आज सकाळपासूनच पोट गुडगुडत होते. दोन वेळा जाऊन आलो. च्यामारी शाळेत लागली तर, तेव्हा काय आजच्यासारखी शाळेत सोय नसायची. शाळेत लागली तर या कल्पनेनेच परत एकदा जाऊन आलो. आई ओरडलीसुद्धा ‘‘अरे काय चालले तुझे, किती वेळा ते. मास्तरलाच बोलव इकडे शिकवायला. आवर आता, सात वाजलेत, शाळा भरेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कच्चे एरंडेल पिल्यासारखे तोंड करून दप्तर उचलले. तेवढय़ात आई म्हणाली ‘अरे चहा पोळी खाऊन जा.’ माझी आवडती चहा पोळी. पण आज खाण्याचे नाव काढताच परत जाऊन यायची इच्छा झाली. ‘अगं पोट दुखतेय’. ‘‘अरे चार वेळा गेला तरी अजून ठीक नाही का.’’ मला वाटले म्हणेल जाऊ नकोस आज शाळेत. कसले काय. उचलले दप्तर निघालो न खाताच. मागे एकदा विज्या बोलला होता की त्याला एकदा शाळेत अशीच जोरात लागली होती. त्याने उपाय सांगितला होता की, बेंबीला थुंका लावायचा म्हणजे बघ कळ जाते. वर्गात बसून चार वेळा शर्टच्या आत बोट घालून काय करत होता ते कळले नव्हते तेव्हा. विचारले तर बोलला कळ घालवतोय रे.

मधल्या सुट्टीत एक हात मागे एक हात पुढे ठेवून कोठे पळाला तेच कळाले नाही. नंतर एकदम हसऱ्या चेहऱ्याने बोलला की पुलाखाली गेलो होतो. थुंकी लावून चड्डीत व्हायची वेळ आली, पण जोरात पळालो म्हणून वाचलो.

आता शाळेत जाताना सहज म्हणून थुंकी बेंबीला लावली. आतापासून तयारीला लागा नंतर पंचाईत नको.

शाळेजवळ पोहचलो अन घंटा झाली. प्रार्थना झाली. रांगेत वर्गाकडे निघालो. शेजारून मनी चालली होती. मुलींच्या रांगेतून बघून हसली. तसे कळ बीळ विसरून गेलो. मागून रव्या ढोसत म्हणाला चल की लेका पटपट. मग शेजारच्या रांगेचा नाद सोडून निघालो.

पहिला तास रेडय़ाचा. घोडके सर डांबरासारखे काळे, लाल पांढरे डोळे करून अंगावर यायचे की पोरे जाम तंतरायची. नववीला आमच्या नशिबी हा वर्गशिक्षक. इतिहास, भुगोल घ्यायचे. शिकवणे म्हणजे धडे वाचून काढणे व मध्येच वर्गाबाहेर जाऊन तंबाखूचा बार लावून यायचे. एकदा का बार लावला की पोरे खूश. सगळ्यांना धडा वाचायला सांगायचे (मनातल्या मनात) व मस्तपैकी खुर्चीवर डोके करून ताणून द्यायचे. हळूच शेजारच्या बाकावर पाहिले तर मनी आपली लाल रिबीनशी चाळा करत होती व शेजारी छायाशी बोलत होती. छाया म्हणजे काळी आणि माझी कट्टर शत्रू. मला अजिबात आवडत नव्हती. एकदा तिने माझी चहाडी केली होती सरांकडे. सर, सर हा दुपारच्या सुट्टीत शाळेमागच्या चिंचेच्या झाडावरच चढला होता. रेडय़ाला काय निमित्तच मिळाले. ‘पडलास, तंगडय़ा मोडल्या तर’ म्हणून माझी कणिक तिंबली होती. तसे छायाने चहाडी करायचे कारण म्हणजे मी मनीला चिंचा दिल्या आणि हिला दिल्या नव्हत्या म्हणून खुन्नस काढली. मग मी पण जाम खुन्नस धरली. आपण जाम अजिबात बोलायचो नाही. या मनीला मात्र काही कळत नाही. वेडचाप. कशाला तिची मैत्री करायची. पण नाही. पाहिले सांगून एकदोनदा. येडचाप कुठची. म्हणे आम्ही एका बेंचवर बसतो. मला कधी कधी सायकलवरून घरी पण सोडते. मग मी का नको बोलू.

मध्येच लाल रिबीनचे माझ्याकडे लक्ष गेले. मी खुणेनेच सांगितले की धडा वाचना. (परीक्षेच्या वेळी मग मला वही मागतेस) तर झटकन हसून मान वळवली.

मध्येच रेडा बाहेर जावून तोंड मोकळे करून आला. ‘हं सांगा रे, दुसऱ्या महायुद्धाची कारणे’  अंकुश ऊठ सांग. अंकुश म्हणजे वर्गातील केसाचा कोंबडा काढून लास्ट बेंचवर बसणारा आमचा हिरो. वयाने दोन वर्ष मोठा. काहीच यायचे नाही. तो उठला. खुन्नस नजरेने सरांकडे बघायला लागला. का कोणास ठाऊक सर त्याला थोडे घाबरायचे बहुतेक. गप्प उभा म्हटल्यावर मला उठविले. मग आमची कॉलर ताठ. मनीकडे तिरक्या नजरेने बघत उत्तर दिले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काय मस्त भाव असायचे. अय्या काय हुशार आहे सगळे येते याला!

मस्त वाटायचे. सगळ्या कोंबडय़ामध्ये कोंबडा कसा ऐट काढून चालतो तसेच काहीतरी वाटायचे.

तेवढय़ात घंटा झाली. रेडा पळाला. अन् गचकन एवढा वेळ विसरून गेलेली कळ आली. पोटात गडगड व्हायला लागले. आज बेंचवर नेमका मी भिंतीच्या बाजूला नव्हतो. कशी काय लावू थुंकी बेंबीला. सकाळी लावलेली वाळली वाटते. म्हणून कळ आली. खूप लावायला पाहिजे होती. हिकडे तिकडे पाहिले तर सर्व कोंबडय़ा, कोंबडे आपापल्या नादात. शेजारचा गण्या पुस्तकातील हिटलरची मिशी वाढवत होता. गॉगलसुद्धा लावून झाला. सगळेच कसे खुशीत, आनंदात होते. कसलीच चिंता नाही. (माझ्यासारखी) एकाला पण कळ येत नाही का माझ्यासारखी. देवा देवा काय करू, कळ हळूहळू वाढायला लागली. मनी माझ्याकडे पाहात होती; पण ती कोण, माझ्याकडे का बघते, काहीच कळत नव्हते. लक्ष सगळे कळीवर होते. कळ कशी आवरू.

देवा देवा. वाचव रे मला. मोठे पणी मी तुला १ नारळ व एक रुपया (मग काय स्वस्ताई होती तेव्हा) वाहेन. लागलेस तर हार व फुलेसुद्धा. गपकन कळ बसली. एकदम वर्गातला गोंधळ कानावर पडला. मनी छान दिसू लागली. शेजारच्या पुस्तकातील हिटलर आता मस्त दिसत होता.

तेवढय़ात शिंदेबाई नाकावरचा चष्मा वर करीत वर्गात शिरल्या. चला आज पुढचा धडा घ्या. मी इंग्रजीचे पुस्तक काढले व समोर ठेवले.

अगं आई. पोटातून कळ परतून आली. गलीतले पुढे गेलेले कुत्रे गपकन मागे फिरावे व अंगावर यावे तशी कळ परतून आली. हळूच तोंडात बोट घालून दोन बटनांच्या मधून बेंबीला कसाबसा स्पर्श केला व जादूचा ताईत मिळाला समझून निर्धास्त झालो. पण हे काय, याचा काहीच परिणाम न होता कळ वाढतच होती. देवा, देवा मी काय पाप केले रे. समोरच्या पुस्तकाच्या जागी मला टमरेल दिसू लागले. मी कोण, कोठे आलो आहे, काय चालले, कसलेच भान उरले नाही. हळूच डावा पाय उजव्या पायावर टाकून गच्च बसलो.

देवा शंकरा, गणेशा, मारुतीराया, दत्ता, भवानी माते (अजून कोणते देव राहिलेत..) सोडवा हो, या संकटातून. मी मोठेपणी दोन नारळ, नाही नाही (कळ वाढली) १० नारळ व १० रुपये तुमच्या चरणी वाहेन. एवढे माझे संकट दूर करा. अगं आई गं, काय करू आता. मनी अशी काय बघतेस, येडचाप समोर बघ. शिंदेबाई फळ्यावर काहीतरी लिहीत होत्या. सर्वजण वहीत लिहून घेत होते. माझा पेन चालू होता. पण डोक्यावरती सगळे देव फेर धरून नाचत होते. नाही नाही, देव नाही. (संकट माझ्यावर आहे) मी त्यांच्यासमोर नाचत होतो. सगळ्या मुली बहिणीसारख्या (मनी सोडून) दिसू लागल्या. छाया तुला मी कधीच काळी म्हणणार नाही. तुला चिंचापण देईन. पक्या, रव्या, अभ्या तुम्ही किती चांगले मित्र आहात रे.

आई आई आता काय करू. मागे वळून दाराकडे पाहिले. बाईंचे लक्ष नाही. उठून पळत सुटावे. खड्डय़ात गेली ती शाळा, ती मनी, छाया, पक्या, रव्या. गणराया, बळकृष्णा, खंडोबा (पालीचा. आमचा खंडोबा पालीचा आहे.), देवींनो (सर्व देवी. एक एक नाव घ्यायला आता वेळ नाही.), हनुमाना (मी रोज भीमरूपी महारुद्रा न चुकता म्हणेन आता.) शंकरा, पार्वती माते, लक्ष्मी माते, वाचवा हो. कळ थांबवा ना. काहीतरी करा. मी २१ नारळ नाही १००० नारळ (जास्तच होतात.) नाही १०० नारळ व १०० रु. वाहीन. (सगळ्यात मिळून हो. नाहीतर नंतर प्रत्येकी तेवढे भागतात.) जाऊ दे, तेव्हाचे तेव्हा बघू. आता मात्र संकटातून सोडवा सर्व देवांनो.

सकाळी तीन वेळा गेलो, अजून एक वेळा गेलो असतो तर ही वेळ आली नसती.

आजपर्यंत केलेली सर्व पापे समोर दिसू लागली (संकटच तसे होते). कुत्र्यांना मारलेला दगड, शेपटीला दोरा बांधून डबा, पण एकदा कुत्र्याला पळवले होते. बेडकांना पावसाळ्यात मारलेले दगड, दादाची बाबांकडे चुगली करून त्याला बसविलेला मार, रव्याच्या दप्तरात ठेवलेली मेलेली पाल, दहावीमधल्या परशाच्या सायकलची सोडलेली हवा, अजून काय काय आठवू. देवा किती पापे केलीत मी. पण त्याची शिक्षा अशी नका देऊ हो. एवढी कळ थांबवा हो. यापुढे मी चांगला वागेन. कोणालाच त्रास देणार नाही. मी खरेच १०० नारळ व १० रुपये वाहीन. आई शप्पत. देवा शप्पथ.

शिंदेबाई आज तुम्ही सुट्टी का नाही घेतली. ऑफ पीरियड असता म्हणजे पळालो असतो. सगळा वर्ग काय, सगळे जग कसे आनंदात आहे. आणि माझ्या वाटेला हे प्रचंड दु:ख (प्रचंड कळ) आहाहा. बरे वाटले. गेली वाटते. बरे वाटू लागले. पण ठूस ठूस चालू होती. नारळ व रुपये ५० करू या का. नको राहू दे. परत आली म्हणजे.

मधेच बाईंची कविता ऐकू यायची. कळ वाढली कि मी ‘त्या’ समाधीत जात होतो. कसलेच भान नव्हते. फक्त कळ आणि कळ. (पूर्वी साधूंनासुद्धा अशीच समाधी लागत असेल का. कसलेच जगाचे भान नाही.)

तेवढय़ात नोटीस घेऊन नामदेव शिपाई आला. वाटले की कोणीतरी गचकले म्हणून बहुधा सुट्टी असणार. बाई सांगत होत्या की पुढच्या महिन्यात अजंठा वेरुळ सहल निघणार आहे. तरी ज्यांना यायचे त्यांनी ५ तारखेपर्यंत रु. १०० जमा करावेत.

अहो, बाई कसली सहल नी कसले अजंठा वेरुळ. येथे मला काही सुचेना आणि सहल म्हणे. नाम्या गेला नि घंटा झाली. बाई गेल्या नि वणीकर सर आले. हिंदी माझा आवडता विषय. पण आज कशातच लक्ष नव्हते.

कळ परत उलटून येत होती. मी मांडय़ामध्ये हात घालून गच्च बसलो होतो. सर ओरडले. पुस्तक काढ. ऐकू नाही का आले. का देवू एक. ‘सौ सुनार की एक लोहार की’ त्यांचा आवडता डॉयलॉग मारला नि सुरू झाले.

काय करू आता. देवांचा धावा परत सुरू झाला. कपाळावर घाम येऊ लागला. कसे काय विचारू सरांना. आधीच खडुस त्यात असे काही विचारले तर ‘सौ सुनार..’ करत मारत बसतील.

तेवढय़ात मनी माझ्याकड बघून खुणेने विचारू लागली काय झाले. (म्हणजे माझा चेहरा काय झाला असेल)

काय झाले काय. काय सांगू बाई तुला माझी व्यथा. कोणता प्रसंग ओढवला माझ्यावर. कळ आता मस्त उंच उंच जाणाऱ्या पतंगाप्रमाणे वर वर जात होती. असह्य़ झाले. शेवटचा प्रयत्न थुंकी, १०० चे १११ नारळ व रुपये केले. आठवतील तेवढय़ा देवांची नावे घ्यायला सुरुवात केली.

पण आज या भक्ताच्या भेटीला देव धावतच नव्हते. किती ऐकले वाचले होते की देव भक्तांची हाक ऐकूण धाव घेतो. पण आज माझी बहुधा  परीक्षा पाहात होते. नको हो देवा, परीक्षा घेऊ अशी. ही काय वेळ आहे परीक्षा घ्यायची आपल्या भक्ताची (?)

पण देवसुद्धा आज हट्टाला पेटले होते. आणि पोटातील कळ त्याहून जोरात धिंगाणा घालत होती.

काय झाले अचानक वर्गात कोणालाच काही कळले नाही. मी उठून सरांना बोललो की सर्व लाजबीज सोडून, मनीकडे न बघता, ‘‘सर, सर मला दोन नंबरची जोरात लागली आहे.’’ माझ्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी ओळखले की फारच अटीतटीची लढाई आहे. म्हणाले, ‘‘पळ, पटकन जा थांबू नकोस.’’ सगळा वर्ग फिदी फिदी हसत होता. मी बाहेर जाण्यास वळलो. तेवढय़ात..

शाळेजवळ राहणारा. शेवटच्या बेंचवरचा आपू म्हणाला की चल तुला पाणी देतो डब्यात. मी कशाला थांबतोय. तोपर्यंत, जोरात पळालो. पळता पळताच वणीकर सरांचा दोन फटके लावण्याचा आवाज आला. ‘तुला कोणी सांगितले नसते उद्योग’ आपूने माझ्यासाठी फटके खाल्ले बहुतेक.

पळता पळता डोळ्यासमारे तो पूल अर्जुनाच्या माशाप्रमाणे दिसत होता. आज तरी माझे ध्येय तेच एक होते. आणि मनात विचार आले की कसले नारळ नी कसले रुपये.. कारण आता माझ्यावरचे संकट दूर झाले होते.

गोविंद कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

More Stories onगोष्टGoshta
मराठीतील सर्व गोष्ट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story
First published on: 27-11-2015 at 01:11 IST