सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी आणि मंगळ या ऊर्जादायक ग्रहांच्या षडाष्टक योगामुळे अडचणी, अडथळे पार करण्यात आपली शक्ती खर्ची पडेल. नोकरी-व्यवसायात कामे लांबणीवर जातील. वरिष्ठांना त्याबद्दल कारणे सांगावी लागतील. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावेल. त्याचे श्रेयही त्याला मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. घरातील ज्येष्ठांचा आधार वाटेल. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. डोळ्यांची जळजळ होईल. पित्त आणि अपचनाचा त्रास संभवतो.

वृषभ चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे एकंदर उत्साह वाढेल. कामामध्ये कल्पकता आणि नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी बरीच मेहनत घ्याल. सहकारी वर्गाच्या अडचणी व्यवस्थापकांपुढे प्रभावीपणे मांडाल. जोडीदार त्याच्या कार्यात खूपच व्यस्त असेल. एकमेकांना समजून घेऊन कुटुंबाला आधार द्याल. पुरेसे पाणी पिणे हिताचे ठरेल. अन्यथा त्वचा व आतडी यांचे त्रास सहन करावे लागतील.

मिथुन मनाचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध यांच्या युती योगामुळे  व्यवहार आणि भावना यांना समानतेने वागवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे पटणार नाही. सहकारी वर्गाच्या मदतीने महत्त्वाच्या मुद्दय़ावर अभ्यासपूर्वक विचारविनिमय कराल. जोडीदाराशी सूर चांगले जुळतील. त्याचे स्वप्न साकार होईल. उष्णतेचे त्रास बळावतील. मूळव्याध, भगिंदर यांसारखे आजार अंगावर काढू नका. मित्रांकडून आनंदवार्ता समजतील.

कर्क चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे चंचलता आणि भावनिकता वाढेल.  नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अधिकारापुढे आपल्या शब्दाला किंमत मिळणार नाही. सहकारी वर्ग आपल्या बाजूने उभा राहील. जोडीदाराच्या कार्यात अनेक अडचणी येऊन त्याची कामे लांबणीवर पडतील. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला उशिराने मिळेल. कौटुंबिक वातावरण बरे राहील. मुलाबाळांच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. तणावामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता!

सिंह चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे नव्या जोमाने कामकाजात लक्ष घालाल. अधिकाराची योग्यरीत्या अंमलबजावणी कराल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या जबाबदारीवर महत्त्वाचे निर्णय घ्याल. सहकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. त्यांच्या सूचनांचा जरूर विचार करावा. जोडीदाराला आपला आधार आवश्यक वाटेल. कुटुंबातील सदस्य कामानिमित्त लहान-मोठा प्रवास करतील. पाठीचा मणका आणि गुडघ्यांवर अतिरिक्त ताण देऊ नका.

कन्या शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला आणि उत्सुकतेला शनीच्या जिज्ञासू वृत्तीची जोड मिळेल. मेहनत घेण्याची तयारी असल्यास यशाचा मार्ग दिसेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मर्जीनुसार कामात बदल घडवून आणाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. कुटुंब सदस्यांची आर्थिक जबाबदारी वाढेल. मित्रमंडळींकडून शुभ वार्ता समजतील. आपले छंद जोपासताना समाजाचे ऋण फेडाल. गुडघे व इतर सांधे यांचे आरोग्य सांभाळा.

तूळ गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे रोजच्या कामाच्या स्वरूपात थोडेफार बदल करून त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाला वेळेची मर्यादा देऊन त्यांच्याकडून कामे करवून घ्यावी लागतील. हलगर्जीपणा महागात पडेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचे वर्चस्व वाढेल. कुटुंबात शिस्तीसह प्रेमाचीही गरज भासेल. दंड दुखणे, खांदा आखडणे  यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत.

वृश्चिक रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे हाती घेतलेल्या कामात यश येईल. गरजवंतांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा योग्य उपयोग कराल. अन्यायाला वाचा फोडाल. सहकारी वर्गाला चुका सुधारण्याची संधी द्याल. जोडीदाराला त्याच्या कामात चांगले यश मिळेल. त्याच्या मेहनतीचे चीज होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आवडीच्या क्षेत्रात काम कराल. मोठी आर्थिक उलाढाल करू नका. पित्त प्रकोप होईल. डोकेदुखी आणि अपचनाचा त्रास संभवतो.

धनू चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नव्या कामात मनापासून रंगून जाल. प्रयत्नांना यश मिळेल. नोकरी-व्यवसायात फायद्या-तोटय़ाचा लेखाजोखा विचारात घेऊन पुढील पावले टाकाल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराला त्याच्या कामातील अडचणींवर मात करून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले  राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करावा. उत्सर्जन संस्थेसंबंधित तक्रारी अंगावर काढू नका.

मकर चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे कामाचा व्याप लीलया सांभाळाल. आखणी, मांडणी व सादरीकरण यशस्वीरीत्या पार पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. आर्थिक गणिते नव्याने मांडावी लागतील. सहकारी वर्गाचे योगदान वाखाणण्याजोगे असेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी करणे आवश्यक! सामंजस्याने प्रश्न सोडवावे. कोरडय़ा त्वचेची विशेष काळजी घ्यावी. वैद्यकीय उपचार घेण्यास दिरंगाई नको.

कुंभ चंद्र-नेपच्यून या भावनाप्रधान ग्रहांच्या नवपंचम योगामुळे समाजोपयोगी कार्य  घडेल. संशोधन कार्यात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात नवे करार करताना सर्व दृष्टीने विचार करणे आवश्यक! जोडीदार कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्यप्रकारे पार पडेल. एकमेकांवर असलेला विश्वास कामी येईल. कुटुंब सदस्यांना शिस्तीचे धडे द्यावेत. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. सद्यस्थितीचे भान ठेवावे. छाती व ओटीपोटाचे दुखणे दुर्लक्षित करू नका.

मीन गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे प्रयत्नांना यश मिळेल. नव्या कार्यक्षेत्रात प्रवेश कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्या.  आपले मुद्दे अभ्यासपूर्वक मांडावेत. सहकारी वर्गाची मेहनत व चिकाटी उल्लेखनीय असेल. त्यांना त्याचे श्रेय द्याल. जोडीदारावर त्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त जबाबदारी येऊन पडेल. कुटुंब सदस्यांच्या व्यवहारचातुर्यामुळे अडचणीतून सहीसलामत बाहेर पडाल.