नाशिक जिल्हा, मालेगाव तालुका. या तालुक्यातल्या रावळगाव आणि वडेल या दोन छोटय़ा गावांमध्ये निसर्गाच्या कुशीत माझं बालपण गेलं. वडेल मामाचं गाव. जास्त निसर्गरम्य. गावात वाहणारी मोसम नदी. खरंतर तिचं नाव मोक्षगंगा. मालेगावात हीच नदी वाहते. तिथे मुस्लीम वस्ती जास्त. मोसम हा तसा हिंदी किंवा उर्दू शब्द. कदाचित त्यामुळेही अपभ्रंश होऊन मोक्षगंगेला मोसम म्हटलं जात असावं. तर अशा या मोक्षगंगेच्या तीरावरील निसर्गरम्य वडेल गावात श्रावण तसा नेहमीच भरारलेला असायचा.
कोकणात जशी ताडामाडाची झाडं असतात ना तशी आमच्याकडे शिंदीची झाडं श्रावणात अधिकच छान दिसायची. ही झाडं कोकणातल्या झाडांसारखीच हुबेहूब दिसतात, त्यांना जी गोड फळं येतात त्यांना शिन्दोळे म्हणतात, ते खायला मजा यायची. नदीच्या पाण्यात डुंबण्याची मजा यायची. श्रावणात आई या नदीच्या खडकांवर साती आसरांचं एक मंदिर होतं त्या मंदिरात दहीभाताचा नैवेद्य दाखवायची. सभोवताली डोंगरराजी तर भरपूर होती. भवानीआईची टेकडी, मुंजरेश्वर डोंगर, दुग्धेश्वर डोंगर अशा डोंगरांवर श्रावणात शाळांच्या सहली आयोजित केल्या जायच्या. लहान वयात डोंगर चढून पाय भरून यायचे. दुखायचे पण तरी आम्ही जायचो. कारण बोरं खायला मिळायची. रस्त्यावर डोंगरांवर चिंच, बोरं आणि एक जाळीदार झाड डोंगरावर असतं त्याला आमोनी कामोनी नावाचं तुरीच्या डाळीच्या आकाराएवढं फळ येतं. चव अतिशय सुंदर. आंबट, तुरट आणि गोड अशा तीन चवी या फळात मिळतात, चव तोंडात रेंगाळत राहते, अशी छान फळं खाण्याची मजा यायची ती श्रावणातच. डोंगर चढून गेल्यावर आत सगळ्यांनी सहभोजन करायचं. ते झालं की तिथल्याच एका खडकात असलेल्या नैसर्गिक टाक्यातलं पाणी प्यायचं. त्या टाक्यात जिवंत झरे होते त्यातून सतत पाणी झिरपायचं. शुद्ध स्फटिकासारखं हे गोड पाणी. निसर्गाची ही किमया नाही जमायची माणसाला. अशा वेळी बोरकरांची कविता आठवायची. हिरवळ आणिक पाणी तेथे, सुचती मजला गाणी, निळीतून पाखरे पांढरी, किलबिलतात थव्यांनी. हसरी, लाजरी, जराशी साजिरी अशी पावसाची सर सर्रकन यायची आणि झर्रकन ओलं करून जायची. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम श्रावणधारा हे गाणं आम्ही फक्त ऐकायचो नाही तर अनुभवायचो. पाऊस अनुभवायचा तर पावसातच गेलं पाहिजे, श्रावण अनुभवायचा तर श्रावणच झालं पाहिजे.
प्रसन्न शिडकाव्यानंतर भलं मोठ्ठं इंद्रधनुष्य आकाशात दिसायचं. आता सिमेंटच्या जंगलात शहरात हा नजारा नाही अनुभवता येत. बालकवींच्या कवितेतला श्रावण चक्क आम्ही अनुभवला, आजही कधी गावाकडे गेलो की अजून अनुभवतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी उन पडे,
वरती बघता इंद्रधनुचा,
गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण जणु बांधले,
नभोमंडपी कुणी भासे,
झालासा सूर्यास्त वाटतो,
सांज अहाहा ती उघडे,
तरूशिखरांवर, उंच घरांवर,
पिवळे पिवळे उन पडे!
ही कविता साक्षात जिवंतपणे आम्ही अनुभवायचो. सांज खुलणे, सांज उघडणे हा अनुभव शहरात कसा येणार? कोवळी उन्हं, खुललेली सांज, झाडांवर घरांवर पडलेली पिवळीधम्मक उन्हं. सायंकाळचे पश्चिमरंग आजही काळजाच्या कॅनव्हासवर तितकेच स्पष्ट आहेत. हे सगळं बघितलं, म्हणूनच काळजात श्रावणच काय पण हिरवीगार पोपटी कविता सतत जिवंत आहे. पाडगावकर म्हणतात, ऊन खातात, वारा पितात, ज्यांची हृदयं झाडांची, त्यांनाच फक्त फुलं येतात! श्रावण अनुभवायचा तर शहरी गोंगाटातून बाहेरच पडलं पाहिजे. खेडय़ात गेलं पाहिजे. मानवी वस्तीपासून दूर एकांतात गेलं पाहिजे, अल्प काळ का होईना पण गेलं पाहिजे.
मश्रूम, भूछत्र असं शहरी माणसं ज्याला म्हणतात त्याला आम्ही कावळ्याच्या छत्र्या म्हणून लहानपणी ओळखायचो, श्रावणात त्या भरपूर उगवायच्या, कुठेही, कशाही. त्या आम्ही उपटायचो आणि त्या छत्रीचा मुलायम स्पर्श गालावर अनुभवायचो. अशा किती तरी वनस्पती श्रावणात उगवतात त्या सहजच दिसायच्या. त्यांच्या पानांवर पावसाचे थेंब एखाद्या मोत्याप्रमाणे स्थिर मध्यभागी असायचे, त्या छोटय़ाशा थेंबात आपलं प्रतिबिंब दिसतं, ते बघताना आनंद व्हायचा. तो अखंड गोल टपोरा थेंब आपण घरी घेऊन जाऊ असं मला वाटायचं म्हणून मी तो पानावरून अलगद हातात घ्यायचो पण असा प्रयत्न केला की तो थेंब खाली मातीत पडायचा, विरघळून जायचा, विखरून जायचा, पुन:पुन्हा थकेपर्यंत हा प्रयत्न चालू असायचा, तो टपोरा मोती आजपर्यंत पकडता आला नाही, हेच तर असतं ना निसर्गाचं गूढरम्य रहस्य!
सांगण्यासारखं खूप आहे, आणि तसाही हा श्रावण शब्दात पकडता येईल इतका साधा सोपा असा थोडाच आहे, रसिक मनांना तो सतत आपल्या गूढरम्य विलोभनीय रूपांनी संमोहक अशी भुरळ घालतच राहणार आहे. त्या संमोहित अवस्थेत राहणंच जास्त सुखद वाटतं.
हिरवी बांगडी घालून धरणी,
हिरवीच नेसून छान पैठणी,
हिरवे पैंजण लेवून अद्भुत,
आली ठुमकत स्वारी,
सखे गं आला श्रावण घरी!
आल्या श्रावण सरी,
सखे गं आला श्रावण घरी!
 भरत उपासनी

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors of sharavan rain
First published on: 28-08-2015 at 01:30 IST