11 July 2020

News Flash

ताळेबंद : सीए एक करिअर

खरे म्हणजे सीए कोर्स हा पदवी वा पदव्योत्तर कोर्स नाही तर तो एक सर्टिफिकेट कोर्स आहे. सीएची परीक्षा अतिशय कठीण असते. निकाल अतिशय कमी लागतो

| May 8, 2015 01:19 am

lp00खरे म्हणजे सीए कोर्स हा पदवी वा पदव्योत्तर कोर्स नाही तर तो एक सर्टिफिकेट कोर्स आहे. सीएची परीक्षा अतिशय कठीण असते. निकाल अतिशय कमी लागतो तरी लाखो विद्यार्थी दरवर्षी ही परिक्षा देतात.

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया (वेबसाइटचे नाव : आयसीएआय.ऑर्ग) ही चार्टर्ड अकाऊंटंटस्(सीए)च्या व्यवसायाचे नियमन करणारी संस्था १९४९ साली लोकसभेने संमत केलेल्या कायद्यानुसार स्थापन झाली. आज तिचे अडीच लाखांहून अधिक सदस्य आहेत. जी व्यक्ती या संस्थेने घेतलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होते तिला सदस्यत्व घेता येते. या संस्थेचे सदस्यत्व घेणे अनिवार्य नसले तरी सीएचा व्यवसाय केवळ सदस्यांनाच करता येतो. म्हणजेच नोकरी करणारे सदस्य नसले तरी चालते.
खरे म्हणजे सीए कोर्स हा पदवी वा पदव्युत्तर कोर्स नाही तर तो एक सर्टिफिकेट कोर्स आहे. याची परीक्षा इन्स्टिटय़ूट घेते. परीक्षा वर्षांतून दोन वेळा म्हणजे मे आणि डिसेंबर महिन्यांत घेतल्या जातात. परीक्षा कठीण असते; निकाल अतिशय कमी लागतो तरी लाखो विद्यार्थी दर वर्षी ही परीक्षा देतात.
सीए डॉक्टरेट करण्यासाठी पात्र असतात. सीए इन्स्टिटय़ूट मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासारखे कोर्सेस घेत असते.
बारावीनंतर सीपीटी म्हणजे कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्ट ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन वा पदव्युत्तर या कोर्ससाठी विनापरीक्षा प्रवेश घेता येतो. हा कोर्स करण्यासाठी वाणिज्य क्षेत्राची पाश्र्वभूमी असावी अशी अट नाही. कला आणि शास्त्र पाश्र्वभूमी असणाऱ्यांना जरा जास्त मेहनत करावी लागेल एवढेच.
हा कोर्स करण्यासाठी कोणा सीएच्या फर्ममध्ये तीन वर्षांची उमेदवारी करावी लागते जिला आर्टिकलशिप असे म्हणतात. या तीन वर्षांत इन्स्टिटय़ूटने निश्चित केलेले वेतन दिले जाते जे अर्थातच माफक असते. म्हणजेच या तीन वर्षांत त्या विद्यार्थ्यांला विशेष काही अर्थार्जन होत नसल्याने तो आपल्या पालकांवर अवलंबून असतो. या तीन वर्षांच्या आर्टिकलशिपपैकी शेवटचे सहा महिने एखाद्या उद्योगात अ‍ॅप्रेंटिसशिप करता येते. ज्यांना पुढे नोकरी करायची असते त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील उद्योगातही अप्रेंटिसशिप करता यावी म्हणून ही सोय केली गेली आहे. या उमेदवारीच्या काळात पहिल्या दिवसापासून सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव प्राप्त व्हावा अशी अपेक्षा असते.
नोकऱ्या सर्वच क्षेत्रांत उपलब्ध आहेत. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, म्युच्युअल फंड मॅनेजर, प्रोजक्ट मॅनेजमेंट यांसारख्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. अर्थात नोकऱ्या उपलब्ध होण्याचे प्रमाण हे अर्थव्यवस्थेच्या वाढीवर अवलंबून असते. सीएंना मिळणारे वेतन हेसुद्धा तसेच ठरते. सध्या नुकताच सीए झालेला तरुण १५ ते २० हजार रुपये दरमहा वेतन घेतो तर ३ ते ५ वर्षांच्या अनुभवानंतर वेतन दरमहा ३५ ते ५० हजापर्यंत जाते. अर्थात हा काही नियम नाही. नोकरी करू इच्छिणाऱ्या सीएंनी वित्तीय (फायनान्स) क्षेत्रात मॅनेजमेंटची पदवी मिळवली तर नोकरी मिळण्याची आणि लवकर वेतनवाढ होण्याची शक्यता जास्त असते.
सीए आणि कंपनी सेक्रेटरी हेसुद्धा नोकरी मिळवण्यासाठी एक चांगले क्वालिफिकेशन आहे. कारण काही कंपन्यांना पूर्ण वेळ कंपनी सेक्रेटरीची नेमणूक करणे बंधनकारक आहे.
हल्ली मुलींचा कलसुद्धा सीए करण्याकडे असल्याचे जाणवते. सीए झालेल्या महिला नोकऱ्या करताना जशा दिसतात तशा त्या व्यवसायातपण दिसू लागल्या आहेत.
परदेशी सीए म्हणून नोकरी करावयाची असेल तर त्या त्या देशाच्या सीए इन्स्टिटय़ूटची परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे. आपल्याकडे सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भारतात कुठेही व्यवसाय करता येतो तशीच परिस्थिती सगळीकडे नाही. अमेरिकेत तर प्रत्येक राज्यासाठी वेगळी परीक्षा आहे. ती परीक्षा उत्तीर्ण होणे हे त्या राज्यात सीए म्हणून काम करण्यासाठी अनिवार्य आहे.
नोकऱ्या खासगी वा सार्वजनिक उद्योगात तसेच सरकारी खात्यात मिळतात. सीए अकाऊंटस्, ऑडिट, टॅक्सेशन वा जनरल व्यवस्थापन अशा सर्व विभागांत नोकरीत असलेले आढळतात.
कंपनी कायद्यानुसार काही मोठय़ा उद्योगांना अकाऊंटस् डिपार्टमेंटच्या प्रमुखपदी सीएंची नेमणूक करणे बंधनकारक आहे.
सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर व्यवसाय करणे, स्वतंत्रपणे किंवा भागीदारीत आणि नोकरी करणे हे दोन पर्याय आहेत. जे सीएचा व्यवसाय करतात त्यांना अन्य कोणताही व्यवसाय वा धंदा करण्यास मनाई आहे, याला अर्थातच शाळा कॉलेजमध्ये शिकवणे हा अपवाद आहे. पण तेसुद्धा काही अटींवरच.
सीएची नोकरी काय किंवा व्यवसाय काय दोन्ही तणावपूर्ण असतात. यात यशस्वी होण्यासाठी आवश्यकता कशाची असेल तर याची :

  • नियमित वाचन आणि अभ्यास याद्वारे कायद्याबाबत अद्ययावत ज्ञान
  • आकडेमोडीची आवड
  • विश्लेषण करता येण्याची क्षमता
  • विविध प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याची कला
  • आपल्या ज्ञानाचा कामात वापर करण्याची क्षमता
  • उद्योगशीलता
  • शिस्तशिर आणि पद्धतशीर

सीएचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर खूपच क्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यांपैकी ऑडिट करणे म्हणजे हिशेब तपासणे हे एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठा देणारे काम असते, ज्या कामाला सर्टिफिकेशनचे काम असे म्हटले जाते. कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक कंपनीला, मग ती प्रायव्हेट लिमिटेड असो वा पब्लिक लिमिटेड असो, ऑडिट करून घ्यावे लागते. याव्यतिरिक्त बँका, विमा, स्टॉक एक्सेंज तसेच फेरासारखे वित्तीय कायदे वगैरे कायद्यानुसार ऑडिट वा सर्टिफिकेशन करून घ्यावे लागते. याशिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कायद्यांनीसुद्धा ज्यांची उलाढाल एका विशिष्ट मर्यादेहून जास्त आहे त्यांना ऑडिट करून घेणे अनिवार्य केले आहे. विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढय़ा वगैरेंनासुद्धा ऑडिट करून घ्यावे लागते. अनेक उद्योग कायद्याने करावयाच्या ऑडिटच्या व्यतिरिक्त इंटर्नल ऑडिट करून घेतात ज्याचा अहवाल व्यवस्थापनाला दिला जातो. हे एक मोठे क्षेत्र सीएंना उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त सीए कर सल्लागाराचे कामसुद्धा करतात. यात प्रत्यक्ष कर म्हणजे आयकर आणि सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष कर म्हणजे व्हॅट, सव्‍‌र्हिस टॅक्स, व्यवसाय कर, एलबीटी वगैरेंचा समावेश होतो. यात सल्ला देण्याव्यतिरिक्त त्या त्या कायद्याप्रमाणे वेळोवेळी विवरणपत्रे भरणे, कराची रक्कम निश्चित करणे, कर निर्धारण करून घेणे या कामाचा समावेश होतो.
मॅनेजमेंट अकाऊंटिंग, बजेटिंग, फोरकास्टिंग, मॉनिटरिंग, मालमत्तेचे वा कंपनीचे वा भागांचे व्हॅल्युएशन करणे अशा अनेक प्रकारच्या सेवा देण्याची संधी सीएंना मिळते.
थोडक्यात म्हणजे उद्योगाच्या स्थापनेपासूनच सीएचा सहभाग असतो आणि तो दैनंदिन स्वरूपाचा असतो. प्रश्न असतो ते काम आपणापर्यंत पोचणार कसे हा..
(लेखक प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट आहेत)
अरुण केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 1:19 am

Web Title: career special 21
टॅग Coverstory
Next Stories
1 मूलभूत विज्ञान : मूलभूत विज्ञानातील संधी
2 वैद्यकीय क्षेत्र : रुग्णसेवेचं व्रत
3 प्रशासकीय सेवा : आयएएस अर्थात सनदी सेवांमधील संधी…
Just Now!
X