विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

पैसा, सत्ता आणि वासना माणसाला कोणत्या थराला नेतील ते सांगता येत नाही अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे. पण हे ज्या वेळेस  एखाद्या राज्य किंवा राष्ट्राच्या बाबतीत लागू केले जाते त्यावेळेस त्यातील वासना व सत्ता एकत्र येऊन त्याची सत्ताकांक्षा तयार होते. ही सत्ताकांक्षा एखाद्या राष्ट्राला कोणत्या थराला नेईल ते सांगता येत नाही अशा आशयाची नवीन म्हण कोविडकाळात तयार झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पश्चिम बंगालसह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांनी कोविडकाळातच संपूर्ण देश ढवळून निघाला. एका बाजूस काही राज्यांमध्ये करोनाने कहर केला आणि अगदी रस्त्यांवर, घरादारांत, रुग्णालयांत मृत्यूचे थैमानच सुरू होते त्यावेळेस राजकीय नेतृत्व या साऱ्याकडे डोळेझाक करत  होते. धार्मिक मुद्दय़ांवर मतांचे ध्रुवीकरण हेच उद्दिष्ट राहिल्याने लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या महाकुंभमेळ्याकडेही दुर्लक्षच करण्यात आले. अखेर व्हायचे तेच झाले, जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्यावर जागतिक प्रसारमाध्यमांच्या बाबत सारवासारव करण्यासाठी मोहीमच हाती घेण्याची वेळ आली.. पण वेळ निघून गेली होती.

स्थानिक म्हणजे देशांतर्गत राजकारण वेगळे आणि आंतरराष्ट्रीय संबंध किंवा परराष्ट्र धोरण वेगळे असे समजण्याची चूक आपल्याकडे सत्ताधाऱ्यांनी केली असे या घटनाक्रमावरून लक्षात येते आहे. कारण जगभरातील प्रसारमाध्यमांनी आता भारत सरकार आणि खासकरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावरच दुसऱ्या लाटेला वाव दिल्याचा ठपका ठेवला आहे. गेल्याच आठवडय़ात ‘लोकप्रभा’नेही ‘दुसऱ्या लाटेला राजकारणीच जबाबदार’ अशी थेट कव्हरस्टोरी केली होती. भारतीय प्रसारमाध्यमांनीही या संदर्भात टीका केलेलीच होती. मात्र आताशा सरकारची तळी उचलून धरणारी अशीही एक माध्यमफळी तयार आहे. त्यामुळे त्याची तीव्रता कदाचित फारशी जाणवलेली नसेल. मात्र या आठवडय़ात संपूर्ण जगभरातून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली ज्याची दखल ‘कथित महासत्तेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या’ सरकारला घ्यावीच लागली.. पण वेळ निघून गेली होती.

कथित एवढय़ासाठीच म्हटले कारण महासत्ता हे भारतीयांचे स्वप्न आहे. त्यात वावगे काहीच नाही. पण महासत्ता होणे हे तेवढे सोपे नसते, फुकाच्या गप्पा आणि छातीचे मोजमाप आपल्याला महासत्तापदापर्यंत नेऊन ठेवत नाही. तर त्यासाठी त्या देशाला अनेकानेक बाबींचे भान असावे लागते. भारताने कोविडची हाताळणी या दुसऱ्या लाटेच्या वेळेस ज्या पद्धतीने केली त्यावरून आता भारताची तुलना तिसऱ्या जगातील देशांशीच परत एकदा होऊ लागली आहे. या दुसऱ्या लाटेच्या आधी आपण लसराजनय दाखवत सहा कोटी लशी मित्रदेशांना पाठविल्या होत्या. चीनवर मात करण्यासाठी ‘क्वाड’ देशांमध्ये पुढाकार घेतला होता. त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाणार तोच ही दुसरी लाट येऊन ठेपली आणि सत्तांकांक्षेच्या मागे लागताना सत्ताधाऱ्यांचे भानही सुटले अखेरीस त्या कृतीने नागरिकांना मृत्युदारात नेऊन उभे केले. सत्ताधाऱ्यांचे भान इतके सुटले की, अखेरीस चेन्नई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला विशेष निर्देश देत सरकारला भानावर आणण्यासाठी पुढाकार घेण्याशिवाय गत्यंतर राहिले नव्हते. दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवरच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी अतिशय आक्रमक भूमिकाही न्यायालयालाच घ्यावी लागली. आणि दुसऱ्या बाजूस लसीकरणाच्या सावळ्या गोंधळाबाबत भूमिका स्पष्ट करणारे निर्देशही देण्याची वेळ सर्वोच्च न्यायालयावरच यावी, यातच सारे काही आले. मात्र तोपर्यंत केंद्र सरकारच्या हातून याही संदर्भात वेळ निघूनच गेली होती.

..तोपर्यंत जागतिक माध्यमांनी याकडे जगाचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आणि तिथेही भारतीय नेतृत्त्वाच्या हातून वेळ निसटलीच. त्यानंतर सारवासारव करण्याचे प्रयत्न झाले. दरम्यान, भारताच्या दिशेने जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. कुठून हवाई दलाची विमाने तर कुठून नौदलाच्या युद्धनौकांमधून ऑक्सिजन आणि इतर उपयुक्त उपकरणे यांचा ओघ देशाच्या दिशेने आला. त्यातूनही पाहा सरकारचे ‘गुडविल’ किती आहे, असेही सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. भारत हा आता दुर्लक्ष करण्यासारखा देश नाही, हे लक्षात येत असले तरी या जगात फुकट कधीच काही नसते. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तर ती मोजावीच लागते. मुळात अशा प्रकारची वेळ आपल्यावर यावी आणि ती आपणच येऊ द्यावी हा शरमेचा आणि नामुष्कीचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याचे भांडवल करणे हा तर  आधी मृत्यू होऊ देण्यासही आपणच आपल्या कृतीने कारणीभूत ठरायचे आणि नंतर त्या मृताच्या टाळूवरचेही लोणी खायचे असाच अश्लाघ्य प्रकार आहे. यात अभिमानास्पद तर नाहीच काही पण शरमेने मान खाली जावी असेच आहे.

पलीकडे चीनने तर ही संधी सोडली नाही. त्यांनी भारतातील या करुणामयी कोविडचित्रांचेही व्यंगचित्रच करून ठेवले. याच काळात चीनने त्यांचे अवकाश स्थानक अंतराळात धाडले. त्याचे छायाचित्र आणि बाजूला भारतातील चितांना ओळीने अग्नी दिल्याचे छायाचित्र सरकारी प्रभावशाली एजन्सीच्या अधिकृत खात्यावरून ‘पाहा कोण कुठे अग्नी प्रज्वलित करतंय’ म्हणजे वेगळ्या शब्दांत भारताची लायकी पाहा काय आहे, असे जाहीररित्या प्रसारित करण्याचा उद्योग केला. अर्थात जागतिक रोषानंतर त्यांनी ते डिलिट केले खरे पण तोपर्यंत तिथेही वेळ निघून गेली होती. चीनवर रोष आणि भारताचे हसे दोन्ही होऊन गेले.

आता येणाऱ्या मदतीच्या ओघाची परतफेडही करावीच लागले या ना त्या रूपात. अशा वेळेस जागतिक पटलावर अनेकदा धोरणांना मुरड घालण्याची वेळ येते असे इतिहास सांगतो. म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या या साऱ्याला उद्योगांना गालबोट म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही!