रजेहो म्हणजे खरं तर राजेहो…

बोली भाषेत त्याचं झालं रजेहो. लोकशाहीतले राजे म्हणजे लोक. तर या लोकांमधलाच एक जण राजा बनतो म्हणजेच सत्ता उपभोगतो त्याची गोष्ट रजेहो या कादंबरीत सांगितली आहे. राजन खान यांची ही वेगळ्या धाटणीची कादंबरी. खरं तर राजकीय कादंबरी. ती वाचताना साहेब या एकाच व्यक्तिमत्त्वामध्ये आपल्याला आपल्या राजकारणातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसायला लागतात आणि मग कादंबरी वाचायला मजा यायला लागते.

ही गोष्ट आहे एका ‘साहेबां’ची. या साहेबांचे वडील सलग सहा वेळा आमदार झालेत. म्हणजे तीसेक वर्षे ते आमदारच आहेत. या आमदार महाशयांचं राजकीय चारित्र्य एकदम स्वच्छ. त्यांनी कधी एक पैसा राजकारणातून मिळवला नाही. सामान्य माणसासारखं घर, कपडे, बायकामुलांचं राहणंजगणंही एकदम साधं. पण वैयक्तिक पातळीवर माणूस कमालीचा अस्वच्छ. चार लोकांत बसून पान-तंबाखू खाऊन थुंकणारा, विडय़ा ओढणारा, टमरेल घेऊन उघडय़ावर नैसर्गिक विधींना जाणारा. चार चार दिवस आंघोळीचा आग्रह नाही, स्वच्छ नीटनेटक्या कपडय़ांचा आग्रह नाही. महिनोनमहिने दाढी नाही. पण माणूस कुठल्याही पातळीवरचं राजकारण न करताही तो वीस-वीस वर्षे आपली आमदारकी टिकवून असलेला. एवढी वर्षे आमदार असूनही एक पडका वाडा आणि चार एकर जिरायत एवढीच काय ती त्याची संपत्ती. तीही वडिलोपार्जित. त्याच्या या सगळ्या जगण्याचा, अघळपघळ वागण्याचा, अस्वच्छतेचा बायकोला प्रचंड तिटकारा. ती स्वच्छतेबाबत प्रचंड आग्रही. हेच संस्कार तिने मुलावरही केलेत.

तर अशा या जोडप्याचा मुलगा पंचविसाव्या वर्षी विधानसभा निवडणुकांना चक्क बापाच्याच विरोधात उभा राहतो आणि पाणी तसंच विकास या मुद्दय़ांवर निवडून येतो. आमदार बनतो. तो निवडून येतो त्या वेळची राजकीय परिस्थिती अशी असते की अपक्षांना अचानक महत्त्व येतं. तो अपक्षांचा नेता बनतो. आपोआपच ‘साहेब’ हे बिरुद त्याला लागतं. स्वत:च्या फायद्याबरोबरच इतर अपक्षांचाही फायदा करून देतो. तो मंत्री होतो. वडिलांप्रमाणे अघळपघळ न वागता मितभाषी राहण्याच्या त्याच्या स्वभावाचे त्याला खूप फायदे होतात. नको असलेल्या माणसाचा तीस वर्षे संसार करायचा आणि घराबाहेर त्याबद्दल एक चकार शब्द बोलायचा नाही हा आपल्या आईचा खाक्या साहेबाने लहानपणापासून बघितलेला असतो. त्याचा त्याला राजकारणात चांगलाच फायदा होतो.

जेमतेम मॅट्रिक पास असलेला हा साहेब आपल्या अंगभूत हुशारीच्या बळावर बघता बघता राजकारणाच्या सगळ्या पायऱ्या झरझर चढतो. अस्तित्वात असलेल्या पण राबवल्या न जाणाऱ्या गावांसाठीच्या सरकारी योजना शोधून काढतो. विरोध पत्करून त्या राबवतो. साहेब आधी आपल्या मतदारसंघाचं हित बघतो, मग जिल्ह्य़ाचं, मग राज्याचं. त्यासाठी स्वतचा पक्ष काढतो. राजकारण करायचं तर फक्त आपलाच फायदा नाही तर आपल्या कार्यकर्त्यांचाही फायदा झाला पाहिजे असं म्हणत तो विकासकामांच्या कंत्राटाचं असं काही गणित बसवतो की एक पैचा भ्रष्टाचार न करता त्याच्या उतरंडीतले सगळे जण समृद्ध होत जातात. साहेब राजकारणात कमालीचा यशस्वी होत जातो. त्याच्या प्रत्येक योजनेची, कृतीची चर्चा होत राहते. तो कधीच किंग बनत नाही, किंगमेकरच्या भूमिकेत राहतो.

साहेबाला इतर कशाचंही नाही तर स्वच्छतेचं प्रचंड वेड. वडिलांच्या अस्वच्छतेचा आईला जेवढा तिटकारा तेवढाच यालाही. आपल्या मतदारसंघात तो सगळ्यात आधी पाण्याचा प्रश्न सोडवतो, कारण त्याला पाणी आणि स्वच्छता यांचा अन्योन्यसंबंध आहे याची जाण आहे. आपल्या आईला स्वच्छतेसाठी पुरेसं पाणी मिळायचं नाही. होतं ते पुरवून पुरवून वापरावं लागायचं हे त्यानं लहानपणापासून पाहिलंय. त्यामुळे पाणी हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय. त्याबरोबरच पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकण्यावरही बंदी आणायचा तो प्रयत्न करतो. त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी त्याला गुटखा उत्पादक कंपन्यांशी टक्कर द्यावी लागते.

मग तो वळतो स्वच्छतेच्या आणखी एका मुद्दय़ाकडे. नैसर्गिक विधींसाठी उघडय़ावर जाणं याचा त्याला प्रचंड तिटकारा. त्यामुळे तो राज्यात प्रत्येक घरी शौचालय असलं पाहिजे असं फर्मान काढतो. त्यासाठी जीवतोड मेहनत करतो. त्यासाठी योजना आणतो. पण ही योजना काही यशस्वी होत नाही. खरं तर जिच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही, कंत्राटदारी झाली नाही अशी साहेबाची ही एकमेव योजना असते. साहेबाच्या फर्मानामुळे सरकारी बाबू योजनेचे सगळे पैसे जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचवतात. पण या योजनेची गंमत म्हणजे लोक पैसे घेऊन शौचालयं बांधतच नाहीत. आणि वर मीडियाला सांगतात की पैसे इतरांना मिळाले, मला नाही मिळाले. म्हणजे लोकच या योजनेचे पैसे लाटतात..

लोकशाहीमध्ये लोक राजे असतात, असं म्हटलं जातं. तर ते राजे हे असे असं अतिशय मिश्कीलपणे सांगणारी ही कादंबरी आपल्या लोकशाही व्यवस्थेवर अतिशय मार्मिकपणे भाष्य करते.

रजेहो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा

राजन खान; मैत्रेय प्रकाशन;

पृष्ठे : १५२; मूल्य : १६०