मोकळी मैदाने बिल्डरच्या घशात जाऊ नयेत यासाठी काढलेला तो मूक मोर्चा ‘फुप्फुसे आमच्या शरीराची, नाही कोणाच्या बापाची, मैदाने वाचवा, प्राणवायू साठवा, नको सिमेंटचा टॉवर, घ्या ऑक्सिजनचा शॉवर’ अशा घोषणांचे फलक घेऊन चालला होता. इतक्यात-

एका संध्याकाळी कपिलच्या कॉमेडीची धमाल आम्ही सर्व कुटुंबीय टी.व्ही.समोर बसून आरामात बघत होतो आणि तेवढय़ात दारावरची बेल वाजली. नेहमीप्रमाणे मीच चडफडत उठलो आणि दार उघडले. समोर आमच्या सोसायटीच्या बी विंगमधील धारपबाई आणि आमच्या विंगमधला सिंग दोघे जण दाराबाहेर उभे. नेहमीप्रमाणे धारपबाईंनी आपला चष्मा टाळूला, हेअर ब्यांडसारखा अडकवला होता आणि सिंग तोंडातला पानाचा रस कसाबसा ओठाआड धरून होता. धारप मॅडम आमच्या एरियातल्या एक समाजसेविका असल्याने त्या नेहमीच आपला चष्मा किवा गॉगल टाळूलाच अडकवतात. अर्थात त्यांना पाहून मी समजलोच की काही तरी सामाजिक काम त्या घेऊन आल्या असणार. मी दरवाजा उघडून दोघांनाही आत घेतले. टी.व्ही.त अडकलेली नजर तशीच ठेवून बायको म्हणाली, ‘आपल्याला काही नको आहे हां. टप्परवेअरचा सगळा सेट आता आहे माझ्याकडे.’ धारपबाई सामाजिक कार्यकर्तीचा टिपिकल आवाज काढून म्हणाल्या, ‘काय वहिनी मी काय टप्परवेअर विकायला आल्येय?’ त्या दोघांकडे बघत आमची बायको एकदम सावरून म्हणाली, ‘अरे धारप मॅडम तुम्ही होय, सॉरी हां. मला वाटलं, कालचीच टप्परवेअरवाली आली की काय?’ सिंग तोंडातील मुखरस सांभाळत म्हणाला, ‘क्या भाभीजी हमें तो आपने सेल्समेन बनाया, मै सेल्स मॅनेजर हूँ भाभीजी, सेल्समेन नहीं.’ त्या दोघांना सोफ्यावर जागा करून देण्यासाठी मुलं अगदी नाखुशीने का होईना कशीबशी उठली आणि त्या दोघांनी सोफ्यावर बैठक मारली. मी म्हटलं, ‘बोलिये जी.’ सिंगने माझी पहिलीच विकेट काढली, ‘हिंदी में क्यों बोलते हो, आप मराठी में बोलिये मै अच्छी तरह समज लूंगा.’ बायकोने दोघांना पाणी विचारलं. दोघं म्हणाले, ‘अहो आपल्याच सोसायटीतून तर आलो आम्ही, पाणीबिणी काही नको.’ मी म्हटलं ‘बोला काय काम काढलंत?’ मग धारप मॅडमनी माझा पर्यावरण या विषयावर, उत्तर ध्रुवावरील बर्फ का आणि कसे वितळत आहे, ग्लोबल वार्मिगचे परिणाम, विकसित राष्ट्रांची बदमाशी, विकसनशील देशापुढील पर्यावरणीय समस्या वगैरेवर बौद्धिक घेतले आणि असा काही स्वर लावला की त्याला जणू काही मीच जबाबदार आहे. तोंडातील रस सांभाळत, डोळे मोठे करून सिंगही माझ्याकडे एखाद्या अपराध्याकडे पोलीस अधिकाऱ्यांनी पाहावे तसा पाहात होता. मी नेहमीप्रमाणे सगळ्यालाच मान डोलवीत होतो. तोंडातला मुखरस सांभाळत, सिंग म्हणाला, ‘आप के बेडरूम के बाहर देखा कभी आप ने?’ बेडरूमचा त्यांनी विषय काढताच मी एकदम घाबरलोच. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागताच, तो मला माझ्याच बेडरूमकडे घेऊन गेला. मी आणखीनच घाबरलो. तो म्हणाला, ‘वो खिडकी खोलो.’ मी आज्ञाधारक मुलासारखा पुढे सरसावलो आणि खिडकी उघडली. बाहेर सगळा काळोख पसरला होता. त्या बाजूला एक मोठे मोकळे मैदान होते आणि त्याच्या मध्यभागी एक मोठा चिंचेचा डेरेदार वृक्ष होता आणि त्याच्या आजूबाजूला बऱ्याच झोपडय़ा होत्या. त्या झोपडय़ांतील बायका-पुरुष आजूबाजूच्या सोसायटय़ांमध्ये कामाला जात. पण आता मात्र रात्रीच्या काळोखात त्यांच्या घरातील दिव्यांच्या प्रकाशामुळे त्यांचे अस्तित्व तेवढे जाणवत होते. त्यांच्या आजूबाजूला काळोखात मोठमोठय़ा मालमोटारींच्या आकृत्या दिसत होत्या. दिवसा उजेडी गेल्या काही दिवसांपासून तेथे मोठय़ा बांधकामासाठी लागणारी सामग्री येताना दिसत होती. मला वाटले, सिंग आता उघडय़ा मिळालेल्या खिडकीतून खाली तोंडातला रस फेकणार, तेवढय़ात मी पुढे होऊन खिडकी बंद करून घेतली. त्याचा नाइलाज झाला. मला म्हणाला, ‘आईये.’ माझ्याच घरात तो मला फिरवत होता. जाता जाता त्याने माझ्या बेसिनमध्ये आपले तोंड मोकळे केले आणि आम्ही हॉलमध्ये गेलो. धारप मॅडम आमची वाटच पाहात होत्या. ‘पाहिलंत ना, आपल्या जवळचे एक चांगले मोकळे मैदान बिल्डरच्या घशात जाणार आहे. तेथे आता सात मजली सात टॉवर उभे राहणार आहेत. अहो, ही मोकळी मैदाने म्हणजे आपली फुप्फुसे आहेत. तीच जर अशी आपण आपल्या डोळ्यादेखत जाऊ दिली तर आपण आणि आपली पुढची पिढी श्वास तरी कुठून घेणार आहेत? आपल्या सोसायटीतील आणि आजूबाजूच्या मुलांना खेळायला मोकळे मैदानही नष्ट होणार आहे. तेव्हा आपल्या विभागातील इतर सोसायटय़ा आणि आपली सोसायटी मिळून आपण याचा विरोध करायचे ठरले आहे. गेल्या रविवारी आमची माझ्या अध्यक्षतेखाली सभाही झाली. आपण कायदेशीर पत्रव्यवहार तर करणारच आहोत, पण या रविवारी माझ्या नेतृत्वाखाली आपल्या सर्व रहिवाशांचा मूक मोर्चा आपण त्या बांधकाम जागेवर घेऊन जाणार आहोत आणि बिल्डरला तसे कडक शब्दातील निवेदन देणार आहोत.’ मी लगेच, पोलिसांची भीती उभी केली. सिंग म्हणाला, ‘वो हमपर छोडो, कानूनबिनून सब मैं देख लूंगा. उसकी चिंता आप ना करो. आप सिर्फ उस दिन सुबह दस बजे आपकी फॅमिली के साथ नीचे आ जावो. छोटे बच्चे भी उसमें शामिल होंगे.’ मला सगळं चित्र समोर दिसू लागलं, पण आमची मुलं मात्र एकदम आनंदात होती. त्यांनी तर चक्क घरातच जोरात हात वर करून ओरडायला सुरुवात केली. बोलता बोलता सिंगने पावती पुस्तक काढलं. मी उदार मनाने आमच्या घरातल्या सर्वाच्या फुप्फुसाला लागणाऱ्या प्राणवायूसाठी आगाऊ १०१ रुपये देऊन पावती घेतली. धारप मॅडम माझ्या बायकोला उद्देशून म्हणाल्या, ‘स्त्रियांनी आता अजिबात मागं राहायचे नाही.’ हे ऐकल्यावर माझी बायको एकदम दोन-चार पावले पुढे आली. मी आपला फालतू विनोद केला, ‘अगं इथे पुढे यायला सांगत नाहीत त्या, अन्यायाच्या विरुद्ध म्हणतायत त्या.’ सिंगने आणि धारपबाईंनी या माझ्या पी.जे.ला गुड जोक असं संयुक्त प्रशस्तिपत्र देऊन टाकलं.
दुसऱ्या दिवशी मी धारप मॅडमना फोन करून मोर्चाच्या ड्रेस कोडबद्दल विचारलं, पुरुषांना लेंगा झब्बा, स्त्रियांना सलवार कमीज आणि मुलांना अर्धी चड्डी आणि सदरा. पायात मात्र बूट चालणार नाहीत. सध्या चपला हव्यात. मोर्चाचा सात्त्विकपणा आणि साधेपणा आपल्या पोशाखातूनही दिसला पाहिजे. घोषणा कुठल्या विचारलं तर म्हणाल्या, ‘हा मूक मोर्चा आहे. जमल्यास तोंडाला पट्टी बांधा. घोषणा फक्त मी देईन. सगळ्यांच्या डोक्यावर गांधी टोपी मात्र कम्पल्सरी आहे.’ माझा पुढचा सगळा आठवडा आणि पैसे घरातल्यांचे सगळे मोर्चासाठीच्या कपडय़ांची जुळवाजुळव करण्यात खर्च झाले.

त्या म्हाताऱ्याने विचारलं, ‘पर्यावरण का काय म्हणतास ता सगळा ठीक असा, पण तुमच्यानं एव्हडो पर्यावरनाचो नाश झालो तेची शिक्षा तुमच्यापैकी कोण कोण घेतला ता सांगा? हाय कबूल?’

करता करता मोर्चाचा दिवस उजाडला. सोसायटीच्या गार्डनमध्ये हळूहळू लोक गोळा होऊ लागले होते. बरेच पांढऱ्या कपडय़ांतील लोक जमा झालेले पाहून काही लोकांना भलताच संशय येऊन गेला, पण आजूबाजूला तशी काही तयारी न दिसल्याने ते जरा काळजीत इकडेतिकडे पाहू लागताच सिंगने पुढे होऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. तेवढय़ात धारप मॅडमदेखील काळा चष्मा टाळूला फीट करीत खाली येऊन पोचल्या. खाली आल्या आल्या त्यांनी सर्वाची सॉरी हं, म्हणून माफीबिफी मागितली. आणि काल दुसऱ्या एका सामाजिक कार्यक्रमाला गेल्यामुळे घरी यायला कसा उशीर झाला वगैरे कोणीही न विचारताच वृतांत ऐकवला. सिंग आणि धारपबाई मेगाफोनवरून इतर रहिवाशांना खाली येण्याचे आवाहन करीत होते. जमेल तसे हलतडुलत एक एक करून रहिवाशी खाली जमू लागले. सिंगने एक वही फिरवायला सुरुवात केली आणि आपले नाव-पत्ता लिहायला आणि सही करायला सांगितली. काळेबाईंनी तेवढय़ात नाव मराठीत चालेल की इंग्लिशमध्ये ते विचारून घेतले. बोरकर म्हणाले, ‘आम्ही सही देतो, पण सहीचा आणि पोलिसांचा काही संबंध नाही ना? कारण मी क्लास वन ऑफिसर आहे, मला अशी सही करता येईल की नाही मला विचारावं लागेल.’ गुर्जरबंधूंनी मात्र ‘क्या क्या सुदी अने केटली सही जोये? बोलो,’ करून धडाधड सह्य केल्या. अर्धा एक तास मेगा फोनवरून विनवण्या केल्यावर बऱ्यापैकी जनता खाली गोळा झाली. सिंगने सर्वाना दोन दोनची लाइन करायला सांगितले, पण ते करतानासुद्धा प्रश्न होताच आपल्याबरोबर कोण असणार याची दखल आणि काळजी जो तो घेत होता. तरुण मुलामुलींच्या जोडय़ा जुळायला फार वेळ लागला नाही. पण प्रौढ मात्र गोंधळात पडलेले आणि विचारात पडलेले वाटत होते. पण थोडय़ाच वेळात चांगली लांबलचक लाइन तयार झाली. ती लांबलचक लाइन पाहून सिंग आणि धारपबाई एकदम सुखावल्या. सगळ्यांनी आपापल्या डोक्यावर टोप्या घाला म्हणून त्यांनी फर्मावले. बोरकरांनी तेवढय़ात पी.जे. मारलाच, ‘टोप्या आपल्याच डोक्यावर घाला रे, दुसऱ्याच्या डोक्यावर नका घालू.’ या पी.जे.वर त्यांची बायको पण हसली नाही. मग मात्र ते हिरमुसले आणि गुपचूप लायनीत उभे राहिले. काही उत्साही मंडळींनी हातात धरायला फलक तयार केले होते. त्यावरील घोषणा मात्र भलत्याच मजेशीर होत्या.
फुप्फुसे आमच्या शरीराची,
नाही कोणाच्या बापाची.
मैदाने वाचवा, प्राणवायू साठवा.
नको सिमेंटचा टॉवर,
घ्या ऑक्सिजनचा शॉवर.. लहान मुलांना घोषणा देण्यापासून आवरणं हे एक मोठं कामच मोठय़ांना होऊन बसलं. असा आमच्या रहिवाशांचा मोर्चा आमच्या सोसायटीच्या दरवाजातून रस्त्यावर आला. त्याच वेळी इतर सोसायटीतील रहिवासी आमच्या मोर्चात येऊन सामील होऊ लागले. मोर्चा रस्त्यावर येताच रस्त्यावर मुकाट बसलेली कुत्री एकदम उठून उभी राहिली आणि त्यांनी भुंकण्याचा पवित्रा घेतला, पण एकंदर मोर्चातील लोकांच्या अवताराकडे पाहून त्यांनाही भुंकण्याचे कष्ट घ्यावेसे वाटले नाहीत. परत ती वेटोळे करून गुपचूप झोपून गेली. हळू आवाजात काहींनी कुठल्या सोसायटीत कोणाच्या जागा विकायच्या, भाडय़ाने देण्याच्या आहेत याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. भाव काय आणि किती स्क्वेअर फूट वगैरे माहितीचे आदानप्रदान हळू आवाजात होऊ लागले. तेवढय़ात एक पोलीस गाडी समोरून येताना दिसताच ज्यांनी त्यांनी योग्य तो पवित्रा घेतला. काहींनी घोषणांचे पुठ्ठे आपले तोंड झाकण्यासाठी वापरले. बोरकरांना एकदम काहीतरी आठवले आणि ते एकदम लाइन सोडून थोडय़ा दुरून चालू लागले. सिंग छाती काढून दोन्ही हात फैलावून जणू काही तो सर्वाचे पोलिसांकडून रक्षण करण्यासाठी समर्थ आहे अशा आविर्भावात मोर्चाच्या एका बाजूला जाऊन उभा राहिला. पोटातून घाबरलेली मंडळी चेहऱ्यावर मात्र स्वातंत्र्यसैनिकाचा बिनधास्तपणा आणून पुढे जात होती. पोलिसांची गाडी जवळ येऊ न थांबताच सिंगने चेहऱ्यावर शक्य तेवढी अजिजी आणून, ‘कुछ नहीं, कुछ नहीं, पर्यावरण, पर्यावरण’ असे काही तरी गाडीतील पोलीस अधिकाऱ्याला सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने निर्विकार चेहऱ्याने सगळ्या मोर्चावरून एक दृष्टिक्षेप टाकला आणि गाडी पुढे निघून गेली. आमचा मोर्चा जेमतेम अर्धा किलोमीटर चालला आणि मागच्या मैदानात जाऊन पोचला. आता कोणाला लायनीत राहण्याची आवश्यकता नसल्याने सगळी घोळक्यात रूपांतरित झाली. धारपबाईंनी टाळूवरचा गॉगल डोळ्यांवर घेतला आणि त्या मेगा फोन घेऊन घोळक्यासमोर उभ्या राहिल्या. अर्थात सिंगदेखील त्यांच्याबरोबर होताच. तोपर्यंत मोठय़ा मुलांनी आपापले मोबाइल काढून वाचायला आणि टाइप करायला सुरुवात केली. काही सभेचे फोटो काढू लागले. लहान मुले अशी खेळायची संधी थोडीच सोडणार? त्यांनी धावाधावी, लपंडाव वगैरे खेळ सुरू केले. धारपबाईंनी मराठीतून आणि सिंगने हिंदीतून पर्यावरण नाश, त्याचे संवर्धन, ग्लोबल वॉर्मिग, त्यासंबधीची जागरूकता, झाडांची कत्तल, वगैरे गोष्टींवरती अर्धा एक तास चांगलं लांबलचक भाषण दिलं आणि जमलेल्या सर्वानी चला एकदाचं संपलं म्हणून जोरजोरात टाळ्या वाजवल्या.
वस्तीतील बरेच लोक एव्हाना जमा झाले होते, ते हे सर्व बरंचसं निर्विकारपणे आणि बरंचसं मनोरंजन म्हणून बघत उभे होते. आमची कामवालीपण त्यात होती, तिने माझ्या बायकोला तिथेच उद्या उशिरा येईन म्हणून निरोप देऊ न टाकला. एक अगदी फाटक्या अंगाचा म्हातारा इसम आपली खुरटी दाढी खाजवीत पुढे आला, आणि धारप बाईंना म्हणाला, ‘माका बी तुमका काय तरी सांगूचा हा. माका काय तुमच्यासारको बोलूक येवाचा नाय, पण माजो म्हनना एक येल आयकून घेशाल तर बरा होईत, मी काय तुमच्या सारको शिकलेलो बिकलेलो नसंय, पटला तर घेवा नाय तर सोडून द्या. धारप बाई म्हणाल्या, बोला ना बोला, लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचा सर्वाना सारखाच हक्क दिलेला आहे. बोला.’ सिंगकडचा मेगाफोन त्यांनी त्या म्हाताऱ्याकडे दिला. म्हातारा सिंगला म्हणाला भोन्गो तुमचे हातीत ठेवा आणि बोलूचा बोंडू माझे हातीत देवा. सिंगने मेगाफोनचा कर्णा आपल्या हातात धरला आणि माईक त्या म्हाताऱ्याकडे सोपवला.
म्हातारा बोलू लागला. ‘तुमी ज्या काय सांग्तास ना, त्या एकशे एक टक्के खरा असा. आमच्या कोकणात पण मेल्यांनी असोच धीन्गानो घात्लेलो असा. बघश्याल थय झाडा तोडूचे धंदे चालू असत.’ धारप बाई आणि सिंग त्या म्हाताऱ्याकडे अभिमानाने पाहू लागले. म्हातारा पुढे म्हणाला, ‘तुमका ठावूक हा, तुमच्या बिल्िंडगी आज हायत ना थय पूर्वी काय होता? लय मोटी आमराय व्हती, मदी यक मोटो पानियाचो तलाव होतो, आमच्या वस्तीतली प्वोरा थय दिवसभर उन्डारायचे, आंब्याच्या दिवसात लय म्हणजे लयच आंबे अमका खौक गावायचे, आमच्या बायका थयसून पानी आणीत व्हत्या, ऐन गरमीच्या मोसमात थय एकदम थंडगार वाटायचा. तुमचो बिल्डर आलो आणि त्यांनी सगळ्या झाडी झाडोऱ्याचो निसंतान करून टाकल्यान, मगे तुमच्या बिल्िंडग हाय उभ्या रावल्या. आता आमच्यासाठी बिल्िंडग उभी रवता तवा पर्यावरनाचो नाश होता म्हणून. पावसाळ्यात आमच्या घरात ह्ये एवढे पाणी असता, चिकलात्सून आमका दिवस काडूक लागतत, आमी कायम नरकात राहूचा आणि पर्यावरनाचो नाश करून तुमी उठवलेल्या बिल्डिंगी कडे नुसते बगून दिवस काडूचे, असा तुमचा म्हणणा हा काय? तर ता काय जमूचा नाय. पर्यावरण का काय म्हणतास ता सगळा ठीक असा, पण तुमच्या मुले एव्हडो पर्यावरनाचो नाश झालो तेची शिक्षा तुमच्यापैकी कोण कोण घेतला ता सांगा? हाय कबूल?’
तोपर्यंत त्या वस्तीतील तरुण मुलेही गोळा झाली होते, म्हाताऱ्याच्या शेवटच्या वाक्यावर त्या सर्वानी कडाडून टाळ्या वाजवल्या. धारप बाईंनी एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतला, आणि सिंगला म्हणाल्या, ‘आपला मुद्दा त्यांच्यापर्यंत पोचला ना? तेच महत्त्वाचं,’ सिंगनेही मान डोलावली. त्या वस्तीतील तरुण मुलांनाही बोलायचं होतं, पण धोरणी धारप बाईंनी सर्वाचे आभार मानून, राष्ट्रगीत वगैरे म्हणून मोर्चा आवरता घेतला. त्यांना दुसऱ्या महत्त्वाच्या मीटिंगला नेहमीप्रमाणे जायचे असल्याने, त्या लवकर निघून गेल्या. सिंग म्हणाला, ‘ये लोग को, कुच समजाने को नहीं जानेका, वो अनाडी पब्लिक को समज मे नही आने वाला.’
आम्हाला सर्वाना मनातून कळून चुकले होते, त्या अनाडी दिसणाऱ्या माणसांनी आम्हाला आमची जागा बरोबर दाखवून दिली होती. सर्व जण पांगले आणि आपापल्या फ्लॅटमध्ये हाश हुश करत मोर्चाच्या गमतीजमती सांगत टीव्हीवरचा कॉमेडी शो लावून बसले. मोर्चाला जाण्यापूर्वीच आज मोर्चाला जायचे असल्याने घरात जेवण करणे जमणार नाही याची कल्पना सर्व स्त्रीवर्गाने घरोघर दिलीच होती. त्यामुळे हॉटेलमध्ये दिलेल्या ऑर्डरची पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांसकट वाट बघू लागले.
माझी बायको हसत हसत म्हणाली, ‘बरी जिरली धारप बाईंची. फार पुढे पुढे करत असते. असा कोणी तरी तिला भेटायलाच हवा होता. आपला मूक मोर्चा त्या म्हाताऱ्याने एका झटक्यात मुकाट मोर्चा करून टाकला. अण्णा, माई आता खूपच थकलेत, आपल्या जवळ असले तर आपल्याला त्यांना नीट बघता तरी येईल. वन बेड कितीपर्यंत देतोय विचारलं पाहिजे नाही का हो?’
तिच्या नकळत, मी माझ्या डोक्याला हात लावला. टीव्हीवरचा कॉमेडी शो आता एकदम रंगात आला होता.