scorecardresearch

क्रीडा : गोल्डन बॉयची विश्वभरारी

लीड्स येथे झालेल्या वेळेआधारित जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणीने बाराव्या जेतेपदाची कमाई केली. वेळ आणि पॉइंट्स दोन्ही प्रकारात जेतेपद पटकावण्याची पंकजने हॅट्ट्रिक केली.

क्रीडा : गोल्डन बॉयची विश्वभरारी

lp23लीड्स येथे झालेल्या वेळेआधारित जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणीने बाराव्या जेतेपदाची कमाई केली. वेळ आणि पॉइंट्स दोन्ही प्रकारात जेतेपद पटकावण्याची पंकजने हॅट्ट्रिक केली. २९व्या वर्षीच जग जिंकणाऱ्या गोल्डन बॉय पंकज अडवाणीच्या कारकिर्दीची घेतलेला वेध.

ही गोष्ट आहे साधारण तीन महिन्यांपूर्वीची. स्थळ होतं मुंबईतलं एक पंचतारांकित हॉटेल. गोरा रंग, चाफेकळी नाक, समोरच्याचा वेध घेणारे डोळे, मध्यम उंची, अर्बन युथ संकल्पेनला साजेसा ट्रेन्डी टीशर्ट आणि ब्ल्यू कलर जीन्स या वर्णनातला एक मुलगा अवतरतो. साथीला मागेपुढे गोंडा घोळणाऱ्या लोकांची फौज नाही, सुरक्षारक्षकांचा ताफा नाही- काहीही नाही. तो कोण हे लक्षात येताच कुजबुज सुरू होते. तेवढय़ात एक शाळकरी मुलगा ऑटोग्राफसाठी वही पुढे करतो. तो थबकतो, त्या मुलाची उंची कमी आहे- हा तात्काळ खाली वाकतो, त्याच्या हातातली वही घेतो, चटकन आपली ट्रेडमार्क स्वाक्षरी करतो, एक मस्त स्माइल देतो त्या मुलाला, त्याचं नाव विचारतो आणि त्याच्या पाठीवर टपली मारतो. ही व्यक्ती सेलिब्रेटी आहे, मात्र रूढार्थाने दिसणारे सेलिब्रेटींचे नखरे अजिबातच नाहीत. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वावर, बोलण्यात नम्रता आणि आपण कोणी वेगळे असा आव नाही. हे वर्णन आहे तब्बल १२ विश्वविजेतेपदे नावावर असणाऱ्या बिलियर्डपटू पंकज अडवाणीचं. २९व्या वर्षीच त्याने त्याचं जग जिंकलंय.

स्नूकर आणि बिलिअर्ड्स यांच्याशी आपलं नातं स्मार्टफोनमुळे जमलेलं. आयतं मिळालेल्या अ‍ॅपरूपी गेममध्ये हा खेळ खेळता येतो. डोळ्याला सुकून देणाऱ्या हिरव्यागार रंगाच्या टेबलवर आकर्षक रंगाच्या चेंडूंची मांडणी केलेली. तत्त्व कॅरमसारखंच. लांब अणकुचीदार आणि नक्षीवाल्या काठीने चेंडू पॉकेटमध्ये ढकलणं. स्मार्टफोनवरच्या युझर-फ्रेंडली बटनावर क्लिक करताच तुमची काठी.. चेंडूला पुश देते, तो चेंडू घरंगळू लागतो आणि अपेक्षित दुसऱ्या चेंडूला धडकतो आणि हळूहळू पॉकेटमध्ये जाऊन विसावतो. तुमच्या गुणांमध्ये वाढ होते. पंकज हेच सगळं करतो, फरक एवढाच की, तो हे खऱ्याखुऱ्या बिलियर्ड्स टेबलवर दिग्गजांच्या समोर करतो आणि नुसता खेळत नाही, तर त्यांना टक्कर देऊन तोजिंकतो आणि जेतेपदही पटकावतो. स्मार्टफोनवर सहजसोपा वाटणारा हा खेळ प्रत्यक्षात सोपा नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी राज्यातल्या मेट्रो शहरांमध्ये पूल तसेच स्नूकर पार्लर खोऱ्याने उघडली होती. स्टेटस सिम्बॉल म्हणून लब्धप्रतिष्ठित घरातील युवकांचा तिथे राबता असे. मात्र खेळण्यापेक्षा भर दिखाऊपणावर असल्याने या चोचल्यांमधून अव्वल दर्जाचा खेळाडू घडल्याचे स्मरत नाही. त्यामुळे हे येरागबाळ्याचे काम नाही. खेळापेक्षा भलत्याच गोष्टींसाठी चालणारी ही स्नूकर पार्लर यथावकाश बंदही पडली; परंतु पंकज या पंथातला नाही, कारण त्याची निष्ठा खेळाशी आहे.

त्याचा जन्म पुण्यातला. त्यानंतर कामानिमित्ताने त्याचं कुटुंब कुवेतला रवाना झालं. तिकडेच स्थायिक होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना भारतात परतावं लागलं. परतल्यानंतर अडवाणी कुटुंबीय बंगळुरूकर झाले. पुणे-कुवेत-बंगळुरू अशी स्थित्यंतरं पाहत लहानाचं मोठं होणाऱ्या पंकजला आणि त्याच्या कुटुंबाला जबर धक्का देणारी घटना घडली. पंकज सहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. हा आघात सहन करणं कोणालाही कठीणच; परंतु अडवाणी कुटुंबीयांनी हे डोंगराएवढं दु:ख सोसलं. पंकजचा भाई श्री त्याच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा. श्री दररोज संध्याकाळी घराजवळच असलेल्या स्नूकर क्लबमध्ये जात असे. आपला मोठा भाऊ रोज संध्याकाळी कुठे गायब होतो याचं पंकजला कुतूहल होतं. न राहवून त्याने भावाला विचारलं आणि समजल्यावर बरोबर येण्याची भुणभुण लावली. शाळेत जाणाऱ्या भावाला स्नूकर क्लबमध्ये न्यावं का, या विचारात श्री अडकला. मात्र रोजची भुणभुण तरी संपेल या विचाराने त्याने पंकजला स्नूकर क्लबमध्ये नेलं. शांत वातावरण, डोळ्याला सुकून देईल अशा हिरव्या रंगाचा कॅनव्हास पसरलेलं भलंमोठ्ठं सागवानी टेबल, त्यावर मांडणी केलेले आकर्षक रंगाचे चेंडू, ते चेंडू पॉकेटमध्ये ढकलण्यासाठी ठेवलेली नक्षीदार काठी हे सगळंच पंकजला प्रचंड आवडलं. मग तो रोज झटपट अभ्यास करून श्रीबरोबर तिकडे जाऊ लागला. मोठय़ा माणसांप्रमाणे आपणही हे खेळू शकतो याविषयी खात्री झाल्यानंतर सहा महिन्यांनी पंकजने श्रीकडे खेळण्याची विनंती केली. इकडे आणला तर खरा, पण आता हे वाढतच चाललंय आणि शालेय मुलाला हे झेपेल का, असे विचार श्रीच्या मनात तरळले; परंतु एकदा संधी द्यायला हरकत नाही म्हणून त्याने पंकजला खेळण्याची संधी दिली. इतके दिवस भावाबरोबर येऊन बसणारा त्या लहान मुलाचा पहिलाच स्ट्रोक एवढा खणखणीत होता की, तिथे उपस्थित सगळेच अचंबित झाले. हा मुलगा विलक्षण असल्याची जाणीव सगळ्यांनाच झाली. आणि त्या क्षणापासून ते टेबलच त्याचं विश्व झालं. ज्या भावाने या विश्वाची ओळख करून दिली, त्यालाच बाराव्या वर्षी नमवत राज्यस्तरीय स्पर्धेत खळबळजनक विजय मिळवला. खेळाची समज आणि जिंकण्यासाठी लहान वयातही अथक परिश्रम घेण्याची पंकजची तयारी यामुळे अडवाणी कुटुंबीयांनी त्याला पुरेपूर पाठिंबा दिला. २००३ मध्ये ज्युनियर स्पर्धा गाजवल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला. दोनच वर्षांत टाइम आणि पॉइंट्स अशा दोन्ही प्रकारांत विश्वविजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पंकजला घरातून खेळाचा वारसा वगैरे मिळालेला नाही. मात्र सहज म्हणून खेळाची ओळख झाल्यावर त्यासाठी सर्वस्व झोकून देण्याची पंकजची वृत्ती युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.

स्नूकर आणि बिलियर्ड्स साधम्र्य असणारे, मात्र तांत्रिकदृष्टय़ा बराच फरक असणारे दोन खेळ. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू साधारण या दोघांपैकी एकाची निवड करतात आणि त्यात प्रभुत्व मिळवतात. दोन्ही खेळांच्या संघटना वेगळ्या, नियम वेगळे आणि स्पर्धाही वेगळ्या असतात. अर्थात दोन्ही खेळ एकाच वेळी खेळण्याची मुभा असते, मात्र दोन्ही करण्याच्या नादात तेल नाही तूप नाहीसारखी स्थिती व्हायला नको म्हणून बहुतांशी खेळाडू एकच फॉरमॅट खेळतात; परंतु पंकज दोन्ही खेळतो आणि नुसता खेळत नाही, तर दोन्हींमध्ये त्याने नैपुण्य मिळवले आहे. दोन्ही खेळांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदे त्याच्या नावावर आहेत. दोन्ही खेळांच्या स्पर्धा सातत्याने होत असतात, हे वेळापत्रक सांभाळणे तारेवरची कसरत आहे, मात्र ती पंकज लीलया पेलतो. वेगळेपण हे, की ज्या कालखंडात मुलंमुली कॉलेज लाइफ एन्जॉय करत असतात, त्या काळात पंकज जगभर स्पर्धा खेळत होता. घरापासून आणि घरच्यांपासून लांब राहत जगातील अव्वल खेळाडूंशी टक्कर देत, विभिन्न वातावरणाशी जुळवून घेत, खेळातले कच्चे दुवे बळकट करत पंकज एकामागोमाग एक जेतेपदे पटकावत होता. खेळात सातत्य होते आणि सुधारणाही होत होती. २००६ मध्ये दोहा येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होती. बंगळुरूत त्याची तयारी सुरू होती. मात्र कामानिमित्ताने मेलबर्नहून बंगळुरूला आलेल्या त्याच्या भावाला, श्रीला पंकज मानसिकदृष्टय़ा कणखर नसल्याचे जाणवले. कॉर्पोरेट ट्रेनर असलेल्या श्रीने मानसिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी पंकजला काही व्यायाम प्रकार सांगितले. दडपणाच्या स्थितीत मनाला स्थिरता देण्यासाठी काय करता येईल या संदर्भात सूचना दिल्या. पंकजने स्पर्धेदरम्यान या सूचनांचे पालन केले आणि परिणाम भारताला पदक मिळवून देणारा ठरला. पंकजने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. पदकात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या भावाला त्याने हे पदक समर्पित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावयाचे असेल तर मानसिकता हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे हे ध्यानात घेऊन पंकजने श्रीला क्रीडा मानसशास्त्र शाखेतच सखोल अभ्यास करण्याची विनंती केली. स्वत: खेळाडू असलेल्या श्रीने ही आवश्यकता जाणली आणि यातच त्याने डॉक्टरेट मिळवली. श्री आता केवळ पंकजलाच नव्हे, तर देशातील अग्रगण्य क्रीडापटूंना मार्गदर्शन करतो. वयाच्या तिशीत आपल्या आणि भावाच्या कारकिर्दीला सकारात्मक वळण देण्याची समज पंकजकडे होती. त्याच्या जेतेपदांची मोजदाद करणंही दमवणारं आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. जेतेपदं आणि पुरस्कार यांनी पंकजच्या घराचा मोठा भाग व्यापला आहे. बिलियर्ड्स आणि स्नूकरमधील विश्वातल्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धाची जेतेपदे त्याने पटकावली आहेत. मात्र तरीही सर्वोत्तम प्रदर्शनाची आणि जिंकण्याची त्याची भूक अद्यापही कमी झालेली नाही. स्पर्धाच्या निमित्ताने प्रतिस्पध्र्यापेक्षा पंकजला सतावणारा मुद्दा म्हणजे आहार. शुद्ध शाकाहारी असल्याने पंकजला विदेशात अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र खेळातही तत्त्व जपणाऱ्या पंकजने शाकाहाराचा त्याग केलेला नाही. वय लहान असल्याने पंकजच्या कर्तबगारीचा अंदाज येत नाही. मात्र बुद्धिबळात विश्वनाथन आनंदचे जे योगदान आहे तेच बिलियर्ड्स-स्नूकरमध्ये पंकज अडवाणीचे आहे. अद्भुत भरारीमुळेच पंकजला गोल्डन बॉय अशी बिरुदावली मिळाली आहे. क्रिकेटचा महापूर असलेल्या देशात अन्य खेळ खेळणं आणि त्यात यशोशिखर गाठणं अतिशय खडतर आहे. मात्र पंकजने ही वाट चोखाळत अपवादात्मक उदाहरण देशवासीयांपुढे सादर केले आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-11-2014 at 01:23 IST

संबंधित बातम्या