lp38बोली शब्दांचा ऐवज

भाषा जितक्या आत्मीयतेने बोलाल, नेहमीच्या व्यवहारात जितकी वापराल तितकी ती अधिक समृद्ध होत जाते. तिचा व्यवहारातला आणि संवाद साधण्यासाठीचा वापर जेव्हा कमी होतो तेव्हा तिच्या अस्तित्वाविषयीची चिंता वाटू लागते. मराठी भाषेचेही काहीसे असेच झाले आहे की काय, असे वाटण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात याला कारणीभूत आहे तो मराठी माणसांमधील असलेला मराठीविषयीचा गंड. त्यातही बोली भाषेतील एखादा शब्द कानी पडला की ‘ही कुठली भाषा?’ असाच काहीसा भाव चेहऱ्यावर प्रकट होतो. परंतु मराठी बोली भाषांमध्ये अनेक शब्दांचे भांडार दडले आहे. यातील काही शब्दांचा आजही आपण सर्रास वापर करतो. तर काही शब्द आपल्या भाषिक व्यवहारांमधून पार बाद झाले आहेत. अशाच ग्रामीण बोलींचा ऐवज डॉ. द. ता. भोसले यांनी ‘ग्रामीण बोलीचा शब्दकोश’ या पुस्तकाच्या रूपात खुला केला आहे.
लेखक मनोगत व्यक्त करताना म्हणतात की, ‘रोजच्या आपल्या व्यवहारात या शब्दांचा वापर झाला तर एका बाजूने मराठी श्रीमंत आणि समृद्ध होईल आणि दुसऱ्या बाजूने वारसाने मराठी असूनही मातृभाषा म्हणून इंग्रजीचा वापर करणाऱ्या नव्या पिढीला महाकवी ज्ञानेश्वरांनी गौरवलेल्या ‘अमृतवाणी’चा परिचय होऊन जाईल.’ हे पुस्तक वाचल्यावर लेखकाचे म्हणणे पटते. अनेकदा नव्या पिढीला बोली भाषेतील शब्दांचा परिचय नसतो. किंवा त्या शब्दांचा अर्थ माहीत नसल्याने ते शब्द वापरले जात नाहीत. अशा वेळी हे पुस्तक म्हणजे या शब्दांच्या नेटक्या वापरासाठीची एक उत्तम उजळणीच म्हणावी लागेल. त्या दृष्टीने हे पुस्तक नव्या व जुन्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल असेच आहे.
या पुस्तकात बोली भाषेतील विशिष्ट शब्दांची उत्पत्ती, ते शब्द पूर्वी कसे वापरले जात किंवा काही शब्दांच्या वापरात कालांतराने संदर्भ कसे बदलत गेले यांची थोडक्यात माहिती लेखकाने दिली आहे. ती माहिती वाचताना मनोरंजनही होते आणि शब्दांच्या नेटक्या व नेमक्या वापराबद्दल मन आग्रही होते. या पुस्तकात लेखकाने ‘अ’ ते ‘ह’ या मूळाक्षरांमधील बोली भाषेतील काही निवडक शब्द अर्थासकट दिले आहेत. या शब्दांमागील अर्थ, शब्दांची फोड, त्यामागील सांस्कृतिक संदर्भ वाचून गंमत वाटते. तर काही शब्दांमागचे संदर्भ किती निराळे आहेत आणि आज आपण किती चुकीच्या पद्धतीने वापरतो हेही कळते. या बोली भाषेतील शब्दांना अनेक सामजिक, धार्मिक, व्यावसायिक, जातीय संदर्भ आहेत. त्यामुळे या शब्दांमधून तात्कालिक सामाजिक परिस्थितीही उलगडत जाते. तत्कालीन लोकांचे राहणीमान, त्यांचा सामाजिक स्तर असे अनेक सामाजिक पदर या शब्दांमधून उलगडतात. हे केवळ बोली भाषेतील शब्द नाहीत तर आपल्याकडील सांस्कृतिक ठेवा आहे. यातील काही शब्दांना शेजारील राज्यातील संदर्भ चिकटले आहेत. काही शब्द त्या राज्यांमधून आपल्या संस्कृतीमध्ये येताना काही वेळा त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो आपल्या सांस्कृतिक जीवनाला साजेसा असा तयार झालेला दिसून येतो तर काही शब्दांमध्ये दोन्ही संस्कृतींचा योग्य संकर साधून नवीन शब्द तयार झालेला दिसतो. असे हे वैविध्यपूर्ण शब्द वाचताना वेगळीच भाषिक गंमत वाचकाला अनुभवायला मिळते.
अतिथी या शब्दाचा पूर्वीचा अर्थ ऐन जेवणाच्या वेळी आलेला अनाहूत पाहुणा. आता आपण सरसकट कुठल्याही पाहुण्यांना अतिथी हा शब्द वापरतो. गतकाळी किंवा गतकाळ* या शब्दाचा अर्थ जिचा वैभवाचा काळ संपून गेला आहे, अशी दुर्दैवी स्त्री कालांतराने मात्र या शब्दाला कांगावा करणारी, भांडखोर स्त्री असा संदर्भ चिकटला. ‘पंचगव्य’ हा जवळजवळ विस्मृतीत गेलेला शब्द. गाईचे दूध, दही, तूप, गाईचे मूत्र आणि शेण या पाच वस्तूंपासून तयार झालेले असे हे पंचगव्य. धर्माच्या चौकटीत न बसणारे कृत्य केल्यास शुद्धीकरणासाठी पंचगव्य घ्यावे लागत असे. एक प्रकारचे हे प्रायश्चित्तच. याचप्रमाणेच पाचवी, सटवी, जिवती, भाकणूक, भादरणे, भानामती, पायघोळ, पाणवठा, बाशिंग अशा अनेक ज्ञात-अज्ञात बोली भाषेतील शब्दांची अर्थपूर्ण उकल लेखकाने या पुस्तकात केली आहे.
केवळ नवीन पिढीलाच नव्हे तर जुन्या पिढीलाही उपयुक्त वाटावा, तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ उलगडणारा मराठी बोली भाषेतील शब्दांचा खजिना आहे.
ग्रामीण बोलीचा शब्दकोश
डॉ. द. ता. भोसले
ग्रंथाली
पृष्ठे -१९०
किंमत – २०० रुपये

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

lp39गीतांजली
रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाचा मराठी भावानुवाद डॉ. अमिता गोसावी यांनी केला आहे आणि तो ‘गीतांजली’ या पुस्तकाच्या रूपात मराठी वाचकांना खुला झाला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी समस्त भारतीयांच्या मनात आपला ठसा उमटविला आहे. उत्तम कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, निबंधलेखक असे विविध साहित्य प्रकार त्यांनी लीलया पेलले. भारताला पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून देणाऱ्या त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाचा मराठी भावानुवाद लेखिकेने उत्तम साधला आहे. या काव्यसंग्रहातून एक हळुवार कवी, नितळ मनाचा माणूस उलगडत जातो. आशा-निराशेवर हिंदकळणारं मन या कवितांमधून प्रकट होतं. समर्पक शब्दांमध्ये जीवनाविषयीचे मांडलेले तत्त्वज्ञान, प्रतिमांचा समर्पक वापर, सहज-सुलभ भावाविष्कार अशा वैशिष्टय़ांसह टागोरांची कविता व्यक्त होते. ही कविता वाचकाला वेगळ्याच भावविश्वाची सैर घडवून आणते.
गीतांजली
रवींद्रनाथ टागोर
भावानुवाद – डॉ. अमिता गोसावी
मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे- १०८
मूल्य- १०० रुपये.

lp40जावे कवितांच्या गावा…
कविता मनाला भावते ती त्यातील कमी शब्दांच्या वापरातून केलेल्या अर्थपूर्ण आशयामुळे. अशीच वैविध्यपूर्ण आशय घेऊन आपल्या भावना नेमक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न अनेक कवी-कवयित्रींनी केला आहे.
शिवाजी घुगे यांच्या ‘भय एकांती अवघडले’ या कवितासंग्रहात कवीने सामान्य माणसाची घुसमट व्यक्त केली आहे. सामान्य माणसाची होणारी मानसिक, आर्थिक घुसमट, त्यातून होणारे उद्ध्वस्त जीवन लेखकाने समर्पकपणे मांडले आहे. या कवितांमधून सामान्य माणसाची होणारी ससेहोलपट वाचकाच्या मनालाही भिडते. ‘कृष्णचक्र’ या कवितेत कवी म्हणतो-
तिमिराच्या सघन तळाशी
भस्माचा स्पंदन काळा/ला
पिंडाच्या जन्म क्षणाला
बर्फातून उगवे ज्वाला
स्खलन या कवितेत कवी म्हणतो-
वळणात बधरी फुलांच्या
जळतो हटकून किनारा
बर्फातून हळहळतो का
ठिणग्यांचा मोरपिसारा
कवीच्या कवितांमधून व्यक्त होणारी सामान्य माणसाची फरफट वाचकाच्या मनाला एकप्रकारची टोचणी लावून जाते. ही कविता वाचकालाही अंतर्मुख करून जाते. मनात वेदनेचे भाव ठसवून जाते.
भय एकांती अवघडले
शिवाजी घुगे
आकांक्षा प्रकाशन
पृष्ठे- ११२
मूल्य- १०० रुपये.

lp41स्पर्श हरवलेले
‘स्पर्श हरवलेले’ हा डॉ. सुलभा कोरे यांचा काव्यसंग्रह म्हणजे माणसाच्या तरल भावनांचा सहज स्त्रीसुलभ आविष्कार. ही कविता उत्कट आहे. मनाला स्पर्शणारी आहे. रोजच्याच दैनंदिन व्यवहारातील घटनांचा वेध घेताना स्वत:मधलं इतरांपेक्षा असलेलं वेगळंपण कवितेतून अधोरेखित होतं. त्याच त्याच घटनांचा त्या कवयित्री म्हणून वेगळा अर्थ लावतात. संवेदनशील विचार मांडतात.
ओठंगून उभी असलेली
एखादी आठवण
हळूच दारावर टकटक करते
कवाडे अलगद उघडली जातात
आठवणींचे पक्षी भरार
येतात, जातात
जातात, येतात..
रोजच्या जगण्याचे प्रश्न सोडविताना माणसातलं हरवत जाणारं हळूवार मन.. त्यात साठणारी कठोरता.. माणसामध्ये रूक्षता आणते. जीवाची होणारी घालमेल व्यक्त करणारी सुलभा कोरे यांची कविता आहे.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
फक्त दोषच वाटय़ाला..
आपणही स्वत:लाच दोष देत गेलो
कदाचित आपण चुकलो असू..
कवयित्रीने व्यक्त केलेली मनाची घालमेल ही केवळ तिच्यापुरती मर्यादित न राहता त्या कवितांशी आपणही तादात्म्य पावतो. त्यातील घटना, माणसं आपल्याही आजूबाजूला वावरू लागतात.
स्पर्श हरवलेले
डॉ. सुलभा कोरे
ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे – ७९
मूल्य- १०० रुपये

lp42साकुरा
‘साकुरा’ हा पूजा मलुष्टे यांचं हायकु काव्य प्रकार असलेलं पुस्तक. ‘हायकु’ या जपानी काव्य प्रकारात लिहिणाऱ्यांची- हायकुकारांची संख्या कमी आहे. अशा काही मोजक्या हायकुकारांमध्ये पूजा मलुष्टे यांची गणती होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्येही हा प्रकार लीलया पेलला आहे; याची साक्ष पटते ‘साकुरा’ या काव्यसंग्रहातून. या काव्यसंग्रहात मराठी व इंग्रजी अशा दोन्ही प्रकारच्या हायकु समाविष्ट केल्या आहेत. मराठीतील ज्येष्ठ हायकुकार शिरीष पै यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. कवयित्रीचे कौतुक करताना त्या म्हणतात की, ‘पूजा मलुष्टे या एक वाक्बगार हायकुकार आहेत. कारण हायकु काव्य प्रकाराचे मूलभूत तत्त्व त्यांनी जाणलेले आहे.’
बघतोय चोच वासून
कावळा आकाशाकडे
सुकलेल्या झाडावरून..
काहीसे हलले शेत
तोच पक्ष्यांचे थवे
उडाले आकाशात
खूप थकून गेले
रस्ता संपला तिथे
तुझे घर दिसले
अशा अनेक उल्लेखनीय हायकु या काव्यसंग्रहातून वाचायला मिळतात. केवळ तीन ओळींमध्ये कवयित्रीने आपल्या मनातील भावभावनांची सुरेल गुंफण केली आहे. याचबरोबर हायकु या काव्य प्रकारावरील लेखिकेने लिहिलेले लेखही या पुस्तकात आहेत. या लेखांमधून हायकु हा प्रकार वाचकाला अधिक ज्ञात होतो. त्यातील विशेष, या प्रकारात वैशिष्टय़पूर्ण लेखन करणारे कवी, लेखक यांची माहिती या लेखांमधून मिळते.
साकुरा
पूजा मलुष्टे; ग्रंथाली प्रकाशन;
पृष्ठे- २००; मूल्य – २०० रुपये.
लता दाभोळकर