आंधळी नावाच्या छोटय़ाशा गावातून आलेली, अर्धवट शिक्षण झालेली स्त्री ते परदेशात सरकारची प्रतिनिधी म्हणून सादरीकरण करणारी अधिकारी.. लग्नानंतर पतीमागोमाग शहरी वातावरणाशी जुळवून घेण्यास धडपडणारी, धड मराठी बोलतानाही घाबरणारी एक सर्वसामान्य गृहिणी ते जर्मनीसारख्या देशात त्यांच्याच भाषेत बोलून प्रभाव पाडणारी करारी स्त्री, नियतीच्या धक्क्याने मोडून पडलेली एक अबला ते बेकायदा आणि अनियमित बांधकामे पाडण्यास न कचरणारी एक कर्तबगार सरकारी अधिकारी या काहीशा अचंबित करणाऱ्या प्रवासाचे कोडे उलगडते, ‘हुमान’मधून. महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या संगीता उत्तम धायगुडे यांच्या आत्मकथनातून. हुमान म्हणजे कोडे. त्यांच्या आत्मकथनातून हे कोडे उलगडते. 

सरकारी अधिकाऱ्याने लिहिलेले आत्मवृत्त असा परिचय या पुस्तकाबाबत करणे चुकीचे ठरेल. आप्तेष्टांनी पाठ फिरवल्यानंतर एकाकी पडलेली अबला शिक्षणाची कास धरून स्वत:च्या पायावर कशी उभी राहते.. नुसती उभी राहात नाही तर यशस्वी होते, ते या आत्मकथनातून समोर येते. नियतीने घातलेली कोडी सोडवत परिस्थितीशी एकाकी झुंज देणारी संगीता यातून पुढे येते. चिकाटीने अभ्यास करणारी विद्यार्थिनी, सासुरवास मुकाट सहन करणारी विवाहिता, पतीनिधनानंतर त्याच्या आठवणीने व्याकूळ झालेली विरहिनी, मुलांपासून दूर राहावे लागते तेव्हा धास्तावलेली आई अशी सामान्य स्त्रीची अनेक रूपे या लेखनातून दिसतात. अचानक आलेल्या संकटाने न खचता त्यातून मार्ग काढत यशस्वी होणारी संगीता तिथूनच थोडी असामान्यतेच्या वाटेकडे सरकते.
सातारा जिल्ह्य़ातील माण या दुष्काळग्रस्त तालुक्यात आंधळी गावात एका सामान्य घरात वाढलेल्या संगीताचा लहानपणापासूनचा प्रवास पुस्तकातून उलगडला आहे. स्वत: अशिक्षित तरीही मुलांना शिक्षणाचे बाळकडू पाजणारे आई-वडील संगीता यांना मिळाले, पण परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण मामाच्या घरी राहून घ्यावे लागले. बारामतीजवळच्या मामाच्या गावी काहीसे आश्रिताचे जिणे जगल्याची भावना लहानपणीच संगीताला उपरेपणाची जाणीव करून देते. स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा ध्यास खरे तर लहानपणच्या त्या अनुभवातूनच घेतला, असे दिसते. शिक्षणाचे ध्येय ठरवले जाते, पण लहान वयातच मनाविरुद्ध झालेल्या लग्नातूनही मनासारखा पती मिळाल्याच्या आनंदात पुढे हे ध्येय कुठेतरी धूसर होते. न मागताही ‘उत्तम’ पती मिळाल्याने हुरळून गेलेली नवविवाहिता त्याच्या प्रेमवर्षांवात भिजत असतानाच सासुरवासाच्या जाणिवेने शहारते. तरीही पतीच्या प्रोत्साहनामुळेच तिच्या शिक्षणविषयक आकांक्षांना नवे पंख फुटतात. शिक्षणाची गोडी लागल्यानंतरही नवऱ्याचे करण्यात आणि मुलांच्या संगोपनात वाहून घेतलेली संगीताच्या रूपातली सामान्य स्त्रीच भेटत राहते; पण नियती या सामान्यपणालाच आव्हान देत जणू कोडे घालते आणि संगीताला अवचित पतिविरह सहन करावा लागतो. त्या दु:खातून वर येताना भेटते, ती नवी संगीता. नियतीने घातलेले हुमान सोडवणारी संगीता.
आत्मकथनाच्या मध्यंतरानंतर साधारण हा स्वत:चे अस्तित्व शोधण्याचा संघर्ष उमटायला लागतो. संगीता धायगुडे यांनी हे आत्मकथन सरधोपटपणे न सांगता वर्तमानातून भूतकाळाकडे नेणारा वेगळा फॉर्म निवडला आहे. पुस्तकाची सुरुवात जर्मनीला जायला निघालेल्या एका आईच्या व्याकूळतेपासून सुरू होते. सरकारी अधिकारी म्हणून फेलोशिप घेऊन जर्मनीला एक वर्ष शिकण्याची संधी मिळालेली संगीता आयुष्याच्या या टप्प्यावर थोडी मागे बघत जर्मनीतील मित्र-मैत्रिणींच्या साक्षीने आपली जीवनकथा हळूहळू उलगडते. लेखनाच्या या फॉर्ममुळे आत्मकथनातील एकसुरीपणा टळला आहे.
मुंबईजवळ उरणला राहात असतानाचा एक प्रसंग लेखिकेने वर्णन केला आहे. पोलीस म्हणून नोकरी करणारा पती कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतानाच तान्हा मुलगा आजारी पडतो. मुलाचं आजारपण नवं नाही. मुंबईच्या नेहमीच्या रुग्णालयात त्याला न्यावे लागते, याची संगीताला कल्पना आहे; पण मुंबईची काडीचीही माहिती नसलेली, गावाकडून आलेली एक गृहिणी अशा प्रसंगी मुलाला घेऊन मुंबईच्या त्या भल्यामोठय़ा इस्पितळात पोचते. हाती फार पैसे नसताना मुलाला घेऊन एकटीनं मुंबईच्या लोकलनं केलेला प्रवास वाचताना मुलाच्या जिवासाठी आईची चाललेली घालमेल आणि त्यापोटी केलेलं ‘धाडस’ कौतुकास्पद वाटतं. मुंबईतल्या मुंबईत एकटीनं प्रवास करताना घाबरणारी तीच स्त्री एक दिवस जर्मनीला पोचतेय, तेही स्वबळावर आणि एकटीच. ही जाणीव आत्मकथनाच्या वेगळ्या फॉर्ममुळे वाचकाला सतत होत असते. लेखिकेचा हा जीवनप्रवास म्हणूनच विलक्षण वाटत राहतो. तिचा संघर्ष या विरोधाभासातून प्रकर्षांने पुढे येत राहतो.
ग्रामीण भागातच नाही तर शहरी समाजातील काही अंधश्रद्धात्मक रूढी आणि परंपरांचा होणारा त्रासही पुस्तकात नेमकेपणाने व्यक्त झाला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो मुलींना आणि शिक्षणाची कास धरणाऱ्या, स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या सामान्य स्त्रियांना हवी असलेली प्रेरणा या लेखनातून मिळते यात शंका नाही.
हुमान
संगीता उत्तम धायगुडे,
प्रकाशक – ग्रंथाली
पृष्ठे- २९७, मूल्य- ३५० रु.