News Flash

राशिभविष्य : २६ मार्च ते १ एप्रिल २०२१

लाभ स्थानातील बुध नेपच्यूनच्या युतीयोगामुळे नव्या संकल्पनांचा विचार कराल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष लाभ स्थानातील बुध नेपच्यूनच्या युतीयोगामुळे नव्या संकल्पनांचा विचार कराल. विचारांवर आणि रागावर योग्य नियंत्रण ठेवाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे पुढे जावे लागेल. अट्टहास दूर ठेवलात तर आपली प्रगती होईल. सहकारी वर्गाला कामाच्या नव्या स्वरूपाबद्दल मार्गदर्शन कराल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याच्या कार्यक्षेत्रात  नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांच्या शिक्षणाबाबतचे प्रश्न हळुवार सोडवाल. डोकेदुखीचा त्रास वाढेल. पित्तावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ चंद्र मंगळाच्या केंद्रयोगामुळे चंद्राची चंचलता, उमेद आणि मंगळाचा उत्साह, ऊर्जा यांचा चांगला मिलाफ बघायला मिळेल. नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या मदतीने आणि पाठिंब्याने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. कष्टाचे सार्थक होईल. सहकारी वर्गासह काही प्रमाणात तडजोड करावी लागेल. जोडीदाराच्या कामातील अडचणी तो हिमतीने दूर करेल. मुलांच्या कार्यात वा शिक्षणात प्रगती होईल. खांदे व डोळे यांची विशेष काळजी घ्यावी.

मिथुन चंद्र गुरूच्या नवपंचम योगामुळे अचानक लाभ होईल. कामावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. ओळखीच्या व्यक्तीकडून मदतीचा हात मिळेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. कामातील बारकावे चोखपणे हाताळाल. सहकारी वर्गाकडून अनपेक्षितपणे धक्कादायक बातमी मिळेल. जोडीदाराचे अनुभव त्याला नव्या गोष्टी शिकवतील. मुलांची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. उष्णतेचे विकार होतील. वेळेवर काळजी घेणे आवश्यक! वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कर्क चंद्र शनीच्या लाभ योगामुळे मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कामातील सातत्य कायम राहील. हाती घेतलेले काम उत्साहाने  पूर्ण कराल. नोकरी व्यवसायात कडक नियम लागू होतील. त्यांचे पालन करावे लागेल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या मेहनतीचे चीज होईल. कुटुंबाला त्याचा आधार वाटेल. मुलांच्या समस्या चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सांधेदुखी तसेच रक्ताभिसरण संस्थेसंबंधित त्रास उद्भवतील. वैद्यकीय औषधोपचार घ्यावा.

सिंह चंद्र हर्षलच्या नवपंचम योगामुळे  चंद्राची कृतिशीलता आणि हर्षलाचा वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यात सुसूत्रता निर्माण होईल. नावीन्याची आस धराल. नोकरी व्यवसायात संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवाल. जोडीदाराची बौद्धिक पातळी विकसित होईल. त्याचा सल्ला उपयुक्त ठरेल. आपला हेका चालवू नका. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंब सदस्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील. फुप्फुसे आणि आतडी यांचे आरोग्य जपावे लागेल. पथ्यं पाळावीत.

कन्या रवी चंद्राच्या समसप्तम योगामुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. अपेक्षित व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. आपल्या मताचा मान ठेवला जाईल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नव्या समस्यांना हिमतीने तोंड द्याल. सहकारी वर्गाला मदत करण्याची संधी मिळेल. जोडीदारासह चांगले नाते निर्माण होईल. समजुतीने घ्याल. नातेवाईकांकडून समाधानकारक प्रतिक्रिया मिळतील. कफ आणि वातविकार बळावतील. योग्य आहार आणि व्यायाम  आवश्यक !

तूळ भावनांचा कारक चंद्र आणि अंत:स्फूर्तीचा कारक नेपच्यून यांच्या समसप्तम योगामुळे नेहमीच्या कामाला थोडे वेगळे स्वरूप द्याल. उत्साह वाढेल. गरजूंना मदतीचा हात द्याल. नोकरी व्यवसायात अनेक समस्यांची उत्स्फूर्तपणे उत्तरे मिळतील. सहकारी वर्गाला चांगले मार्गदर्शन कराल. जोडीदारासह वाद टाळा. त्याच्या कार्यक्षेत्रातील हितशत्रूंचा त्रास वाढेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा अभिमान वाटेल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक शुक्र शनीच्या लाभ योगामुळे शुक्राच्या अतिउत्साहाला आणि चंचल स्वभावाला शनीच्या शिस्तीचा व सातत्याचा लगाम बसेल. नोकरी व्यवसायात नव्या गोष्टी शिकण्याची संधी उपलब्ध होईल. या संधीचे सोने कराल. वरिष्ठांच्या पाठबळामुळे आत्मविश्वास वाढेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठी भरारी घ्याल. जोडीदार आपले कर्तृत्व उत्तमप्रकारे पार पाडेल. मुलांचे वैचारिक गोंधळ दूर कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. घशाची जळजळ होईल. त्वचेला खाज सुटेल.

धनू शनी चंद्राच्या नवपंचम योगामुळे कामावर लक्ष केंद्रित कराल. वेळेची बंधने पाळाल. नोकरी व्यवसायात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जबाबदारीने वागाल. वरिष्ठांचे आदेश तंतोतंत पाळावे लागतील. यातच आपले हित आहे.  सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा व्यर्थ ठरेल. स्वावलंबनाचा अवलंब कराल. जोडीदाराची समर्थ साथ मिळेल. त्याचा सल्ला उपयोगी ठरेल. मुलांबाबतचा कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. उष्णतेचे विकार बळावल्यास घरगुती उपाय करावेत.

मकर चंद्र गुरूच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या कुतुहलाला गुरूच्या ज्ञानलालसेची जोड मिळेल. नव्या गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामानिमित्त प्रवास कराल. सद्य:परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी लागेल. सहकारी वर्गाला मदत कराल. त्यांच्यातील तंटे सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. मुलांना आपली मते मांडण्याची संधी द्यावी. खांदा, पोटरी यांतील शीर दबल्यामुळे हालचालींवर प्रतिबंध येतील. योग्य व्यायाम आवश्यक !

कुंभ चंद्र बुधाच्या समसप्तम योगामुळे चंद्राची मानसिकता आणि बुधाचा व्यावहारिकपणा यांच्यात योग्य सांगड घालाल. सद्य:स्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून बघाल. इतरांच्याही भल्याचा विचार कराल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. कामाला गती येईल. आत्मविश्वास वाढेल. सहकारी वर्गापुढे पेच उभा राहील. जोडीदाराच्या कामाचे आणि कष्टाचे सार्थक होईल. कुटुंबाची आर्थिक बाजू सावरून धराल. मुलांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक कराल. उत्सर्जन संस्थेचे त्रास भेडसावतील.

मीन चंद्र शुक्राच्या समसप्तम योगामुळे कलात्मक दृष्टीने विचारांना नवी चालना मिळेल. आपल्यावर मोठय़ांच्या विचारांचा पगडा बसेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक पावले उचलाल. सहकारी वर्गाच्या मदतीने कामे वेळेत पूर्ण कराल. जोडीदाराच्या कामातील अडथळे शांत डोक्याने दूर करावे लागतील. मुलांच्या सामंजस्याचे कौतुक वाटेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना आधार द्याल. कामाच्या व्यापामुळे अंगदुखी , डोकेदुखी यांचा त्रास वाढेल. औषधोपचार घ्यावा. दुर्लक्ष करू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 1:56 pm

Web Title: astrology 26th march to 1st april 2021 rashibhavishya dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १९ मार्च ते २५ मार्च २०२१
2 राशिभविष्य : दि. १२ ते १८ मार्च २०२१
3 राशिभविष्य : दि. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२१
Just Now!
X