श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कवितेतील दोन ओळी आठवल्या तरी श्रावणातील निसर्गाची सुंदर किमया डोळ्यांसमोर येते. श्रावणातील सृष्टीच्या रूपाने जणू एक सुंदर स्वर्ग नगरी देवाने आपल्याला भेट केली आहे. श्रावणाचे खरे सौंदर्य कोकणात किंवा गावच्या ठिकाणी पाहायला मिळते. कडी-कपाऱ्यातून वाहणारे पाणी, धो धो वाहणारे धबधबे, हिरवी शाल पांघरून बसलेले डोंगर, सूर्याच्या सोनेरी किरणाने चमकून उठणारी धरणीमाता, त्यालाच साथ देणारी पक्ष्यांची किलबिलाट, थुईथुई पिसारा फुलवून आनंदाने नाचणारा मोर, रानात चरणारी गाई-गुरे, नदीकाठी शेतामध्ये दिसणारी माणसे हे अलौकिक रूप फक्त आणि फक्त श्रावणातच पाहायला मिळते.
त्यासोबत श्रावण महिन्यात तर विविध सणांची रेलचेल असते. आपल्या संस्कृतीने श्रावणात नागपंचमीला शेतकरी राजाच्या मित्राची, नागराजाची पूजा करायला आणि आभार मानायला शिकवले आहे. त्यानंतर गोकुळाष्टमीला खटय़ाळ-खोडकर कृष्णाचा जन्म साजरा करणे, गोकुळाष्टमीला दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांनी मजा लुटणे, दर मंगळवारी स्त्रियांचे गौरीपूजन व मंगळागौरीचे खेळ यांसारखे कार्यक्रम यांची सगळेजण आतुरतेने वाट पहात असतात. बहीण-भावाच्या नात्याला अतूट बंधनात बांधून ठेवणारा रक्षाबंधनासारखा सण, कोळी बांधवांनी समुद्र राजाला सोन्याचा नारळ देऊन पूजा करणं यात संस्कृतीचा गोडवा आहे.
हा पूर्ण महिना कसा येतो, कसा जातो ते कळत नाही. क्षणोक्षणी बदलणारे सृष्टीचे रंग आपल्याही मनावर परिणाम करत असतात. असा हा श्रावण नावाप्रमाणे सुंदर, सोज्वळ, अनामिक, नटलेला, बहरलेला, नाचणारा, गाणारा, बागडणारा, हसवणारा, साद घालणारा अशा विविध रूपांनी सजलेला आहे. श्रावणाची आठवण अलगद, हळुवार मनाला उत्साह आणणारी आहे.
याशिवाय श्रावणाने नटलेल्या निसर्गात भटकंती करून आल्यावर मनाला आल्हाद मिळतो. अंगावर रोमांच येतात. आपणच आपल्यात हरवून गेल्यासारखे वाटते.
श्रावण महिना असाच राहण्यासाठी, ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’ कारण तरच..
श्रावणातल्या या स्वप्नांना साक्षात्काराची जोड असेल
हा वरुण राजा
माझ्या शेतकऱ्याला
तेजाचे उधाण देईल
सौभाग्याची ही खाण
अशी निरंतर उजळत राहील
माझा श्रावण मग
सुंदर श्रावणच राहील.
सुंदर साजिरा श्रावण पाहुनी
घेऊनी आला बालपणीच्या
गोड आठवणी
हुरहुर लागली माझिया मनी
भटकावे असे रानीवनी..
श्रीकला नलावडे

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors of sharavan heaven
First published on: 28-08-2015 at 01:28 IST