अखेर हिवाळ्याने एंट्री घेतली. कपाटात आत गेलेले स्वेटर्सही बाहेर आले. पण.. ऑफीस, कॉलेजला जाताना चांगल्या कपडय़ांवर तेच ते जुने-पुराणे स्वेटर्स घालायचे म्हणून चेहरा हिरमुसला. पण आता नॉट टू वरी.. स्टायलिश दिसण्यासाठी ट्रेण्ड आलाय ट्रेन्च कोटचा.. सो बी कुल..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळा हा आपल्याकडे ऋतू आहे की नाही, इथपासून वाद आहेत. पण सकाळी नेहमीप्रमाणे अलार्म वाजला तरी बाहेर अजून काळोख आहे, म्हणून एक एक्स्ट्राची डुलकी काढण्याची मुभा देणारा, रात्री कुडकुडत्या थंडीत आइस्क्रीम किंवा बर्फाचा गोळा खाण्याची मजा अनुभवयाला देणारा, आजी किंवा आईने विणलेल्या स्वेटरची आठवण करून देणारा हा गुलाबी ऋतू. अर्थात काही अरसिक लोक हिवाळ्यात ओठ, हात, पाय फुटतात, वातावरण ड्राय होतं, काम करायचा मूड लागतं नाही, अशी टुकार कारणं देत, यापासून पळ काढत असतात. अर्थात यात त्यांचा दोष नाही म्हणा. अशा गुलाबीसर थंडीत कोणतेही कारण काढून कामापासून अंग चोरत गुपचूप ब्लँकेटमध्ये गुडूप होण्याची इच्छा प्रत्येकाची असतेच.

पावसाळ्यात कुठेही बाहेर जायचे म्हटले की, रेनकोटमध्ये आपले स्टाइलिश कपडे लपवावे लागतात. तीच गत हिवाळ्यात स्वेटरमुळे होते. कितीही चांगला ड्रेस घातला तरी त्यावर तोच तीन-चार र्वष जुना स्वेटर घालावा लागतो आणि स्टाइलची ऐशीतैशी होते. मग यावर करायचं तरी काय? त्यात मुंबईसारख्या ठिकाणी काही लोकांचं दुखणं वेगळंच असतं. त्यांना जॅकेट, श्रगसारखे प्रकार घालायला प्रचंड आवडतं असतं, ओव्हर ड्रेसिंग म्हणजे त्यांचा जीव की प्राण. पण ‘मेली हिवाळ्यातली थंडी त्यांच्या गावाला कधी येतच नाही.’ यामुळे ऑफिसमधल्या पीसीवर स्विर्झलडमधल्या एखाद्या बर्फाच्छादित डोंगराचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवयाचा, तोच काय त्यांचा हिवाळा.. मग या दोन टोकांच्या लोकांनी नक्की करायचं तरी काय? याबद्दलच आज आपण बोलू या.

हिवाळा म्हणजे स्वेटर हे समीकरण आता जुनं झालंय. त्याची जागा जॅकेट्स, श्रग्स, शाल यांनी कधीच घेतली आहे. पण आता या कुटुंबामध्ये अजून एक मेंबरची भर पडली आहे. त्याचे नाव आहे ट्रेन्च कोट. कित्येक र्वष युरोपातील ‘बलबेरी’ ब्रॅण्डची मक्तेदारी असलेला हा ट्रेन्च कोट सध्या जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे तो जिथे जातोय तिथल्या संस्कृतीमध्ये तंतोतंत जुळवून घेतोय. युरोपात शांत, राजेशाही रुबाबातील हा ट्रेन्च कोट जेव्हा अमेरिकेत गेला, तेव्हा लगेच तिकडच्या अ‍ॅनिमल प्रिंट प्रेमी लोकांनी त्याला आपलेसे करून आपल्या रंगात रंगवून टाकले. जपानला जाऊन त्याने शिमर फॅब्रिक्सना आपलेसे केले. आता भारतात येऊन दाखल झालाय म्हटल्यावर, भारतीयांच्या नसानसात भिनलेला ड्रामा त्याच्यामध्ये सामावल्याशिवाय राहतोय थोडीच.. इथल्या डिझायनर्सनी त्याला कधीचेच आपल्या रंगात रंगवायला सुरुवात केली आहे.

आपल्याकडे ‘कोट’ म्हटल्यावरच कित्येकांच्या डोक्यावर आठय़ा येतात. कित्येकांना कोट कितीही व्यवस्थित असला, तरी उगाच कुठेतरी घट्ट वाटतो, स्लिव्ह तोकडय़ा आहेत, खाज येतेय असं काहीतरी वाटायला सुरुवात होते. पण ट्रेन्च कोटच्या नावात कोट असला तरी तो इतर कोट्सच्या प्रकारांपेक्षा अगदी वेगळा आहे. नेहमीच्या वुलन फॅब्रिक्ससोबतच तो डेनिम, सिल्क, जकार्ड अशा विविध फॅब्रिक्समध्ये पाहायला मिळतो. त्यातही तुम्हाला हव्या तितक्या व्हरायटी पाहायला मिळतात. अगदी प्लेन बोल्ड शेडच्या फॉर्मल ट्रेन्च कोटपासून ते स्टाइलिश पार्टीवेअर ट्रेन्च कोटपर्यंत याचे विविध प्रकार पाहायला मिळतात. लेन्थच्या बाबतीतसुद्धा याचे नखरे नसतात. अँकल लेन्थ ट्रेन्च कोटपासून ते वेस्ट लेन्थ ट्रेन्च कोटपर्यंत विविध साइझमध्ये ट्रेन्च कोट उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार, ऑकेजननुसार वेगवेगळे ट्रेन्च कोट निवडायची पूर्ण मुभा तुम्हाला असते.

मुळात ट्रेन्च कोट ड्रेसवर घालायचा असतो, असेही काही नाही. कित्येक ट्रेन्च कोट तुम्ही ड्रेस म्हणून पण वापरू शकता. ट्रेन्च कोटमधला पहिला प्रकार असतो, कॅज्युअल ट्रेन्च कोटचा. सिंगल बोल्ड कलरमधील हे ट्रेन्च कोट रोज ऑफिसला जाताना घालण्यास उत्तम असतात. कोणत्याही कॉन्ट्रास शेडच्या शर्ट किंवा टी-शर्टसोबत ते घालता येतात. बेज, ब्राऊन, नेव्ही, ऑलिव्ह ग्रीन अशा न्युट्रल शेड्सपासून ते थेट पिंक, ऑरेंज अशा ब्राइट शेड्समध्ये हे ट्रेन्च कोट पाहायला मिळतात. शक्यतो ट्रेन्च कोट फुल स्लिव्हचे असतात. पण तुम्ही स्लिव्हलेस ट्रेन्च कोटसोबत फुल स्लिव्ह शर्ट घालून वेगळे स्टाइल स्टेटमेंट तयार करू शकता. ऑलिव्ह ग्रीन, ब्राऊन ट्रेन्च कोटसोबत लेदर पँट्स मस्त सफारी लुक देतात. तर ब्राइट शेडच्या ट्रेन्च कोटसोबत न्युट्रल शेडची डेनिम आणि टी-शर्ट घालता येतो.

यातला दुसरा प्रकार आहे, शर्टलेस ट्रेन्च कोटचा. कित्येक ट्रेन्च कोट तुमच्या रोजच्या वापरातील डे-ड्रेसचे काम करतात. शर्ट स्टाइलचे हे ट्रेन्च कोट नुसतेच किंवा डेनिमसोबत घालता येतात. ट्रेन्च कोटमधील सर्वात महत्त्वाचा भाग असतो त्याचा बेल्ट. आणि या स्टाइलमध्ये त्याच्या बेल्टमुळे तुमच्या शरीराचे कव्‍‌र्ह अधोरेखित होतात.

पार्टीसाठी जायचे असल्यास प्रिंटेड ट्रेन्च कोटचा पर्याय सर्वात उत्तम. लेपर्ड प्रिंट्सपासून ते थेट फ्लोरल, ट्रेडिशनल प्रिंट्सपर्यंत विविध स्टाइलचे प्रिंट्स ट्रेन्च कोटमध्ये पाहायला मिळतात. हा ट्रेन्च कोटचा तिसरा प्रकार. या स्टाइलच्या ट्रेन्च कोटसोबत बेसिक शेडचे टी-शर्ट आणि डेनिम घालणे कधीही उत्तम. कारण या ट्रेन्च कोटमध्येच भरपूर ड्रामा असतो. त्यात तिसऱ्या कोणाची गरज नसते.

तीच बाब आहे याच्या चौथ्या प्रकाराची. म्हणजेच शिमर ट्रेन्च कोटची. सिक्वेन्स, शिमर फॅब्रिक वापरून या ट्रेन्च कोटमध्ये आधीच इतका ड्रामा भरला जातो, की त्यात अजून कुठल्याही प्रकारच्या अ‍ॅड ऑनची गरज नसते. त्यामुळे लेट देम सेलिब्रेट देअर सेल्फ ..

यातला शेवटचा आणि अस्सल देशी प्रकार म्हणजे ट्रॅडिशनल ट्रेन्च कोट. एक सच्चा भारतीय या नात्याने आपण ट्रेन्च कोटला आपल्या सणांपासून दूर अजिबात ठेवू शकत नाही. मग अशा वेळी त्यात थोडा सा बदलाव तो बनता है ना.. हे ट्रेडिशनल ट्रेन्च कोट तुमच्या नेहमीच्या सलवार कमीझ किंवा अनारकलीला हटके लुक देतात. त्यामुळे फेस्टिव्हल सिझनमध्येसुद्धा तुम्ही तुमच्या ट्रेन्च कोटपासून लांब राहात नाहीत. मग चला यंदाच्या गुलाबी थंडीत बी स्टाइलिश विथ ट्रेन्च कोट..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion
First published on: 05-12-2014 at 01:05 IST