devi-ogदेवीची नावे अनेकविध असली तरी भक्त तितक्याच श्रद्धेने तिची पूजा करतात. भाविकांच्या मनात त्यांची देवी कोणत्या पंथाची किंवा संप्रदायाची आहे हा विचारही आलेला नसतो. देवीची विविध नामरूपे असली तरी तिचा उदोकार नित्य आणि शाश्वत आहे हे निश्चित!

‘अंबाबाईचा उदो’ किंवा ‘उदे ग अंबे उदे’ असे म्हणत देवीचे भक्त देवीचा जागर करतात, तेव्हा त्यांच्या मनातील तिच्याविषयीची निस्सीम भक्ती ओसंडून वाहत असते. कदाचित त्यांना उदो, उदे या शब्दांचे मूलार्थ माहीतही नसतील आणि तरीही त्या शब्दांद्वारे आपण देवीच्या असीम शक्तीचे आवाहन करीत आहोत याची आंतरिक जाणीव त्यांनी केलेल्या उदोकारात पुरेपूर भरून राहिलेली असते. उदे किंवा उदो हा शब्द उदय या शब्दाच्या उदव या अपभ्रंशातून आलेला आहे. ‘अंबा प्रकट होऊ दे’ किंवा ‘अंबेची अतुल्य अशी मंगलदायी शक्ती प्रकट होऊ दे’ यासाठी तिच्या भक्तांनी तिला घातलेली ही उत्स्फूर्त साद असते. ही साद घालत असताना भक्तांच्या मनात त्यांची देवी कोणत्या पंथाची किंवा संप्रदायाची आहे हा विचारही आलेला नसतो. ती जगज्जननी, मंगलकारिणी असल्याची नितांत श्रद्धाच फक्त भक्तांनी केलेल्या देवीच्या उदोकाराच्या आणि उपासनेच्या मुळाशी असते. तिचे रौद्र रूपही अंती मंगलकारकच आहे याची त्यांना खात्री असते.

Grah Gochar May 2024
मे महिना देणार प्रेम, पैसा, प्रसिद्धी… ग्रहयुतीमुळे ‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी
Loksatta Chaturang Fearless Concepts of fear by age
 ‘भय’भूती : भय अशाश्वतीचे
marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी

भारतीय दैवतपरंपरेचा इतिहास लक्षात घेतला तर असे दिसते की, त्या परंपरेचा स्रोत स्थलकालानुरूप विविध धारांनी प्रवाही होत राहिला. वैदिकपूर्व, वैदिक, वैदिकोत्तर तसेच पुराणग्रंथांचा काळ, भक्तिसंप्रदायांचा काळ अशा प्रकारे ढोबळ पद्धतीने दैवतपरंपरांच्या इतिहासाचे विभाजन केले तर प्रामुख्याने प्रत्ययाला येणारी गोष्ट म्हणजे आधीच्या काळातील दैवतांना येत गेलेले गौणत्व आणि नवीन काळात होणारा नवीन दैवतांचा उदय आणि त्यांचे वाढत जाणारे महत्त्व. त्या इतिहासाचे तपशील येथे देणे आवश्यक नसले तरी एवढे सांगता येईल की वैदिक काळातील वरुण, इंद्रादी देवांचे महत्त्व कमी कमी होत जाऊन पुराणग्रंथांच्या काळापर्यंत त्या पूर्णपणे मागे पडून शिव, विष्णू आणि शक्ती यांच्या उपासनेला अधिकाधिक महत्त्व येत गेले. त्या त्या देवतांचे आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या दैवतमंडळांचे महत्त्व ठसविणाऱ्या आणि त्यांच्या उपासनापद्धतीचे स्पष्टीकरण देणाऱ्या कथा दैवतपरंपरांचा अविभाज्य भाग बनल्या.

इथे लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट ही की, या कथांचा मूलस्रोत कुणालाच माहीत नाही. परंतु त्याचा उगम बहुश: लोकधारेतून आलेला असावा. वैदिक काय किंवा अवैदिक काय, दोन्ही परंपरांमध्ये आढळणाऱ्या मिथककथा अचानक कुणी एकाने किंवा एका लोकसमूहाने रचल्या असे म्हणता येणार नाही. विश्वाच्या आणि सृष्टिचक्राच्या संबंधातील प्रत्यय आणि त्यातून पडलेली कोडी सोडविण्याच्या मानवी प्रयत्नांमधून आणि मानवी समूहमनाच्या सर्जनशील कल्पनांमधून अनेक कथाबीजांना धुमारे फुटून मिथककथांचे वटवृक्ष उभे राहिले. विविध काळांतील ग्रंथकारांनी इष्ट संदेश लोकमानसापर्यंत पोचविण्यासाठी परंपरेत रुजलेल्या मिथककथांचा उपयोग करून घेतला. प्रसंगी त्यांचे रूपांतरही केले. परंतु त्या कथा त्यांनी रचल्या आणि त्यासुद्धा एखाद्या विवक्षित हेतूने असे म्हणता येणार नाही. फार तर असे म्हणता येईल की जे आधीच अस्तित्वात होते ते त्यांनी त्यांच्या कालविशिष्ट शैलीतून, प्रतिभाविलासाच्या आधारे अधिक प्रभावी केले.

एकाच आराध्य दैवताला इष्ट दैवत मानून त्याच्या आराधनेभोवती गुंफल्या गेलेल्या संप्रदायांमध्ये या कथांच्या आधाराने त्या त्या दैवताचे महत्त्व विशद केले गेले. परंतु लोकव्यवहाराच्या जिवंत परंपरेत ही प्रक्रिया फक्त सांप्रदायिक ग्रंथसंपदेपुरतीच मर्यादित राहणे हे अपेक्षित नाही. लोकव्यवहाराच्या माध्यमातून त्या कथा लोकस्मृतीत उतरल्या आणि लोकसाहित्यातून, लोकधारेतून एक वेगळीच झळाळी घेऊन कीर्तन, प्रवचनातून आणि जागरण, गोंधळ यांसारख्या लोककलांमधून व्यक्त झाल्या. सर्वसामान्यांच्या स्मरणात असतात त्या गोष्टी ग्रांथिक साहित्यापेक्षा या लोकमाध्यमांमधून पोहोचलेल्या असतात. तशा त्या पोहोचतात तेव्हा त्यांनी बऱ्याच अंशी सांप्रदायिकतेच्या मर्यादा पार केलेल्या असतात. म्हणूनच एखाद्या दैवताशी निगडित असलेल्या प्रचलित कथापरंपरांचा अभ्यास करताना अभ्यासक फक्त ग्रांथिक संदर्भाचा विचार करून थांबत नाहीत. लोकपरंपरांच्या सखोल विश्लेषणावरही त्यांचा भर असतो.

सांप्रदायिक कथापरंपरांचा अभ्यास करताना काही कथाबीजांची पुनरावृत्ती सर्वच संप्रदायांमध्ये होताना दिसते. उदाहरणार्थ, संप्रदायाच्या आराध्य दैवताकडून आसुरी किंवा अमंगल शक्तींचे दमन केले जाणे. या कथाबीजावर आधारलेल्या कथा ग्रांथिक आणि लोकपरंपरेत आपापल्या शैलीची लेणी लेवून उभ्या राहतात. आराध्य दैवताच्या मूलवृत्तीनुसार आवश्यक ते तपशील त्या कथांमध्ये भरले जातात. असे असले तरी भारतीय परंपरेत कोणत्याही काली फक्त एकाच संप्रदायाचे प्राबल्य असल्याचे दिसत नाही. एकाच वेळी अनेक संप्रदाय नांदत होते असे दिसते. त्यांच्यामध्ये सांप्रदायिक तेढ होती, एकामेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा होती हे अमान्य करताच येणार नाही. परंतु एखाद्या दैवताशी निगडित असलेल्या मिथककथा आणि उपासनापद्धती जेव्हा जेव्हा संकुचित सांप्रदायिकतेच्या घेऱ्यातून बाहेर पडून जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या तेव्हा तेव्हा त्यांचे सांप्रदायिक कंगोरे आपोआपच गुळगुळीत झाले. भारतीय श्रद्धाजीवनाचा जो एक अनादी, अनंत असा समन्वयित विशाल प्रवाह आहे त्यात त्या मिसळल्या आणि त्याचाच एक भाग बनून गेल्या. शतधारांनी एकमेकांमध्ये मिसळणे, पुन्हा नवे रूप घेऊन विलग होणे आणि पुन्हा मिसळणे हा भारतीय श्रद्धाप्रवाहाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच प्रसंगानुरूप एका दैवताच्या स्व-भावाचे आरोपण दुसऱ्या दैवताच्या स्व-भावावर झाले आहे की काय असे वाटण्याइतके साम्य पारंपरिक कथांमधील त्यांच्या चित्रणात दिसून येते. दैवतांचे अपेक्षित वरद रूप कसे असेल, क्रोधित रूप कसे असेल याबद्दलच्या कल्पना पठडीबद्ध झालेल्या दिसतात आणि मग दैवताचे नामरूप बदलले तरी त्याच त्याच तपशिलांची पुनरावृत्ती होते.

दैवतांच्या विविध नामरूपांचा उल्लेख केला त्या निमित्ताने आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. शिव असो किंवा विष्णू किंवा देवी, या दैवतांच्या नामावलींकडे एक नजर टाकली तर लक्षात येते की त्यांची नावे त्यांच्या स्वभावाची निदर्शक अशी विशेषणे आहेत. त्यातील काही विशेषणे ही एकाहून अधिक दैवतांना लागू होणारी असतात. एकाच दैवताची अनेक नावे असतात हे ओघाने आलेच. या लेखाच्या संदर्भात आपण देवीनामांचा विचार केला तरी आपल्याला हेच दिसेल की तिची सर्व नावे तिच्या प्रासंगिक रूपांचे वर्णन करणारी विशेषणेच आहेत. देवीचे शक्तिरूप जेव्हा एखाद्या पुरुष देवतेशी जोडले जाते तेव्हा त्यामध्ये त्या पुरुष देवतेच्या नावाला प्राधान्य असते. उदाहरणार्थ, वैष्णवी किंवा नारायणी ही नावे विष्णू आणि नारायण या नावांवरून सिद्ध झाली आहेत आणि संदर्भाने ती विष्णुपत्नी लक्ष्मीची आहेत असे आता प्रचलित असलेल्या परंपरेत समजले जाईल. त्याच न्यायाने शिवानी, ईशानी यांसारखी नावे शिवपत्नी पार्वतीची आहेत असे समजले जाईल. परंतु भारतीय परंपरेत जगन्माता या नात्याने देवीचे त्याहीपलीकडचे एक स्वतंत्र स्थान आहे आणि ते कोणत्याही सांप्रदायिक इतिहासापेक्षा प्राचीन आहे.

महाराष्ट्रामध्ये ही जगन्माता अंबा या नावाने ओळखली गेली. ती जागृत असेल तरच सृष्टीच्या सृजनाचे चक्र अबाधित राहील ही मूलभूत श्रद्धा तिच्या उपासनेच्या मुळाशी आहे. म्हणूनच तिच्या भक्तांचा गोतावळा सर्व जातीजमातींचा बनलेला आहे. अनेकांची ती कुलदेवता आहे. तिच्या उदोकारात सृष्टीच्या सृजनाचे इंगित सामावलेले आहे. जनमानसात आणि लोकधारेत अंबा या नावाने स्थित असलेल्या या जगज्जननीला महालक्ष्मी म्हणूनही संबोधले जाते. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या देवीत्रयांमधील एक म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाईचे महालक्ष्मी हे नाव रूढ झाले असे एक स्पष्टीकरण कोल्हापूरच्या मंदिररचनेवरून देता येणे शक्य आहे. कारण अंबाबाईच्या मूळ गाभाऱ्याच्या एका बाजूस महासरस्वतीचा आणि दुसऱ्या बाजूस महाकालीचा गाभारा आहे. परंतु मंदिररचनेत हे दोन्ही गाभारे नंतर जोडलेले आहेत हे स्पष्टपणे दिसते. अंबाबाई या स्थानिक दैवताला राजाय लाभल्यामुळे त्याचे उन्नयन होण्याच्या प्रक्रियेत केव्हातरी महालक्ष्मी हे नाव रूढ झाले असे आणखी एक स्पष्टीकरण देता येईल. काही असले तरी तिचे महालक्ष्मी हे नावही प्राचीनच आहे असे उपलब्ध पुराभिलेखांच्या आधारे म्हणता येते.

कोल्हापूर हे प्राचीन काळात भारत आणि रोममधील व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र होते याचे पुरावे मिळालेले आहेत. परंतु त्यानंतर अनेक शतके कोल्हापूरच्या अस्तित्वाचा ठावठिकाणा इतिहासात मिळत नाही. इसवी सनाच्या अकराव्या शतकाच्या सुमारास उदयाला आलेल्या शिलाहार घराण्यातील दुसऱ्या जतिगाने कऱ्हाडच्या सिंदवंशी आदित्यवर्माचा पराभव केला आणि महाराष्ट्रात आपला अंमल बसवला. या शिलाहारांची एक शाखा कोल्हापूरला प्रस्थापित झाली होती. त्या शाखेचा पहिला ज्ञात लेख म्हणजे शके ९८० (इ.स. १०५८)चा मारसिंहाचा मिरज येथे मिळालेला ताम्रपट होय. त्यामध्ये मारसिंहाला पन्नाळदुर्गाद्रिसिंह असे म्हटलेले आहे. तसेच स्वत:ला ‘श्रीमहालक्ष्मीलब्धवरप्रसादादीसमस्तराजावळीसमलंकृत महामांडलिक श्रीमारदेवसिंह’ असे म्हणवून घेतलेले आहे. पुराणांतरीच्या कथांनुसार हे स्थान आदि शक्तिपीठ आहे. परंतु पुराणांचा काल निश्चित करणे कठीण असल्यामुळे व प्राचीन म्हणजे किती प्राचीन याबद्दल पुराणातील वर्णने नि:संदिग्ध नसल्यामुळे कोल्हापूरची प्राचीनता त्यांच्या आधारे ठरविता येत नाही. कोल्हापूरचा उल्लेख करणारा सर्वात जुना पुराभिलेख इसवी सनाच्या अकराव्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. गोव्याच्या कदंब राजघराण्यातील राजषष्ठ याने कोल्हापुरास जाऊन महालक्ष्मीची पूजा बांधल्याचा उल्लेख त्यात आहे. त्याही आधीचा म्हणजे नवव्या शतकातील ठाणे जिल्ह्य़ातील संजान येथे सापडलेल्या एका लेखात राष्ट्रकुट राज अमोघवर्ष याने त्याच्या डाव्या हाताचे बोट कापून महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. ही महालक्ष्मी कोल्हापूरचीच असावी असा विद्वानांचा तर्क आहे. याचाच अर्थ इसवी सनाच्या नवव्या ते अकराव्या शतकापर्यंत कोल्हापूर हे महालक्ष्मीचे स्थान म्हणून मान्यता पावलेले होते.

एकाच देवीची अंबा आणि महालक्ष्मी ही दोन नामाभिधाने असण्यामुळे तिच्या सर्वसामान्य भक्तांच्या श्रद्धेत काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत नाही. जगन्मातेचे रूप घेऊन लोकमानसात स्थित झालेल्या शक्तिरूपाला जगदंबा किंवा अंबा या नावाने संबोधले जावे हे सहजसिद्धच आहे. दक्षिणेत कोणत्याही देवीनामाच्या मागे ‘अम्मा’ हे अभिधान लावणे जितके प्रचलित आहे तितकेच महाराष्ट्रात ‘आई’ हे अभिधान प्रचलित आहे. विष्णुपत्नी लक्ष्मी आहे तसेच उपजाऊ भूमीच्या स्वरूपातील भूदेवी म्हणजेच श्री हीही लक्ष्मीच आहे. एवढेच नव्हे तर साक्षात मृत्युस्वरूप असलेल्या मरीआईलाही लक्ष्मीच म्हणण्याचा प्रघात आहे. लक्ष्म म्हणजे लक्षण. विशिष्ट लक्षणांनी युक्त असलेली ती ‘लक्ष्मी’ असा त्याचा अन्वयार्थ लावता येतो. त्यामुळे अंबा आणि लक्ष्मी ही दोन्ही नावे काळाच्या ओघात एकत्र आली असावीत असे म्हणता येईल. राजाश्रयामुळे लक्ष्मी या नावामागे ‘महा’ ही उपाधी लागली. नंतरच्या काळात केव्हातरी महासरस्वती आणि महाकाली यांचे गाभारे जोडले गेल्यामुळे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा समावेश देवीत्रयामध्ये झाला.

देवीच्या या नामरूपांच्या प्रवासाची संगती अभ्यासक कशीही लावोत तिचा उदोकार मात्र नित्य आणि शाश्वत आहे हे निश्चित. आणि म्हणूनच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भक्त तिच्यापुढे नतमस्तक होऊन ‘उदे गं अंबे उदे’ असे म्हणत सृजनाचा अखंड जागर करतच राहतील.
शुभांगना अत्रे – response.lokprabha@expressindia.com