पावसाळ्यात हॅण्डबॅग्जमध्ये पाणी जातं. त्यामुळे सगळं सामान भिजतं. पावसाळ्यामध्ये कोणत्या हॅण्डबॅग्ज वापरता येतील?
– रुचिरा राऊत, २२

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळा आला की, आनंदही तितकाच होतो, पण प्रवास करताना तारांबळ उडते खरी. त्यात रुचिरा तू म्हणतेस तसं बॅग्जमध्ये पाणी जाऊन सगळं सामान खराब होणं ही एक समस्या आहेच. कित्येक जणी यावर उपाय म्हणून सामान प्लॅस्टिकच्या पिशवीत भरतात आणि मग बॅगेत टाकतात, पण या पिशव्या उघडतानासुद्धा पाणी सामानात जातंच. सर्वप्रथम तुझ्या नेहमीच्या लेदर, रेक्झिनच्या बॅग्ज पावसाळ्यात वापरण्यास योग्य नसतात हे लक्षात घे. कारण या बॅग्जना बुरशी येते किंवा पावसात भिजल्यावर त्याला एका प्रकारची दरुगधी येते. त्यामुळे महागडी लेदर बॅग पावसाळ्यात काढूच नकोस. (अर्थात ती कपाटात नीट ठेवावी लागते, नाही तर तिथेही दमटपणाने त्यावर बुरशी येते.) त्याऐवजी सध्या बाजारात मस्त प्लॅस्टिकच्या बॅग्ज आल्या आहेत. त्या नक्कीच वापरू शकतेस. विशेष म्हणजे या पारदर्शी आणि फ्लोरोसंट रंगाच्या असतात. त्यामुळे तुझ्या स्टाइलमध्ये भरच घालतील. याशिवाय ग्लॉसी रेक्झिनच्या बॅग्ज तुला वापरता येतील. पावसाळ्यात बॅगमध्ये शक्यतो कमीत कमी सामानच घेणं योग्य. त्यातही वॉटरप्रूफ आणि भिजणारं सामान वेगवेगळं करून ठेव. प्लॅस्टिकच्या पिशवीपेक्षा झिप लॉक बॅग्जमध्ये सामान ठेवल्यास ते व्यवस्थित राहीलही आणि दिसायलाही चांगलं दिसेल.

मला ऑफिसच्या फॉर्मल्सवर आणि एरवी कॅझुअल्सवरपण वापरता येईल असे वॉलेट घ्यायचे आहे, पण नेहमीचे काळे वॉलेट नको आहे. त्याला काही पर्याय आहेत का?
– सुमित पवार, २५

वॉलेट मुलांसाठी महत्त्वाचं असतं. केवळ फॅशन अ‍ॅक्सेसरी म्हणून नाही तर त्याचा प्रत्यक्षात उपयोगही होतो. त्यामुळे वॉलेट निवडताना रंग, स्टाइलपेक्षा त्यात पुरेसे कप्पे आहेत ना, आकार योग्य आहे ना, हे पाहिलं जातं. तसं वॉलेटमध्ये काळा रंग सर्वाधिक पसंत केला जातो, पण सुमित, तुला काळे वॉलेट नको असेल तर इतरही पर्याय बाजारात आहेत. सध्या लेदरसोबत रेक्झिनचे वॉलेट येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यात रंग आणि पॅटर्नचे पर्याय मिळू लागले आहेत. डार्क मेहंदी ग्रीन रंगाचे वॉलेट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. सोबत ब्राऊन रंग वॉलेटसाठी नेहमीच पसंत केला जातो. बेज रंगही वॉलेटमध्ये पाहायला मिळतो. तुला ऑफिसमध्ये हे वॉलेट वापरायचे आहेत. त्यामुळे फंकी वॉलेट निवडू नकोस, पण सेल्फ कलरमध्ये चेक्स केलेले वॉलेट किंवा दोन कलरचे वॉलेट तुला ऑफिसमध्ये वापरता येईल. फक्त ते जास्त गॉडी नसतील याची काळजी घे. स्टड्स असलेले वॉलेट शक्यतो घेणे टाळ. ते वापरायलाही सोयीचे नसतात. सध्या झिप किंवा बटन लॉक वॉलेट पाहायला मिळतात. तेही तुला वापरता येतील. विशेषत: पावसाळ्यात हे उपयोगी ठरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफिससाठी वॉलेट घेताना थोडे जास्त पैसे गुंतवून ब्रँडेड वॉलेट घेणं कधीही उत्तम.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

More Stories onफॅशनFashion
मराठीतील सर्व फॅशन पॅशन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion
First published on: 17-07-2015 at 01:10 IST