आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो. मुलांचा कल ठरवायला मदत करणाऱ्या काही नवीन चाचण्या आता उपलब्ध झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोकापर्यंत गेल्या आहेत. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, त्यांचे प्रश्न.. यादी संपतच नाही. या लेखात आपल्या पाल्याच्या करिअर गाइडन्सबद्दल विचार करणार आहोत.
‘‘आमचा मुलगा ऐकतच नाही..’’
‘‘आमची मुलगी अभ्यास करते, पण ऐन परीक्षेत काय होते कोणास ठाऊक..’’
‘‘इतका खोडय़ा करतो आहो हा.. रोज तक्रारी..’’
‘‘आमचा बंटी फारच हायपर आहे. कसे त्याला आवरावे तेच कळत नाही.’’
‘‘त्याच्या लक्षात कसे राहात नाही तेच कळत नाही.’’
असे संवाद आपण रोज कुठे ना कुठे ऐकत असतो. त्यांची समस्या खरी असते. पण त्यावर नेमके काय करायचे तेच समजत नसते. खरेतर प्रत्येकामध्ये काही वैगुण्य तर काही चांगली वैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वेळीच ओळखता आली नाही तर पैसा, श्रम व मुख्य म्हणजे वेळ (वय) वाया जातो. म्हणजे कल्पना करा आपण मुलाला इंजिनीअरिंगला टाकले. पहिल्या वर्षी एक-दोन विषय गेले. दुसऱ्या वर्षी असाच मागे पडला आणि नंतर ते जमत नाही दुसरे काय असा विचार सुरू झाला तर? अट्टहास कोणाचा का असेना, पण गेलेली दोन वर्षे, त्याचेसाठी भरलेली गलेलठ्ठ फी आणि त्याने काहीका होईना पण घेतलेले श्रम हे भरून येणार? त्याहीपेक्षा त्याचा आत्मविश्वास खालावला तर? मग तर काय त्यासाठी किती डॉक्टर्स, किती समुपदेशक.. काही विचारूच नका.
कुंडली किंवा इतर पारंपरिक साधनांनी याची उकल करता येते. पण मुलांचा कल ठरवण्यासाठी शास्त्रीय किंवा वैज्ञानिक अशी पद्धत आहे का याचा शोध घेता पुढील काही पद्धतींचा अवश्य विचार करता येईल असे दिसते.
हॉवर्ड गार्डनर हे एक नोबेल विजेते. मुले का मागे पडतात किंवा पुढे जातात याचा विचार करताना त्यांनी असा सिद्धांत मांडला की ‘प्रत्येक मूल हे हुशार असतेच. फक्त प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या आघाडय़ांवर हुशार असते. काही मुले काही बाबतीत खूप पुढे असतात, पण तीच मुले काही बाबतीत फार मागे असतात.’
याचा अर्थ प्रत्येक जिवामध्ये काही ना काही तरी गुणवैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वैशिष्टय़े वेळीच ओळखून त्याप्रमाणे त्याला किंवा त्याच्या पालकांना योग्य असे मार्गदर्शन करू शकलो तर खूप काही चांगले घडू शकते.
गार्डनर यांनी अशी आठ वैशिष्टय़े नमूद केली आहेत. आपल्याकडे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यातले हे आयाम अगदी चांगल्या पद्धतीने सांगण्याचे काम त्यांनी केले आहे. ती पुढीलप्रमाणे-
१) स्वत:ची ओळख : काही मुलांचा आत्मविश्वास खूप दांडगा असतो. आणि त्याप्रमाणे ते आपापले मत मांडून त्याप्रमाणे स्वत:ला सिद्धही करीत असतात. अशी मुले कुठेही यशस्वी होऊ शकतात. कारण सगळे कसे आखीवरेखीव, शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित असे असते. अंतर्मुख होऊन ती योग्य विचार करायला सक्षम असतात.
२) तार्किक : योग्य असा तर्कशुद्ध विचार करणे. आपले मत समोरच्याला पटेल असे मांडणे. ही मुले नियोजन क्षेत्रात, सॉफ्टवेअर डिझाइनिंग, मार्केटिंग अशा क्षेत्रात जाऊ शकतात.
३) बहुभाषिकत्व : भाषा चांगली असणे, प्रभावी असणे, एकापेक्षा अनेक भाषांमध्ये पारंगत असणे या गोष्टींची आजच्या जगात गरज आहे.
४) निसर्गाविषयी : निसर्गाची आवड, जाण, ओढ या गोष्टी काही जणांना उपजत असतात. त्यांना प्राणी, पक्षी, वृक्ष व त्यांची भाषाही अवगत असते.
५) सामाजिक जाण : काही मुले एकलकोंडी असतात तर काहींचे मित्रमैत्रिणींशिवाय पान हलत नाही. इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांना वेळोवेळी मदत करणे हेही एक बुद्धिमत्तेचे लक्षण सांगितले आहे. यांची भाषाजाण चांगली असेल तर साहित्यिक होऊ शकतात. तर निसर्गजाण चांगली असेल तर चांगले समाजसेवक तयार होतात.
६) दृश्यात्मक जाण : दृश्य अशा सर्व गोष्टींचे ज्ञान असणे हे एक कौशल्य आहे. रंग, रचना, आकार, चित्र, शिल्प इत्यादींची जन्मत: जाण असणे हे एक उत्तम कलाकाराचे लक्षण असते.
७) शारीरिक कौशल्य : काही मुले ही कायम मैदानात दिसतात. त्यांना शालेय अभ्यासही घरापेक्षा मैदानातच करायला आवडतो. खरे तर अभ्यासापेक्षा खेळातच त्यांना रस जास्त असतो. चपळता, उत्साह, गती, शारीरिक नियंत्रण यामुळे त्यांना खेळाचीच जास्त आवड असते.
८) संगीतकौशल्य : जणू मागच्या जन्मात कोणीतरी महान गायक असावा आणि राहिलेली संगीत सेवा पूर्ण करायला आत्ता जन्म घेतला असावा अशी ताल-स्वर-लय यांची जाण काही मुलांना लहानपणीच असते. अशांना संगीतात करिअर करू न देता अभ्यासात मागे पडला म्हणून फटके मारत बसलो तर काय होईल?
अशा या अष्टपैलूंचा विचार त्यांनी मांडला. यावर बऱ्याच संशोधनाअंती एक पद्धत विकसित केली गेली. त्याला आजकाल डीएमआयटी (DMIT – Dermatoglyphics Multiple Intelligence Tests) या नावाने संबोधले जाते.
आपल्या बोटांच्या पहिल्या पेऱ्यांवर (नख असलेले) काही रेषा असतात. त्यांचा संबंध सरळ मेंदूशी असतो. बाळ आईच्या पोटात चौथ्या- पाचव्या महिन्यात असतानाच आपल्या मेंदूमध्ये ही कौशल्ये पॅटर्नस्वरूपात तयार होतात. ती निसर्गदत्त देणगीच म्हणा हवे तर. हीच कौशल्ये हातांच्या बोटांच्या या पेरांवरील रेषांवरून वाचता येतात. आपल्याला माहीत असेलच की गुन्हेगारशोध मोहिमेत किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्येही याच बोटांच्या अशा रेषांचा अभ्यास केला जातो. आणि ही पद्धत अगदी शास्त्रीय म्हणून जगभर वापरली जाते.
या रेषांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या स्त्री, पुरुष अशा प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात आणि आयुष्यात कधीही बदलत नाहीत.
डीएमआयटी या चाचणीमध्ये तुमच्या हाताच्या बोटांच्या या पेरांचे ठसे स्कॅन करून घेतले जातात, ते संगणकाच्या माध्यमातून मूळ सॉफ्टवेअरकडे पाठविले जातात. तिथे यावरून एक सुमारे ४५ रंगीत पानांचा रिपोर्ट तयार होतो जो आपल्याकडे पाठविला जातो. या रिपोर्टवरून कदाचित सगळ्यांनाच समजेल असे नाही. त्यामुळे या रिपोर्टमध्ये आलेल्या आपल्या दहा कौशल्यांपैकी कोणत्या कौशल्याच्या आधारे आपले व्यक्तिमत्त्व खुलवू शकता, कोणत्या शाखेची निवड आपण करू शकता अशा विविध पैलूंना समजावून सांगण्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञाकडून किमान एक तासाचे समुपदेशन मिळते. हेच समुपदेशन आपल्या भावी आयुष्यात खूप उपयुक्त ठरते.
या पेरांवरील रेषा कधीही बदलत नाहीत, त्यामुळे आयुष्यात कधीही हा रिपोर्ट काढला तरी तोच येतो. अर्थात आयुष्यात एकदाच हा रिपोर्ट काढावा लागतो.
या रिपोर्टमध्ये एकूण दहा गुणांचा विचार केला जातो. वरील आठव्यतिरिक्त आणखी दोन गुणवैशिष्टय़ांचा विचार आहे. तो म्हणजे बोटांमधील कलात्मकता आणि स्मरणशक्ती. यातून आणखीही सखोल मार्गदर्शनाकडे जाता येते. या दहा गुणवैशिष्टय़ांव्यतिरिक्त बऱ्याच आयामांचा विचार या रिपोर्टद्वारे होत असतो.
तसेच या रिपोर्टचा उपयोग फक्त विद्यार्थीदशेतच होतो असे नाही. त्याचे फायदे अनेक आहेत.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Useful test for career
First published on: 25-12-2015 at 02:25 IST