नित्याच्या व्यापाच्या धबडग्यातून चार दिवस तरी घराबाहेर पडायला मिळाले तरी आनंदाला अक्षरश: बहार येतो. चार दिवसांच्या पर्यटनामुळे (हवापालटामुळे) उर्वरित काळ नक्कीच चांगला जातो. त्यामुळे पर्यटनापासून मिळणारी ‘ऊर्जा’ खचितच विशेष म्हणायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वीसारखे ‘पर्यटन’ कठीण व गैरसोयीचे अजिबात राहिलेले नाही. नवनवीन तंत्रज्ञानाने ते अधिक सरळ, सोपे व एकदम सोयीचे बनले आहे. नोकरीच्या ठिकाणी वर्षांतून निदान तरी मालकाकडून पर्यटन भत्ता, एलटीए/एलएफसी मिळत असल्याने कुटुंबासह मौजमजा करता येते. प्रवाशांना पर्यटन घडवून आणण्यासाठी हल्ली बऱ्याच प्रवासी कंपन्या पुढे सरसावत आहेत. प्रवाशांनी एकदा त्यांचे शुल्क दिले की खरोखरीच ते मोकळे असतात. कारण खाणे, पिणे, भोजन, निवास, स्थानिक भ्रमण साऱ्याची व्यवस्था तेच करतात. हे खरे असले तरी ‘स्वयंनियोजित पर्यटन’-देखील काही औरच असते आपण आपल्या इच्छेनुसार पर्यटन करू शकतो वा तेथून लगेच सटकूही शकतो. प्रत्येकाच्या डाव्या-उजव्या बाजू असतातच. त्यात प्रत्येकाची इच्छा व आवड, कुवत वेगळी असते. त्यानुसार तो पर्यटन आराखडा ठरवू शकतो.

काही मौलिक सूचना

  • पर्यटनाअगोदर किमान तीन ते चार महिने पर्यटनस्थळ आपल्या ग्रुपमध्ये संमत करावे. (किमान सात-आठ जणांचा ग्रुप असल्यास चांगलेच) त्यानुसार अधिकाधिक माहिती (उदा. नकाशे, स्थळ इतिहास, भूगोल, आहार, विहार, संस्कृती, पेहेराव, रेल्वे टाइम टेबल इ.) विविध माध्यमांद्वारे मिळवावी.
  • विमान वा रेल्वेची जाण्याची, येण्याची, मधली सारी आरक्षणे करून टाकावीत. हॉटेलादी आरक्षणांसाठी व भोजनादी व्यवस्थांसाठी ग्रुपमधील एक व्यक्तीस दोन महिने अगोदर त्या ठिकाणी स्वत: पाठवावे. म्हणजे प्रवास करताना कुणाचीच गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळा-नुसार औषधे, पेहेराव घ्यावा. स्वत:चे वाहन घरापासून घेऊन जाणार असल्यास कोणतीच अडचण येणार नाही. छोटय़ा दहा-बारा तासांच्या प्रवासासाठी स्वत:चे वाहन ठीक आहे. पण हजारो कि. मी. च्या प्रवासासाठी रेल्वे, विमानाचा अवश्य वापर करावा) गाडीत पिण्याचे पाणी सोबत न्यावे.
  • हॉटेलात शिरताना तेथील अडचणींची सूचना व्यवस्थापकास प्रथम द्यावी. त्या अडचणी दूर कराव्यात.
  • पर्यटन करताना विशेषत: दक्षिण भारतात भाषेची अडचण प्रकर्षांने जाणवते. कोणत्याही वादग्रस्त मुद्दय़ांवर बोलणे टाळावेच. कारण सुसंवादापेक्षा विसंवाद होऊन पर्यटनाच्या रंगाचा बेरंग होऊ शकतो. आपल्या वाणीबरोबरच खाण्यावरदेखील नियंत्रण असावेच. कारण परराज्यातील खाण्याची आपल्याला तशी सवय नसते. उत्साहाच्या भरात अति खाणे महागात पडू शकते. आयत्या वेळी बिघडलेली प्रकृती स्वत:सोबत इतरांचादेखील बेरंग करते. रस्त्यावरील उघडय़ावरचे खराब पदार्थ कटाक्षाने टाळावेत. त्यामुळे उलटय़ा, जुलाब होऊ शकतात.
  • समुद्र, तलाव, नद्या, टेकडय़ा, जंगले इ. ठिकाणांचा मनमुराद आनंद अवश्य घ्या. पण जरा जपूनच. कुठेही दाखविलेली अती शौर्य वा उत्साह (ओव्हर एक्साईटमेंट) घातक वा जीवघेणी ठरू शकते. बऱ्याचदा दुर्घटना घडण्याची उदाहरणे आहेत.
  • पैसे हल्ली एटीएम वा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे काढ-घाल करणे शक्य होत असले तरी वेळप्रसंगी उपयोगी पडावी म्हणून थोडी रोख रक्कम अवश्य तुमच्या जवळ ठेवा.
  • प्रवासात (रेल्वे/ बस) शक्यतो कुणीही दिलेल्या गोष्टी खाऊ नयेत. कारण त्यात नशा/ अमली पदार्थ असू शकतात. त्याद्वारे लूटमारीची शक्यता नाकारता येत नाही.
  • सार्वजनिक ठिकाणी आपापसात भांडू नका व तसे वर्तन करू नका. त्याचा तिसरा गैरफायदा उठवू शकतो. मुक्कामी आल्यावर शंका-निरसन होऊ शकतो.
  • शक्यतो प्रवासाच्या अखेरच्या दिवशी खरेदी करा. म्हणजे ओझे वाहवत न्यायला नको.
  • तीर्थक्षेत्री पंडय़ा लोकांच्यापासून दूरच राहा. कारण तुमच्या भावनाविवशतेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
  • प्रवासात सदैव जागरूक राहणेच चांगले व हितावह.
  • पैशाचं पाकीट, तिकिटं नेहमी सांभाळून ठेवा.
    रामकृष्ण अभ्यंकर – response.lokprabha@expressindia.com
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before going to tour
First published on: 21-07-2017 at 01:03 IST