सत्तरीच्या दशकात (१९७७) अमेरिकी प्राध्यापक सुझन सोन्टॅग यांनी फोटोग्राफीबद्दल लिहिले. त्या म्हणतात की, फोटोग्राफी म्हणजे केवळ प्रतिमा पकडणे आणि स्वत:चा अनुभव शाबीत करणे इतकेच नाही. वास्तविक आपण फोटो घेतो तेव्हा आपल्यावरच मर्यादा घालून घेत असतो, कारण आपल्याला फक्त फोटोजेनिक घटकांचेच फोटो काढायचे असतात. तसे नसणाऱ्या इतर घटकांना आपण एक प्रकारे नाकारतच असतो. दुसरे म्हणजे फोटो घेताना आपल्याला त्या अनुभवाचं रूपांतर प्रतिमेत, आठवणीत करायचं असतं; पण तसं करताना आपण एक प्रकारे तो अनुभव घेणंच नाकारत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसजशी फोटोग्राफीच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली तसतसं लोकांचं वागणंही कसं बदलत गेलं याबाबत सुझन सोन्टॅग यांनी, तसंच त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, फोटोग्राफीमुळे असं झालं की, एखाद्या सुंदर निसर्गदृश्याचा अनुभव घेण्यापेक्षा त्याचा फोटो घेऊन तो संग्रही ठेवणं हेच लोकांना जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवापेक्षा त्याच्या दस्तावेजीकरणाला जास्त महत्त्व आलं.

सध्या सेल्फी या प्रकाराकडे ज्या नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे, त्याच प्रकारची ही सुझन सोन्टॅग आणि मंडळींची टीका आहे. खरं तर फोटोग्राफीकडे ज्या उपहासात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात असे, त्याच उपहासातून सध्या सेल्फीकडे पाहिले जात आहे.

गंमत म्हणजे फोटोग्राफीकडे एके काळी उपहासाने बघणारे आता तेव्हाच्या फोटोग्राफीकडे रोमँटिकपणे पाहतात, तिच्या रम्य आठवणी काढतात आणि सेल्फीकडे सामाजिक समस्या म्हणून पाहतात. खरं तर सुरुवातीच्या काळातली फोटोग्राफी आणि आजच्या काळातले सेल्फी या दोन्ही प्रकारांत प्रचंड साम्य आहे. या साम्यस्थळांकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेस आपण हे समजून घेण्यात कमी पडतो; की आपण कोण आहोत, काय विचार करतो आणि आपल्याला काय व्हायचे आहे हे सारे सांगण्याची एक विलक्षण ताकद सेल्फीमध्ये दडलेली आहे.

१९६५ मध्ये पहिला स्वस्त कॅमेरा (पोलराइज्ड स्विंगर) लोकांच्या हातात आला. त्यामुळे मध्यमवर्गीय अमेरिकी लोक स्वत:चा कॅमेरा विकत घेऊ  लागले. त्यामुळे स्वत:चे फोटो काढायला लागले; पण अशा प्रकारच्या अमॅच्युअर फोटोग्राफीसाठी स्वस्त कॅमेरे बाजारात येण्याच्या आधीच लेखक, तत्त्वज्ञ, कलाकार यांना चिंता पडली होती की, लोक स्वत:कडे ज्या नजरेने पाहात असतात, तसंच आपल्या आसपासच्या जगाकडे ज्या नजरेने पाहात असतात, त्या जगाशी त्यांचं जे नातं असतं, त्यावर फोटोग्राफीमुळे नेमका काय परिणाम होईल. साधारण सतराव्या शतकाच्या मध्यावर फ्रेंच राणी मारी अँटोनियाचं चित्र काढणारी प्रसिद्ध चित्रकार एलिझाबेथ व्हेगी ली ब्रून हिने डगुरेटाईपबद्दल (सुरुवातीच्या काळातल्या फोटोग्राफीचा प्रकार) तक्रार केली होती की, मानवी व्यक्तिमत्त्वाला असलेला पोत आणि कडा (लेअर्स) फोटोग्राफीत पकडता येत नाही. या विधानाचं विस्तारीकरण करताना असं म्हणता येतं की, म्हणजेच फोटोग्राफीत काही तरी पकडण्यासाठी त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं जे काही वैशिष्टय़ असतं ते गमवावं लागतं. फोटोग्राफीच्या तुलनेत अधिक वेळ आणि अधिक गुंतवणूक घेणाऱ्या लिखाण किंवा पेंटिंगमधून ते वैशिष्टय़ पकडता येतं.

सुरुवातीच्या काळातल्या फोटोग्राफीसाठी अधिक तंत्रज्ञानाची, प्रशिक्षणाची आणि अगदी एक फोटोप्रत विकसित करण्यासाठीदेखील अधिक उपकरणांची गरज असायची. आता मोबाइलमध्ये असलेल्या उत्कृष्ट क्षमतेच्या कॅमेऱ्यामुळे एखाद्याकडे व्यक्तिगत कॅमेरा असणं या गोष्टीला जे महत्त्व होतं, तेच संपून गेलं आहे. दुसरं म्हणजे त्यामुळे फोटो काढण्यासाठी प्रशिक्षणाची किंवा अधिक उपकरणांची गरज तर जवळजवळ नसतेच आणि फोटो काढणं जितकं सोपं होत चाललं आहे, तितके ते शेअर करण्याची नवनवी माध्यमं येत चालली आहेत. एकटय़ा फेसबुकवरून रोज २०० कोटी फोटो शेअर होतात, असा दावा फेसबुकने मे २०१५ मध्ये केला होता. २०१५ या वर्षांत ट्रिलियन फोटो घेतले गेले असा एक अंदाज आहे, त्यातले ८० टक्के फोटो मोबाइलवरून घेतले गेले आहेत.

सेल्फीमध्ये नावीन्य असल्यामुळे ते अगणित प्रमाणात घेतले जातात. तो घेणं आणि शेअर करणं या दोन्ही गोष्टी आता तंत्रज्ञानामुळे सोप्या झाल्या आहेत. सेल्फीच्या माध्यमातून एखाद्याचं आयुष्य मांडणं आता सहजशक्य झालं आहे. आपण अस्तित्वात आहोत हे सांगण्यासाठी सेल्फी हा महत्त्वाचा पुरावाच म्हणता येईल. सुझन सोन्टॅग यांची काळजी अशी होती की, स्वस्त कॅमेरे आल्यानंतर सुट्टीवर, फिरायला गेलेले लोक फिरण्याचा, बघण्याचा अनुभव न घेता फक्त फोटोच काढत सुटतील. आता सेल्फीमुळे मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर आठवण म्हणून किंवा भेटल्याचा पुरावा म्हणून त्यांच्याबरोबर फोटो काढला नाही, असं होतंच नाही. मी नुकत्याच केलेल्या विमानप्रवासात माझ्या सहप्रवाशाने टेक ऑफ ते लँडिंगदरम्यान किमान दहा तरी सेल्फी काढले असतील. आपण आनंदात, उत्साहाने सळसळत जगतो आहोत एवढंच आता पुरेसं नसतं तर त्याचा पुरावाही लागतो. म्हणजेच आता एखाद्या घटनेचं दस्तावेजीकरण त्या घटनेइतकंच महत्त्वाचं झालं आहे.

आता सेल्फीवर केली जाणारी टीका नवीन वाटत असली तरी फोटोग्राफी सुरू झाली तेव्हा तिच्या सुरुवातीच्या काळात तिच्यावरही अशीच टीका झाली होती. टीकेच्या त्या सगळ्या जुन्या मुद्दय़ांना आता आधुनिक आयाम (की कलाटणी) मिळाला आहे इतकंच. फोटोग्राफीच्या सुरुवातीच्या काळात एखादं निसर्गरम्य ठिकाण त्याचं सौंदर्य अनुभवण्यापेक्षा, निरखण्यापेक्षा फोटोच्या रूपाने जतन करून ठेवण्यासाठी किंवा फोटोत पकडण्यासाठी जास्त महत्त्वाचे ठरायला लागले. आता सेल्फीमुळे तर असं ठिकाण एखाद्याच्या चेहऱ्यासाठीची पाश्र्वभूमी किंवा वॉलपेपर ठरायला लागलं आहे. फोटोग्राफीमुळे एखादा माणूस मांडणं हे लेखन किंवा पेंटिंगच्या तुलनेत सोपं झालं असेल तर सेल्फीमुळे तर त्या माणसाच्या उर्वरित शरीरापेक्षा त्याच्या हसऱ्या चेहऱ्यालाच अधिक महत्त्व, उठाव आला आहे. (सेल्फीने तर त्या माणसाचं रूपांतर त्याचं उर्वरित शरीर वगळून निव्वळ हसऱ्या चेहऱ्यात केलं आहे.)

आपल्या आसपासच्या जगाकडे सेल्फीसाठीची पाश्र्वभूमी म्हणून बघणं हे आपल्या सघन सामाजिक सखोल जाणिवेचा, गांभीर्याचा बुरखा टराटरा फाडणारं आहे. अन्त्ययात्रा, पूर्वीचे नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प अशा ठिकाणी काढलेले सेल्फी समाजमाध्यमांवरून सर्रास टाकले जातात. आता भारत सरकारने तर राज्य सरकारांना पर्यटनांच्या लोकप्रिय ठिकाणी असलेले सेल्फी डेंजरस झोन निश्चित करायला सांगितले आहेत. कारण अशा विशिष्ट ठिकाणी सेल्फी काढण्यात रंगून गेलेली व्यक्ती सेल्फीच्या नादात आसपासच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि जखमी होते किंवा जीव गमवून बसते. सेल्फी काढणारी व्यक्ती सेल्फीच्या नादात एखाद्या ठिकाणाच्या महत्त्वाकडे, सांस्कृतिक संदर्भाकडे दुर्लक्ष करत असेल किंवा आसपासच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा जीव धोक्यात घालत असेल, आसपासच्या जिवंत जगाकडे निव्वळ आपल्या सेल्फीसाठीचा एक निष्क्रिय पडदा म्हणून बघत असेल तर खरोखरच काही तरी चुकते आहे.

मात्र तरीही सेल्फीकडे पूर्णपणे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे हासुद्धा एक प्रकारचा उपहासच आहे. कारण त्यातून लोकांच्या माणूस म्हणून जगण्याच्या निखळ, सुंदर आणि छोटय़ाछोटय़ा पद्धतींकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. सेल्फीतून त्या व्यक्तीचा सांस्कृतिक, नैसर्गिक अवकाश पाश्र्वभूमीसारखा मांडला जात असतोच, पण त्याचबरोबर तो एखाद्याने स्वत:बद्दल स्वत:च्या पद्धतीने सांगण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे. सेल्फी म्हणजे टोकाचं आत्मप्रेम असं मानणारे, सेल्फीच्या माध्यमातून ती व्यक्ती स्वत:बद्दल सांगत असते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक त्या माध्यमातून ती व्यक्ती एक प्रकारे स्वत:ची गोष्टच सांगत असते. आपण वैशिष्टय़पूर्ण, इंटरेस्टिंग व्यक्ती आहोत, हे इतरांना सांगण्याची त्यांची ती पद्धत असते. त्यांचा तो मार्ग असतो. म्हणूनच सेल्फी घेणं हा फक्त व्यक्त होण्याचंच माध्यम नाही, तर तो त्या व्यक्तीने घेतलेला स्वत:चा शोधदेखील आहे.
(लेखक मानववंशशास्त्र या विषयातील तज्ज्ञ आहेत)
ब्रॅडली डनसीथ
अनुवाद :  वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selfie obsession
First published on: 26-08-2016 at 01:27 IST