पुणे आकाशवाणीवरून १९५५च्या रामनवमीला म्हणजे १ एप्रिल या दिवशी गीतरामायणाच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली. बाबूजी आणि गदिमा यांनी त्यापूर्वीही अनेक उत्तमोत्तम चित्रपटगीते दिली होती, मात्र गीतरामायणामुळे त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख ठळकपणे अधोरेखित झाली. या कथेत किती वैविध्य आहे, किती व्यक्तिरेखा आहेत, मात्र या दोघांनी संपूर्ण रामकथा गीत-संगीताच्या माध्यमातून किती उत्कटपणे सादर केली आहे, हे पाहिलं की थक्क व्हायला होतं. मुळात गदिमा हे केवळ कवी वा गीतकार नव्हते, तर ते कथा-पटकथाकारही होते, त्यामुळे त्यांनी ५६ गीतांमधून श्रीरामाच्या जीवनाचा पटच उभा केला आहे, त्यातील प्रत्येक गीतात नाटय़ आहे, भावना आहे.. आणि बाबूजींनी या गीतांना अतिशय विचारपूर्वक चाली दिल्या आहेत. गीतातील आशय, प्रसंग ओळखून त्याला साजेसा राग त्यांनी निवडला आहे. माझ्यातील संगीतकाराला ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते. वातावरणनिर्मिती करण्यासाठी शब्दांना न्याय देणारे सूर कसे निवडावेत, याचा वस्तुपाठ त्यांनी गीतरामायणात घालून दिला आहे. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्यांनीच नव्हे तर संगीतकारांनीही यातून खूप शिकण्यासारखं आहे. कोणत्या व्यक्तिरेखेला कोणाचा आवाज वापरायचा याकडेही त्यांनी लक्ष दिलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शूर्पणखेच्या तोंडी असलेल्या ‘सूड घे त्याचा लंकापती’ या गीतासाठी त्यांनी योगिनी जोगळेकर यांना पाचारण केलं आणि ‘सुडाने पेटलेली शूर्पणखा त्वेषात कशी गाईल, तसं गा’, असं त्यांना सांगितलं. जोगळेकरबाईंनी ते गीत एवढय़ा प्रभावीपणे गायलं की बाबूजींनी त्यांचं मुक्तकंठाने कौतुक केलं.
गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे सूर यात एकमेकांना पूरक ठरले आहेत, जणू हातात हात घालून ते पुढे जातायेत. यामुळेच या कलाकृतीमध्ये काव्य अथवा संगीत परस्परांवर कुरघोडी करताना दिसत नाही. या निमित्ताने या दोन महान कलाकारांच्या समर्पित वृत्तीचीही साक्ष पटते. अतिशय धावपळीच्या वेळापत्रकातून गदिमा गीत लिहीत असत आणि बाबूजींनी तर पुण्यात भाडय़ाने घरच घेतलं होतं. ध्वनिमुद्रणाच्या आदल्या किंवा त्याआधीच्या दिवशी ते तेथे जात असत आणि ध्वनिमुद्रण करूनच मुंबईत परतत असत. प्रभाकर जोग हे बाबूजींचे साहाय्यक, ते पुण्यात राहत असल्याने गदिमांकडून नवं गीत आणण्यासाठी बाबूजी त्यांना पाठवत असत. जोगांना येताना पाहिलं की गदिमा गमतीने म्हणत असत, ‘बघा, रामाचा दूत आला.’ अशा खेळीमेळीच्या वातावरणात ही कलाकृती घडत गेली. ही कल्पना ज्यांनी मांडली त्या सीताकांत लाड यांचंच नाही तर पुणे आकाशवाणीच्या सर्वच तंत्रज्ञांचे या निर्मितीसाठी मनापासून सहकार्य लाभले. अगदी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर उत्तररात्रीही यातील काही गीतांचे ध्वनिमुद्रण झालं आहे. वर्षभर दर आठवडय़ाला सातत्याने कोणत्याही विघ्नाशिवाय वा आपत्तीशिवाय एक गीत ध्वनिमुद्रित होणे, (तेही एकाच कवीने व एकाच संगीतकाराने) त्याला श्रोत्यांचं अलोट प्रेम लाभणे आणि एवढय़ा वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता टिकून राहणे हे सर्व श्रीरामाच्या कृपेमुळेच शक्य झाले, अशी बाबूजींची भावना होती, मलाही तसंच वाटतं. गीतरामायणाच्या लोकप्रियतेनंतर काही जण बाबूजींकडे निरनिराळ्या कल्पना घेऊन आले होते व गीतरामायणासारखं काहीतरी करा, असा आग्रहही त्यांनी केला. मात्र बाबूजींनी त्या सर्वाना ठामपणे नकार दिला. ‘गीतरामायण माझ्याकडून करवून घेतलं गेलं. अशी कलाकृती एकदाच होते’ अशी भावना बाबूजींनी व्यक्त केली.
गीतरामायणाचे जाहीर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तर त्याच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने उंचावलेलाच राहिला. अनेक थोरामोठय़ांनी बाबूजी व गदिमांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. मात्र स्वा. सावरकरांकडून झालेल्या कौतुकाने हे दोघे मोहरून गेले. पुण्यातील शिवाजी मंदिरात सावरकरांचा सत्कार सोहळा होता, या कार्यक्रमात गीतरामायणही सादर झाले होते. सावरकर अगदी समोर, पहिल्या रांगेत बसलेले. एरवी भावनाविवश न होणाऱ्या सावरकरांनी ‘पराधीन आहे जगती..’ या गीताच्या सातव्या अंतऱ्यातील ‘नको आंसू ढाळू आता, पूस लोचनांस, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा’ या पंक्ती ऐकून अश्रूंना मोकळी वाट करून दिली. हे गीत संपल्यावर ते उठले आणि बाबूजी व गदिमा दोघांना त्यांनी प्रेमभराने आलिंगन दिले. ‘तुम्ही दोघे फार महान कलाकार आहात’ अशा शब्दांत त्यांनी या दोघांचं कौतुक केलं. बाबूजींनी सावरकरांवरील चित्रपटाच्या निधी उभारणीसाठी गीतरामायणाचे असंख्य कार्यक्रम केले. देश-विदेशांत मिळून त्यांनी गीतरामायणाचे पंधराशेपेक्षा अधिक कार्यक्रम केले. या महाकाव्याच्या लोकप्रियतेने भाषेची बंधनेही ओलांडली. हिंदी, गुजराथी, तेलुगू, बंगाली, आसामी, कानडी अशा भाषांमधून या काव्याचा अनुवाद झाला. मूळ चाली मात्र त्याच ठेवण्यात आल्या. १९८०मध्ये पुण्यात तब्बल आठवडाभर गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव रंगला, त्यात या सर्व भाषांतील गीतेही सादर झाली.
ही कलाकृती पुढील पिढीपर्यंत जावी, असं बाबूजींना फार वाटत असे. त्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात रीतसर जाहिरात देऊन होतकरू गायकांना गीतरामायण शिकवण्याची तयारीही दर्शविली होती. दुर्दैवाने दोघा-चौघांचा अपवाद वगळला तर त्यास प्रतिसाद लाभला नाही. माझं भाग्य म्हणजे मला आता गीतरामायण सादर करायची संधी मिळत आहे. २००८ पासून मी नियमितपणे गीतरामायणाचे कार्यक्रम करत आहे. लहान असताना अनेक दौऱ्यांत मी बाबूजींना प्रत्यक्ष ऐकलं आहे, त्यांच्या गायनातील बारकावे ठाऊक असल्यानेच हे शिवधनुष्य उचलण्याचे धैर्य मी केलं आहे. ही गाणी गाण्यापूर्वी मला माझ्या आईकडूनही मोलाच्या सूचना मिळाल्या. त्यांची गाणी मी गातो तेव्हा हृदयाच्या एका कप्प्यात मला त्यांचं मूळ गाणं ऐकू येत असतं, त्या स्वरांचं बोट धरूनच मी पुढे जातोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geet ramayan
First published on: 28-03-2014 at 01:06 IST