कवी, कथा-पटकथा-संवादलेखक, अभिनेते आदी अनेक कलाप्रांतांत एकाच वेळी लीलया संचार केलेल्या ग. दि. माडगूळकर अर्थात ‘गदिमां’ची समग्र माहिती आता एका क्लिकवर ‘गदिमां’चे नातू सुमित्र यांनी अथक परिश्रमाने मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गदिमा’ हे अष्टपलू कलाकार होतेच, मात्र त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुपेडी होतं. त्यांच्या या विविध छटा चिमटीत पकडून ठेवणं शक्यच नाही, तरीही त्यांची जगावेगळी प्रतिभा व त्यांचा कलाविष्कार पुढील पिढय़ांना कळावा, या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मी काही तरी भरीव करायचं ठरवलं. ते वर्ष होतं १९९८, तेव्हा माझं इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीयिरग नुकतंच पूर्ण झालं होतं. त्या वेळी आजच्यासारखा सोशल मीडिया तर नव्हताच, मात्र मराठीमध्ये वेबसाइटही एक-दोनच होत्या. त्यातच मी ‘गदिमाडॉटकॉम’ ही साइट सुरू केली. मात्र तेव्हा इंटरनेट सुविधेचा फार विस्तार झाला नसल्याने मी या साइटवरील सर्व तपशिलाचा समावेश असलेली एक सीडी काढली होती, तिला चांगला प्रतिसाद लाभला.
या साइटचं रूपडं पालटलं ते ‘गीतरामायणा’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने. यंदा एप्रिलमध्ये या वर्षांला सुरुवात झाली, त्या वेळी या साइटवर मी ‘गीतरामायणा’चं एक विशेष पेज फेसबुकवर सुरू केलं, त्याला एवढे व्हिजिटर्स लाभले व अजूनही लाभतायत की, आम्ही सारे थक्क झालो. त्यातून गदिमा साइट अपडेट करण्याची कल्पना सुचली. या कामी मला पत्नी प्राजक्ताचीही मोलाची सोबत होती. हे काम करताना आम्हाला ‘गदिमां’च्या प्रतिभेचा आवाका नव्याने जाणवला. या प्रतिभेला न्याय देण्यासाठी आम्हाला सुरुवातीला दोन-चार तास आणि शेवटीशेवटी तर रोज पंधरा-पंधरा तास काम करावं लागलं, त्यातून ही समग्र साइट आकाराला आली.
या साइटमध्ये काय-काय आहे, याची उत्सुकता एव्हाना ‘गदिमां’च्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली असेल. तर रसिकहो, यामध्ये तुम्ही गदिमांची तब्बल सातशे चित्रपटगीते ऐकू शकता, सोबत ही गीते वाचण्याचीही सुविधा आहे. आपल्यापकी अनेक जण शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात गेले असतील, तर तेथे जी काकडआरती होते, ती ‘गदिमां’च्या लेखणीतून उतरली आहे. या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं, हे आम्हालाही यानिमित्ताने समजलं. या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. ही आरतीही या साइटवर आहे. गदिमांनी स्वातंत्र्यलढय़ातही भाग घेतला होता, त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं, ते टोपणनावाने म्हणजे ‘शाहीर बोऱ्या भगवान’ या नावाने केलं आहे, ही माहितीही जिज्ञासूंना यात मिळेल. ‘फडके-माडगूळकर’ जोडीचं ‘गीतरामायण’ किती लोकप्रिय झालं हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, मात्र या ‘गीतरामायणा’ची दोन व्हर्जन्स यामध्ये आहेत. पहिलं म्हणजे, आकाशवाणीवरून प्रसारित झालेली विविध गायकांच्या आवाजातील गीते व दुसऱ्या व्हर्जनमध्ये सर्व म्हणजे ५६ गीते बाबूजींच्या आवाजात ऐकायला मिळतात.
‘गीतरामायणा’इतकंच तोलामोलाचं काम गदिमांनी ‘गीतगोपाल’च्या वेळी केलं. श्रीकृष्णचरित्रावर आधारित हे ‘गीतगोपाल’ दुर्दैवाने गाजलं नाही, मात्र ही गीतेही इथे आहेत. गंमत म्हणजे सी. रामचंद्र, यशवंत देव आणि श्याम जोशी अशा तीन संगीतकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं स्वरबद्ध केलेलं ‘गीतगोपाल’ येथे ऐकायला मिळतं. गदिमांनी पेशवाईवरही ‘गंगाकाठी’ या नावाने एक काव्यकथा लिहिली होती, त्याचं वाचनही यात उपलब्ध आहे. अथर्वशीर्षांचं मराठी रूपांतर ही कल्पनाच वाटेल, मात्र गदिमांनी तेही केलं आहे आणि हे मराठी अथर्वशीर्ष इथे ऐकता येतं.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G d madgulkar
First published on: 25-07-2014 at 01:09 IST