25 February 2021

News Flash

डोंगरातल्या आनंदाची अनुभूती…

डोंगरभटक्यांची जगण्याची व्याख्याच वेगळी असते. केवळ चार भिंतींबाहेरच्या जगातली स्वच्छंद भटकंती, निसर्गाचा आनंद असं त्याचं वर्णन करता येणार नाही.

| August 14, 2015 01:08 am

lp40डोंगरभटक्यांची जगण्याची व्याख्याच वेगळी असते. केवळ चार भिंतींबाहेरच्या जगातली स्वच्छंद भटकंती, निसर्गाचा आनंद असं त्याचं वर्णन करता येणार नाही. तर ती एक अनुभूती असते. डोंगरात भटकून, कडे-सुळके आणि हिमशिखरं चढून तुम्हाला नेमकं काय मिळालं याचं उत्तर त्या अनुभूतीत दडलेलं असतं. ही सारी धडपड, जिद्द, निसर्गाबद्दलची ओढ असते त्याचं सार्थक होतं ते डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर. ती अनुभूती अनुभवावी लागेल. त्या अनुभूतीची पुनरावृत्ती मोहिमेच्या अखेरीस सायंकाळच्या कॅम्प फायरमध्ये उमटते. कॅम्प फायर म्हणजे केवळ जिवाभावाच्या डोंगरमित्रांसोबतच्या शिळोप्याच्या गप्पा नसतात, तर डोंगर जगणाऱ्यांच्या विश्वाची ती एक अनोखी मैफल असते. डोंगरातला आनंद जगणारी अनोखी जीवनशैलीच असते. याच जीवनशैलीचं नेमकं प्रत्यंतर वसंत लिमयेंच्या ‘कॅम्प फायर’ या पुस्तकात पुरेपूर उतरलेलं दिसतं.
या ‘कॅम्प फायर’मध्ये अनेक डोंगरभटक्यांच्या कैक आठवणी दडलेल्या आहेत. कधी त्या कॉलेज जीवनातल्या पहिल्या डोंगरभटकंतीतल्या अवखळपणातून जाणवतात. डोंगरभटकंतीत वाट चुकणं म्हणजे काय याचा अनुभव मांडतात, तर कधी अवाढव्य अफाट अशा अंगावर येणाऱ्या कोकणकडय़ाचं आव्हान स्वीकारतानाच्या साहसातून थेट अंगावरच येतात. भारतातील क्रमांक एकच्या कांचनजंगा हिमशिखराच्या मोहिमेतून गिर्यारोहण म्हणजे काय याचं उत्तर देतात.
या आठवणी केवळ डोंगरापुरत्या आणि साहसापुरत्याच मर्यादित राहात नाहीत. तर डोंगरमित्रांच्या आयुष्यातदेखील डोकावतात. कधी राजगडाच्या वाटेवरच्या भिकुल्याच्या वाडय़ातील ती गावरान मेजवानी असते. तर कधी एव्हरेस्टवरच्या पहिल्या यशस्वी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या लॉर्ड जॉन हंटसारख्या डोंगराएवढय़ा माणसाशी झालेली लंडनमधील भेट असो, की जे.आर.डी. टाटांसारख्या थोर उद्योजकाने आवर्जून आणि ममतेने साधलेला संवाद. डोंगरभटक्यांच्या आयुष्याचे असे असंख्य पैलू अगदी सहजपणे ओघवत्या शैलीत या पुस्तकातून उलगडले जातात.
साहसाला जिद्दीने भिडणं आणि निसर्गासमोर नतमस्तक होणं, आलेल्या संकटाने डगमगून न जाता त्यावर मात करणं, प्रतिकूल परिस्थितीतदेखील घेतलेल्या आवाहनाला सामोरं जाणं, डोंगरभटकंतीतल्या धुंदीत वाहात न जाता त्याचा मनमुराद आनंद घेणं, त्या सृष्टीचक्राशी एकरूप होणं आणि स्वत:ला विसरून जाणं. एक डोंगरभटक्या त्याच्या आयुष्यात जे जे काही करतो, अनुभवतो ते ते सारं या पुस्तकात उमटलं आहे.
खरं तर गिरिभ्रमण, प्रस्तरारोहण आणि गिर्यारोहणावर आपल्याकडे आजवर जे काही लिखाण आहे त्यात बऱ्याच अंशी एक तर तांत्रिकता डोकावते किंवा ते अति लालित्याच्या वाटेनं जाणारं असतं. पहिला प्रकार सर्वसामान्यांसाठी बोजड ठरण्याची शक्यता असते आणि दुसऱ्या प्रकारात सत्याचा अपलाप होण्याचा धोका असतो. ‘कॅम्प फायर’ हे पुस्तक या दोन्ही धोक्यांना अगदी अलगद बाजूला ठेवतं आणि गिर्यारोहकांबरोबरच सर्वसामान्यांच्यादेखील पसंतीस उतरतं.
या पुस्तकाचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे नकळतपणे तीसेक वर्षांचं महाराष्ट्रातील गिर्यारोहणाचं दस्तऐवजीकरणदेखील झालं आहे. वसंत यांनी साधारण १९७१ पासून डोंगरभटकंतीला सुरुवात केली. तेव्हापासूनच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी या पुस्तकातून नोंदविल्या गेल्या. गिर्यारोहण क्षेत्रात झालेले बदल तर आपसूकपणे दिसून येतातच, पण निसर्गातील बदलाचीदेखील नोंद झाली आहे.
खरं तर वसंत लिमयेंनी याआधीच ‘धुंद स्वच्छंद’ या पुस्तकातून २० वर्षांपूर्वीच आपल्या भटकंतीला (मुख्यत: सह्य़ाद्रीतील) शब्दबद्ध केलं आहे. स्वच्छंदीपणातील स्वयंनियंत्रित अशी संयत धुंदी यातून अनुभवता आली. ते पाहता हे पुस्तक जरा उशिराच आलं असं म्हणावं लागेल.
वसंत लिमये यांच्या या तीस-पस्तीस वर्षांतील कारकीर्दीचा हा लेखाजोखा अशा अनेक अंगांनी वाचताना एकदा तरी डोंगरात भटकावं असं नक्कीच तुम्हाला वाटू शकतं. त्याचं कारण त्यांचं शब्दलालित्य. स्थलकाळाचे संदर्भ, तांत्रिक माहितीतला अचूकपणा या आघाडीवर पुस्तक सरस आहेच, पण शब्दलालित्य हा महत्त्वाचा पैलू म्हणावा लागेल. डोंगरभटक्यांच्या गप्पांत हे शब्दलालित्य भरपूर असतं, पण ते कागदावर मांडताना अनेकांची गडबड होते. पण वसंत लिमये यांनी ते अगदी चपखलपणे मांडलं आहे. मुख्य म्हणजे ते शब्दबंबाळ नाही. डोंगरभटक्यांच्या जीवनशैलीला त्यांनी अगदी सहजपणे जगासमोर मांडलं आहे. गिर्यारोहकांच्या सदाबहार जगण्यानुसार अगदी डिलक्स स्वरूपात हे पुस्तक आलं आहे असंच म्हणावं लागेल. असाच प्रयोग त्यांच्या समकालीन गिर्यारोहकांनीदेखील करावयास हरकत नाही हे नमूद करावं वाटतं.
हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण त्याचबरोबर प्रेक्षणीयदेखील झालंय. नीलेश जाधव या हरहुन्नरी रेखाचित्रकाराने सर्वच प्रसंगांना अगदी पुरेपूर न्याय देत केलेली रेखाटनं हे या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. ही रेखाचित्रं केवळ पूरक म्हणून नसून तर त्यामध्येदेखील भाष्य दडलेलं आहे.
एकंदरीतच हे पुस्तक म्हणजे तुम्ही कधी तरी डोंगरात गेला असाल तर तुम्हाला पुन:प्रत्ययाचा आनंद देणारं आहे आणि ज्यांनी डोंगर दुरूनच पाहिलेत त्यांनादेखील या विश्वाची एक समृद्ध अशी सैर घडवणारं आहे.
‘कॅम्प फायर’
वसंत वसंत लिमये
ग्रंथाली प्रकाशन
मूल्य : रु. ३००/-
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:08 am

Web Title: book review 71
Next Stories
1 जेरुसलेमच्या इतिहासाची सफर
2 प्रांजळ आणि प्रामाणिक रुदन
3 जमिनीवरचा फील्ड मार्शल…
Just Now!
X