भारतीय हवामान खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून सरासरीच्या फक्त ८८ टक्के एवढाच असणार आहे. मान्सूनच्या विविध पैलूंसंदर्भात भारतीय उष्ण देशीय मौसम विज्ञान संस्थेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. माधवन नायर राजीवन यांच्याशी स्नेहा कुलकर्णी यांनी केलेली बातचीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* सर्वप्रथम ‘आयआयटीएम’ आणि ‘राष्ट्रीय मान्सून मिशन’च्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन! भारतीय हवामान खात्याचे माजी संचालक आणि आता आयआयटीएमचे संचालक या नात्याने यंदाच्या मान्सूनच्या आव्हानाबद्दल काय सांगाल?
* संचालकपदाची सूत्रे स्वीकारून काही महिने होत असतानाच जाहीर झालेला दुष्काळ हे एक मोठे आव्हान असणार आहे. कोणत्याही वर्षीचा मान्सून हा कधीच सारखा नसतो। कधी त्याच्या आगमनाच्या तारखा बदलतात, तर कधी परतीच्या तारखांमध्ये विविधता आढळते. शेती, लघुउद्योग, भारताची अर्थव्यवस्था या सगळ्याच घटकांवर दुष्काळाचा परिणाम जाणवतो. पावसाला गृहीत धरल्याने आणि त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असल्याने भारतासारख्या कृषिप्रधान देशात पावसाचे काही टक्क्यांनीही कमी होणे म्हणजे चिंतेची बाब ठरते. कमी पाऊस, त्यामुळे अन्नधान्य कमीष त्यामुळे महागाई हे न संपणारे चक्र मग सुरू होते. पावसावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांपैकी नक्की कोणता घटक एखाद्या वर्षी जास्त सक्रिय असेल हे सांगणे अवघड असते. अशातच एखाद्या वर्षी पावसाचा अंदाज देणाऱ्या संस्थांचे अंदाज चुकले किंवा मागे-पुढे झाले आणि त्यातही यंदासारखी दुष्काळ सदृश परिस्थिती असेल तर अशा संस्था, त्यांची यंत्रणा हे विनोदाचा भाग बनतात, अनेकदा पुढील परिणामांसाठीही या संस्थांना कारणीभूत ठरवले जाते. म्हणून यंदाचा मान्सून, त्याचे अंदाजपत्र आणि दुष्काळ या सगळ्या पातळ्यांवर हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
* मान्सून म्हणजे नक्की काय? आणि त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ देता येतील का?
* मान्सून म्हणजे ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे. मान्सूनच्या शास्त्रोक्त व्याख्येत पर्जन्याला स्थान नाही. मान्सून हा मुळात अरेबिक शब्द असून त्याचा संदर्भ ऋतू या शब्दाशी जोडला जातो. शेकडो वर्षांपूर्वीपासून अरबी समुद्रावर होणाऱ्या वाऱ्यांच्या बदलांना मासेमारी करणाऱ्या लोकांनी ही संकल्पना वापरल्याचे सांगण्यात येते. दिशा बदलणारे हे वारे सहा महिने नैर्ऋत्येकडून तर बाकी सहा महिने ईशान्येकडून वाहतात.

* या मौसमी वाऱ्यांची निर्मिती कशी होते? त्यामागे काही ठरावीक विज्ञान आहे का?
* जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. याउलट पाण्याला तापण्यासाठी तसेच थंड होण्यासाठीही जास्त वेळ लागतो. जमीन आणि पाणी या दोन्हीतल्या तापमानातील या फरकामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. सूर्याभोवती पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे समुद्र आणि जमिनीवर कमी किंवा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, आणि मग वाऱ्याच्या नियमाप्रमाणे हे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागतात. उन्हाळ्यात आशिया खंड खूप तापतो आणि हिंदी महासागराचे तापमान त्या मानाने  कमी असते तेव्हा वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. उलट हिवाळ्यात आशिया खंड थंड होतो आणि हिंदी महासागर तितका थंड झालेला नसतो तेव्हा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. उन्हाळ्यात वाहणारे वारे हे समुद्रावरून जमिनीकडे येत असल्याने ते बाष्पयुक्त असतात, त्यामुळे अशा बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतीय उपखंडाला पाऊस मिळतो. मान्सून काळात समुद्रसपाटीपासून पाच किलोमीटपर्यंत नैर्ऋत्येकडून, तर पाच ते बारा किलोमीटपर्यंत पूर्वेकडून वेगवान वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय असतो. यांपैकी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वरच्या थरांतील वाऱ्यामुळे कमी दाबाची क्षेत्रे समुद्राकडून जमिनीकडे ढकलली जातात. त्यामुळे मान्सून सक्रिय राहतो. याउलट हिवाळ्यात वाहणारे वारे हे जमिनीकडून वाहत असल्याने त्यांच्याकडून पाऊस मिळण्याची शक्यता कमी असते.
तापमानातील फरक, कमी-जास्त दाबाची क्षेत्रे,  वारे, त्याच्या दिशा आणि सूर्य, या निसर्गाच्या सगळ्या घटकांमध्ये माणसाला अचंबित करील अशी सूत्रबद्धता असते. त्यामुळे प्रमाण कितीही कमी किंवा जास्त असले तरी दरवर्षी मान्सूनचा पाऊस येणार हे मात्र निश्चित असते.

* भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही मान्सून असतो का?
* शीत कटिबंधात मान्सून उद्भवू शकत नाही. तो फक्त उष्ण कटिबंधातच आढळतो. त्यामुळे शीत कटिबंधातील देशांमध्ये वर्षभर पाऊस पडतो आणि त्याचे प्रमाणही     कमी- अधिक असते. जागतिक पातळीवर निर्माण होणारी दाब क्षेत्रे, तापमानातील बदल अशा अनेक घटकांचा मान्सूनशी संबंध असतो. यामुळे आफ्रिकेतला काही भाग, ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका, इंडोनेशिया अशा जगातल्या विविध भागांत  मान्सूनची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. परंतु भारतासारखी पावसाची नियमितता मात्र इतर कुठेही दिसत नाही. सलग चार महिने नित्यनेमाने येणारा पाऊस आणि त्यानंतर परतीचा मान्सून हे साचेबद्ध रूप फक्त भारतातच अनुभवता येते.
* भारतातील मान्सूनचे आगमन कोणत्या घटकांवर अवलंबून असते?
* कुठल्याही एका घटकाशी असे मान्सूनचे नाते लावता येत नाही. मान्सूनचे भारतातील आगमन वातावरणातील विविध घटकांवर अवलंबून असते. यातील कोणत्याही एका घटकात बदल झाला तर त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमनाच्या किंवा परतीच्या लांबणीवर होऊ  शकतो. याचप्रमाणे जागतिक स्तरावर होणारे बदल उदा. एल निनो, ला नीना, एन सो हेही घटक पावसाच्या कमी-जास्त प्रमाणासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. भारतीय मान्सूनच्या आगमनाचा अभ्यास करताना पुढील घटक अभ्यासले जातात,
१) उष्णतेमुळे तयार होणारा कमी दाबाचा पट्टा –
मे महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत उत्तर गोलार्धातील सूर्याच्या उष्णतेमुळे आणि जमिनीने परावर्तित केलेल्या उष्णतेमुळे जास्त प्रमाणात ऊर्जेची निर्मिती होते, ज्याचे रूपांतर नंतर कमी दाबाच्या पट्टय़ात होते. सोमाली, अरबस्थानापासून तयार होणारा हा पट्टा पाकिस्तान आणि उत्तर भारतावर पसरलेला असतो. याच काळात उत्तरेकडे वेस्टर्लीजचे प्रमाण वाढलेले असते. उष्णतेमुळे तयार होणारा हा कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या आगमनासाठी पूरक ठरतो.
२) विषुववृत्तीय ट्रफ आणि मास्कारीनजवळ जास्त दाबाचा पट्टा
भारतामधील मान्सूनच्या आगमनापूर्वी विषुववृत्तालगत पाच अंश उत्तर आणि पाच अंश दक्षिण या भागात दाब पट्टा तयार होतो. भारतातील मान्सूनच्या उत्तरेकडील सरकण्यासोबतच हा ट्रफदेखील उत्तरेकडे सरकत राहतो.
याच सुमारास दक्षिण गोलार्धात कमी तापमानामुळे जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. मास्कारीनजवळ तयार झालेल्या या पट्टय़ामुळे वारे दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्ध असा प्रवास करतात आणि मान्सूनच्या पावसात आपले योगदान देतात.
३) सब ट्रॉपिकल वेस्टर्लीज आणि ट्रॉपिकल इस्टर्ली जेट स्ट्रीम्स
मे महिन्याच्या उत्तरार्धात वातावरणातील वरच्या थरातील वाऱ्याची दिशा हिमालयाच्या दिशेने उत्तरेकडील होते. पश्चिम ते पूर्व अशी मूळ दिशा सोडून वाऱ्याचे उत्तरेकडे वाहणे हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देते. या वाऱ्याला सब ट्रॉपिकल वेस्टर्लीज असे म्हणतात. देशाच्या दक्षिणेकडील भागातही पूर्व ते पश्चिम वाहणाऱ्या ट्रॉपिकल इस्टर्ली जेट स्ट्रीम्सचे मान्सूनच्या शंभर दिवसांतील अस्तित्व महत्त्वपूर्ण ठरते.
४) तिबेटच्या पठारावरील कमी दाबाचे क्षेत्र
भारतामधील मान्सूनच्या निर्मितीसाठी तिबेटच्या पठारावरील कमी दाबाचे क्षेत्र हे काही महत्त्वाच्या घटकांपैकी एक मानले जाते. पठाराच्या उंचीमुळे तापमानातील तफावत येथे जास्त आढळून येते, ज्याचा फायदा भारतीय मान्सूनवर दिसून येतो.
५) एन सो ( एल निनो, ला नीना आणि साउथन ओसिलेशन्स)
वर उल्लेख केल्याप्रमाणे जगातील बदलांचा परिणाम हा भारतीय मान्सूनवर दिसून येतो. ज्यामध्ये एन सो हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर समुद्राचे तापमान वाढून त्याचा फटका तिथल्या मासेमारीच्या व्यवसायाला बसतो. दक्षिण अमेरिकेच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने वारे त्या दिशेने  वाहू लागतात. या घटनेला ‘एल निनो’ असे म्हणतात. स्पॅनिश भाषेतल्या या शब्दाचा अर्थ ‘बाळ येशू’ किंवा ख्रिस्ताचा मुलगा असा होतो. ख्रिसमसच्या सुमारास हे वारे प्रबळ होत असल्याने त्यांना एल निनो (ख्रिस्ताचा मुलगा) असे म्हणले जाते. एल निनो हे दोन ते सात वर्षांत एकदा येते. एल निनो सक्रिय असणाऱ्या वर्षी भारतातील पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. असे असले तरी याचे एकास एक असे नाते लावता येत नाही, कारण अनेकदा एल निनो प्रबळ असतानाही चांगला पाऊस झाल्याची उदाहरणे सापडतात.
एल निनो परिस्थितीच्या विरुद्ध जेव्हा समुद्राचे तापमान कमी असते तेव्हा जास्त दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वारे उलट दिशेने वाहू लागतात. भारतीय उपखंडातील चांगल्या मान्सूनला साजेशी ही स्थिती असते. याचे प्रमाण अधिक असेल तर त्यास ला नीना (कन्या) असे संबोधण्यात येते. ला नीना परिस्थिती सक्रिय असल्यास भारतीय उपखंडात पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते.
* भारतामध्ये मान्सूनचा प्रवास कसा होतो?
* अरबी समुद्रावरून येणारी शाखा आणि बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा अशा दोन मार्गानी मान्सूनचा भारतात प्रवेश होतो. गेल्या काही वर्षांच्या सरासरीनुसार एक जूनच्या सुमारास तो अरबी समुद्राच्या शाखेमार्फत केरळच्या सीमेवर येऊन धडकतो. १० ते १५ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीपर्यंत पोहोचतो. पुढे १५ जुलैपर्यंत म्हणजे अंदाजे दीड महिन्यात तो संपूर्ण देश व्यापून टाकतो.
मान्सूनच्या दुसऱ्या शाखेमुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात तो बंगाल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पाऊस देतो. वर सांगितलेल्या वेगवेगळ्या घटकांच्या कमी-अधिक प्रमाणांमुळे या तारखा मागे पुढे होण्याची दाट शक्यता असते. मान्सूनचे वेळापत्रक हे शाळा-कॉलेजच्या वेळापत्रकाप्रमाणे ठरावीक नसते. मान्सूनच्या चार-पाच दिवस मागे पुढे येण्याने विशेष असा काही फरक पडत नाही, पण एखाद्या वर्षी तो उशिरा आला तर विविध स्तरांतून चिंता व्यक्त करण्यास सुरुवात होते.

* वरील माहितीच्या पाश्र्वभूमीवर मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटकांची सध्याची स्थिती कशी आहे? हवामान खात्याने २०१५ पावसाचे प्रमाण सरासरीच्या ८८ टक्के असेल हे कोणत्या घटकांवर सांगितले?
* मान्सूनला पूरक अशा घटकांची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. मान्सूनच्या निर्मितीला कारणीभूत असणारा भारतीय उपखंडाचा उत्तरेकडील भूभाग हा अजून म्हणावा तितका गरम झालेला नाही. (low heating) योग्य प्रमाणात त्याची उष्णता न वाढल्याने म्हणावे तसे कमी दाबाचे क्षेत्रही अजून तयार झालेले नाही. विविध कारणांमुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.
अशातच चिंताजनक बाब म्हणजे हिंदी महासागरातील मान्सूनसदृश स्थितीही तितकीशी चांगली नाही. त्यामुळे सध्या तरी महत्त्वाचे काही घटक मान्सूनच्या विरोधातच दिसत आहेत.
भारतीय हवामान खात्यातर्फे काही महिन्यांपूर्वी जेव्हा यंदाच्या मान्सूनचे अनुमान देण्यात आले होते तेव्हा ते सरासरीच्या ९३ टक्के एवढे सांगण्यात आले होते. त्यातही इतर काही संस्थांनी हे प्रमाण १०० टक्क्यांच्या वर असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. हे अंदाज त्या त्या वेळेच्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार देण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसांत ‘एल निनो’ हा घटक जास्त जोर धरत असल्याचे समोर आले. ‘एल निनो’ च्या वाढत्या परिणामांमुळे हवामान खात्यातर्फे पूर्वी घोषित केल्यापेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या ८८ टक्के एवढाच पाऊस होईल, अशी नवी माहिती गेल्या आठवडय़ात देण्यात आली आहे.

* मान्सूनचे केरळमधील आगमनही ठरावीक तारखांच्या तीन-चार दिवस आधी होईल असे सांगितले जात होते, परंतु प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. याचे कारण काय असू शकेल?
* वर सांगितल्याप्रमाणे मान्सूनच्या आगमनाच्या तारखा सभोवतालच्या परिस्थितीनुसार त्या चार-पाच दिवस पुढे-मागे होऊ  शकतात. त्यात गैर किंवा घाबरण्यासारखे काहीच नाही. शेवटी तो निसर्ग आहे. त्याचे पूर्ण अनुमान सांगणे हे कधीच शक्य नाही. या वर्षीच्या तारखांसंदर्भात बोलायचे झाले, तर मान्सूनचे केरळमधील आगमन ठरावीक तारखांच्या तीन-चार दिवस आधी होईल, असे हवामान खात्याने सांगितले होते. परंतु एल निनो आणि इतर काही घटकांमुळे हे आगमन लांबल्याचे दिसत आहे.
* सध्याची परिस्थिती लक्षात घेता केरळ आणि महाराष्ट्रात कधी मान्सून दाखल होईल ते सांगता येईल का?
* जूनच्या पहिल्या आठवडय़ाच्या उत्तरार्धात केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झालेले आहे. त्या आधी काही दिवस केरळ किनारपट्टीवर विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. मान्सूनची पूर्वस्थिती कायम राहिली तर जूनच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या शेवटी मान्सूनने महाराष्ट्र व्यापलेला असेल.

* मान्सूनच्या आगमनाप्रमाणेच त्याच्या परतीच्या मागेही काही विज्ञान आहे का? गेल्या काही वर्षांमध्ये परतीचा मान्सून लांबत असल्याचे दिसते. त्याच्यामागे काय कारण असू शकेल? ऋतूंच्या बदलांशी याचा काही संदर्भ लावता येईल का?
* अंदाजे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात देशाच्या वायव्य टोकापासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासास सुरुवात होते. त्यानंतर नित्याप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर पाऊस आणि वादळजन्य परिस्थिती तयार होऊ  लागते. २३ सप्टेंबर रोजी सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडत असतात. त्यानंतर  सूर्याचं भासमान भ्रमण विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे होऊ  लागते. याच काळात देशाच्या वायव्येकडील कमी दाबाचे प्रमाण कमी कमी होत जाते. यानंतर खऱ्या अर्थाने मान्सून भारतीय उपखंडातून माघार घेऊ  लागतो. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये एखाद्या प्रदेशात सलग पाच दिवस पाऊस न पडणे हे त्या भागातून मान्सून परतल्याचे महत्त्वाचे लक्षण मानण्यात येते. हवेतील आद्र्रतेत झपाटय़ानं घट आणि तपांबराच्या (tropsphere) खालच्या थरात ८५० हेक्टापास्कल किंवा त्याहूनही कमी वाऱ्याचा दाब असणे ही त्याची आणखी काही लक्षणे सांगण्यात येतात. मान्सून परतू लागला की, विजांचा कडकडाट आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना हमखास दिसून येतात. ऑक्टोबरमध्ये देशाच्या इतर भागांतून मान्सून परत गेला असला तरी देशाचा पूर्व किनारा, आसाम आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये वादळे आणि ईशान्य मौसमी वाऱ्यांचा पाऊस अनुभवास मिळतो.
गेल्या काही वर्षांत परतीच्या मान्सूनचे वेळापत्रक बदललेले आहे हे खरे आहे. किमान १५ दिवस मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला असल्याचे दिसून येत आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर कायम असणे हे यामागचे प्रमुख कारण सांगता येईल. परंतु याचा संदर्भ थेट ऋतूंच्या बदलांशी किंवा ऋतूंच्या पुढे सरकण्याशी लावणे मात्र अयोग्य आहे. त्यासाठी अभ्यासपूर्ण संशोधनाची गरज आहे.

* काही महिन्यांपूर्वी यंदाच्या मान्सूनचा अंदाज सरासरीच्या ९३ टक्के एवढा देण्यात आला होता. पण आता तो ८८ टक्क्यांवर आला आहे, केरळमधील मान्सूनच्या आगमनाची तारीख ही मूळ तारखेच्या चार-पाच दिवस आधीची देण्यात आली होती. परंतु हे दोन्ही अंदाज चुकले. हे कशामुळे?
* मुळातच भारतीय उपखंडाच्या भौगोलिक स्थानामुळे शंभर टक्के अचूक अंदाज व्यक्त करणे अवघड आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अंदाज बरोबर ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातही अचूक ठरलेल्या अंदाजांची वाच्यताही कमीच होते आणि समजा एखाद्या वर्षी अंदाज चुकला तर प्रसिद्धीमाध्यमे तसेच सामान्य जनतेसाठी हवामानाचे अंदाज देणाऱ्या संस्था या चर्चेचा किंवा विनोदाचा भाग ठरतात.
या पुढे जाऊन यंदाच्या मान्सूनच्या अंदाजाविषयी बोलायचे झाले तर काही प्राथमिक अंदाज चुकले हे खरे आहे. पण एल निनोसारखे अचानक घडणारे बदल हे त्यास कारणीभूत आहेत हे लक्षात घ्यायला हवे. या घटकांचे पूर्वानुमान देणे अशक्य असते.
असे असले तरी हवामानाचे अंदाज देणाऱ्या मॉडेल्समध्ये सध्या लक्षणीय प्रगती होत आहे आणि बऱ्याच अंशी ही मॉडेल्स योग्य अंदाज देत आहेत.

* सध्या हवामानाच्या अंदाजासाठी भारतात कोणती मॉडेल्स वापरली जातात? आणि त्यांच्या पुढची मुख्य आव्हाने काय आहेत?
* सध्या वापरण्यात येणारी मॉडेल्स ही प्रामुख्याने परदेशी बनावटीची आहेत. तेथील वातावरणाला अनुसरून त्यांची रचना केलेली आहे, सध्या वापरण्यात येणारी मॉडेल्स ही प्रामुख्याने परदेशी बनावटीची आहेत. तेथील वातावरणाला अनुसरून त्यांची रचना केलेली आहे, ती भारतीय भूभागासाठी पूर्णपणे उपयुक्त नाहीत. पण गेल्या काही वर्षांपासून त्यात काही महत्वपूर्ण बदल करून ही मॉडेल्स भारतीय वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरली जातात.
सांख्यिकी (statistical) मॉडेल्स आणि गणितीय (mathematical) मॉडेल्स या प्रमुख दोन मॉडेल्सचा वापर सध्या मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्या त्या वर्षांच्या संदर्भाने महत्वपूर्ण असणाऱ्या घटकांच्या एकत्रित अभ्यासाने सांख्यिकी मॉडेल्स मान्सूनचा अंदाज वर्तवतात. परंतु सध्याच्या मॉडेल्समध्ये कालानुरूप बदलानुसार आवश्यक सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. बदलाचा निर्देशांक (changing coefficient) हा दर १० ते १५ वर्षांनी बदलत असतो. पण त्याला अनुसरून मॉडेल्समध्ये बदल झाल्याचे दिसत नाही. यामुळेच सांख्यिकी मॉडेल्सही बऱ्याचदा अचूक अंदाज देऊ  शकत नाहीत. दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे अंदाज देण्यास तर ही सांख्यिकी मॉडेल्स अनेकदा चुकतात.
गणितीय प्रकारात मोडणारी (डायनामिक) मॉडेल्स ही दैनंदिन भौगोलिक घडामोडी, गणितीय प्रक्रिया आणि महासंगणकीय तंत्रज्ञानावर अवलंबून असतात. या मॉडेल्सची कमतरता म्हणजे ही मॉडेल्स युरोपियन बनावटीची असून ती तेथील वातावरणाशी मिळतीजुळती आहेत. भौगोलिक परिस्थितीच्या फरकामुळे ही भारतीय भूभागासाठी विशेष उपयोगी नाहीत. याचबरोबर वातावरणाची आजूबाजूची परिस्थिती ही थोडय़ा थोडय़ा कालावधीनंतर बदलत असल्याने दीर्घकालीन अंदाज मांडण्यासाठी ही मॉडेल्स उपयोगी नाहीत.
परदेशांमध्ये भारतासारखा भूभाग नाही, डोंगर, दऱ्या, वाळवंटे अशी विविधता नाही. त्यामुळे भूभागाचा अभ्यास हा मुद्दा त्यांच्याकडील मॉडेल्समध्ये गौण ठरतो. तसेच मॉडेल्सनुसार मान्सूनचे निदान करताना सर्वात मोठा अडथळा समोर येतो, तो म्हणजे एखाद्या ढगातून किती पाऊस पडेल याचा अंदाज करता येत नाही. त्याच्याभोवती असणारे बाष्प आणि त्यानुसार पडू शकणारा पाऊस यांचा गणितीय अंदाज लावता येत असला तरी प्रत्यक्षात मात्र ते कधीच बरोबर येत नाही.
* सध्याची मॉडेल्स म्हणावी तशी उपयुक्त नाहीत, असे असताना भविष्यात आयएमडी किंवा आयआयटीएमद्वारे काही नवीन मॉडेल्स किवा तंत्रज्ञानाची उपयोजना करण्यात येत आहे का?
* सध्याची मॉडेल्स अधिक उपयुक्त बनवणे, काही नवीन मॉडेल्स आणि तंत्रज्ञान विकसित करणे अशा दोन्ही स्तरांवर सध्या काम चालू आहे. तसेच रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जात आहे.
सध्या आयआयटीएमतर्फे दोन नव्या मॉडेल्सची उभारणी केली जात आहे. ही दोन्ही मॉडेल्स संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून विविध घटकांचा योग्य अभ्यास करून अचूकतेच्या बाबतीतही परदेशी मॉडेल्सपेक्षा यशस्वी ठरतील याची खात्री आहे. तसेच इतर मॉडेल्सच्या तुलनेत प्रादेशिक स्तरावरही पावसाचा अंदाज देण्याची शक्यता या मॉडेल्समध्ये असणार आहे.  सध्याच्या तंत्रज्ञानानुसार देशपातळीवर किती आणि कसा पाऊस होईल याचा अंदाज वर्तवला जातो. परंतु राज्य किंवा विभागीय पातळीवरचा अंदाज देण्याची क्षमता या मॉडेल्समध्ये नाही. परिणामी सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. या पाश्र्वभूमीवर नवीन येणारी मॉडेल्स मोठी क्रांती घडवतील अशी आशा वाटते.
सध्या ही मॉडेल्स प्रायोगिक तत्त्वावर, नवीन सुधारणांचा अभ्यास करीत आयआयटीएममध्ये कार्यरत आहेत. येत्या दोन वर्षांत ही देशाच्या सेवेत रुजू होतील आणि आपले मान्सून अंदाजाचे कार्य चोख पार पाडतील याची खात्री वाटते.

* सरासरी पडणारा पाऊस आणि त्या अनुषंगाने येणारी दुष्काळ किंवा पूर परिस्थिती यांचे गणित कसे लावले जाते?
* भारतीय हवामान खात्याने भारतीय परिस्थितींचा अभ्यास करून काही प्रमाण रेषा ठरवलेल्या आहेत. या नुसार सर्वसामान्य मान्सून जर शंभर टक्के धरला तर ९६ टक्के ते १०४ टक्के हा सर्वसामान्य पाऊस मानला जातो. ९६ टक्के ते ९० टक्के हा सर्वसामान्य प्रमाणापेक्षा कमी पाऊस ठरतो. आणि ९० टक्क्यांपेक्षा खाली हा दुष्काळ म्हणून समजला जातो. या प्रमाणानुसार सध्याचा ८८ टक्केपाऊस हा दुष्काळी परिस्थिती दर्शवतो.
हवामान खात्याच्या गणितानुसार दुष्काळ किंवा पूर परिस्थिती घोषित करण्यासाठी चार महिन्यांचा एकूण पाऊस गृहीत धरला जातो. परंतु भारतातल्या बऱ्याच ठिकाणी जून आणि जुलै म्हणजेच शेतीमध्ये पेरण्यांच्या काळात जर पाऊस आला नाही किंवा कमी आला तर ते वर्ष शेतीसाठी दुष्काळी वर्ष समजले जाते. दोन्ही प्रमाणांच्या याच तफावतीमुळे अनेकदा सरासरी पाऊस नव्वद ते शंभर टक्के पडूनही पाऊस जून किंवा जुलै महिन्यात न पडल्याने शेतीसाठी मात्र ते वर्ष दुष्काळी वर्ष ठरते.
गेल्या काही वर्षांचे उदाहरण घेतले तर असे दिसून येईल की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. या महिन्यातील पावसाने जून आणि जुलैमधील तफावत भरून काढल्याने चार महिन्यांचा सरासरीचा पाऊस योग्य आहे. परंतु जून-जुलैमधील सततच्या कमी पावसामुळे शेतीचे परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्या मोठय़ा जनसमुदायाचे भरपूर नुकसान होत आहे. त्यांना दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

* म्हणजे पावसापेक्षाही पावसावर असणारे अवलंबित्व हे दुष्काळास कारणीभूत आहे का?
* हो नक्कीच, कारण ८८ टक्के हा पाऊस मुळातच बऱ्यापैकी चांगला पाऊस म्हणावा लागेल परंतु आपले पावसावरील अवलंबित्व एवढे आहे की हे प्रमाण थोडे जरी कमी-जास्त झाले तरी त्याचा आपण अतिजास्त बाऊ करतो. मुळात आपण पावसाला गृहीत धरतो. पडणारा सगळा पाऊस आपण योग्यरीत्या साठवून ठेवू शकलो तर सर्वत्र दिसणारी पाण्यासाठीची तारांबळ आपण नक्कीच थांबवू शकू. जलसिंचनाच्या सोयी उत्तम होत नाहीत आणि शेती तसेच दैनंदिन गोष्टींचे पावसावर अवलंबून राहणे कमी होणार नाही तोपर्यंत दुष्काळ किंवा पूरसदृश परिस्थितीला आपल्याला सामोरे जावेच लागेल.
जेव्हा सरासरीच्या ८८ टक्के किंवा १०० टक्के वगैरे पाऊस जाहीर होतो तेव्हा तो काही संपूर्ण देशावर तेवढय़ा प्रमाणात पडत नसतो. चेरापुंजी किवा मोसिंद्राममध्ये त्या ठिकाणच्या सरासरीच्या म्हणजे दहा ते अकरा हजार मिलिमीटरच्या आणि राजस्थान किंवा मराठवाडय़ात ३०० ते ४०० मिलिमीटरच्या ८८ टक्के किंवा शंभर टक्के पाऊस पडणार असतो, ही महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यायला हवी आणि या सगळ्या प्रमाणांचा विचार करून पाण्याचे सिंचन करायला हवे.
धरणे न भरणे किंवा शेतीसाठी ठरावीक काळात ठरावीक पाऊस न मिळणे एवढय़ाच संकल्पनांशी दुष्काळाचा संदर्भ लावण्यापेक्षा पावसाला शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्यास आपण यशस्वी ठरलो तर मान्सूनच्या परिणामांची दाहकता नक्कीच कमी होऊ  शकेल.

* शेती, भारतीय अर्थव्यवस्था आणि मान्सून यांचे नाते सर्वश्रुत आहे. यंदाच्या दुष्काळाचा या घटकांवर कसा परिणाम होऊ  शकतो?
* भारतासारख्या कृषिप्रधान देशात निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे. मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. यामुळेच एखाद्या वर्षीच्या दुष्काळाचा फटका हा समाजातील सर्वच स्तरांना जाणवतो. दुष्काळाचा अर्थव्यवस्थेवर होणारा थेट परिणाम म्हणजे यामुळे जीडीपी जवळपास दोन टक्क्यांनी कमी होऊ  शकतो. कमी पाऊस, यामुळे अन्नधान्य कमी, त्यामुळे महागाई हे न संपणारे चक्र मग सुरू होते.
या सगळ्यावर तातडीने अमलात आणता येण्यासारखा उपाय म्हणजे जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचा हव्यास न धरता कमी पाण्यावर होतील अशीच पिके घेणे.
वातावरणाच्या सध्याच्या परिस्थितीशी पोषक अशी नैसर्गिक खते वापरून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन काढून घेणे आणि आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे पाणी उपलब्ध आहे त्याचे वैयक्तिक पातळीपासून इमारत, सोसायटी, खेडं, गाव, जिल्हा अशा विविध पातळ्यांवर सिंचन करणे. पाण्याचा दुरुपयोग टाळून समाजात पाणी बचतीबाबत जागृती निर्माण करणे.
राज्य किंवा देश पातळीवर तात्काळ अमलात आणता येईल असा पर्याय म्हणजे दुष्काळासाठी दिले जाणारे अनुदान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात पोहोचते की नाही याची खबरदारी घेणे.  तसेच दुष्काळामुळे येऊ  शकणारी अन्नधान्याची कृत्रिम टंचाई आणि त्यासोबतची दलाली यांच्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे. अशा प्रकारे विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले तर दुष्काळामुळे होणाऱ्या जीवित आणि वित्तीय हानीचे प्रमाण नक्कीच कमी होऊ  शकते.

* दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा कसा 0देता येईल?
* पावसाअभावी गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहता यंदाचा दुष्काळ हा शेतकरी तसेच सरकार पुढेही आव्हान ठरणार आहे. सध्या तरी जेवढा पाऊस पडेल त्याची योग्य पद्धतीने साठवणूक करणे हेच गरजेचे आहे. शेतीचे पावसावरील अवलंबित्व आपण काही एका वर्षांत कमी करू शकत नाही. पण आता त्या दृष्टीने विचार तरी करायला हवा. तसं बघायला गेले तर महाराष्ट्राला बऱ्यापैकी पाऊस मिळतो. कोकण किनारपट्टी हा प्रदेश देशातील दुसऱ्या क्रमांकावरचा जास्त पाऊस मिळणारा प्रदेश आहे आणि विदर्भ मराठवाडय़ाचा विचार करता राजस्थानच्या तुलनेत या भागातही चांगला पाऊस पडतो. पण पुन्हा इथे पावसाच्या साठवणीचा मुख्य प्रश्न पुढे येतो. यामुळेच जलसिंचन हेच मुख्य आव्हान मला वाटते.

* हा सतर्कतेचा इशारा, मान्सूनच्या विविध घटकांचे ज्ञान समाजातील विविध स्तरांत पोहोचवण्याची काही यंत्रणा सध्या उपलब्ध आहे का?
* तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध असणाऱ्या सामाजिक घटकांसाठी आयएमडी, आयआयटीएम तसेच इतर काही खासगी संस्थांच्या वेबसाइट्स हा सध्याची आणि पुढच्या हवामानाची माहिती घेण्याचा उत्तम मार्ग आहे. या दोन्ही संस्थांच्या वेबसाइट्सवर काही तासांच्या आत नवीन माहिती, हवामानाचे अंदाज, त्या वेळेचे उपग्रहामार्फत मिळालेले फोटो यांचे अपडेट मिळण्याची सोय आहे. देशातील बऱ्याच शहरात तसेच मोठय़ा गावांमध्ये संपर्काचा हा मार्ग उपयोगी ठरत आहे.

जेथे ही सुविधा पोहोचू शकत नाही अशा खेडेगावांमध्ये, दुर्गम भागात दिवसातून दोन वेळा मोबाइल एसएमएसद्वारे हवामानाचे अंदाज पोहोचवण्याचे प्रकल्पही कार्यान्वित आहेत. ही एसएमएस सेवा शेतकऱ्यांना बरीच उपयोगी ठरत आहे. हवामानाच्या अंदाजाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४ तास चालू असणारी शेतकरी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून खते, पिकं, शेतीविषयक हत्यारे, बँकविषयक सल्ले अशा बऱ्याच विषयांवर मार्गदर्शन मिळते.

* शेतकऱ्यांच्या बाजूने या उपक्रमांना कसा प्रतिसाद मिळतो? पावसाविषयक शेतकऱ्यांना असलेल्या ज्ञानाचा या संस्था काही उपयोग करून घेत आहेत का? कारण ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या अंतर्गत पावसासोबत संपूर्ण देश फिरत असताना एक समान गोष्ट समोर आली आहे, की प्रत्येक ठिकाणी शेतकरी किंवा तेथील स्थानिकांच्या पावसाच्या अंदाजाच्या काही पूर्वापार चालत आलेल्या पद्धती आहेत आणि हवामान खात्याच्या अंदाजापेक्षाही त्यांचा या पद्धतींवर जास्त विश्वास आहे.
* खरे सांगायचे तर शेतकरी किंवा स्थानिकांचे ज्ञान जाणून घेता येईल आणि त्याचा या संशोधन संस्थांच्या अभ्यासाशी संबंध लावता येईल अशी वेगळी सुविधा सध्या तरी अस्तित्वात नाही, पण भविष्यात असे झाल्यास मान्सून समजून घेण्यास संशोधकांनाही नक्कीच फायदा होईल. उदाहरण देऊन सांगायचे झाले तर किनारपट्टीवरील मासेमारी त्यांच्या अनुभवातून समुद्रातल्या बदलांच्या माध्यमातून मान्सून कधी येणार याचा अंदाज अगदी खात्रीशीर आणि योग्य देऊ  शकतात. राजस्थानात मुळातच पाऊस कमी पडत असल्याने ठरावीक कोणते ढग पाऊस देतील याची माहिती तेथील स्थानिक नक्कीच देऊ  शकतात आणि या ज्ञानाचा संपूर्ण देशाला फायदा होऊ  शकतो. म्हणूनच सामान्य जनता आणि संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ, त्यांचे संशोधन यांच्यातील दरी कमी होण्याची गरज आहे.
शेतकरी हेल्पलाइन किंवा मेसेज सुविधा वगळल्यास तसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच आहे आणि म्हणूनच समाजातील युवक किंवा विविध समाजसेवी संस्था यांनी पुढे येऊन संशोधन संस्था आणि सामान्य शेतकरी यांच्यातील दुवा बनण्याची गरज आहे. संशोधन संस्थांमधील ज्ञान आणि सामान्य शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभवांचा साठा यातील दुवा बनण्याचे काम कोणी करू शकले तर ते खूप मोठे योगदान ठरेल.

* पावसाची अनियमितता किंवा पाऊस न पडणे यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसासारखे प्रकल्प उपयोगी ठरू शकतील का? या प्रकल्पाअंतर्गत नक्की काय केले जाते?
* कृत्रिम पाऊस या संकल्पनेला सोप्या शब्दात बसवायचे झाले तर, तयार असलेला बाष्पयुक्त ढग आपल्याला हव्या त्या प्रदेशावर आल्यावर त्यावर मीठसदृश पदार्थाची फवारणी करणे आणि हव्या त्या भागावर पाऊस पाडणे. पण व्याख्येइतके प्रत्यक्षात मात्र हे सोपे नाही. मुळात या पद्धतीने आपण निसर्गाच्या रचनेत हस्तक्षेप करणार असतो. आणि त्याही पुढे जाऊन या साठी लागणारा खर्च, योग्य ढग ओळखणे, फवारणीचे पदार्थ अशा घटकांच्या अभ्यासाची आणि ते यशस्वीपणे अमलात आणण्याची मोठी जबाबदारी असते. यंदाच्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने गरजेनुसार राज्याच्या विविध भागांत या सुविधा वापरण्याची तयारी दाखवली आहे.
* मान्सूनचे कमी-जास्त प्रमाण किंवा परतीच्या मान्सूनच्या तारखा लांबणे याचा संदर्भ जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिग) किंवा वातावरणातील बदलांशी (क्लायमेट चेंज) या संकल्पनांशी जोडला जात आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
* मुळातच जागतिक तापमान वाढ आणि क्लायमेट चेंज हे मुद्दे जागतिक वादाचा विषय आहे. दोन्ही विषयांवर ठोस असे संशोधन अजून झालेले नाही. त्यामुळे पावसाला मुख्यत: मान्सूनच्या कमी-जास्त होण्याला या संकल्पनेच्या परिणामात बांधायचे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. असे असले तरी येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जागतिक तापमान वाढ ही संकल्पना आपण खरी मानली तर मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढायला हवे. कारण वाढलेले तापमान कमी-अधिक दाबाची क्षेत्रे निर्माण करतील आणि पावसाचे प्रमाण वाढण्यास पूरक ठरतील. परंतु जागतिक तापमान वाढीच्या संकल्पनेचे समर्थक मात्र मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी होण्याशी जागतिक तापमान वाढीचा संबंध लावत आहेत. याविषयी ठोस भाष्य करण्याआधी  त्याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.

* गेल्या वर्षी उत्तर भारतात आलेला पूर, त्याआधीची ढगफुटी किंवा गेले एक-दोन वर्षे महाराष्ट्रातील काही भागांत होणारी गारपीट, अवकाळी पाऊस यांचा संदर्भ मग कशाशी लावता येईल? मान्सून वाऱ्यांशी त्याचा काही संबंध आहे का?
* मान्सून काळात पडलेल्या जास्त पावसामुळे जर पूर परिस्थिती निर्माण झाली असेल तरच आपण त्याचा थेट संदर्भ मान्सूनशी लावू शकतो. या मध्येही मानवनिर्मित घटक पुराचे परिणाम वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. महाराष्ट्रात झालेल्या गारपिटीबद्दल बोलायचे झाले तर गेली सलग दोन वर्षे बाष्पापासून गारा बनण्याची पातळी -फ्रिजिंग लेव्हल  ठरावीक मार्गापेक्षा थोडय़ा खालून गेल्यामुळे गारपिटीची स्थिती उद्भवली. स्थानिक पातळीवरील बदलांशी याचा संदर्भ लावणे उचित ठरणार नाही तसेच कोणत्याही वैज्ञानिक पुराव्याशिवाय या घटना जागतिक वातावरण बदल किंवा तापमान वाढ जोडणेही चुकीचे आहे.

* म्हणजे नवी मुंबईकरांनी काही महिन्यांपूर्वी अनुभवलेला गारांचा पाऊस हा स्थानिक पातळीवरील वाढलेली पाणीसाठय़ांची संख्या, वाढलेलं सिंचन आणि त्यातून होणारे जास्तीचे बाष्पीभवन यांचाशी संबंधित नाही तर..
* बाष्पापासून गारा बनण्याची पातळी -फ्रिजिंग लेव्हल हे अशा पावसाचे प्रमुख कारण आहे. स्थानिक पातळीवरील बदलांशी याचा संदर्भ लावणे योग्य नाही.

* वाचकांना शेवटी काय सांगाल?
* हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी असला तरी त्याचे प्रमाण अजून कमी न होवो आणि त्याचे अनियमितता हे रूप या वर्षी न पाहायला मिळो एवढीच सध्या आपण अपेक्षा करूया. दुष्काळाच्या रूपाने का होईना आपण मान्सूनला आणि निसर्गाला समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू या. आणि २०१५ च्या या वेगळ्या मान्सूनचे आनंदाने स्वागत करायला सज्ज होऊ या.

मान्सूनचे काही संदर्भ
भारताचा इतिहास बघितला तर, ऋग्वेदासारख्या पौराणिक ग्रंथांमध्येही याचे संदर्भ सापडतात. उत्तरेकडील नद्या, पर्वत, वाळवंटे यांचा थेट संदर्भ आर्यानी मान्सूनशी लावल्याचे दिसून येते. भारतीय पुराणशास्त्राप्रमाणेच चिनी, ग्रीक आणि बौद्ध ग्रंथांतही याविषयीचे लिखाण आढळते. महाकवी कालिदासाचे ‘मेघदूत’ हे महाकाव्य साहित्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन मान्सूनचे विज्ञान सांगते.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Directer of indian institute of tropical meteorology dr madhavan nair rajeevan inetrivew
First published on: 12-06-2015 at 01:10 IST