ऐरोली
स्थापना : १९९० उत्सवी वर्ष : रौप्य महोत्सवी

ऐरोलीच्या सेक्टर ४ मधील ऐरोलीचा राजा सावर्जनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
दरवर्षी आकर्षक देखावा आणि सजावट यासाठी हे मंडळ समस्त ऐरोलीकरांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू ठरतं. वेगवेगळे विषय हाती घेऊन त्यात कल्पकतेने सजावट केली जाते. म्हणूनच या मंडळाला सजावटीसाठी आत्तापर्यंत पुष्कळ पुरस्कार मिळाले आहेत. सजावटकार प्रवीण नार्वेकर यांनी सातत्याने मंडळाला अनेक बक्षिसांचा मानकरी ठरवलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत सामाजिक प्रश्न, समस्या, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर केले आहेत. सजावट आणि सादरीकरणामुळे एका स्पध्रेचा फिरता चषक गेली पाच वष्रे याच मंडळाकडे अबाधित आहे.
मंडळाचे कार्यकत्रे महेश गावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले आहे. तसंच विभागातील मुलांच्या कला, क्रीडा, शैक्षणिक गुणांना चालना देण्याची तसंच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. यंदाही अनेक सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बुद्धिबळ, कॅरम अशा क्रीडा स्पर्धा तर लहान मुलांसाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचबरोबर वृक्षारोपण, एड्सविषयक पथ्यनाट्य, आरोग्य चिकित्सा शिबीर असे सामाजिक उपक्रमही राबवले आहेत.
मंडळाने श्रीगणेश मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर पूर्णत्वास नेले आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक भान ठेवत आणि परंपरा जोपासत हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करतं.