lp06माझ्यामधली ऊर्जा सकारात्मक दिशेला वळावी यासाठी आईवडिलांनी मला खेळाचा पर्याय दिला. बॅडमिंटन कोर्टशेजारीच असलेल्या स्क्वॉश कोर्टने माझं लक्ष वेधलं गेलं. बंद काचेआड चालणाऱ्या या खेळाने मला आकर्षून घेतलं. तेव्हापासून मी स्क्वॉशशी जोडला गेलो तो कायमचा. आंतरराष्ट्रीय स्तरावर मी आता कुठे स्थिरावतो आहे. स्पर्धा अतिशय तीव्र आहे, सातत्य राखणं अवघड आहे. भारताचा सर्वोत्तम स्क्वॉशपटू होण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी मेहनत घेतोय. माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीचे श्रेय रमेश मोरे आणि वामन आपटे या प्रशिक्षक जोडगोळीला जाते. अंधेरीहून मी रोज चर्चगेटजवळच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया अर्थात सीसीआयमध्ये सरावाला यायचो. स्क्वॉश म्हणजे काय इथपासून, प्रगत प्रशिक्षणापर्यंत हा टप्पा या दोघांमुळेच गाठता आला. सतत चांगलं खेळण्यासाठी प्रेरित करणं प्रशिक्षकाचं काम असतं. दडपण हाताळता येणं हा सगळ्यात अवघड भाग आहे. शारीरिक सक्षमता lp25आवश्यक असतेच, पण त्याहीपेक्षा मानसिकदृष्टय़ा कणखर असणं नितांत गरजेचं असतं. प्रत्येक लढत नवीन आव्हान उभं करते. प्रत्येक सामना तुम्हाला दमवून टाकणारा असतो. अशा वेळी खंबीरपणे मागे उभा राहणारा प्रशिक्षक मिळाला तर प्रवास सुकर होतो. जेतेपदं, यश मोजक्या वेळी नशिबी येतं. पराभवाशी जवळीक जास्त होते. पराभवातून उभं राहून पुन्हा खेळायला प्रशिक्षकच प्रवृत्त करतो. बदलत्या काळानुसार, प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हिडीओ अभ्यासणं, त्यांच्या त्रुटींचा कसा फायदा उठवायचा, मोक्याच्या क्षणी आपला खेळ कसा उंचावायचा या तपशिलामध्ये प्रशिक्षकाची भूमिका निर्णायक असते. खेळात सातत्याने कशी सुधारणा होईल याकडे प्रशिक्षक बारकाईने लक्ष देतो. प्रशिक्षक हा शिक्षकासारखा असतो. न बोलताही त्याला आपल्या मनातलं कळतं. मात्र चूक झाली तर हक्काने कानही पकडतो. प्रगत प्रशिक्षणासाठी मी बेल्जियममध्ये शॉन मोक्सहॅम यांच्याकडे मार्गदर्शन घेतो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीन स्पर्धाची जेतेपदे पटकावली. भारतात स्क्वॉश हळूहळू रुजतो आहे. त्याची लोकप्रियता वाढायला वेळ जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला टक्कर द्यायची असेल तर अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त, घोटीव तंत्रकौशल्य असणाऱ्या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक होते. म्हणून अनुभवी मोक्सहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आहे.

* २००९ मध्ये ब्रिटिश ओपन स्पर्धेचं १५ वर्षांखालील गटाचे जेतेपद
* २०१३- पीएसए वर्ल्ड टूर चॅलेंजर फाइव्ह स्पर्धेचं जेतेपद
* २०१३- ब्राटिस्लाव्हा, स्लोव्हाकिया येथे आयोजित आयएमईटी स्पर्धेचं जेतेपद. या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरणारा पहिला भारतीय स्क्वॉशपटू.
* २०१४- इन्चॉन येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग.
* २०१४- मुंबईत झालेल्या जेएसडब्ल्यू चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद
शब्दांकन : पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com