क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांनी मुसंडी मारणे यात तसे नवीन काहीच नाही. पण गेली काही दशके केवळ पुरुषांचाच आणि पुरुषी  खेळ म्हणून  मानल्या गेलेल्या क्रीडा प्रकारात उतरून पुरुषांच्या संघात खेळून स्वत: ठसा उमटवणे मात्र क्रीडा क्षेत्रातील िलगसमानता अधोरेखित करते. अलीकडच्या दोन घटना त्याचेच प्रतीक आहेत. यातील एक घटना इंग्लंडमधील तर दुसरी भारतातील आहे. या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील या िलगसमानतेचा ‘टीम लोकप्रभा’ने घेतलेला हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॉर्म्युला वन म्हटले की आपल्यासमोर उभ्या राहतात त्यात सुसाट पळणाऱ्या गाडय़ा.. कानठळ्या बसवणारा आवाज.. प्रती सेकंदात वेग पकडणाऱ्या गाडय़ा़.. वळणावळणाच्या सर्कीटवर एकमेकांना मागे टाकण्यासाठी रंगणारी चढाओढ.. आणि या सरतेशेवटी होणारा विजयी जल्लोष.. पण याही पलीकडे फॉर्म्युला वनचा व्याप आहे. प्रत्येक संघासोबत असलेले सहकारी, त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारी एक स्वतंत्र यंत्रणा.. या सर्वामध्ये दिसणारा एक समान धागा आणि तो म्हणजे ‘पुरुष’.. हा खेळ रांगडा नसला तरी त्यामध्ये असलेली रोमहर्षकता आणि सतत प्रतिस्पर्धी संघावर हावी होण्याचा प्रयत्न, त्यामुळेच हा खेळ ‘पुरुषप्रधान’ म्हणून ओळखला जातो. अर्थात हा खेळ केवळ पुरुषांपर्यंत मर्यादित आहे, असे नाही. या खेळात महिलांच्याही स्पर्धा होतात. परंतु त्या स्पर्धाच्या किल्ल्या या पुरुष व्यवस्थापकांच्याच हाती असल्याने त्यात तो पुरुषीबाणा येतोच.. मात्र, या पुरुष प्राबल्य असलेल्या खेळात भारतीय वंशाच्या महिलेने प्रवेश घेत, इतिहास घडविला. फॉर्म्युला वन शर्यतीतील सौबेर एफ वन संघाच्या प्रमुखपदी ती विराजमान आहे. ही गोष्ट दोन वर्षांपूर्वीची असली तरी फॉर्म्युला वन स्पध्रेतील एखाद्या संघाचे प्रमुखपद भूषवणारी ती एकमेव महिला आहे. मोनिशा कॅल्टेनबर्न असे तिचे नाव असून तिचा जन्म भारतातील डेहराडून येथील आहे. मात्र, तिचे संपूर्ण आयुष्य हे व्हिएना येथे गेले. मोनिशा कॅल्टेनबर्गचे मूळ नाव मोनिशा नारंग.

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या देहराडून येथे मोनिशाचा जन्म झाला. लहानपणापासून अंतराळवीर होण्याचे स्वप्न तिने मनाशी बाळगले होते. आठव्या वर्षांपर्यंत ती देहराडून येथेच वाढली, परंतु येथील शिक्षणाची गुणवत्ता लक्षात घेता तिच्या पालकांनी परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथे मोनिशाला उच्च शिक्षणासह आपले स्वप्नही साकार करता येतील, असे त्यांना वाटत होते. मोनिशाचे काका व्हिएना येथे आण्विक संस्थेत कामाला होते. त्यामुळे तिच्या पालकांनी व्हिएनाची निवड केली. मोनिशाने तिथे कायदेतज्ज्ञाची पदवी घेतली आणि लंडन स्कून ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करताच तिने मालमत्ता व्यवस्थापन कंपनीत नोकरी केली. हा प्रवास असाच सुरूहोता. त्यानंतर तिने फॉम्र्यूला वन संघ रेड बूल सौबेर एफ-वन यांच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या फ्रित्ज कैसार ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शर्यतपटू, प्रायोजक आणि उत्पादक यांच्या करारासंबंधी सर्व बाबी पाहण्याची आणि त्यात बदल करण्याची जबाबदारी मोनिशावर सोपविण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही भागीदारांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सौबेर एफ वन संघाने तिला नोकरी देऊ केली आणि मोनिशाने ती स्वीकारलीही. इतकी र्वष या संघासोबत जोडले गेल्यानंतर मोनिशाची या खेळाची आवडही वाढली होती. तिच्या कामाची पद्धत आणि आवाका पाहून सौबेर संघाचे प्रमुख पीटर सौबेर हे प्रभावीत झाले होते. ‘‘एफ-वन संघासोबत जोडली गेले असल्याची कल्पनाही करत नव्हती. त्याने माझ्यावरील दबाव अधिक वाढला होता. कारण संघातील प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत करून घेण्याची जबाबदारी अंगावर आली होती,’’ अशी प्रतिक्रिया मोनिशाने त्यावेळी दिली होती. मात्र या खेळातील रुची वाढल्यामुळे कालांतराने तिला हे सर्व सोपे वाटू लागले. पण वकिली पेशापासून सुरू झालेला हा प्रवास संघाच्या प्रमुखपदी नेऊन पोहोचवेल, असे तिला स्वप्नातही तिला वाटले नव्हते. कारण हा खेळ पुरुषप्रधान असल्याने सुरुवातीला तिला बिचकल्यासारखे वाटले आणि त्यामधून यशाचा मार्ग काढत मोनिशा सौबेर एफवन संघाच्या प्रमुखपदावर विराजमान आहे.  पुरुषप्रधान खेळात तुला अवघडल्यासारखे वाटते का, या प्रश्नावर ती सांगते, ‘‘या वातावरणाशी गेली अनेक र्वष मी जुळवून घेत आले आहे आणि त्यामुळे मला नवीन असे काहीच वाटत नाही. पण मी वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे पाहते आणि तो म्हणजे मला फॉर्मल्स घालता येणार आहेत. फार कमी महिलांना तसे करण्याची संधी मिळते.’’ तिच्या या प्रवासात अर्थात घरच्यांचा फार मोठा पाठिंबा होता. घराची आणि संघाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा यक्ष प्रश्न तिच्यासमोर होता आणि तिच्या आईने व आजीने अगदी सहजपणे ते सोडवला. घरची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यामुळे मोनिशाला आपल्या नवीन जबाबदारीवर लक्ष केंद्रित करता आले. त्यामुळे सौबेर संघाची संपूर्ण जबाबदारी अगदी शर्यतीच्या रणनीतीपासून, ते शर्यतपटूच्या निवडीपर्यंतची जबाबदारी ती यशस्वीरीत्या पार पाडत आहे. तिचा मनमिळाऊ स्वभाव, परिस्थितीला धाडसाने सामोरे जाण्याची वृत्ती ही इतर स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे फॉम्र्यूला वन यापुढे केवळ पुरुषांपुरताच मर्यादित न राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.

स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India born monisha first woman to head formula one team
First published on: 04-12-2015 at 01:34 IST