटचा जन्मही झाला, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरच! १९७१मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते.. साक्षात सर डॉन ब्रॅडमन! त्यांचे पहिल्यावहिल्या एकदिवसीय सामन्याविषयीचे उद्गार होते.. ‘आपण एका ऐतिहासिक बदलाचे साक्षीदार आहोत!’

मर्यादित षटकांचे क्रिकेट ही त्यावेळी नवलाई नव्हती. क्रिकेटची जन्मभूमी असलेल्या इंग्लंडमध्ये प्रत्येकी ६५ षटकांची जिलेट कप स्पर्धा साठच्या दशकाच्या उत्तरार्धात खेळवली जायची. रविवारी खेळवले जाणारे हौशी मंडळींचे सामने मर्यादित षटकांचेच खेळवावे लागत. शिवाय कंटाळवाण्या पारंपरिक कौंटी सामन्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली होती, त्यामुळे इंग्लिश प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांचा प्रयोग सुरू झालेलाच होता. जिलेट कप स्पर्धेतील पहिला सामना १९६३मध्ये खेळवला गेला होता. ऑस्ट्रेलियामध्येही १९६९मध्ये तेथील प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांचा प्रयोग झाला होता. तो तुफान लोकप्रिय ठरला होता. तरीदेखील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय किंवा मर्यादित षटकांच्या सामन्याचा जन्म मात्र नाटय़मयरीत्या, पूणपणे अनपेक्षित, अनियोजित असा झाला. सात (!) कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ मालिकेसाठी इंग्लंडचा संघ १९७०-७१मध्ये ऑस्ट्रेलियात गेला होता. तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ३१ डिसेंबर १९७० ते ४ जानेवारी १९७१ (त्या काळी एक दिवस विश्रांतीचा असायचा) दरम्यान खेळवला जायचा होता. परंतु त्या सामन्यात पहिले तीन दिवस पावसाने वाया गेले. त्यामुळे सामनाच रद्द झाला. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळापुढे गंभीर आर्थिक पेच उभा राहिला. जवळपास ८० हजार पौंडांचा (त्या वेळचे) फटका बसणार होता.

ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश क्रिकेट मंडळांनी मिळून एक तोडगा काढला आणि आणखी एक कसोटी सामना मालिकेत खेळवण्याचा निर्णय झाला. जिलेट कपसदृश एक ४० षटकांचा मर्यादित सामना खेळवण्याचे ठरले. या सामन्यासाठी तब्बल ४४ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली आणि हा प्रकार मानवल्याचा पुरावाच दिला. मात्र, यातही एक अडचण उभी राहिलीच. इंग्लिश क्रिकेटपटूंनी अतिरिक्त मानधनाची मागणी केली. ड्रेसिंगरूममध्ये प्रचंड गोंधळ झाला, असे माजी क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले. बहुतेक इंग्लिश क्रिकेटपटू या निर्णयाविषयी नाराज होते. त्या काळात तसेही कसोटी मानधन कमीच मिळत होते. शिवाय काही दिवस नुसते ड्रेसिंगरूममध्ये काढल्यानंतर अचानक खेळण्यासाठी उतरायचे याला अनेकांची तयारी नव्हती. काहीशा नाखुशीनेच इंग्लिश क्रिकेटपटू मैदानात उतरले. ती नाखुशी आणि अनिच्छा त्यांच्या खेळातही दिसून आली. इंग्लिश फलंदाज जॉन एड्रिच त्या सामन्यात चमकले (त्यांचे अलीकडेच निधन झाले). पण ते वगळता (११९ चेंडूंमध्ये ८२) बाकीच्यांना छाप पाडता आली नाही. ३९.४ षटकांत इंग्लिश संघ १९० धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने ३४.६ षटकांत पाच गडी राखून ते लक्ष्य पार केले. इयन चॅपेल (६०), डग वॉल्टर्स (४१ ), ग्रेग चॅपेल (२२) यांनी धावा केल्या. एड्रिच सामनावीर ठरले. इंग्लिश क्रिकेटपटूंच्या नाराजीची नोंद घेऊन त्यांना प्रत्येकी ५० पौंड मानधन अतिरिक्त दिले गेले. एड्रिच यांना १०० पौंड मिळाले! या सामन्याची नोंद ‘एकदिवसीय कसोटी सामना’ अशी सुरुवातीला केली गेली होती. वर्षभराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या सामन्याला पहिला एकदिवसीय सामना अशी मान्यता दिली.

ऑस्ट्रेलियात या सामन्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. तिकडे इंग्लंडमध्ये ‘द गार्डियन’सारख्या पारंपरिक पत्रानेही ‘एकदिवसीय कसोटी क्रिकेट’ टिकणार आणि वाढणार असे भाकीत वर्तवले. पुढील चार वर्षांतच महिला क्रिकेटपटूंचा (१९७३) आणि पुरुष क्रिकेटपटूंचा (१९७५) विश्वचषक भरवण्यापर्यंत एकदिवसीय क्रिकेटची मजल पोहोचली. १९७७मध्ये केरी पॅकरच्या ‘सर्कस क्रिकेट’ला अधिकृत मान्यता मिळाली आणि एकदिवसीय क्रिकेटला नवा ‘रंग’ मिळाला. तरीही रंगीत पोशाखातील सामने बरीच वर्षे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपुरतेच मर्यादित होते. पहिल्या चार विश्वचषक स्पर्धा पारंपरिक पांढऱ्या पोशाखांतच खेळवल्या गेल्या हे सर्वज्ञात आहेच. रंगीत पोशाखांतील पहिला विश्वचषकही ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये खेळवला जाणे हा योगायोग नव्हताच.

भारतात मर्यादित षटकांच्या क्रिकेटविषयी फारसे आकर्षण नव्हतेच. ७०च्या दशकात आपण दुय्यम संघ उतरवतो असे आपल्याला वाटायचे, तर आपला संघच दुय्यम आहे याविषयी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये बहुतांना खात्री वाटे! १९८३चा विश्वचषक एकूणच भारतीय क्रिकेट, जागतिक क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटला कलाटणी देणारा ठरला. या प्रकारात केवळ प्रस्थापित, बलाढय़ संघच नव्हे, तर इतरही संघ जिंकू शकतात असा विश्वास त्या विजयामुळे क्रिकेटपटूंना, क्रिकेटरसिकांना, विश्लेषकांना, पुरस्कर्त्यांना मिळाला. यानंतरचे तिन्ही विष्टद्धr(२२४)वचषक – १९८७ (ऑस्ट्रेलिया), १९९२ (पाकिस्तान), १९९६ (श्रीलंका) – दावेदार न मानल्या गेलेल्या संघांनी जिंकले आणि एकदिवसीय क्रिकेटमधील अनिश्चिततांविषयीचे आकर्षण अधिकच वाढले. २०१९मध्ये झालेला इंग्लंड-न्यूझीलंड अंतिम सामना एकदिवसीय क्रिकेटमधील रंगतीची परिसीमा ठरला. त्यामुळेच आजही एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व आणि लोकप्रियता कमी झालेली नाही. टी-२० क्रिकेटला गांभीर्याने घेतले जात नाही आणि कसोटी क्रिकेटचे आस्वादक घटत आहेत, या पार्श्वभूमीवर कोटय़वधींचा महसूल मिळवणारा प्रकार ५० षटकांचे सामने हाच आहे. ५० षटकांच्या क्रिकेटच्या पन्नाशीनिमित्त हे पुन्हा एकदा सांगावे लागेल.

response.lokprabha@expressindia.com