0shitalनृत्य आणि साहित्य हा खरं तर खूप अवघड विषय. कारण या दोन भिन्न गोष्टी एकमेकांत एवढय़ा मिसळून गेल्या आहेत की त्या दोघांची मिळून एक भाषा कशी निर्माण झाली हेच लक्षात येत नाही. पूर्वी फक्त हावभाव अथवा हातवारे करून संवाद साधला जात असे. हळूहळू त्याची जागा भाषेने घेतली. माणसाला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी भाषेची गरज भासू लागली आणि अर्थपूर्ण भाषेतून तो त्याच्या भावना प्रभावीपणे समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचवू लागला. परंतु तरीही नृत्यातून भावना प्रकट करणे याचे महत्त्व अबाधितच राहिले. एवढंच नाही तर नृत्याची भाषा अधिकाधिक फुलत गेली. कारण नृत्यातून उलगडलेली कृष्णाची गोष्ट विविध भाषक लोक एकत्र बसलेले असतील तरीही त्यांच्यापर्यंत छान पोहोचते. त्यावेळी त्या कृष्णावरील बंदिशीचे बोल मराठीत आहेत की हिंदीत की संस्कृतमध्ये हा मुद्दा गौण ठरतो. अशा ठिकाणी भाषेचा अडसर नृत्याने पार केलेला असतो. 

आपले शास्त्रीय नृत्य हे प्राचीन परंपरेशी जुळलेले आहे. शास्त्रीय नृत्यात जसे शुद्ध नर्तनाला अतिशय महत्त्व दिले जाते तसेच अभिनयालाही. त्यामुळे नृत्याचा आणि साहित्याचा खूपच जवळचा संबंध आहे. शास्त्रीय नृत्य शैलींपैकी एक म्हणजे ‘कथक.’ ‘कथा कहे सो कथक कहलावे’ या उक्तीमधून कथक नृत्याची निर्मिती झाली अशी कथा आहे. पूर्वी कीर्तनकार कीर्तन करीत असताना ते अधिक रंगतदार होण्यासाठी नृत्याचा आधार घेत असत. कथकमध्ये कवित् या प्रकारात छंदोबद्ध कविता असून त्यावर नृत्य एखादी कविता तालावर प्रस्तुत केली जाते. वेगवेगळ्या बंदिशींवर अभिनय केला जातो. तसेच कथकमध्ये ठुमरी, भजन, स्तुती, दोहा, अभंग यावरही नृत्य सादर केले जाते. भरतनाटय़म-मध्ये तमिळ अथवा तेलगु भाषेतील वर्णम्, पदम् अशा प्रकारच्या विविध साहित्यावर किंवा काव्यावर अभिनय केला जातो. ओडिसीमध्ये ‘गीत गोविंद’वर अतिशय सुंदर नृत्य प्रस्तुत केले जाते. याशिवाय लावणी, भारूड, पोवाडे यावरही बहारदार नृत्य सादर केली जातात. हल्ली तर विविध कवितांवरसुद्धा नृत्य प्रस्तुती केली जाते.
नृत्यांत विविध गोष्टी दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मुद्रांचा उपयोग केला जातो. साप, आरसा, कान, केस, कुंकू, डोक्यावरील घडा, अग्नीच्या ज्वाळा, आकाश, ढग, पाऊस, वीज, पक्षी ,विविध प्राणी अशा गोष्टी दर्शविण्यासाठी किंवा थांब, निघून जा, अश्रू पूस, केसात फूल माळणे, डोळ्यात काजळ घालणे, कानात व पायात आभूषणे घालणे अशा क्रिया दर्शविण्यासाठी मुद्रांचा उपयोग केला जातो. माणसाला झालेला आनंद अथवा दु:ख, काळजी, भय अशा भावना अभिनयाद्वारे व्यक्त केल्या जातात.
साहित्यात जसे शृंगारिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध विषयांवर साहित्यनिर्मिती झाली. त्याचप्रमाणे नृत्यातही असे विभिन्न रस अतिशय उत्कटतेने हाताळले गेले. कधी कधी साहित्य अन नृत्य याची स्पर्धाही झाली. म्हणजे कृष्णाची गोष्ट जास्त रसाळ की नृत्यातला कृष्ण जास्त मोहक. कधी कबीराचा एखादा दोहा अथवा एकनाथांचे भारूड असे काही तत्त्वज्ञान सांगून जातं की ते नृत्यातून मांडणे अवघड. तर कधी कथकमधून एखादी अनवट बंदिश अशा काही नजाकतीने पेश केली जाते की ती शब्दात व्यक्त करणे महाकठीण.
ज्याप्रमाणे साहित्य हे फक्त निखळ आनंदनिर्मितीसाठी निर्माण केलं गेलं तसेच सर्वसामान्यांच्या आकलन शक्तीपलीकडील विषयातही साहित्यनिर्मिती झाली. त्याचप्रमाणे नृत्यसुद्धा सर्वाना सहजपणे समजेल, आवडेल अशा रीतीनेही सादर केले जाते. अत्यंत तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध फक्त नृत्यकलेतील दिग्गजांना भावेल अशा पद्धतीनेही पेश केले जाते.
तरीही नृत्य आणि साहित्य या दोन्हीत एक मूलभूत फरक आहे आणि तो म्हणजे नवोन्मेष. एकदा साहित्यनिर्मिती झाली की ती कायमस्वरूपी तशीच राहते. मात्र एकाच प्रकारच्या नृत्याचा आविष्कार हा दरवेळी वेगवेगळा असतो. शिवाय तो प्रत्येक प्रयोगागणिक परिपूर्ण होत जातो, नृत्य सादर करणाऱ्याला दरवेळी नव्याने अधिक आनंद मिळतो. असे हे नृत्य आणि साहित्य एकमेकांत सामावून गेलेले आणि तरीही आपला वेगळा आब राखून असलेले.
शीतल कपोले

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ