08 March 2021

News Flash

लेक झाली गुरु!

‘आम्हाला शिकवू नकोस’ असं म्हणणारे पालक आता त्यांच्या पाल्यांचेच शिष्य होऊ लागलेत. टेक्नॉलॉजीपासून आधुनिक विचारांपर्यंतची शिकवण ही मुलंच पालकांना देताना दिसताहेत.

| July 31, 2015 01:13 am

lp06‘आम्हाला शिकवू नकोस’ असं म्हणणारे पालक आता त्यांच्या पाल्यांचेच शिष्य होऊ लागलेत. टेक्नॉलॉजीपासून आधुनिक विचारांपर्यंतची शिकवण ही मुलंच पालकांना देताना दिसताहेत.

सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दकि शुभेच्छा. हा ई-मेल पाहून अवाक् होशील कदाचित किंवा हसायलाही येईल तुला. पण ते काहीही असो. ही माझ्याकडून तुला गुरुदक्षिणा. आता पुन्हा तोंडाचा मोठाला आ वासून डोळे मोठे करून बघू नकोस अशी. बाबांना हे अचानक काय झालंय याचाही विचार करू नकोस. कारण हे अचानक काही घडलं नाहीये. अगदी ठरवलेलंच मी की या गुरुपौर्णिमेला माझ्या या गुरूचे आभार मानायचे आणि तेही तिने शिकवलेल्या विद्य्ोद्वारेच.
मने मला माहीतेय की एव्हाना तुझ्या मनात लाखो प्रश्न आले असणार की हे काय अगम्य बोलताएत बाबा. पण खरंच.. तुम्ही आजची मुलं आम्हा आई-बाबांचे गुरूच आहात. बऱ्याच गोष्टी शिकतो आम्ही तुमच्याकडून आणि शिकायची इच्छा असली ना तर वयाचा वगरे अडथळा येतच नाही. अशाच काही गोष्टी शिकलोय मी तुझ्याकडून.. किंबहुना अजूनही शिकतोच आहे.
तुमच्या भाषेत म्हणतात ना काय ते ‘टेक्नो’ का ‘टेक’ गुरू.. तीच आहेस तू माझ्यासाठी. मोबाइलचा खरा उपयोग हा कॉल करण्यापलीकडेच सुरू होतो हे मला तुझ्याचमुळे कळलं. तूच तर मला आणि तुझ्या आईला स्मार्टफोन्स विकत घ्यायला भाग पाडलंस. पण ते स्मार्टफोन्स मात्र ओव्हरस्मार्ट फोन्स निघाले. आम्हाला ओ का ठो कळत नव्हतं त्यातलं. त्यात तो टचस्क्रीन. हे म्हणजे ‘बोट लावीन तिथं गुदगुल्यां’सारखं. अचानक मध्येच कोणालातरी फोन लागायचा. नुसत्या बोटांच्या स्पर्शाने मेसेज भलत्यालाच जायचा. आमची तर तारांबळच उडायची. नुकत्याच कुठे इंग्रजी वाचायला शिकलेल्याला शेक्सपिअर आणून देण्यासारखं होतं हे. आम्हाला तर त्या फोन्सची कटकटच झालेली. तो बाजूला ठेवून आम्ही आमचा साधा बटणवाला फोन वापरणार होतो. पण तोपर्यंत तू आमचा आणि फोन दोघांचाही ताबा घेतलेलास. अगदी नित्यनेमाने प्रचंड सहनशीलतेने आमच्या दोघांत स्मार्टफोन वापरण्याएवढा स्मार्टनेस आणलास. तीच गत लॅपटॉपची. ते तर अजून जटिल यंत्र. पण अमेरिकेत बसलेल्या दादाशी गप्पा मारायच्या असतील तर याला पर्याय नाही. रडतखडत का होईना तेही शिकलो. किती काय काय सामावलेलं असतं त्या इंटरनेटमध्ये. त्याचा आवाका पाहूनच दडपायला होतं. आजच्या युगातला जीनीच म्हणायला लागेल त्याला. तुम्हाला हवी ती गोष्ट त्याला सांगायची खोटी की लगेच ती तुमच्यासमोर हजर. उगीच नाही तुम्ही मुलं या तंत्रज्ञानाच्या एवढय़ा प्रेमात असता.
मने, तुम्हा मुलांना कायम असं वाटतं ना की आम्ही आई-बाबा फक्त उणीदुणी काढतो. आजची पिढी कशी भरकटलीए यावर तुम्हाला ‘लेक्चर’ देत बसतो. पण तुमच्या आणि आमच्याही नकळत आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकतही असतो. तुझी स्वप्नांना गवसणी घालण्याची धडाडी मलाही खूप काही शिकवून जाते. स्वप्नं आम्हीही बघितलेली. पण तुमच्याइतकं झपाटलेपण आमच्यात नसावं कदाचित. मला तरुणपणी गायक व्हायचं होतं, पण वडिलांनी नोकरी कर सांगितल्यावर गपगुमान तेच केलं. मग स्वप्नाची फक्त आठवणच शिल्लक राहिली. त्या दिवशीच म्हटलंस ना तू मला की तुम्ही किती छान गाता, शिका ना गाणं तुम्हाला आवडतं तर.. हेच जर माझ्या बाबांनी मला म्हटलं असतं तर.. तुम्हा मुलांचं मला खरंच कौतुक वाटतं याबाबतीत. स्वप्नांना जगण्यासाठी िहमत लागते. तुम्ही तर स्वत:ला झोकून देता त्यासाठी. तीच िहमत आणि तेच सर्वस्व झोकून देणं शिकतोय मी तुझ्याकडून.
खूप वेळ पाया पडल्याने काही होणार नाही. नशिबात असेल तरच सगळं मिळतं. आठवतंय तू मुलाखतीला जात असताना मी म्हटलेलं तुला. गमतीत अगदी. अन् त्यावर तू दिलेलं उत्तर अजूनही माझ्या लक्षात आहे. मुळात मी मला काही मिळावं म्हणून पाया पडतच नाहीये. माझ्या एकाग्रतेसाठी ते करतेय मी. आणि मला हेही माहीतेय की जोपर्यंत आपण मेहनत करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीच गोष्ट मिळणार नाही. नशिबापेक्षा माझा माझ्या मेहनतीवर विश्वास आहे. काम झालं नाही म्हणून एखाद्या तिसऱ्याच गोष्टीला दोष देण्यापेक्षा आपल्याला हातातल्या गोष्टीच पारखून घेतलेल्या बऱ्या. त्या दिवशी मला माझ्यावरच नसलेल्या विश्वासाची जाणीव झाली. मी काही देवभोळा नाही, पण नशिबाला अगदीच डावलून शंभर टक्के स्वत:वर विश्वास ठेवणाऱ्यातलाही नाही. त्या दिवशी मला कळलं की शिकायचं म्हटलं की आपल्या आसपासच हजारो गुरू असतात. त्यांच्याकडे डोळसपणे बघण्याची आणि त्यांच्याकडून शिकायची आपली फक्त तयारी असायला हवी.
पण मने, एक गोष्ट शिकायची म्हटली तुझ्याकडून तरी शिकता येत नाहीये. प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत तुमची पिढी फारच प्रॅक्टिकल बुवा. आमच्या वेळी तर सगळंच वेगळं होतं. आम्ही प्रेमात पडलोय हे आम्हाला समजेपर्यंतच लग्न होऊन जायचं. कोणाला काही सांगायची, विचारायची हिंमतच नव्हती आमच्यात तेव्हा. पण तुमचं तसं नाहीये. लग्नाच्या आधी तुम्ही स्वत:ला प्राधान्य देता. करिअरचा विचार करता. वयाच्या कोणत्या टप्प्यावर काय, कधी, कसं करायचं याचं रितसर प्लॅनिंग करता. आणि मला ते खरंच पटलं. कोणाचीही जबाबदारी येण्याआधी आपण स्वत: किती सक्षम आहोत हे प्रत्येकाने जाणून घेतलंच पाहिजे. पण तुमच्या त्या ‘कमिटमेंट फोबिआ’चं कोडं काही मला अजून सुटलेलं नाही. आम्ही आपलं अंगावर पडेल ती प्रत्येक जबाबदारी म्हणजे आपली कमिटमेंट असं समजायचो. मग ती जबाबदारी आम्ही घेतलेली असो किंवा कुणी आमच्यावर लादलेली.
येणारी प्रत्येक नवीन पिढी ही आपल्याबरोबर काही ना काही नवीन घेऊन येत असते. ज्यांना ते नावीन्य रुजत नाही त्यांना ती पिढी भरकटलेली वाटते. आमचे आई-वडीलही आमच्या बाबतीत असंच बोलायचे. पिढय़ांची ही पिढीजात बोलणी पुढील अनेक र्वष पिडत राहणारच आहे. पण म्हणून काही तुमच्या पिढीच्या शिकवणी विसरल्या जाणार नाहीत.
तुझे इवलुसे हात धरून तुला चालायला शिकवायचो मी तुला. त्याच इवल्या हातांनी जेव्हा मला माझा हात धरून की-बोर्ड वापरायला शिकवलं तेव्हा एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं समाधान वाटलं मला. भरुन आलं होतं मला. आता या ई-मेलचा शेवट करताना मला होणारा आनंद तुला तुझ्या मुलांची शिष्या झाल्याशिवाय कळायचा नाही!.
तुझाच आज्ञाधारक शिष्य
बाबा.
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:13 am

Web Title: guru paurnima special 26
Next Stories
1 दत्तात्रेयांचे चोवीस गुरू
2 रसिकश्रीमंत चित्रकार!
3 पंढरपुरातील हाताने मैलासफाई
Just Now!
X