गिरगाव
स्थापना : १९६५ उत्सवी वर्ष : सुवर्ण महोत्सवी

सगळ्यांनी एकत्र यावं, भेटावं, विचारांची देवाणघेवाण करावी, एकीने राहावं हे लोकमान्य टिळकांचं आवाहन पाळणारं मंडळ म्हणजे गिरगावातील श्री गणेशोत्सव मंडळ. मंडळाचं हे यंदाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. १९६५ साली दिलीप वालावलकर यांनी स्थापन केलेल्या या मंडळात यंदा इको फ्रेंडली देखावा करण्यात आला आहे. दरवर्षी सामाजिक, साहित्यिक, पौराणिक, ऐतिहासिक असे वेगवेगळे विषय हाताळले जातात. यंदाचं वर्ष खास असल्याने इको फ्रेंडली सजावट करून पर्यावरणविषयक देखावा करण्यात आला आहे. या देखाव्यात अतिशय कोरीव काम केलं आहे.
मंडळाला मिळालेल्या निधीमधून दरवर्षी वेगवेगळ्या आश्रमांना मदत केली जाते. गणेशोत्सवात लहान मुलांसाठी नृत्य, चित्रकला, स्मरणशक्ती स्पर्धा असतात. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांनी पुढे प्रगती करावी याचसाठी या स्पर्धाचं आयोजन केलं जातं. अशा स्पर्धामधून मुलांचा आत्मविश्वासही वाढावा हाही त्यामागचा एक हेतू आहे. स्पर्धात्मक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. गणेशोत्सवात दररोज भजनाचा कार्यक्रम असतो. तसंच एक दिवस स्नेहभोजनही असतं. यानिमित्ताने सगळ्यांनी एकत्र यावं, सण साजरा करावा, एकमेकांबद्दलचं प्रेम वाढावं हा त्यामागचा उद्देश. या वर्षी वाद्यवंृदाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसंच सहस्रावर्तनही केलं जाणार आहे.
या सगळ्या कार्यक्रमांसाठी मोठी मदत असते ती तरुण मंडळींकडून. आपापली कामं सांभाळून ही तरुणाई वेगवेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात. या मंडळात जादूच्या प्रयोगांचाही कार्यक्रम केला जातो. केवळ गणेशोत्सवच नाही तर दहीहंडी, होळी, हनुमान जयंती असे काही उत्सव हे मंडळ उत्साहात साजरे करतात. हे मंडळ साध्याच पण नेमकेपणाने गणेशोत्सव साजरा करतात.