भूतान हा आनंदी लोकांचा देश. परंपरा जपणारा, नवतेची ओढ असणारा. धार्मिक पगडा असला तरी त्याचे अवडंबर न करणारा. निसर्गसंपन्न, स्वच्छता, देशप्रेम ही मूल्ये जपणारा. प्रत्येकाने भूतानला एकदा तरी भेट द्यायलाच हवी असा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बरेच दिवसांपासून भूतानला जाण्याचा विचार करीत होतो. शेवटी एकदाचे ठरले. सर्वानी जोयगाव येथील हॉटेलमध्ये भेटायचे ठरले. एकंदर १२ जण जाणार होतो. सर्वजण दुपापर्यंत एकत्र झाले. संध्याकाळपर्यंत सर्वाचे प्रवेश परवाने आलेत. उद्या सकाळी साडेआठ वाजता निघायचे ठरले.
सकाळी बरोबर साडेआठला गाडी आली, परंतु ड्रायव्हर गायब. कोणी म्हणाले न्याहारीला गेला, कोणी म्हणाले पोट दुखत असल्यामुळे औषध आणायला गेला. सव्वानऊला तो एक बासमती तांदळाचे पोते घेऊन आला. ते पोते त्याला भूतानला न्यायचे होते.
जोयगावला लागून भूतानची सीमा आहे. मोठय़ा ‘भूतान गेट’मधून फुन्शोलिंगमध्ये प्रवेश केला. गेटच्या दोन्ही बाजूला ड्रॅगन होते. भूतानमध्ये त्यांना फार महत्त्व आहे. भूतानची भाषा आहे, डोंग्खा. तिच्यामध्ये द्रुक म्हणजे थंडर ड्रॅगन. भूतानच्या राष्ट्रीय ध्वजावर तो समृद्धीचे प्रतीक म्हणून हिऱ्यामाणक्यांसह आहे.
पहिला मुक्काम होता पारो इथे, ते समुद्रसपाटीपासून ७ हजार ४०० फुटांवर आहे. प्रवासाला सुमारे सात तास लागतात. वाटेत चुखा धरणाजवळ थांबून दुपारचे जेवण घेतले. तेथील हायड्रो इलेक्ट्रिक प्लान्ट फार जुना आहे. त्याची क्षमता ३०० मेगावॅट आहे. तयार झालेली वीज पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडला निर्यात होते. पारो येण्यापूर्वी एका ठिकाणी थांबलो, तेथून विमानतळाचा देखावा फार छान दिसत होता. हे भूतानमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
संध्याकाळी पारोला पोहोचलो. लगेच बाजारात फेरफटका मारून आलो. पारो शहर खूप शांत, नीटनेटके व स्वच्छ आहे. संपूर्ण प्रवासात रस्ते खूप स्वच्छ व चांगले होते. काही ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. तेथे सर्व वाहने अगदी शिस्तीत उभी होती. कोणीही लाईन तोडली नाही आणि तेही पोलिसांची उपस्थिती नसताना.
सोनेरी- हिरवी तांदळाची शेते, नियोजनबद्ध रस्ते, घरे ह्यमुळे फार प्रभावित झालो. थोडावेळ फिरल्यावर एका हॉटेलमध्ये जेवावयास गेलो. तेथे एका शाळेच्या फुटबॉल कोचला निरोप देण्याचा कार्यक्रम होता. तरीही त्यांनी आम्हाला परतवून लावले नाही. आदरपूर्वक सोफ्यावर बसवून घेतले व चहा दिला. विद्यार्थ्यांची त्यांच्या कोचबद्दलची भावना ऐकून खूप बरे वाटले. हॉल खूप छान सजविला होता. वातावरण अगदी जिवंत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळे इंग्रजीमध्ये बोलत होते. त्यांच्या डोंग्खा भाषेत कोणीही बोलले नाही. कार्यक्रमात आम्ही परके असूनही आमची योग्य दखल घेण्यात आली. लॉजवर आलो तर थकलेलो, पण समाधानी होतो.
सकाळी सुभाष राय नावाचा
२३ वर्षांचा मुलगा गाईड म्हणून आला. हसऱ्या चेहऱ्याचा सुभाष पुढील पाच दिवस आमच्या सोबत होता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कदाचित मी देऊ शकणार नाही, पण मी आपले समाधान करण्याचा जरूर प्रयत्न करीन असे तो म्हणाला. सर्व भूतानी युवकांप्रमाणे तोसुद्धा सलमान खानचा चाहता होता. सलमानचा फोटो त्याच्या व्ॉलेटमध्ये होता.
प्रथम आम्ही द्रुकगेल ड्रोंगला गेलो. डोंग्खा भाषेत ड्रोंग म्हणजे किल्ला. प्रवेशद्वाराजवळ एक सुरेखसे प्रार्थना चक्र (ढ१ं८ी१ हँी’) होते. एक वृद्ध महिला ते फिरवीत होती. येथील टेहळणी टॉवर १७ व्या शतकात शब्द्रुंग नामग्याल ह्यनी बांधले होते. १९५१ मध्ये येथे भीषण आग लागली होती, त्यात हा किल्ला जळून भस्मसात झाला.
नंतरचे ठिकाण तक्त्संग मोनॅस्ट्री. त्याच्या बेस कॅम्पला आम्ही आलो. हे भूतानमधील एक पवित्र स्थान आहे. हे नवव्या शतकात गुरू पद्मसंभव किंवा गुरू रिनपोचे यांनी बांधले होते. बुद्धाला भूतानमध्ये आणण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. अशी श्रद्धा आहे की गुरू तिबेटहून ह्य ठिकाणी वाघावर बसून हवेतून उडत येथे आले होते. असेही सांगितले जाते की, तिबेटच्या राजाची बायको गुरूंची शिष्या झाली. तिने वाघिणीच्या रूपात गुरूंना पाठीवर बसवून येथे आणले होते. येथील एका गुहेत राहून गुरूंनी साधना केली होती, म्हणून ही जागा पवित्र झाली. बेस कॅम्पच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. तिथे रंगीत नेकलेस, ओमेट दागर, मुखवटे, काही जुन्या वस्तू ठेवल्या आहेत. या मोनॅस्ट्रीला भेट देण्यासाठी साधारण सहा तासांचा ट्रेक करावा लागतो.
पुढे आम्ही कायचू लाखंग येथे आलो. येथे दोन मंदिरे आहेत. एक सातव्या शतकात तिबेटी राजाने बांधले व दुसरे १९८८ मध्ये भूतानच्या राजाच्या आईने बांधले. येथून निघताना आम्ही दोन धर्मगुरूंशी बातचीत केली.
नंतर भूतानमधील ता ड्रोंग या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली. २०१२ साली झालेल्या भूकंपात ते उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर समोर दुसरी इमारत बांधून त्यात संग्रहालयातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. आतमध्ये फोटोग्राफीला मनाई आहे.
पारोमधील आमचे शेवटचे ठिकाण पारो ड्रोंग किंवा रिंपुंग. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर छान पेंटिंग आहे. किल्ल्यात एका बाजूला मॉनेस्ट्री तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय व न्यायिक व्यवस्था आहे. धार्मिक व प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी चालतात हे पाहून आश्चर्य वाटले. ही वास्तू खूप विलोभनीय आहे. शेजारून पोचू नदी शांतपणे वाहते. या ठिकाणी आम्ही एका मॉन्कच्या हातात हंटर पाहिला. बुद्ध धर्म आणि हंटरने शिक्षा ह्य दोन्ही गोष्टी एकत्र बघून आश्चर्य वाटले. पहाडावर आम्ही बर्फ बघितला आणि पोचू नदीच्या पाण्यात पाय टाकून शांत बसण्याची इच्छा झाली. बर्फाच्या थंड पाण्यामुळे दिवसभराचा थकवा नाहीसा झाला.
दुसऱ्या दिवशी पुनाखासाठी निघालो. वाटेत दोचुला येथे थांबलो. येथे राजाच्या आईने १०८ स्तूप बांधल्याचे कळले. उल्फा ह्य संघटनेशी झालेल्या चकमकीत ज्या शिपायांना वीरमरण आले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे बांधले आहेत. परिसर चोहोबाजूंनी पहाडांनी वेढलेला आहे.
पुढचा स्टॉप पुनाखा ड्रोंग, जे दोन नद्यांच्या संगमावर आहे. पोचू म्हणजे वडील किंवा पुरुष नदी आणि मोचू म्हणजे आई किंवा स्त्रीनदी. पुरुषनदीला खळखळाट जास्त व स्त्रीनदीला कमी असे स्पष्टीकरण सुभाषने दिले.
पुनाखा ही १९५५ पर्यंत भूतानची राजधानी होती नंतर तिम्फू राजधानी झाली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल ह्यंचे लग्न जेत्सुम पेमा हिच्याची १३ ऑक्टोबर २०११ साली येथेच झाले.
यानंतर आम्ही वंदी (हंल्ल्िर) ला आलो. येथे मुक्काम केला. येथून तिम्फूला जाताना वेळ आम्ही त्सेचू फेस्टिव्हल व त्या निमित्ताने नाच पाहिला. त्सेचू हा भूतानमधील मोठा उत्सव आहे. संपूर्ण भूतानमध्ये हा साजरा केला जातो. ह्या प्रसंगी परिधान केलेली विविध वस्त्रे व मुखवटे, पद्मसंभव व अन्य संतांच्या जीवनावरील प्रसंगावर आधारित आहेत. पद्मसंभवाने तिबेटला आठव्या शतकात व भूतानला नवव्या शतकात भेट दिली होती. त्सेचू फेस्टिव्हल पद्मसंभवाने सर्वप्रथम बुम्थांग येथे आयोजित केला होता. येथे त्याने विविध प्रकारची आठ नृत्ये सादर केली होती. त्सेचू आता फार मोठा सामाजिक मेळावा झाला आहे. दूरवर पसरलेल्या खेडय़ामधील लोकांमध्ये यामुळे एक सामाजिक बांधिलकी जाणवते. मोठा व्यापार त्या निमित्ताने होतो. सर्वाचा एकसारखा पोषाखपाहून फार कौतुक वाटते. पुरुषांच्या पोशाखास ‘घो’ तर महिलांच्या पोशाखास ‘कीरा’ म्हणतात.
संध्याकाळी आम्ही तिम्फूला पोहोचलो. वाटेत दोन ठिकाणे पाहिली. एक राष्ट्रीय मेमोरिअल चोएतेन. हे तिसऱ्या राजाच्या आईने बांधले. अशी ख्याती आहे की येथे एक अद्भुत शक्ती आहे, तिच्या प्रभावामुळे मंदिरावरील पिनाकॅल उडून जाऊ नये म्हणून ते चारही बाजूच्या पिलरला बांधून ठेवले आहे. वास्तू एकदम शांत आहे, फक्त वाजणाऱ्या घंटीमुळे काय ती शांतता भंग पावते. त्यामुळेच कदाचित राणीने आपल्या मुलासाठी बांधले असावे.
दुसरे ठिकाण साक्यामुनी बुद्धाची १३८ फूट उंचीची भव्य मूर्ती. ती पर्वतावर विराजमान आहे. २००७ साली साम्राज्याला २०० वर्षे पूर्ण झाली, त्याच्या स्मरणार्थ हे बांधकाम सुरू आहे. त्यावरून पर्वतराजीने वेढलेल्या थिम्फू शहराचे मनोहारी दर्शन होते.
येथील वास्तवात कळले की १९ व्या शतकापासून वान्गचुक राजवट सुरू आहे. सध्याचा राजा जिग्मे खेसर नामग्याल पाचवा राजा आहे. ह्यचे वडील सर्वात जास्त प्रगतिशील होते. त्यांनी १९५३ साली नॅशनल असेम्ब्लीची स्थापना केली. १९९८ साली लोकांनी निवडून दिलेल्या कौन्सिल ऑफ मिनिस्टरला प्रशासनिक अधिकार आहेत. राजावर अविश्वास ठराव व्यक्त करण्याची पद्धत त्याने सुरू केली.
सर्वात महत्त्वाचा लँडमार्क म्हणजे ताशीच्हो दझोंग. आम्ही येथे त्सेचू महोत्सव पाहिला. येथे इमारतीत भूतानच्या राजाची कार्यालये आहेत. केंद्रीय सचिवालयही येथेच आहे.
पुढे आम्ही टेकडीवर विविध इमारती बघितल्या, ज्यात सध्याच्या राजाचे राहण्याचे ठिकाण होते. स्थानिक बाजारातील हस्तकलेच्या वस्तू छान होत्या. लोक त्सेचू महोत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये होते. त्यांना तीन दिवसांची सुट्टीही होती.
२००८ साली बांधलेले फुटबॉल स्टेडियम पाहून आम्ही फुन्शोलिंगसाठी रवाना झालो. वाटेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी भेटल्या. त्यांना आम्ही लिफ्ट दिली. त्या नैसार्गिक संसाधन विषयात पुनाखा येथे शिकत होत्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यंच्या भूतान भेटीमुळे त्या फार प्रभावित झाल्या होत्या. भारताविषयी त्यांची उत्सुकता वाढली होती. पुढील शिक्षण भारतात घेण्याची त्यांची इच्छा होती.
भूतान हा आशियामधील सर्वात आनंदी देश आहे. (ऌंस्र्स्र््री२३ उ४ल्ल३१८ ्रल्ल अ२्रं). आनंदी देशांमध्ये जगात भूतानचा आठवा नंबर आहे. आम्ही गाईडला विचारले की हे कसे काय शक्य आहे? तो म्हणाला की येथे लोकांच्या संपत्तीमध्ये बरीच समानता आहे. येथे आम्हाला एकही भिकारी दिसला नाही. कारण एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल तर तो राजाकडे जातो व राजा त्याला मदत करतो. भूतानमध्ये गरिबी आणि श्रीमंतीमधील अंतर बरेच कमी आहे. येथे आरोग्य व शिक्षण सेवेत बरीच प्रगती दिसून येते. वातावरण स्वच्छ आहे. जंगलाची अवस्था उत्तम आहे. प्रदूषण नाहीच. स्वच्छतेबद्दल लोक जागरूक आहेत. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार नाहीत. धूम्रपान नाही. खासगी जागेतसुद्धा धूम्रपानास परवानगी घ्यावी लागते. सिगारेट, बिडी, तंबाखूचे सेवन ठरावीक मात्रांमध्ये घेता येते. लोकांचे त्याच्या संस्कृतीवर प्रेम आहे. राष्ट्रीय पोषाख व प्रथा ह्यंचा त्यांना अभिमान आहे. येथील तरुण वर्गाशी बोलण्याची संधी मिळाली. जीवनाबाबत त्यांच्या कल्पना स्पष्ट आहेत. धर्माचा फार मोठा पगडा त्यांच्यावर आहे. धर्माच्या विकासासाठी सरकारचीसुद्धा फार मोठी मदत होते, राजकीय व आर्थिकसुद्धा. धर्मामुळे त्यांच्या जीवनात एक प्रकारचा समतोल जाणवतो. सध्याच्या जगातील इंटरनेट, केबल टीव्ही, सेलफोन, आधुनिक तांत्रिक उपकरणे व कल्पना भूतान लोकांच्या जीवनाचा भाग बनले आहे. परंतु संस्कृतीचे मूल्यजतन व पर्यावरणाचे संरक्षण ह्यला ते प्राधान्य देतात. राजेशाहीपासून लोकशाही स्थलांतर अगदी सहज झाल्याचे जाणवते. लोकांच्या भल्यासाठी स्वत:चे अधिकार कमी करण्यात राजाने पुढाकार घेतलेला दिसतो. देशातील लोक सर्वाधिक आनंदी कसे होतील ह्यचा ध्यास तेथील राजाने घेतला आहे. भूतानला जो कोणी भेट देतो त्याच्याही आनंदात निश्चितच वाढ होते.
प्रदीप जोशी – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व ट्रॅव्हलॉग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhutan
First published on: 07-08-2015 at 01:05 IST