गेल्या चार-पाच वर्षांपासून सायकलवरून भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रोजच्या कामासाठी सायकलींचा वापर कमी झाला असला तरी सायकलवरून दूरचे प्रवास करणारे वाढले आहेत. साधारण २०-३० वर्षांपूर्वी मात्र सायकलवरून असे दूरवरचे प्रवास म्हणजे दिव्यच असायचे. एक तर आजच्यासारख्या भटकंतीपूरक सायकली नसायच्या आणि माहिती व संवादाच्या साधनांचा अभाव. अशा काळात भारतातील चार हौशी सायकलपटूंनी सायकलींवरून जगभ्रमंती केली. संस्कृती, समाज, भाषा, खाद्यपदार्थ, निसर्ग अशा अनेक ठिकाणी आड येणाऱ्या भिन्नतेवर मात करत तब्बल ३२० दिवसांत २४ देशांध्ये या सायकलवीरांनी भारताचा झेंडा मिरवला. त्या सायकलिंगची रोमहर्षक कथा म्हणजे ‘दोन चाकं झपाटलेली’ हे सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी लिहिलेलं पुस्तक.

सुरुवातीला केवळ मोहिमेचे नियोजन करून देणारा सतीश आंबेरकर अपघाताने मोहिमेचा सदस्य बनतो. प्रभादेवीच्या श्रॉफ चाळीत राहणारा कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठी घरातील हा नोकरदार गृहस्थ हरहुन्नरीपणामुळे या मोहिमेत सहभागी होतो आणि थेट जगालाच गवसणी घालतो. याची अथ्पासून ते इतिपर्यंतची कहाणी या पुस्तकातून उलगडते. सतीश आंबेरकर यांच्या या जगावेगळ्या अनुभवाची कहाणी लेखकाने इतक्या परीणामकारकपणे पोहोचवली आहे की जणू काही तो स्वत:च हा प्रवास करत आहे.

सायकलीवरून असा अचाट प्रवास करायचा म्हणजे खरे तर धाडसी वृत्ती तर हवीच, पण त्याचबरोबर योग्य नियोजन महत्त्वाचे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात सारी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते, मात्र १९८९ मध्ये यापैकी काहीच नव्हते. मोबाइलने आपले विश्व व्यापलेले नव्हते आणि घरोघरी दूरध्वनी असणे हे केवळ प्रतिष्ठेशी निगडित होते. त्यामुळे केवळ नियोजनालाच चार वर्षे खर्ची पडली. अर्थातच अत्यंत काटेकोरपणे केलेल्या या नियोजनाचा फायदा सायकलस्वारांना कसा पदोपदी झाला ते हा प्रवास वाचताना अनुभवयास येतो.

३२० दिवसांतील प्रत्येक क्षणाने या सायकलस्वारांना काही ना काही नव्याने शिकवले आहे. आजच्यासारखी परिस्थिती उद्या नाही आणि उद्यासारखी परवा नाही, त्यामुळे रोज नवा संघर्ष. कोठे स्थानिकांच्या आदरातिथ्यामुळे दबून जाणे, तर कोठे पोटभर जेवणाची मारामार. कोठे निसर्गाने झोडपणे, +४८ अंशापासून ते थेट उणे पाच अंशापर्यंतच्या भिन्न वातावरणाला सामोरे जाणे, तर कोठे आतंकवादी चळवळ्यांशी भेट होणे अशा असंख्य परस्परविरोधी अनुभवांनी ही सायकल सफर पुरेपूर भरली आहे.

अर्थात घरापासून दूर सारा बाडबिस्तरा पाठीवर लादून प्रवास करताना हे सारे अनुभवताना या सायकलस्वारांच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतोच, पण त्याचबरोबर मानसिक क्षमतादेखील जोखली जाते. बाह्य़ आव्हाने असली तरी चौघांचे म्हणून स्वत:चं एक कुटुंबच तयार झालेले असल्यामुळे एका टप्प्यावर एक भिडू कमी झाला तरी सतीश आंबेरकर, महेंद्रकुमार, मख्खनसिंग हे एकदिलाने सफर पूर्ण करतात.

आयफेल टॉवर, नायगरा, चीनची भिंत अशी जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहणारे पर्यटक अनेक आहेत, पण सुवर्णभूमीची ओसाड भूतनगरी अनुभवणे, नशाबाजांच्या निडल पार्कचे विश्व पाहणे, जर्मनची भिंत कोसळतानाचा दोन्ही देशांतील त्या ऐतिहासिक वातावरणाचा अनुभव घेणे, कधी तंबू तर कधी युथ हॉस्टेलमध्ये मुक्काम ठोकत स्वत:च्या हाताने स्वयंपाक रांधणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज नव्या प्रदेशातील जनजीवनाला जवळून पाहण्यासाठी चाकोरीबाहेरचीच वाट पकडावी लागते. मनमौजी आणि काहीशा फकिरीवृत्तीच्या लोकांनाच हे जमते, त्यामुळे या सायकल भटंकतीत आलेले हे अनोखे अनुभव पुस्तकाच्या पानापानावर उलगडत जातात.

हा सारा प्रवास २५ वर्षांपूर्वीचा आहे. खरे तर तेव्हाच त्याचे पुस्तक येणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आज हे वर्णन वाचताना मात्र २५ वर्षांपूर्वीचा संदर्भ डोक्यात ठेवावा लागतो, तरीदेखील काळाच्या ओघात त्यातील अनेक घटना न बदलणाऱ्याच असतात. त्यामुळे ही सायकल सफर पुस्तकातून अनुभवणे अर्थातच रोमांचकारक ठरते.

‘दोन चाकं झपाटलेली’ लेखक : सुमेध वडावाला (रिसबूड) प्रकाशक : नवता पृष्ठसंख्या : ३७६ किंमत : रु. ३६०/-