गणपती चौक, बुधवार पेठ, पुणे
स्थापना : १८८७ उत्सवी वर्ष : शतकोत्तरी अठ्ठाविसावे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुजी तालीम ही पुण्यातील त्या काळची सर्वात मोठी तालीम. पुण्यासह सर्वत्र व्यापक स्वरूपात सार्वजनिक उत्सव जरी १८९३ पासून साजरा होऊ लागला तरी गुरुजी तालमीत १८८७ पासूनच गणेशोत्सव साजरा केला जात असे. म्हणजे थोडक्यात असे म्हणता येईल की लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये गणेशोत्सवाला सुरूवात केली असली तरी त्यांच्याही आधी पाच वर्षे गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरूवात झाली होती. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम वल्लद लालाभाई व रुस्तुमभाई (नालबंद बंधू) या तालमीच्या गुरुवर्यानी या तालमीची स्थापना केली. तेच या गणेशोत्सवाचे व्यवस्थापकदेखील होते. सुरुवातीस तालमीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होत असे, पण कालांतराने लक्ष्मी रोड मोठा झाल्यावर तालमीतल्या मंदिरात मांडव टाकून उत्सव साजरा होऊ लागला. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पूर्वी गुरुजी तालमीचा मेळा होता. आता तालमीच्या जागेवर इमारत उभी असून पूर्वीची तालीम अस्तित्वात नाही.
पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला मानाचे तिसरे स्थान आहे. पुण्याचा राजा म्हणून हा गणपतीची महती आहे. आठ किलो सोने आणि दोन किलो चांदीने अलंकृत अशा या गणेश मूर्तीची पारंपरिक पद्धतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडत पूजा होते. पहिल्या दोन मानाच्या गणपतीनंतर रथातून मिरवणूक नेण्याचा मान या गणपतीला असतो. दरवर्षी गणपतीसमोर मंत्रजागर, गणेशयाग असे धार्मिक विधी होतात.
गुरुजी तालीम मंडळाने शताब्दी महोत्सव साजरा केल्यानंतर प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वर्गणी बंद करण्याचा निर्णय घेतला असून सर्व कार्यकर्ते व मित्रमंडळींच्या आर्थिक सहभागातून उत्सव साजरा होतो.
गणेशोत्सवाव्यतिरिक्त दुष्काळ व पूरग्रस्तांना व बेघर लोकांना आर्थिक मदत, खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन, गरजू रुग्णांना मदत असे उपक्रम नियमितपणे राबविले जातात. गरज भासल्यास अनेक वेळा कार्यकर्त्यांतर्फे तातडीने रक्तदान केले जाते.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh vishesh
First published on: 05-09-2014 at 01:46 IST