lp00खेळ म्हणजे फक्त क्रिकेट हे आपल्या देशातलं समीकरण आता बदलायला लागलं आहे. मुख्य म्हणजे क्रीडा क्षेत्राची आवड आता फक्त टीव्हीवरून खेळ बघण्यापुरती राहिलेली नाही तर या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आता वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

काही वर्षांपूर्वी ९० टक्के वा अधिक गुण मिळाले तर विज्ञान शाखा, त्यातून मग इंजिनीयर, डॉक्टर किंवा त्यातीलच एखादी उपशाखा निवडायची, ८० टक्क्य़ांच्या आसपास गुण मिळाल्यास वाणिज्य शाखा बघायची आणि यापैकी कुठेच प्रवेश मिळाला नाही आणि अभ्यासात फार गती नसेल तर कला शाखेतील एखादा अभ्यासक्रम निवडून आपली कारकीर्द घडविणे असा साधा सोप्पा सरळ मार्ग होता. आता मात्र अनेक अभ्यासक्रमांची उपलब्धता, आवड व क्षमता यांना न्याय देऊन कारकीर्द घडविण्यासाठी वेगळा मार्ग निवडण्याची तयार झालेली मानसिकता यामुळे चित्र खूपच पालटलेले आहे.
खेळातून उपजीविकेची संधी?
ज्यांना खेळामध्ये गती आहे, खेळांची आवड आहे, त्यांच्यासाठी, तसेच ज्यांना नावीन्याची ओढ आहे, स्वत:मधल्या सृजनशीलतेला वाव देण्याची इच्छा आहे आणि ज्यांना मळलेल्या वाटेवरून न जाता काही वेगळे करून दाखवायचे आहे अशा सर्वासाठी क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचे हे आगळेवेगळे क्षेत्र समोर खुले आहे.
पूर्वी खेळ हे फक्त विरंगुळ्याचे साधन मानले जायचे. आता मात्र शारीरिक तंदुरुस्तीचे समाजात वाढणारे महतत्त्व व क्रीडा प्रकारांना मिळू लागलेली राजमान्यता व लोकमान्यता यामुळे यशस्वी क्रीडा कारकीर्द असलेली व्यक्ती म्हणजे खेळण्यात खूप बक्षिसे मिळविलेला क्रीडापटू, असे चित्र आता राहिले नसून खेळाच्या विविध अंगांचा उपयोग एक यशस्वी व्यवसाय म्हणून करता येऊ शकतो, हे आता आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. खेळाशी निगडित असे अनेक व्यवसाय उदयाला आले आहेत.
१. खेळाडू : एक व्यावसायिक खेळाडू म्हणून क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालविणे, ही संकल्पना तशी जुनीच आहे. पूर्वी राजेरजवाडे, संस्थानिक आपल्या पदरी मल्ल/ कुस्तीगीर बाळगीत असत, आता विविध अस्थापना क्रीडादर्जा बघून खेळाडूंना नोकऱ्या देतात, त्यांना क्रीडा सुविधा पुरवितात. क्रिकेट, टेनिस यांसारख्या ‘ग्लॅमरस’ खेळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना तर जाहिरातींचे एक ‘श्रीमंत’ माध्यम खुले झाल्याचे आपण बघत आहोतच. खेळाडू म्हणून फक्त क्रिकेटच खेळता यायला पाहिजे असे नव्हे तर फुटबॉल, हॉकी, टेबलटेनिस यासारख्या खेळातील कौशल्यावरही भवितव्य घडू शकते. खेळाडू म्हणून प्रत्यक्ष मैदानावर असलेली कामगिरी वयोमानानुसार जरी थांबली, तरी त्याच खेळामध्ये व्यावसायिकरीत्या संघटनात्मक कार्य करण्याचा पर्यायही खुला आहेच. पंच, अधिकारी हा देखील अध्र्या वा पूर्ण वेळचा व्यवसाय बनू शकतो. अनेक कार्यक्रमांच्या उद्घाटन/ समारोप समारंभांमध्ये, दूरचित्रवाणींवरील अनेक कार्यक्रमात ‘क्लब्ज’मध्ये शारीरिक कसरतींची प्रात्यक्षिकेही सादर करणाऱ्या कसरतपटूंना मागणीही आता वाढू लागली आहे.
२. क्रीडा प्रशिक्षक : क्रीडा प्रशिक्षक हा आता केवळ ‘पी. टी. टीचर’ राहिलेला नाही. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, क्रीडा संस्था, क्लब्स्, कंपन्या अशा विविध ठिकाणी सर्वसाधारण क्रीडा प्रशिक्षण अथवा विवक्षित खेळाच्या विशिष्ट प्रशिक्षणाची जबाबदारी क्रीडा प्रशिक्षकाकडे दिली जाते. शैक्षणिक संस्थांच्या गुणमूल्यांकनासाठी आता उत्तम क्रीडा सुविधा व क्रीडा दर्जा आवश्यक झाल्यामुळे अशा क्रीडा प्रशिक्षकांची आता गरजही निर्माण झाली आहे. वैयक्तिक किंवा सांघिक क्रीडा प्रशिक्षण, नवीन किंवा अनुभवी खेळाडूंना मार्गदर्शन, क्रीडेशी संबंधित एखाद्य विशिष्ट पैलूचेच प्रशिक्षण अशा प्रकारे एकाच संस्थेमध्ये पूर्ण वेळ अथवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये फक्त थोडा थोडा वेळ तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका आता निभावता येऊ शकते.
३. क्रीडा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांची देखभाल व व्यवस्थापन : अनेक क्लब्स्, हॉटेल्स, रिसॉर्टस् येथे क्रीडासदृश्य मनोरंजनात्मक उपक्रमांना खूप प्रतिसाद मिळतो. या ठिकाणी व्यवस्थापनाचे काम सृजनशील आहे, आकर्षकही आहे आणि विविधांगी जबाबदाऱ्या हाताळण्याचे कसब लागणारे आहे. ग्राहकाचे समाधान, प्रशिक्षित व इतर कर्मचारी यांना हाताळण्याचे कौशल्य आणि पोहण्याच्या तलावाचे वा जिमचे व्यवस्थापन इतर सुविधांवर देखरेख अशी अनेक कामे यात अंतर्भूत असतात.
४. शारीरिक तंदुरुस्ती तज्ज्ञ (फिजिकल फिटनेस ट्रेनर) : हा सध्याचा एक अत्यंत आकर्षक पर्याय आहे. जिम्स, हेल्थ क्लब्स किंवा वैयक्तिक तंदुरुस्तीसाठी घरी या ‘ट्रेनर्स’ना आता मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. अगदी गृहिणींपासून ते उच्चपदस्थ अधिकारी असो वा गल्ली-बोळातील जिम वा पंचतारांकित हॉटेल असो – विविध स्तरांवर या व्यवसायाला आता प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली आहे. उच्चस्तरीय व्यक्ती, नेते मंडळी, अभिनेते यांच्या तर घरच्या घरी सुसज्ज व्यायाम उपकरणे असतात आणि त्यांचा स्वत:चा ‘पर्सनल ट्रेनर’ देखील असतो.
५. क्रीडा उद्योजक : क्रीडा साधनांची, खेळासाठी लागणाऱ्या कपडय़ांची व इतर वस्तूंची निर्मिती, विक्री हा एक चांगला पर्याय आता उपलब्ध आहे.
६. क्रीडापत्रकारिता/ समालोचन : भाषा चांगली असणारे खेळाडू वा खेळांची आवड असणारी व्यक्ती लेखन वा दृकश्राव्य माध्यमातून आपली कारकीर्द घडवू शकते. क्रीडा समालोचक व समीक्षकांनाही हल्ली चांगले दिवस येऊ लागले आहेत. खेळाच्या खाचाखोचांची माहिती, भाषेवरील प्रभुत्व व विश्लेषणात्मक गुणवत्ता ही या क्षेत्रातील यशस्वितेची गुरुकिल्ली ठरते. वृत्तपत्रे व विविध वाहिन्या अशा हरहुन्नरी व्यक्तींच्या नेहमी शोधातच असतात.
खेळाचीही खूप आवड आहे आणि शैक्षणिक गुणवत्ताही चांगली आहे अशांना क्रीडा मानसशास्त्र, क्रीडावैद्यकशास्त्र, क्रीडा आहारशास्त्र अशा एक ना अनेक पर्यायांचा विचार शक्य आहे.
असे आहेत क्रीडाक्षेत्राशी संबंधित काही प्रमुख पैलू. अर्थात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे खेळाची आवड, माहिती व त्या त्या अनुषंगाने योग्य ते प्रशिक्षण. क्रीडा प्रशिक्षकांसाठी तर भारतभरातील व भारताबाहेरील विद्यापीठांचे अनेक पदवी अभ्यासक्रम आहेत, भारत सरकारद्वारा त्यांच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सहा आठवडय़ांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून वर्ष दोन वर्षे चालणारे, अगदी दहावी-बारावी एवढीच उत्तीर्ण पात्रता आवश्यक असणारे अभ्यासक्रम आहेत. विविध संस्थांचे व्यवसायभिमुख छोटे छोटे पदविका अभ्यासक्रम तर असंख्य आहेत, यातले अनेक अभ्यासक्रम जरी सरकारमान्य नसले तरी एक चांगला पाया तयार करण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत.
डॉ. नीता ताटके