कार्पोरेट जग, तिथले चढउतार, गळेकापू स्पर्धा, संधी, पैसा या सगळ्याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. पण प्रत्यक्षात काय असतं ते सगळं? कार्पोरेट जगाचा एक्स रे दाखवणारी नवी कादंबरी-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनॅशनल कास्टिंग्ज अ‍ॅण्ड फोìजगच्या भव्य आवारांत निळी प्रीमियर पद्मिनी गाडी नेहमीच्या पार्किंग लॉटमध्ये स्थिरावली आणि विसूभाऊ सातपुते, जनरल मॅनेजर यांची स्वारी नेहमीप्रमाणेच सावकाश गाडीबाहेर येताच आजूबाजूच्या वॉचमन, स्वीपर्सपासून बाजूने जाणाऱ्या कामगार, सुपरवायजर्सबरोबर राम-रामची देवघेव झाली. विसूभाऊंचे स्थान चेअरमन आबासाहेब कुलकर्णीच्या खालोखाल नंबर दोन इतके उच्च असले तरी कारखान्यांतील छोटय़ांत छोटय़ा कामगारांपासून फिनान्स, सेल्स डायरेक्टरांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्याबद्दल हा आपला माणूस आहे, अशी आदरयुक्त आपुलकीची भावना होती. शांत, प्रसन्न चेहरा, मृदू बोलणे, मध्यम बांधा, मूळचा गोरा पण टक्केटोणपे खाल्ल्याने रापलेला रंग यामुळे प्रथमदर्शनी दहाजणांतला एक असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. एकदा परिचय झाल्यावर कुणालाही नावाने ओळखण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे विसूभाऊ अजातशत्रू होते.
विसूभाऊंना पाहताच आज बोर्ड मीटिंग आहे हे कुणाला वेगळे सांगावे लागले नाही. नेहमी सफारीत असणारे सातपुते साहेब बोर्ड मीटिंगला थ्री-पीस सुटांत असणार हा परिपाठच होता. बोर्ड मीटिंग रुटीन असो वा महत्त्वाची, फुल कोरम अपेक्षित असो वा एक-दोनच डायरेक्टर्स येणार असोत, बोर्ड मीटिंग म्हणजे बोर्ड मीटिंग! तिचा डेकोरम ठेवलाच पाहिजे, सर्व प्रोटोकोल पाळले गेलेच पाहिजेत, अशी शिस्त सातपुते साहेबांनी लावली होती व खुद्द सीएमडी आबासाहेब कुलकर्णीची धारणा तीच असल्याने इंटरनॅशनलची मीटिंग हा एक इव्हेण्टच होत असे.
पद्मिनीचे दार बंद करताना त्यांना जाणवले की, गाडी आता म्हातारी झाली आहे. मित्रमंडळीत व बरोबरीच्या सीनियर्समध्ये त्यांची गाडी हा कायम थट्टेचा विषय होता. ‘‘साहेब, आय.सी.एफ.च्या जी.एम.च्या स्टेटसला साजेशी शोफर-ड्रीवन कारसाठी कुठला मुहूर्त शोधताय?’’ अशी वारंवार विचारणा होऊनही सातपुतेंनी हा विषय हसण्यावारीच नेला होता. जेव्हा फक्त स्कूटरच परवडण्यासारखी होती तेव्हा त्यांच्या पस्तिसाव्या वाढदिवशी सकाळी अचानक घरी येऊन आबासाहेबांनी या गाडीच्या किल्ल्या त्यांच्या हाती दिल्या आणि त्या क्षणीच त्या दिलदार मालक मित्राच्या पायाशी पूर्वीच वाहिलेली निष्ठा जन्माची पक्की झाली. अशा गाडीची गेल्या आठ वर्षांची संगत सोडण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. आबासाहेबांनी वारंवार सांगूनही गाडी बदलायची नाही यावर ते ठाम होते.
मेन पोर्चमध्ये आबासाहेबांची गाडी आधीच उभी होती. शेजारीच कंपनी सेक्रेटरी शंकरन सातपुतेंची वाट पाहत थांबला होता. हा उमदा तरुण त्यांना मनापासून आवडायचा. मिठ्ठास वाणी, कितीही कामाचा भार पडला तरी सदैव हसरा चेहरा, कमालीचा व्यवस्थितपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॉसच्या विचारांच्या दिशा आणि गरजा आधीच ओळखण्याची हातोटी.
‘‘गुड मॉìनग, सर. सीएमडी पंधरा मिनिटांपूर्वीच आलेत. तुम्ही एकदा बोर्ड रूमवर नजर टाकता? सर्व अ‍ॅरेंज झालंय. चौघेजण काल रात्रीच चेक-इन झालेत. त्यांच्यासाठी नेहमीचेच एस्कॉर्ट दिमतीला आहेत. चोप्रासाहेब डायरेक्ट बँकेतून येणार आहेत. त्यांनी एस्कॉर्ट नाकारलाय. अजेंडा पेपर्स..’’ लेटेस्ट पोझिशन सांगत सांगत शंकरन सातपुतेंना बोर्डरूममध्ये घेऊन गेला.
बोर्डरूम इंटरनॅशनल कास्टिंग्जच्या रेप्युटेशनला साजेशीच होती, नव्हे तशी ती होण्यासाठी आबासाहेब व विसूभाऊंनी टॉपक्लास आíकटेक्ट नेमून आपल्या सर्व कल्पनांना मूर्त स्वरूप दिले होते. चारी भिंतींना फ्लोअर-टू-सीलिंग रोजवूड पॅनेलिंग, आरशासारखे लखलखीत लांबलचक शिसवी टेबल, त्याला शोभेशा खुच्र्या, िभतीवर इंडियन मास्टर्सची तलचित्रे, स्टेट ऑफ द आर्ट लाइटिंग व साऊंड सिस्टीम्स, कॉम्प्युटरला जोडलेले ओवरहेड प्रोजेक्टर्स आदी सर्व अद्ययावत सोयी असूनही कुठेही दिखाऊ भपका जाणवत नव्हता.
शंकरनने सर्व अ‍ॅरेंजमेंटस् चोख केल्या होत्या. आबासाहेबांनी आधीच ओ. के. केलेल्या सीटिंग प्लॅनप्रमाणे डायरेक्टर्सच्या जागा ठरवल्या होत्या व त्याप्रमाणे प्रत्येक खुर्चीसमोर त्यांच्या नेमप्लेट्स व अजेंडा पेपर्स ठेवले होते, कारण प्रत्येक वेळी कुणी ना कुणी डायरेक्टर आधी पाठवलेले अजेंडा पेपर्स घरी विसरून येणार असा अनुभव होता.
‘‘वेरी गुड, शंकर! बरं, तिसऱ्या आयटेमसाठी फिनान्स वीपी व पाचव्यासाठी ऑपरेशन्स वीपी लागतील.’’
‘‘दोघेही आधीच आलेत, सर. मीटिंगच्या आधी सीएमडी त्यांना चेंबरमध्ये बोलावण्याची शक्यता आहे.’’
‘‘छान! आबासाहेब नेहमीप्रमाणे पंधरा मिनिटे लवकर येऊन सर्व नजरेखाली घालतीलच.’’ बोलता बोलता सातपुतेंची तीक्ष्ण नजर वॉल क्लॉकवर स्थिर झाली. ‘‘शंकर, घडय़ाळ दोन मिनिटे मागे आहे.’’
‘‘सॉरी सर, अ‍ॅडजेस्ट करून घेतो. पण तुम्ही सोडून इतर कुणाच्याही लक्षात येणार नाही.’’
‘‘चुकलास! आबासाहेबांची ही सवय आता मला लागली आहे. वक्तशीरपणा त्यांच्या रक्तातच भिनलाय. आताचं जाऊ दे, पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा एका खोपटात आम्ही छोटं युनिट चालवत होतो तेव्हाही त्यांना त्यांच्या-माझ्या घडय़ाळांत एका मिनिटाचा फरक चालायचा नाही.’’

जेव्हा फक्त स्कूटरच परवडण्यासारखी होती तेव्हा त्यांच्या पस्तिसाव्या वाढदिवशी सकाळी अचानक घरी येऊन आबासाहेबांनी या गाडीच्या किल्ल्या त्यांच्या हाती दिल्या आणि त्या क्षणीच त्या दिलदार मालक मित्राच्या पायाशी पूर्वीच वाहिलेली निष्ठा जन्माची पक्की झाली.

सातपुत्यांच्या नकळत त्यांचे घडय़ाळ अलगदपणे पंचवीस वष्रे मागे गेले आणि त्यांच्या मनचक्षूसमोर उभा ठाकला तो धडपडीचा काळ.
ऊ ऊ ऊ
स्वातंत्र्य मिळून पाच-सात वष्रे झाली असली तरी सर्वसामान्यांचे हाल कमी झाले नव्हते. नव्या रोजगारांच्या संधी थोडय़ाच होत्या. महागाई मी म्हणत होती. अशा वेळी कुठलाही मध्यमवर्गीय तरुण चोखाळील असाच मार्ग विश्वनाथ सातपुतेंने अनुसरला. मॅट्रिकला फर्स्ट क्लास मिळविलेला. पण पुढील शिक्षणासाठी आíथक पाठबळ अजिबात नव्हते. मग जमेल ती नोकरी कर, बरोबरीने संध्याकाळी टायिपग-शार्टहँड, अकाऊंट कीपिंगच्या क्लासना जाऊन आपली मार्केट व्हॅल्यू वाढवायचा प्रयत्न कर, असे करण्यात चार-पाच वष्रे गेली, पण कुठेच स्थिरता येईना आणि अचानक त्याची पुन्हा भेट झाली आबा ऊर्फ लक्ष्मण कुलकर्णीबरोबर.
आबा आणि विसू एकाच शाळेचे विद्यार्थी एवढेच त्यांच्यात साम्य. आबा त्याच्या दोन वष्रे पुढे. कुशाग्र बुद्धिमत्तेबरोबर प्रचंड आत्मविश्वासाचेही जन्मजात देणे घेऊन आलेला. गॅदरिंग असो वा खेळांच्या स्पर्धा, आबाचा वाटा सिंहाचा. सुखवस्तूपणाचे तेज व पोशाखापासून सर्व गोष्टींतल्या नीटनेटकेपणाने तो शंभरात उठून दिसायचा व वागायचा तसाच. बॉर्न लीडरच होता तो.
याउलट विसूची तऱ्हा! अतिगरिबीने येतो तो संकोच व बुजरेपणा, सामान्य कपडे यामुळे अंगी अनेक गुण असूनही मागे मागेच राहायचा. अभ्यासात कधी कमी पडला नाही, पण वर्गात धीटपणे प्रश्न विचारील किंवा हुशारीचा डौल दाखवील- नाव सोडा! तरीही त्याची व आबाची दाट मत्री कशी हे एक कोडेच होते. दोघांनाही बुद्धिबळाचा नाद- खेळायला बसले की तहान-भूक हरपून तासन्तास खेळणार. पण त्यांच्या मत्रीसाठी हे पुरेसे कारण निश्चित नव्हते. आबाच्या अनेक अ‍ॅक्टिविटीज, त्यापकी एक बुद्धिबळ. कधी लहर लागली तर खेळणार. पण तो आणि विसू रोज संध्याकाळी नियमित एकत्र दिसायचेच. त्यांची मत्री कुठल्या तरी दुसऱ्याच अदृश्य धाग्यांनी दृढ बांधलेली होती हेच खरे.
आबा पुढे कॉलेजात गेला, दोन वर्षांनी इंजिनीयिरगला पुण्याला अ‍ॅडमिशन मिळाली व आबा-विसूच्या गाठीभेटी हळूहळू कमी होऊन शेवटी थांबल्याच. पोटामागे धावताना बिचाऱ्या विसूलाही पुन्हा बुद्धिबळाचा पट कधी मांडावासा वाटला नाही.
तोच आबा आपल्यासमोर उभा आहे हे पटायला विसूला थोडा वेळच लागला. कधी आठवण आली तर सुटाबुटांतल्या इंजिनीयर आबाची प्रतिमा डोळ्यांसमोर यायची. पण हा खराखुरा आबा अगदी साध्या, थोडय़ा मळक्या-चुरगाळलेल्या शर्टातच हातातील कसल्यातरी अवजड सामानाची पिशवी एका जुनाट स्कूटरला लटकवण्याची खटपट करीत रस्त्याच्या कडेला उभा होता व एका हाताने खुणावत त्याला हाका मारीत होता.
‘‘आबा, तू? किती दिवसांनी!’’ विसू हर्षभरीत स्वराने म्हणाला. पण त्याच्या डोळ्यांतले आश्चर्य ओळखून आबा मोठय़ाने हसला ‘‘आणि मी इथे, असा कसा, हेच विचारणार आहेस ना? वेळ आहे का तुला? बस मागे आणि चल वर्कशॉपवर.’’
विसूला जाणवले की बाह्य़दर्शन बदलले असले तरी आपला मित्र अजून तसाच बॉर्न लीडर आहे. तेच बेफिकीर हास्य, उमदा आवाज, डोळ्यातली निश्चयाची झाक, ताठ शरीरयष्टी, तसूभरही फरक नाही.
‘‘भरपूर वेळ आहे. कुठे जायचं? ते ओझं दे माझ्या मांडीवर.’’
स्कूटर वेगाने इंडस्ट्रियल एस्टेटच्या दिशेने निघाली आणि थोडय़ाच वेळात एका छोटय़ा, पण सुसज्ज वर्कशॉपशी येऊन थांबली. एक कामगार धावत पुढे आला व अदबीने म्हणाला ‘‘साब, मिला स्पेअर पार्ट? बहूत अच्छा. अब काम नहीं रुकेगा.’’
‘‘ओ.के.! जरा निरंजनला मी बोलावलंय म्हणून सांग.’’
काही मिनिटांतच एक पोरगेलासा तरुण डोक्यापासून पायापर्यंत ग्रीजने माखलेल्या अवतारात समोर आला.
‘‘विसू, हा निरंजन, माझा टेक्निकल ट्रबलशूटर! प्रेस डाईज का तोडतोय त्याचं कारण सापडलं?’’
‘‘अजून नाही, पण सगळा प्रेस सोडवून चेक करतोय. होणार, काळजी नको.’’ निरंजनचा आत्मविश्वास त्याच्या शब्दांतच जाणवत होता. त्याच पावली तो परत वर्कशॉपमध्ये धावला.
‘‘विसू, आपल्या शाळेचा जनू माळी आठवतोय?’’ विसूचा प्रश्नार्थक चेहरा पाहून आबाने खुलासा केला. ‘‘अरे, तो नेहमी ‘दत्त, दत्त’ पुटपुटणारा, आपल्याला गुपचुप कैऱ्या देणारा? त्याचा हा निरंजन मुलगा. बाबांनीच त्याच्या शाळेचा आणि टेक्निकल कोर्सचा खर्च केला. जीनियस आहे. आयआयटीत टॉपर व्हायची लायकी आहे, पण म्हणतात ना कपाळावर रेषा नव्हती.’’ आबा जोरात हसून पुढे म्हणाला, ‘‘अर्थात माझा कपाळावरच्या रेषांवर कधीच विश्वास नव्हता. माणसाचं डोकं जागेवर व मनगट मजबूत असलं, तर त्या कपाळावरच्या सो-कॉल्ड रेषा तो बदलून दाखवतो. हा पोरगा पण तेच करणार, खात्रीने सांगतो.’’
दाराशीच टाकलेल्या फोल्डिंग खुच्र्यावर विसावत दोन्ही मित्र भरभरून बोलत होते, आडपडदा न ठेवता मधल्या काळात काय घडलं ते जाणून घेत होते. विसूने आपली एका छोटय़ा जॉबहून दुसऱ्या छोटय़ा जॉबवर अशी फरफट कशी चालली आहे ते नि:संकोचपणे सांगितले आणि मग आबाने सुरुवात केली.
‘‘तर थोडक्यात सांगायचं म्हणजे इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षांला असतानाच बाबा अचानक गेले. पण मी फायनललाही क्लास चुकू दिला नाही. आईची इच्छा, मी लगेच नोकरी करावी म्हणजे घराची गाडी पुन्हां रुळावर येईल. पण पहिल्यापासून माझे प्लॅन पक्के होते. हे फेब्रिकेशन युनिट बघतोयस ते गेल्या दोन वर्षांत कमावलेल्या पशांतून. बाबांच्या एकाही पशाला हात लावलेला नाही. धंदा छान चाललाय. आज बारा वर्कर आहेत. खूश आहेत. पगार भरपूर आणि ठरल्या दिवशी देतो. मात्र स्वत:साठी फक्त किमान गरजेपुरते ठेवून बाकीचे पुन्हा धंद्यात गुंतवतो. अनेक बँकांचे उंबरठे झिजवले. त्यांच्या लघुउद्योगाच्या मदतीच्या स्कीम केवळ कागदावर. पुरेसा प्रोजेक्ट फिनान्स आणि खेळतं भांडवल मिळालं तर दोन वर्षांत धंदा दसपट होईल. देखते है, वो भी हो जायेगा!’’ पुन्हा खळाळतं हास्य.
विसू समाधानाने हसला. आपला हीरो अपेक्षाभंग करतो की काय, या भीतीला पूर्णविराम मिळाला होता. पण आबाचा पुढचा प्रश्न त्याला अनपेक्षित होता.
‘‘विसू, तू वेडावाकडा अर्थ काढणार नाहीस या खात्रीनेच विचारतोय, इथे काम करायला आवडेल तुला? मला ज्या मदतीची आवश्यकता आहे ती सगळी कामे तू वेगवेगळ्या नोकऱ्यांत हाताळली आहेसच. तुझ्या सध्याच्या पगाराच्या डबल आकडा परवडेल मला, आणि निदान दोन वर्षांची गॅरंटी. पुढलं पुढे.’’
‘‘आणि काम? मी तुला तितका खरोखरच उपयोगी पडेन का?

आणि त्या संध्याकाळपासून विश्वनाथ सातपुते, लक्ष्मण कुलकर्णीचे मॅनेजर- कम – सेक्रेटरी- कम- फॅक्टरी सुपरवायझर – कम – अकाऊंटंट- कम- मेसेंजर- कम- प्यून झाले. विसूने अक्षरश: आबाच्या या कामाचा गाडा आपल्या खांद्यावर पेलला.

‘‘नक्कीच. इथली सुपरविजन, अकाऊंट्स, पत्रव्यवहार, सरकारी इन्सपेक्टर्सना तोंड देणं, बँकेचे व्यवहार असल्या कामात सध्या माझा निदान अर्धा वेळ जातो. तो वाचला तर मार्केटिंग, क्वालिटी कंट्रोल व नवी प्रॉडक्ट्स यावर मला जोर देता येईल. अजूनपर्यंत विश्वासाने हे सर्व सोपवता येईल असा माणूसच मला दिसला नव्हता. आज अचानक तू दत्त म्हणून उभा राहिलास म्हणून विचारण्याचे धाडस करतोय.’’
आणि त्या संध्याकाळपासून विश्वनाथ सातपुते, लक्ष्मण कुलकर्णीचे मॅनेजर- कम – सेक्रेटरी- कम- फॅक्टरी सुपरवायझर – कम – अकाऊंटंट- कम- मेसेंजर- कम- प्यून झाले. विसूने अक्षरश: आबाच्या या कामाचा गाडा आपल्या खांद्यावर पेलला. भल्या सकाळी शटर उघडून जरूर पडल्यास हाती झाडू घ्यायला तो कचरला नाही. कॅश मॅनेजमेंटपासून सर्व अवांतर व्यवहार सांभाळताना आबाचा त्याच्यावरचा गाढा विश्वास वाढतच गेला. संबंधितांच्या लेखी आबाचे आबासाहेब आणि विसूचे विसूभाऊ कधी झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही.
* * *
बोर्डरूममधला फोन खणखणला आणि विसूभाऊ दचकून पुन्हा वर्तमानकालात आले.
बोर्ड मीटिंगमध्ये महत्त्वाचा विषय होता- कारखान्याचा विस्तार.
आबासाहेबांनी अगदी मोजक्या शब्दांत पण मुद्देसूदपणे सूतोवाच केले. कारखान्याच्या अवघ्या तीन वर्षांच्या आयुष्यात इंटरनॅशनलने हेवी कास्टिंग्ज आणि फोìजग्जमध्ये आपले स्वत:चे स्थान कसे निर्माण केले आहे, आपल्या देशाच्या संरक्षण खात्याच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत आपला किती आणि कशा प्रकारचा सहभाग अपेक्षित आहे आणि काही प्रगत देशांतील बडय़ा कंपन्यांकडूनसुद्धा कशी विचारणा होत आहे, हे सांगून आबासाहेबांनी हीच वेळ पुढील पाऊल टाकण्यास योग्य कशी आहे हे डायरेक्टर्सच्या मनावर ठसवून वीपी (ऑपरेशन्स) अय्यर आणि फिनान्स डायरेक्टर आगाशे यांना त्यांचे संयुक्त प्रेझेंटेशन देण्यासाठी पाचारण केले.
अय्यरांनी सध्याच्या सहा शॉप्सची बॅलन्सिंग इक्विपमेंटस्च्या सहाय्याने कपॅसिटी २० टक्के कशी वाढविता येईल व दोन नव्या शॉप्सची नव्या प्रॉडक्ट्ससाठी कशी जरूर आहे ते स्लाइड-शोच्या सहाय्याने विशद केले. आगाशेंनी अशा विस्ताराचा खर्च कमीत कमी कसा ठेवला जाईल व त्याचा मोठा भाग कारखान्याच्या मिळकतीतूनच भागवून बँकेच्या कर्जाचा बोजा किती अत्यल्प असेल ते दर्शवून दिले.
जरी अपेक्षेप्रमाणेच बहुसंख्य डायरेक्टर्सनी अनुकूलता दर्शविली तरी डेव्हलपमेंट बँकेचे नॉमिनी डायरेक्टर चोप्रा आणि सीनियर डायरेक्टर प्रेमचंद यांच्या कौलावरच या प्रोजेक्टचे भवितव्य अवलंबून होते. दोघानीही अजेंडा पेपर्सचा सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याने शंकेला जागा राहिली नाही. चोप्रानी कारखाना-विस्तारास हिरवा कंदील दाखविल्यावर प्रपोजल एकमताने मंजूर झाले.
बोर्ड मीटिंगनंतर सर्व डायरेक्टर्सना निरोप देऊन आबासाहेब विसूभाऊंसहीत त्यांच्या बोर्डरूमसमोरच्याच प्रशस्त केबिनमध्ये जाणार व आढावा घेणार हा नित्याचा परिपाठ. पण आज त्यांची पावले लिफ्टकडे वळली.
‘‘विसू, जरा गच्चीवर जाऊ या.’’
व्हीआयपी ब्लॉक ही येथील सर्वात उंच इमारत. त्यामुळे तिच्या गच्चीवरून कारखान्याचा प्रशस्त परिसर पूर्णपणे नजरेत येत होता. अनिमिष नजरेने आबासाहेब आपण शून्यातून निर्माण केलेले हे कवतिक न्याहाळीत होते. खरोखर इंटरनॅशनलचा कारखाना हा त्या खेडेवजा शहराचे भूषण होते-नव्हे त्यामुळेच त्या खेडय़ाचे शहरात रूपांतर व्हायला मदत झाली होती.
शहरालगत धावणाऱ्या राज्यमार्गाशी काटकोनात असलेला पाऊणएक कि.मी.चा रस्ता इंटरनॅशनलच्या उत्तुंग कमानीशी संपत होता. कमान कारखान्याच्या अडीचशे एकराच्या प्रचंड आयताकृतीच्या मोठय़ा बाजूच्या साधारण मध्यावर होती. कमानीच्या एका बाजूस प्रचंड घडय़ाळ असलेला क्लॉक टॉवर लांबवरच्या राज्यमार्गावरूनही दिसे. आत प्रवेश करताच डाव्या बाजूला प्रशस्त पाìकग लॉट, उजव्या बाजूला सíव्हस गेट व समोर मेन गेट होते. मेनगेटपासून सुरू झालेला, दोन्ही बाजूला वीस वीस फुटी प्रशस्त पदपथ असलेला भव्य रस्ता आयताच्या दुसऱ्या टोकाशी असलेल्या कारखान्याच्या मुख्य शेडकडे जाण्याचा राजमार्ग होता. दोन्ही बाजूला दहा-दहा फुटांवर लावलेली अशोकाची झाडे व त्यामध्ये असलेली फुलझाडे आता चांगलीच तरारली असल्याने या रस्त्याला भव्यता व सौंदर्याच्या मिलाफाचे देणे लाभले होते.
मेनगेटमधून प्रवेश करताच डाव्या बाजूला व्हीआयपी ब्लॉक तर उजव्या बाजूला अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक या बाहयत: अगदी सारख्या दिसणाऱ्या पण आतली रचना पूर्णपणे वेगळी असलेल्या इमारती होत्या. व्हीआयपी ब्लॉकला पाचवा म्हणजे एक मजला जास्त होता व त्याच्याच गच्चीत आता आबासाहेब व विसूभाऊ उभे होते.

व्हीआयपी ब्लॉक ही येथील सर्वात उंच इमारत. त्यामुळे तिच्या गच्चीवरून कारखान्याचा प्रशस्त परिसर पूर्णपणे नजरेत येत होता. अनिमिष नजरेने आबासाहेब आपण शून्यातून निर्माण केलेले हे कवतिक न्याहाळीत होते.

व्हीआयपी ब्लॉकमध्ये नावाप्रमाणेच चेअरमन्स, सेक्रेटरीएट, सर्व बडय़ा अधिकाऱ्यांच्या केबिन्स, बोर्डरूम व त्याला लागून डायरेक्टर्स लाऊंज व डायिनग हॉल होता. सर्वात वरच्या मजल्यावर बडय़ा पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊस व टेरेसवर छोटीसी बाग असा थाट होता.
अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉकच्या प्रवेशव्दाराशीच टाइम ऑफिस, रिसेप्शन व स्टाफ डिपार्टमेंट असल्याने तो भाग कायम गजबजलेला असायचा. वरच्या मजल्यांवर सेल्स, फिनान्स, परचेस इत्यादी विभाग व दोन छोटय़ा कॉन्फरन्स रूम्स होत्या.
या दोन इमारतींच्याच ओळीत, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉकच्या पुढे होते ‘कामगार भवन.’ या टुमदार इमारतीत ऑडिटोरियम, युनियन ऑफिस, स्टाफ कन्टीन, फेअर प्राइज शॉप वगरे कामगारांसाठी खास सुविधा होत्या.
त्यापुढचा जवळ जवळ पंचवीस-तीस एकरांचा पट्टा क्रीडांगणासाठी मोकळा सोडला होता. गेल्या वर्षीच तेथे छोटेसे क्लब हाऊस व प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधल्याने व त्या हिरव्यागार परिसराभोवतीची झाडे आता छान गर्द छायेची झाल्याने सर्व क्रीडांगणांत कायम प्रसन्न वातावरण वाटे. क्रीडांगणाला लागूनच सíव्हस गेटवरून आलेला सíव्हस रस्ता वळून मुख्य कारखान्याकडे जात होता. कच्च्या-पक्क्या मालाची सर्व जड वाहतूक कारखान्याच्या बाऊंडरीवरून धावणाऱ्या या रस्त्यावरून होत असल्याने आतल्या परिसराला त्याची झळ पोचत नसे.
या चारी इमारती व क्रीडांगण आणि कारखान्याच्या मुख्य शेडस् यामधील जवळ जवळ दीडशे फूट रुंदीचा व आयताच्या पूर्ण लांबीच्या मोकळ्या पट्टय़ाच्या चारी बाजूला ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अशोकाच्या झाडांची संरक्षक िभतच जणू उभी केली होती व मध्ये नसíगक झाडे कायम ठेवून फुलबागेची रचना केली होती. यामुळे मेनगेटमधून प्रवेश करणाऱ्यांना कारखाना कुठे आहे याचा पटकन अंदाजच येत नसे.
शिफ्ट संपल्याचा भोंगा झाला आणि कामगारांचे लोंढे कारखान्यांच्या शेडस्मधून राजरस्त्याने बाहेर व नव्या कामगारांच्या मेनगेटमधून टाइम ऑफिसला भेट देऊन कामाच्या दिशेने जाऊ लागले. पाहता पाहता शांत वाटणारा तो परिसर एकदम जिवंत झाला.
‘‘विसू, तुला आठवतंय? आपला ले-आऊट ठरवताना ते आíकटेक्ट कामगारांचे जाणे-येणे सíव्हस रोडनेच व्हायला हवे अशा मताचे होते?’’
‘‘आठवतं तर ! आणि तुझे तेव्हाचे शब्ददेखील आठवतात. ‘‘हा कारखाना ज्यांच्या जिवावर चालतो ते माझे कामगार राजरस्त्यानेच प्रवेश करतील व बाहेर पडतील.’’
‘‘आणि आबा, प्रथम ऑडिटोरियम आणि गेल्या वर्षी क्लब हाऊस आपण वाढवलं तेव्हाची चोप्रा व काही डायरेक्टर्सची प्रतिक्रिया आठवते?’’
‘‘हो, म्हणे हा अनुत्पादक खर्च आहे, अनाठायी आहे. आता हीच मंडळी गुणगान गाताहेत की या छोटय़ाशा शहरात कधीही न कल्पिलेल्या या सुविधांमुळेच आपला कामगार समाधानी आहे आणि जिकडे तिकडे मोच्रे-संपाचे वातावरण असूनही आपल्याकडे सर्व आलबेल आहे.’’
इकडे-तिकडे रेंगाळणारे काही तुरळक कामगार सोडले तर राजमार्ग व आजूबाजूला पुन्हा सर्व शांत शांत जाणवत होते. मोठय़ा समाधानाने आबासाहेब आणि विसूभाऊ खाली आले. (क्रमश:)

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Board meeting
First published on: 11-07-2014 at 01:20 IST