साल १९५५. गीतरामायण पुणे केंद्रावरून प्रसारित व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती. त्या वेळी आम्ही नरके वाडय़ात म्हणजेच शिवाजी पेठेतल्या बावडेकर सरकारांच्या वाडय़ात राहत होतो. आमच्याच नाही तर शेजारी रेडिओ ही त्या काळी चैनीची मानली जाणारी वस्तू बऱ्याच घरात नव्हती. ज्यांच्या घरी ती होती तिथे आम्ही गीतरामायण ऐकायला जात असू. आम्ही आलो की त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तिरस्काराची भावना दिसायची. पण त्याला काहीच इलाज त्या वेळी तरी नव्हता. गीतरामायणातील सारी गीते आम्ही त्या वेळी खरंच अगदी निर्लज्ज होऊन ऐकली. आमच्या परिस्थितीची आम्हाला चीड यायची. राग यायचा; पण गीतरामायण ऐकणं हे त्याहून महत्त्वाचं असायचं.
गीतरामायणातले ते गीत ऐकून आम्ही बाहेर पडलो की आमचा सारा राग पार वितळून जायचा. आता आठवतो तो काळ. गीतरामायणाचे पुरुषोत्तम जोशी यांचे ते धीरगंभीर आवाजातलं प्रथम निवेदन, नंतर ते गीत ऐकताना कधी डोळे भरून यायचे, तर कधी मन व्यथित व्हायचं. आज आठवतं. ‘माझा राम जाताना काय म्हणाला रे?’ हा दशरथाचा प्रश्न आणि सुमंत त्याला ‘बोलले इतके मज श्रीराम’ या गीतातून सारे मनोगत दशरथाला सांगतो ते गीत ऐकताना आम्ही मुलंच नव्हे तर गीत ऐकणारी सारीच माणसे ओक्साबोक्शी रडत होती. गीत संपलं तशी सारेजण खाली मान घालून त्या घरातून दु:खी अंत:करणानं बाहेर पडलो.
माडगूळकरांचे शब्द, सुधीर फडके यांचे संगीत आणि त्यांनीच म्हटलेली गीते याची मोहिनी इतकी वर्षे उलटली तरी तिळमात्र कमी झालेली नाही. याच नरके वाडय़ात मागील बाजूला श्रीपतराव नरके यांची चाळ होती. त्या चाळीत आबा पाटणकर (गदिमांचे सासरे) राहत होते. या पाटणकर कुटुंबाशी आमचा परिचय झाला आणि त्यांच्या घरी दोन बँडचा मर्फीचा ट्रँझिस्टर आल्यावर गीतरामायण दुसऱ्यांदा तिथं ऐकलं. आमच्यापैकी कुणाच्याच घरी वीज नव्हती. म्हणून बॅटरीवर चालणारा ट्रँझिस्टर पाटणकरांनी घेतला होता, आणि त्यांचं घर आम्हा मुलांना खरोखरीच मुक्तद्वार होते. इथेच मला अण्णा माडगूळकर, पुलं, मंगल पिक्चर्सचे वामनराव कुलकर्णी आणि सुधीर फडके प्रथम भेटले. आता भेटले म्हणण्यापेक्षा त्यांना मी प्रथम पाहिलं हेच म्हणणं योग्य ठरेल. गीतरामायणातली गीते वहीमध्ये लिहून काढण्याची आम्हा मुलांची जणू स्पर्धाच चालायची. केसरीचा अंक घराघरात त्या वेळी फिरत राहायचा. आता लिहिताना ते दिवस आठवतात. वर्तमानपत्र घेण्याएवढीही आमची परिस्थिती नव्हती.
तरीही त्या गरिबीतही आम्ही आनंदी होतो. संध्याकाळी शाळेतून घरी आलो की दिवसाउजेडी अभ्यास करायचा आणि कार्डावर मिळणारं रॉकेल वाचवायचं असा आमचा दिनक्रम होता. नटसम्राट बालगंधर्वाच्या कन्या पद्माताई खेडेकर याच वाडय़ात राहायच्या. मा. दुर्गाराम त्यांचे पती. गंधर्व कंपनीत तेही नाटकांतून भूमिका करायचे. बालगंधर्व नाटक झालं की, दुसऱ्या दिवशी आपल्या कन्येला भेटायला यायचे. टांग्यातून यायचे. त्यांना प्रथम पाहिलं ते इथंच आणि त्यांच्याशी बोललो तेही याच वाडय़ात. नरके वाडा हा त्या वेळी सांस्कृतिक केंद्र होतं.
सुधीर फडके यांना आम्ही पाहिलं असलं तरी त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष गीतरामायण ऐकायचा योग आला तो मिरजेच्या साहित्य संमेलनात. प्रा. श्री. के. क्षीरसागर संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष होते वि. स. खांडेकर. मिरजेचे हे संमेलन तीन कारणांनी माझ्या स्मरणात आहे. पहिले कारण- स्वागताध्यक्ष म्हणून वि. स. खांडेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण, सुधीर फडके यांच्या तोंडून प्रथम गीतरामायण ऐकायला मिळाले हे दुसरे कारण. तिसरे कारण- हस्ताक्षर संग्रहातल्या निवडक हस्ताक्षरांचे पहिले प्रदर्शन मिरजेच्या साहित्य संमेलनात भरवले.
त्यानंतर हस्ताक्षरांच्या प्रदर्शनास सुधीर फडके यांनी दुसऱ्या दिवशी भेट दिल्याची आठवण पुसटशी स्मरते. पुढे गीतरामायणाचे कार्यक्रम ऐकण्याची संधी सहसा सोडली नाही. निपाणीच्या देवचंद कॉलेजच्या पटांगणात रात्री गीतरामायण ऐकले. गावात राहायची सोय नव्हती म्हणून आम्ही चार-पाचजण स्टेजवरच झोपलो आणि सकाळी उठून कोल्हापूरला परतलो.
काही कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते कोल्हापूरला आले त्या वेळी न चुकता गाठीभेटी झाल्या, तरी त्यांची एक भेट मात्र स्मरणात आहे ती कॉमर्स कॉलेजच्या हॉलमधील. बाबूजींचे गुरू पं. वामनराव पाध्ये गेल्यावर त्यांच्या श्रद्धांजलीची सभा आणि सुधीर फडके यांचे त्यानंतरचे गायन या दोन्ही घटना स्मरणात राहिल्या. मैफलीच्या आधी बाबूजींनी पं. वामनरावांच्या अनेक आठवणी सांगून त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त केले. ‘असा कसा देवाघरचा न्याय उफराटा’ हे गीत त्यांनी म्हटलं आणि पं. वामनराव पाध्ये यांचा मुलगा आणि प्रायव्हेट हायस्कूलमधील माझा वर्गमित्र सुरेश याला यानिमित्ताने गोळा झालेला निधी बाबूजींनी दिला, आणि कोल्हापूरकरांना त्यांनी या सभेत एक आश्वासन दिलं की, ‘त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला मी इथे येऊन पाध्ये बुवांचा आवडता ‘अंबिका’ राग म्हणेन, पण हे पुढे कधी घडले नाही. त्यांच्या तोंडून अंबिका राग ऐकायचा योग कधीच आला नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर चित्रपट काढण्यात ते गुंतले होते. त्यासाठी निधी गोळा करायचे काम सुरू होते. त्या वेळी ते कोल्हापूरला आले होते. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये त्यांनी एक बैठक घेतली. चित्रपटाची मूळ भूमिका सांगितली. निधीसाठी आवाहन केले. त्या वेळी त्यांनी केलेले भाषण हेही स्मरणात राहिले.
बाबूजी काही ना काही कारणाने भेटत राहिले. केशवराव भोसले नाटय़गृहात त्यांच्या कार्याचा गौरव सोहळा आयोजित केला होता. त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती क्षीण होत चालल्याचे जाणवत होते ते त्यांच्या बोलण्यातून. सत्काराला उत्तर त्यांनी गीतरामायणातले किंवा असेच एखादे गीत म्हणून द्यावे अशी अनेक रसिकांनी विनंती केली. त्या वेळी त्यांना ऐकूही कमी येत असावे. त्यांनी रसिकांकडून आलेली चिठ्ठी वाचली आणि म्हणाले, ‘माफ करा. मला माझा स्वरच आता सापडत नाही. परमेश्वराच्या कृपेने जर यात सुधारणा झाली ना, तर मी इथे तुमच्यापुढे निश्चित गाईन. पण आज मला क्षमा करा.’
बाबूजींचे ते उद्गार ऐकून असंख्य रसिकांच्या डोळय़ांत अश्रू जमा झाले. मला मात्र बाबूजींच्या आवाजातली ती गीतरामायणातली गीते, त्यांचे ते स्वर आठवत होते. ‘माता न तू वैरिणी’ आणि ‘सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे’. मला आज आठवण आली ती या ‘सेतू बांधा रे सागरी’मधील ‘भुभू:कारूनी पिटवा डंका’ ही त्यांनी पहिल्या दोन अक्षरांवर जोर देऊन म्हटलेली ओळ आणि आजचा त्यांचा स्वर- ‘माफ करा, आता माझा स्वर मला सापडत नाही’ याची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geet ramayan
First published on: 02-05-2014 at 01:27 IST