मी नुकतेच माझे शिक्षण पूर्ण केले असून आता जॉब शोधत आहे. इंटरव्हय़ूला जाताना फॉर्मल कपडे घालायचे असतात, इतकेच मला ठाऊक आहे; पण त्याशिवाय आपल्या पेहरावातील इतर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?
– सिद्धार्थ, वय २२, पुणे.

उत्तर : पहिला इंटरव्हय़ूू आणि पहिला जॉब हा प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्या दिवसासाठी आपण जय्यत तयारी करत असतो. पहिल्या इंटरव्हय़ूला जाताना आपण आपल्या दृष्टीने सगळे परफेक्ट असण्याकडे भर देण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. इंटरव्हय़ूला जाताना फॉर्मल कपडे घालणे जितके आवश्यक असते, तितकेच गरजेचे असते इतरही छोटय़ाछोटय़ा, पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे शूज पॉलिश असणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे घरातून निघतानाच तुमचे शूज साफ आहेत की नाही याची खात्री नक्की करा. हेअरस्टाइल नीटनेटकी असणेसुद्धा गरजेचे असते. यशिवाय नीट कापलेली नखे, योग्य बॅगेची निवडसुद्धा महत्त्वाची असते. सध्या आपल्या सर्वाकडे स्मार्टफोन्स असतात आणि कॉलेजमध्ये असताना त्यांना फॅन्सी कव्हर्स लावायला सर्वानाच आवडते; पण इंटरव्हय़ूला जाताना हे फॅन्सी कव्हर्स काढून त्याऐवजी सिंपल कव्हर लावायला विसरू नका किंवा कव्हर नाही लावले तरी चालू शकते. इंटरव्हय़ूला जाताना या छोटय़ाछोटय़ा गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. त्यावरून तुमच्या स्वभावातील व्यवस्थितपणा लक्षात येतो. त्यामुळे या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

कित्येकदा पार्टीमध्ये जाताना सिलेटोज किंवा हाय हिल्सचे शूज घालणे गरजेचे ठरते; पण माझ्या पायांचे तळवे मोठे असल्याने मला फार वेळ हाय हिल्स घालता येत नाही आणि कित्येकदा तर ते मला घालायला आवडतही नाहीत. मग अशा वेळी काय करावे? नेहमीच्या हिल्सना इतर कोणते पर्याय आहेत का?
– अपूर्वा, वय २६

उत्तर : पार्टीचे नाव काढले की हाय हिल्स घालणे बंधनकारक असते, असा काहीसा समज आपल्या मनामध्ये करून दिला गेलेला असतो. त्यामुळे पार्टीसाठी का होईनात, पण चांगले हिलचे शूज आपल्याकडे असलेच पाहिजेत, असे प्रत्येक मुलीला वाटत असते; पण खरे पाहिले तर अपूर्वा, असे काही नसते. पार्टी असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, सगळीकडे आपण काय वापरलं तर कम्फर्टेबल रीतीने वावरू शकतो याचा विचार प्रथम करायला हवा. बरेचदा पार्टीला जाताना तुम्हाला घर ते पार्टीचं ठिकाण असा बराच प्रवास करावा लागतो. अशा वेळी हिल्स घातलेले असतील, तर पाय दुखणे स्वाभाविक असते. त्यामुळे सध्या बाजारात ‘कन्व्हर्टेबल हिल्स’चे शूज पाहायला मिळतात. या शूजच्या हिल्सची रचना अशा प्रकारे केलेली असते, की ज्यामुळे हिल्स बाजूला काढल्यास शूजचे रूपांतर फ्लॅट्समध्ये होते. त्यामुळे प्रवासाच्या वेळेस फ्लॅट्स घालून पार्टीला पोहोचल्यावर हिल्स लावून घेऊ शकता; पण तुला हिल्स घालणे आवडतच नसेल तर बॅलरीनाजचा पर्याय कधीही उत्तम. सध्या क्रिस्टल किंवा ग्लिटर बॅलरीनाज बाजारामध्ये पाहायला मिळतात. ते तू नक्कीच वापरू शकतेस किंवा पार्टीसाठी अशा बॅलरीनावर स्वत: घरच्या घरी स्टड्स लावणेसुद्धा कठीण नसते. त्यामुळे प्लेन बॅलरीना आणून त्यावर तुझ्या पसंतीची नक्षी करून पर्सनल टचसुद्धा देऊ शकतेस. त्यामुळे हाय हिल्स घातलेच पाहिजेत असं नाही.
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत