रखमा काकूमाझ्या वडिलांची चुलती. मोलमजुरी करणारी आणि कष्टात जगणारी. त्या दिवसांची आठवण आजसुद्धा पुन्हा परत त्या काळात घेऊन जाते. जातिवंत धंदा नसताना सुतारकामात तरबेज असणारे वडिलांचे चुलते. आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो आणि चुलतीला काकू. आप्पा काकू दोघांचा संसार भांडततंडत चालू होता. मी तेव्हा लहान होतो, पण त्यांच्यात लुडबुड करत होतो. त्यांची भांडणं मजेशीर वाटायची, ती चालूच राहावी असं वाटायचं. कारण आप्पा भांडणात हसण्यासारखी वाक्ये वापरायचे. त्यांच्या अशा वाक्यांवर काकूचा खमंग शेरा असायचा अन् हसत हसवत भांडणाचा शेवट व्हायचा. बरेच दिवस आम्ही ज्यांना पाहिलंही नाही असे जगन्नाथभाऊ  हे आप्पा काकूचे सुपुत्र. फार दिवसांपासून कोणाचीही व कसलीही तमा न बाळगता बाहेरगावी अज्ञातस्थळी खपत होते. त्यांच्या कर्तृत्वाचे कारनामे अनेकांकडून ऐकायला मिळायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आप्पा आणि काकू थकलेले जीव, पण जगण्याची लढाई आधाराशिवाय लढत होते. आम्ही जवळच होतो, पण त्यांच्या पोटचं मूल मात्र कुठं होतं, काय करतंय याची त्यांना काही कल्पना नव्हती. काकू दिवस दिवस शेतावर कामाला जायची, कधी याच्या तर कधी त्याच्या. सव्वा रुपया रोजगार मिळायचा दिवसभर केलेल्या कामाचा. चुलीवर हिरवी मिरची घालून केलेली डाळीची आमटी, काकू सोबत दुपारचं जेवण घेऊन गेल्यानंतर शिल्लक राहायची. मला ती आमटी कोणत्याही पक्वान्नापेक्षा जबर आवडायची. मी त्या आमटीवर दुपारी ताव मारत असे. रात्री काकू आल्यावर आमटीच्या तवलीला बघून काय प्रतिक्रिया देते याकडे माझं लक्ष असायचं. काकू कुत्र्या-मांजरांना आमटी फस्त केली म्हणून जबाबदार धरून दोन-चार गावरान शिव्या हासडायची, तेव्हा मला मजा यायची. मी थोडा वेळ गप्प राहून परत काकूला सांगायचो. त्यानंतरची काकूची प्रतिक्रिया आमटीसारखीच चवदार असायची. रात्री कामाहून येणारी काकू थकलेली असेल हा आपला समज होता हे तिच्या बोलण्यातून व रात्रीच्या स्वयंपाकातील हालचालीतून लक्षात यायचे. काथवटीत भाकरी करतानाचा आवाज आणि तव्यावर चेंडूसारखी फुगणारी भाकरी बघून चुलीच्या उबेला बसून खावीशी वाटावी यात नवल ते काय?

मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of close relationships
First published on: 30-12-2016 at 03:20 IST