शालूकर बोळ, पुणे
स्थापना : १८९२ उत्सवी वर्ष : शतकोत्तरी तेविसावे

भाऊसाहेब रंगारी यांच्या गणेशोत्सवाने पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला. तोवर घराघरात साजरा होत असणारा हा उत्सव भाऊसाहेबांनी १८९२ मध्ये सर्वप्रथम सार्वजनिक स्वरूपात स्थापन केला. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे तथा भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते. शनिवारवाडय़ाच्या मागे त्यांचे निवासस्थान आणि धर्मादाय दवाखाना होता. वैद्यकीय व्यवसायात असले तरी स्वातंत्र्यसैनिकांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. १८९२ साली भाऊंनी आपला गणपती सार्वजनिक मांडवात आणला. ही घटना पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक इतिहास घडविणारी होती. त्याचाच परिणाम म्हणून १८९३ साली आणखीन मंडळांची स्थापना होऊन सार्वजनिक गणेशोत्सवाला जोर आला. तर पुढच्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी, विंचुरकर वाडय़ात गणपतीची स्थापना करून उत्सवाच्या सार्वजनिकतेवर मोहोर उठवली. तसेच लोकमान्यांनी या गणपतीस मिरवणुकीत मानाचे तिसरे स्थान १९९४ मध्ये दिले होते.
सुरुवातीस भाऊसाहेबांचा गणपती हा इचलकरंजीकर यांच्या वाडय़ातील तबेल्यात बसविण्यात येत असे. १९०५ मध्ये भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी काशिनाथ ठकुजी जाधव यांनी या ट्रस्टची धुरा सांभाळली. लोकमान्यांसहित बिपिनचंद्र पाल, चाफेकर बंधू, दादासाहेब खापर्डे, शि. म. परांजपे, पं. मदनमोहन मालवीय, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, वीर सावरकर, प्र. के. अत्रे, जयंतराव टिळक, आबासाहेब मुजुमदार अशा अनेक थोरामोठय़ांनी येथील व्याख्याने दिली आहेत.
काशिनाथ जाधवांनतर परशुराम निकम आणि प्रभाकर नीळकंठ शेलार यांनी उत्सवाची धुरा सांभाळली. त्यांच्याच काळात देणगी अथवा वर्गणी जमा न करण्याचा निर्णय घेतला गेला आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून उत्सव साजरा केला जात आहे. आज १२२ वर्षांनंतरदेखील भाऊसाहेब रंगारी यांनी कागदाच्या लगद्यापासून १८९२ साली स्वत: तयार केलेल्या मूर्तीची स्थापना उत्सवात केली जाते. तर मिरवणुकीतील रथ हादेखील १८९२ साली वापरलेला मूळ रथ आहे.
मिलिंद ऊर्फ बाबा डफळ यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची नवी पिढी म्हणून कार्यरत आहे. गरीब मुलांना शालेय साहित्य मदत, एमपीएससी, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, आरोग्य शिबीर, दर महिन्याच्या नऊ तारखेला आयुर्वेद उपचार शिबीर असे अनेक सामाजिक उपक्रम मंडळाकडून नियमितपणे राबविण्यात येतात. गणेश जन्म उत्सव साजरा केला जातो.
विशेष म्हणजे आजच्या काळातील इतरांच्या दणदणाटी आणि झगमगत्या उत्सवाच्या तुलनेने भाऊ रंगारी गणेशोत्सव धार्मिक व पारंपरिक पद्धतीने करण्यात येतो.
१८९२ च्या पहिल्या मिरवणुकीचे दुर्मिळ छायाचित्र