आठवडय़ाला १७०० तरुणांच्या आत्महत्या
नैराश्य हा एवढे दिवस मानसिक समजला जाणारा आजार प्रत्यक्षात शारीरिक असून तो मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्वाइन फ्ल्यू अशा कोणत्याही आजाराइतकाच गंभीर आहे. नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये ऑरगॅनो फॉस्फरस हे उंदीर, झुरळं मारायचं औषध घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण तरीही आपल्याकडे अजूनही या औषधावर बंदी आलेली नाही, हे जास्त धक्कादायक आहे.

आजचं राहणीमान, बदलती सामाजिक परिस्थिती, वाढती स्पर्धा, नातेसंबंध या सगळ्यामुळे लोकांचं जगणंच बदललं आहे. या स्पर्धेत टिकून राहताना बऱ्याचशा गोष्टींचा परिणाम आपल्या जगण्यावर होतोय याची कल्पना नसते. आणि ती असली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हळूहळू याचं प्रमाण वाढून एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने मानसिक आजारांसंबंधी नुकतंच एक सर्वेक्षण केलं. जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मदतीने केलेल्या या सर्वेक्षणाच्या अहवालात असं स्पष्ट म्हटलं आहे की, महाराष्ट्रासह मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज आहे. विविध प्रकारच्या मानसिक आजारांनी ग्रासलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्राचा देशभरातून दुसरा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्राचा विचार करता मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. मुंबईमध्ये ३८ हजार ५८८ तर राज्यात अंदाजे सव्वा लाख व्यक्ती मानसोपचार घेत असल्याची माहितीही या अहवालात  आहे. त्यामधील नैराश्यासंबंधीच्या नोंदी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतात.

Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

हल्ली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट अशा सोशल मीडियाच्या वापरामुळे जग जवळ येतंय, असं एकीकडे म्हणत असतानाच दुसरीकडे त्याच्या आधीन जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. या आधीनतेमुळे लोकांना विविध मानसिक-शारीरिक आजारांना सामोरं जावं लागत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मानसोपचार घेत असलेल्यांना कोणत्या प्रकारचा त्रास आहे, त्यांचा वयोगट कोणता याचीही माहिती घेण्यात आली. त्या वेळी ५० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये नैराश्य आणि चिंताग्रस्तता यांची लक्षणे प्रामुख्याने आढळून आली आहेत. दहा वर्षांच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांचा यामध्ये समावेश आहे. या अहवालामुळे एकूणच नैराश्य या आजारावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. त्याची लक्षणं, मूळ कारण, परिणाम, प्रतिबंधात्मक उपक्रम यांची माहिती घेणं महत्त्वाचं ठरतं.

मेंदूमध्ये नैराश्य येण्यासाठी प्रामुख्याने सिरोटोनिन, नॉर एपिनेफ्रिन, डोपामिन ही रसायनं जबाबदार असतात. नैराश्य येण्याला कारणीभूत असलेल्या यापलीकडे असू शकणाऱ्या रसायनांबाबत आपले शास्त्र अनभिज्ञ आहे. माणसाला नैराश्य येतं तेव्हा त्याच्या मेंदूतील रसायनं अनेकदा कमी झालेली असतात. एखाद्या व्यक्तीला नैराश्याचा आजार होण्यासाठी मेंदूच्या विशेष भागांत पेशींची प्रथिनोत्पादनाची प्रक्रिया बदलणे आवश्यक असतं. ही प्रक्रिया जशी जनुकांवर अवलंबून असते तशीच त्या व्यक्तीच्या परिस्थितीवरही अवलंबून असते. व्यक्तीचं जेनेटिक स्ट्रक्चर आणि वातावरणाचा तिच्यावर होणारा परिणाम या दोन्ही गोष्टींचा समन्वय होतो तेव्हाच त्या व्यक्तीमध्ये नैराश्याची गुणसूत्रे (क्रोमोझोम्स) किंवा जनुकं (जीन्स) असतील आणि त्याच्या जोडीला वातावरणात ताणतणाव असेल तर त्या सगळ्याच्या परिणामातून त्या व्यक्तीला नैराश्याचा आजार होतो. याची शक्यता आता साधारण १८ ते २५ टक्के इतकी असते. म्हणजे जन्माला आलेल्या १०० बालकांमध्ये १८ ते २५ बालकांना नैराश्याचा त्रास आयुष्यात एकदा तरी अनुभवावा लागेल. हा आजार मधुमेह आणि रक्तदाब यापेक्षा खूप मोठय़ा प्रमाणावर आहे.

आपल्याकडे नैराश्याचा विचार म्हणावा तितका गांभीर्याने केला जात नाही. पण तो करणं अत्यंत आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘ग्लोबल बर्डन डीसीजेस’ नावाचा एक निर्देशांक तयार केला. या ग्लोबल बर्डनचा अर्थ असा की समजा एखादी व्यक्ती आजारी पडली, तिला ताप आला, तर त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम होणार नाही. पण जर जगातील पाच दशलक्ष लोकांना स्वाइन फ्लू झाला तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता पाच दशलक्ष ही संख्या मोठी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या या निर्देशांकामध्ये त्यांना असं लक्षात आलं की, नोकरीतील असमाधान, नैराश्य, मद्यविकार या वेगवेगळ्या त्रासांचा परिणाम हा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, कर्करोग यांपेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे खरं तर आपल्याकडे हृदयविकाराचा झटका येण्याची संख्या खूप कमी आहे, पण तीदेखील आपल्याला जास्त वाटते. हृदयविकाराच्या झटक्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर  परिणाम होतो. पण तो नैराशाच्या आजारामुळे होणाऱ्या  परिणामापेक्षा कमी असतो. पण आपल्याकडे नैराश्य इतकं सर्वसाधारण वाटतं की त्याबद्दल फारसं बोललंच जात नाही. पण नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती काम करू शकत नाही किंवा कामात तिच्याकडून सतत चुका होत असतात. यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होऊ  शकतो. हे एखाद्या हिमनगाच्या टोकासारखं आहे; म्हणजे हिमनग आपल्याला समोर दिसतो पण त्याचा खरा विस्तार आपल्याला दिसत नाही. तसंच नैराश्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो हे आपल्याला पटकन दिसत नाही.

मेंदूतील रसायनांचा असमतोल हे नैराश्याचं एकमेव कारण आहे. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीचा अपेक्षाभंग होतो किंवा विशिष्ट गोष्टीमुळे तिच्या मनात असंतोष, असमाधान निर्माण होतं त्या वेळी तिच्या मेंदूतील रसायनं कमी होतात. असमाधान वाढलं की रसायनांना गळती येते. अशा वेळी कमी गळती लागलेल्या रसायनांची कसर भरून काढण्यासाठी मेंदू अधिकाधिक प्रयत्न करत असतो. पण माणसाच्या मनात छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून असमाधान, असंतोषाची भावना निर्माण होऊ  लागते तसतसं मेंदू गळती लागलेल्या रसायनांची पूरक यंत्रणा सुरू ठेवू शकत नाही. माणसाचा मेंदू या सगळ्यात झटत असतो. त्या वेळी त्या व्यक्तीला ताणतणाव आहे, असं म्हटलं जातं. पण त्या माणसाचा मेंदू त्या सगळ्यात बराच काळ झगडून थकतो, हे सहसा लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत तणावाचं राज्य सुरू होतं. तरीदेखील अपेक्षाभंग, असंतोष वाढत गेला तर नैराश्याचा आजार सुरू होतो. याचं एक साधं उदाहरण देतो. समजा मेंदूतील १०० पेशी रसायनं व्यवस्थित ठेवण्यासाठी काम करत आहेत. त्या व्यक्तीच्या मेंदूतील ताणतणाव वाढल्यानंतर त्या १०० पेशींना जास्त काम करावं लागतं. त्यातल्या कमकुवत पेशी काही दिवसांनी थकतात. त्यांचं काम कमी व्हायला लागतं. मग बाकीच्या सुदृढ पेशी त्यांचं काम करतात. काही दिवसांनी त्यातल्याही काही पेशी थकतात. या थकलेल्या पेशी पुन्हा रसायनं तयार करू शकत नाही. याचा ताण बाकीच्या पेशींवर यायला लागतो. हळूहळू हे सगळं नैराश्याकडे वळायला लागतं. मेंदू अथक प्रयत्नांनीही रसायनांचा ऱ्हास भरून काढूच शकत नाही तेव्हा नैराश्याचा आजार सुरू होतो, असं म्हणता येईल.

नैराश्य हा खरं तर शारीरिक आजार आहे. तो मनाचा म्हणून आपण त्याला मानसिक आजार म्हणतो. पण मनसुद्धा शरीरातच आहे त्यामुळे तोदेखील शरीराचाच आजार आहे. फरक इतकाच की तो सिटी स्कॅन, एमआरआयमध्ये दिसत नाही. अपेक्षाभंग, असमाधान अशा भावना निर्माण झालेल्या काही व्यक्ती या सगळ्यावर मातही करतात. वैधव्य असलेल्या स्त्रिया, कर्जबाजारी शेतकरी, नापास झालेले विद्यार्थी असे सगळेच आत्महत्या करत नाहीत किंवा या सगळ्यांनाच नैराश्य येतंच असं नाही. याचाच अर्थ असा आहे की मेंदूमध्ये असमाधानाचं, अपेक्षाभंगाचं रसायनशास्त्र असलं पाहिजे. ते आपल्याच दृष्टिकोनात आहे. आपल्या वेदांमध्ये रथारूढ व्यक्ती, सप्तेंद्रिय घोडे, सारथी बुद्धिमत्ता, रथ एकंदर क्षमता आणि ‘मन/ अक्ल’ बुद्धिमत्तेच्या हातचे ‘लगाम’ किंवा बाइंडिंग फोर्स (्रुल्ल्िरल्लॠ ऋ१ूी) आहे, असं म्हटलं आहे. अपेक्षाभंग, असमाधान या सगळ्याकडे सकारात्मकतेने पाहिलं तर नैराश्य होण्याची शक्यता कमी असते. नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला लगेच नैराश्य येतं. म्हणून सकारात्मक विचार करणं महत्त्वाचं आहे. ही सकारात्मकता मुलांना लहानपणीच शिकवता येते. सकारात्मकता म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षी नाही; तर परिस्थितीकडे तर्कशुद्ध पद्धतीने बघण्याची शिकवण मुलांना लहानपणीच देणं आवश्यक आहे. कारण हीच मुलं मोठी झाल्यावर सगळ्याच परिस्थितींकडे तर्कशुद्ध पद्धतीने बघून सारासार विचार करू शकतील. यामुळे त्यांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असेल. म्हणूनच दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. मुलं इतरांकडे बघून स्वत:शी तुलना करतात. मला काहीच मिळत नाही किंवा त्याला मिळतं पण मला मिळत नाही, असा विचार त्यांच्या मनात येतो. पण हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे. हे शिकवलं पाहिजे. लहान मुलांमध्येही नैराश्य असतं. पण त्याची लक्षणं वेगळी असू शकतात. अभ्यासात मागे पडणारी मुलं, मस्ती करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणारी मुलं, जी मित्र बनवू शकत नाहीत, अतिचिंताग्रस्त मुलं अशा चार प्रकारच्या लहान मुलांमध्ये नैराश्य दिसून येतं.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. कोणाचंही आयुष्य १०० टक्के परिपूर्ण, आदर्श असं असूच शकत नाही. प्रत्येक माणूस दहा टक्के सुख असेल आणि ९० टक्के दु:ख असेल तरी तो आनंदात राहू शकतो. तसंच ज्याच्या आयुष्यात ९० टक्के सुख आहे असं आपल्याला वाटतं; तोसुद्धा निराशेच्या गर्तेत गेल्यासारखा वाटतो. म्हणजेच बिकट, कठीण परिस्थितीतही उत्तरं शोधली पाहिजेत.  त्यानुसार याबाबत मुलांनाही शिकवलं पाहिजे. इथे प्रतिबंधक मनोदोषचिकित्सा (प्रिव्हेंटिव्ह सायकीअट्री) महत्त्वाची ठरते. मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला तर आपण नैराश्याच्या गंभीर प्रश्नांना ते धीराने सामोरे जाऊ  शकतात.

मध्यंतरी जागतिक आरोग्य संघटनेने भारतातल्या आत्महत्यांसंबंधीची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. दर आठवडय़ाला भारतातील ३० वयोगटातील १७०० माणसं विविध कारणांसाठी आत्महत्या करतात, असं त्यात म्हटलं आहे. ब्लू व्हेलमुळे आतापर्यंत सहा आत्महत्या झाल्या असं म्हटलं होतं. पण खरं तर ब्लू व्हेलमुळे दोन आत्महत्या झाल्या असं तपासानंतर समजलं. पण ऑरगॅनो फॉस्फरस म्हणजे फिनाइल, उंदीर, झुरळ मारण्याच्या औषधांचा वापर करून ६५० ते ७०० आत्महत्या होताहेत, या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होतंय. ऑरगॅनो फॉस्फरस कम्पाऊण्ड किराणा मालाच्या दुकानात किंवा केमिस्टकडे सहज मिळू नये अशी तरतूद असलेला कायदेशीर मसुदा २००८ पासून संसदेत मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. श्रीलंका, बांगलादेशात हा कायदा पूर्वीच संमत झाल्यामुळे त्यांच्याकडे ऑरगॅनो फॉस्फरसच्या सेवनामुळे होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं आहे. पण आपल्याकडे गेली दहा वर्षे हा मसुदा संमत होत नाही. आता आपल्याकडे १७०० पैकी ६५० आत्महत्या ऑरगॅनो फॉस्फरसमुळे होताहेत तर आपण कशावर बोललं पाहिजे ? ब्लू व्हेल, हा कायदेशीर की फक्त नैराश्य वाढतंय यावर? आता या सगळ्यावर काही तरी कृती केली पाहिजे. नैराश्यावर मात कशी करायची हे मुलांना शिकवलं पाहिजे. ऑरगॅनो फॉस्फरस हा सर्वात धोकादायक आहे. यासंबंधीचा कायदा केल्यानंतर जगात आत्महत्या कमी झाल्या आहेत तर तो कायदा भारतात का होऊ  शकत नाही? २००८ पासून त्यावर चर्चा झाली, संसदेत त्याचा कायदेशीर मसुदा पोहोचलेला आहे तरीदेखील तो संमत का होत नाही, याकडे दुर्लक्ष होतंय. आठवडय़ाला ६५० आत्महत्या होताहेत ही गंभीर बाबही तितकीच दुर्लक्षित केली जात आहे. नैराश्यावर लिहीत असताना त्याच्या प्रतिबंधात्मक पैलूंचाही विचार करायला हवा.

अनेकांना वाटतं की आपण जे वाचतो आणि टीव्हीवर बघतो तोच भारत देश. पण त्यापलीकडेही जग आहे, हे प्रत्येकाने बघायला हवं. आज आपल्याकडे ९२ टक्के कामगार असंघटित क्षेत्रात आहेत. त्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. असंघटित क्षेत्रात कामगार सत्तरीपर्यंत काम करतो आणि ७२ व्या वर्षी मृत्युमुखी पडतो. त्याच्या हातावर त्याचं पोट असल्यामुळे वयाची सत्तरी उलटली तरी काम करायची त्याची गरज असते. मध्यंतरी मुंबईतील उच्चाधिकाऱ्यांमध्ये ताणतणाव जास्त आहे, अशी आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. पण ही आकडेवारी जेमतेम आठ टक्के कर्मचाऱ्यांसंबंधीची आहे. त्यातल्या ४० टक्के लोकांना ताणतणाव जास्त आहे म्हणून त्याकडे लक्ष वेधलं गेलं. पण त्या उर्वरित ९२ टक्के असंघटित कामगारवर्गाचं काय? त्यांचे ताणतणावसुद्धा समजून घ्यायला हवे. या ९२ टक्क्यांबद्दल थोडी माहिती काढली तर त्यांचे प्रश्न किती मोठे आहेत याची कल्पना येईल. या असंघटित कामगार वर्गापर्यंत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंबंधीच्या सुविधा पोहोचायला हव्यात. अर्जेटिना, नॉर्वे अशा काही देशांमध्ये डॉक्टरांचा नैराश्याची माहिती देण्याचा मोठा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी तेथील डॉक्टरांना नैराश्यावरील उपचार देण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची कायदेशीर तरतूद आहे. कॉर्पोरेट विश्वातील लोकांना नैराश्य आलं तर त्यांना दहा मानसोपचारतज्ज्ञांची नावं माहीत असतात. ही नावं त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लिहिणारे, बोलणारे टीव्हीवर येणारे यांच्याकडून पोहोचत असतात. पण त्या ९२ टक्क्यांमधील कामगारवर्गाकडे असा कोणताच स्रोत नाही. त्यासाठी काही तरी करायला हवं.

एका अमेरिकी संस्थेने प्रकाशित केलेलं ‘डायग्नोस्टिक्स स्टॅटिस्टिकली मॅन्युअल’ आणि जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेलं ‘इंटरनॅशनल क्लासिफिकेशन डिसीझेस’ ही दोन्ही पुस्तकं यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची आहेत. यात दोन्हींमध्ये नैराश्याची काही लक्षणं आणि त्याची वेगवेगळी रूपं सांगितली आहेत. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरची काही लक्षणं एक आठवडा तर काही लक्षणं महिनाभर असली तर त्याला नैराश्य म्हणता येईल, असं त्यात नमूद केलं आहे. आपल्या रोजच्या घडामोडींशी निगडित असलेली काही लक्षणंही त्यात सांगितली आहेत. झोप न लागणं, अन्नावरची वासना जाणं, वजन कमी होणं, स्त्रियांची मासिक पाळी बंद होणं, मलावरोध (कॉन्स्टिपेशन), डोकेदुखी, पाठदुखी अशी काही नैराश्याची शारीरिक लक्षणं आहेत. उदास वाटणं, निराश वाटणं, आत्महत्येचे विचार येणं, काहीही करावंसं न वाटणं, कशातच आनंद न घेणं, कुठचीही भावना मनामध्ये न येणे, कोणाला भेटावंसं न वाटणं, कमालीचं निराश वाटणं ही नैराश्याची मानसिक लक्षणं आहेत. शारीरिक आणि मानसिक लक्षणांचा एकत्रित परिणाम होऊन नैराश्य येतं. पण ही लक्षणं एकत्रितपणे एखाद्याच्या आयुष्यात आली तर त्याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे असं म्हणतात. या मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरला नैराश्याचा आजार म्हणतात.

या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा काही लोकांना काही आजारांमुळे, औषधांमुळे, काही परिस्थितींमुळे अशाच प्रकारची लक्षणं येऊ  शकतात. एखाद्या माणसाला कर्करोग झाला आणि त्यानंतर त्याला उदास वाटायला लागलं की माझ्यामागे माझ्या मुलांचं कसं होणार, माझं कसं होणार अशी काळजी त्याला असते. याला डिप्रेशन असोसिएटेड विथ द मेडिकल डिसऑर्डर असं म्हणतात. या परिस्थितीत अगदी मधुमेह, रक्तदाबाची सुरुवात झाली तरी काही जण घाबरतात. कर्करोग रुग्ण केमो थेरपी किंवा रेडिओ थेरपी घेतो तेव्हा ती औषधं रक्ताद्वारे थेट मेंदूपर्यंतही जातात आणि त्या औषधांमुळेसुद्धा नैराश्य येऊ  शकतं. याला ड्रग असोसिएट डिप्रेशन असं म्हणतात. घटस्फोट झाला, वैधव्य आलं, नोकरी गेली, कुटुंब सदस्याचा मृत्यू अशा घटना घडत असतात. त्यामुळेही नैराश्य येऊ  शकतं. पण ते तात्पुरतं असतं. त्याला अ‍ॅडजस्टमेंट डिसऑर्डर म्हटलं जातं. अचानक नोकरीत बदली झाली आणि दुसऱ्या शहरात जावं लागलं तर त्यांच्या मुलांमध्ये नव्या जागी जाण्याची आणि जुने मित्र तुटण्याची भीती निर्माण होऊन नैराश्य येतं. मुंबईत राहणारं एखादं वयस्कर दाम्पत्य मुलाची बदली बंगळूरुला झाल्यामुळे तिथे स्थलांतरित झालं, तर त्याला तिथे या वयात नवे मित्र करता येत नाहीत. त्यामुळे नैराश्य येऊ शकतं. हे संपूर्णपणे सिच्युएशनल डिप्रेशन आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे ते वाढत चाललं आहे. ही बदलती परिस्थिती आपल्यापुढे आव्हानं घेऊन येत आहे. मानसिक-शारीरिक काळजीसाठी आपल्याकडे आरोग्य विमा काढता येत नाही. जो होतो तो फक्त त्या आठ टक्के लोकांसाठी होतो. ९२ टक्के लोकांना नाही. त्यामुळे सिच्युएशनल डिप्रेशन आर्थिक परिस्थितीशी निगडित आहे. काम केलं नाही तर पैसे मिळत नाहीत. मग भूक भागणार नाही. इथे हे गणित शारीरिक-आर्थिक परिस्थितीशी जुळलं जातं; गरिबी आणि नैराश्य. पूर्वी एका देशातून दुसऱ्या देशात गेलेल्या लोकांना त्या देशाने स्वीकारल्यानंतरसुद्धा तिकडचं राहणीमान, तिकडची भाषा येईल का याबद्दल त्यांना नैराश्य आलं होतं. तेवढंच नैराश्याचं प्रमाण आपल्याकडच्या असंघटित वर्गातील लोकांमध्येही आहे. असंघटित कामगार वर्गातील जवळजवळ ४७ टक्के ज्येष्ठ नागरिकांना नैराश्य येतं.

ज्या ज्या गोष्टींमधून अपेक्षाभंग होऊ शकतो त्यातून नैराश्य येतं. त्यात नातेसंबंध, ऑफिस, मित्र, शाळा, समाज असं सगळं आहे. याची सुरुवात लहानपणापासून व्हायला हवी. मुलांना नकार पचवता आला पाहिजे. मेंदूचं स्वास्थ्य राखण्यासाठी त्यातल्या विविध रसायनांचा समतोल राहणं महत्त्वाचं असतं. हा समतोल ठेवण्याची प्रक्रिया मेंदूच्या विविध जागा करत असतात. नैराश्यात मेंदूमध्ये असलेल्या जागेत तो समतोल ठेवण्याची प्रक्रिया होत असते. मेंदूच्या ज्या भागात सर्वात जास्त पडसाद उमटतील त्याप्रमाणे मानसिक विकार कुठचा होणार आहे हे ठरत असतं. त्यामुळे नैराश्याच्या आजारांमध्ये मग तो कौटुंबिक, आर्थिक, काहीही असेल अपेक्षाभंग कोणताही झाला असला त्याचे पडसाद भावनिक बाह्य़पटलावर (इमोशनल कॉर्टेक्स) पडतात. ते इमोशनल कॉर्टेक्स व्यवस्थित काम करू शकलं नाही, मेंदूच्या रसायनांचा समतोल सांभाळू शकलं नाही तर मग नैराश्याचा आजार होताना दिसतो.

एकुणात, नैराश्याकडे केवळ मानसिक आजार म्हणून न बघता शारीरिक आजार म्हणूनही गांभीर्याने बघायला हवं. मानसिक-शारीरिक आजारांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो ही बाब विसरून चालणार नाही. नैराश्यावर चर्चा करतानाच त्याचे प्रतिबंधात्मक मनोदोषचिकित्सेचाही अभ्यास करायला हवा. लहान मुलांना यासंबंधी माहिती देतानाच असंघटित कामगार-वर्गातील नैराश्याची कारणं, परिणाम याकडे लक्ष वेधलं पाहिजे. सर्वबाजूंनी याचा अभ्यास केला, परिपूर्ण माहिती मिळाली तरच नैराश्याच्या आकडेवारीत फरक पडेल.

स्वत:च्या प्रतिमेत अडकताना सावधान!

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला कोणी त्रास देत असेल तर ते तुम्हाला तुमच्या टाइमलाइनवर सतत दिसत असतं. रस्त्यावर कोणी चिडवतं तेव्हा रस्त्यातले दहाच जण बघतात. पण फेसबुकच्या टाइमलाइनवर जर कोणी चिडवलं तर त्या व्यक्तीच्या अकाऊंटला जे-जे आहेत त्या सगळ्यांना ते दिसत राहणार. त्यांना ते सतत दिसत आहे हे त्या व्यक्तीला नेहमी वाटत राहतं. चांगल्या मिळालेल्या प्रतिक्रिया त्यांना फारशा चांगल्या वाटत नाहीत. पण टीकेचा मात्र सतत विचार केला जातो. म्हणून बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये लाजिरवाणं वाटतं. सतत ते सलत राहतं. ते सहजासहजी डोक्यातून जात नाही. आजची पिढी स्वत:च्या प्रतिमेबाबत खूप सजग आहे. ती स्वत:ची प्रतिमा सांभाळायचा खूप प्रयत्न करते. पूर्वी आरशात बघणं हे फार कमी होतं. स्वत:ची प्रतिमा दिसणं हे फार कमी होतं. आता प्रत्येक मोबाइलमध्ये कॅमेरा आहे आणि त्यात सेल्फीसुद्धा आहे. माणूस स्वत:लाच सारखा बघत असतो. त्यामुळे ही पिढी इमेज कॉन्शिअस झाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला की त्यांना खूप त्रास होतो. पण याच्या दूरगामी परिणामांचा विचार होणं आवश्यक आहे.

आपण नैराश्याच्या दिशेने जातोय असं वाटतंय..?

हे करा…

  • अशा परिस्थितीत तुम्ही कोणाशी तरी बोलायला हवं. तुम्हाला मदत हवी आहे, हे दुसऱ्यांना समजणं महत्त्वाचं आहे.
  • जुने मित्र किंवा नातेवाईक यांना संपर्क करावा.
  • जुने छंद जोपासा. तुम्हाला ते अशा वेळी उपयोगी पडतील.
  • व्यायाम करा.  4 भरपूर पाणी प्या.  4 भरपूर सॅलड खा.
  • काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यामध्ये अगदी सोप्या सोप्या गोष्टीदेखील असू शकतात. उदा. तुम्ही उजव्या हाताने लिहीत असाल तर डाव्या हाताने लिहायला शिका आणि डावखुरे असाल तर उजव्या हाताने लिहायला शिका. यामध्ये हस्तव्यवसाय, चित्रकला हेदेखील येऊ शकतं.
  • तुम्हाला नैराश्य आलं आहे का हे तपासण्यासाठी बेक डिप्रेशन इन्व्हेंटरी (beck depression inventory) अशी एक टेस्ट असते. ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यातून आलेला निकाल गंभीर आहे असं लक्षात आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

– हे टाळा…

  • शक्यतो एकटं राहू नका. 8 टीव्ही बघू नका.
  • तुमचं दु:ख कमी करण्यासाठी कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नका.
  • इंटरनेटवर पोर्नोग्राफी आणि इतर आमिषं दाखवणाऱ्या साइट्सवर जाऊ नका.

डॉ. आशीष देशपांडे
(शब्दांकन : चैताली जोशी)
response.lokprabha@expressindia.com