lp06एखाद्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाचा शिष्य बनणं हे तर ओघाने आलेच, पण आपल्या रोजच्या जीवनात असे किती तरी गुरू असतात जे वेळोवेळी आपल्याला काही ना काही शिकवत असतात.
अमेय मकरंदला भेटला. गप्पांचा विषय अर्थातच तबला. कारण अमेय तबला वाजवायला नुकताच शिकू लागला होता. मकरंद त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा. मकरंदला गाण्याचे बाळकडू मिळालेले. मकरंद उत्तम गायचा पण गाणं हे त्याचं करिअर नव्हतं. दुसरीकडे अमेयला तबलावादनातच मोठं व्हायचं होतं. काय अ‍ॅव्हेन्यूज आहेत, कुठे मोठी संधी मिळू शकते अशा बऱ्याच चर्चा रंगल्या. गप्पांच्या गाडीला वाफाळत्या चहाचं जंक्शनही लागलं. एक तास खल झाल्यानंतर मकरंद अमेयला म्हणाला, ‘‘तू एक चांगला गुरू कर!’’ अमेय तात्काळ उत्तरला, ‘‘अरे लेका आता काय रोबोकडून शिकतोय का तबला?’’ यावर मकरंद म्हणाला, ‘‘अरे तसं नाही, ते शिकवतात चांगलं पण तुला यातच करिअर करायचं असेल तर तुला मोठा गुरू करावा लागेल. जो तुला रस्ता दाखवेल, अडखळलास तर सावरेल, तू भलत्या वाटेला लागलास तर तुला समज देईल.’’ अमेय गमतीने मकरंदला मित्र द फ्रेंड असं म्हणायचा. लहानपणापासून गट्टी असल्याने केमिस्ट्री पक्की असल्याने त्यांना एकमेकांना गोष्टी फार उलगडून सांगाव्या लागायच्या नाहीत. पण आज मकरंदने सांगितलेली ही गुरूची गोष्ट डोक्यात शिरायला तयार होईना.
विषय बदलतात, क्षेत्रंही भिन्न होतात पण अमेय-मकरंद आणि गुरूची गोष्ट कायम राहते. कॉपोर्रेट फिल्डमध्ये ‘उप्पर जाने के लिए कोई गुरू कर ले तगडा’ हा उद्गार असो किंवा काढताक्षणी बुडिताच्या गोष्टी करणारा बिझनेससाठीही ‘कोई गुरू के सरपर माथा रख’ हा सबुरीचा सल्ला असो किंवा फेम चाहिए, तरक्की चाहिए तो ‘बेटा अपने गुरु के पास जा- उससे सीख ले’ ही आदेशवजा सूचना असो. जेव्हा जेव्हा आपण पुढे जाण्याची, प्रगतीची, क्षितिजं विस्तारण्याचा विचार करतो तेव्हा तेव्हा गुरू एलिमेंट आयुष्यात डोकावतो. अधोगतीच्या काळोख्या रस्त्यासाठी वाईट संगत पुरते, त्यासाठी गुरू लागत नाही. पण अपवर्ड मोबिलिटीसाठी मात्र मसिहा लागतो. कुणी त्याला गॉडफादर म्हणतं, कोणी मेंटर अशी टर्म वापरतं, कोणी गुरुजी अशी साद घालतात, एक ना अनेक प्रारूपं. खरंच कुणी असा एक किंवा कुणी अशी एक आपल्या उन्नतीचा मार्ग आखू शकतो? एका व्यक्तीतील ज्ञानाला, व्यासंगाला आपण शरण जातो. खरंच आपलं कर्तृत्वानं मोठं होणं एखाद्या व्यक्तीभोवती मर्यादित राहतं? आपण त्या व्यक्तीकडून शिकतो, बारकावे टिपतो. गायकांच्या बाबतीत, बोलताना गुरूंचा उल्लेख जरी झाला तरी अतीव आदरातून साहजिक कानाला हात लावला जातो. यात दिखावा काहीच नसतो. भरभरून दिलेल्या गुरुप्रतीची ती दाद असते. पण म्हणून अन्य गायकांचे गुरू, गायकीतले अन्य बुजुर्ग खुजे होत नाहीत. त्यांच्याकडूनही काही पदरात पडू शकतं. आपल्याला नक्की काय करायचंय हे अनेकदा कळत नाही. कुठलातरी आऊटर फोर्स लागतो आपल्याला- त्यात वावगंही काही नाही, कारण आपण आपल्यात मश्गूल असतो. त्या स्वच्छंदी कोशातून बाहेर काढायला कोणीतरी लागतो. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सातत्याने प्रोसेसबद्दल म्हणतो. मॅचच्या आधी, टॉसच्या वेळी, मॅचनंतर- अनेक वर्ष म्हणतोय-प्रोसेसची गोष्ट. प्रयत्नांची प्रोसेस हंड्रेंड परसेंट व्हायला हवी हा त्याचा आग्रह असतो. ती काटेकोर होणं त्याच्या दृष्टीने आवश्यक, आऊटपूट तितकंसं महत्त्वाचं नाही. म्हणजे सगळं रामभरोसे असं नाही, त्याचं म्हणणं- प्रोसेस नीट केली की आऊटपूट अपेक्षित साधतंच. पण जरी आऊटपूट मनाजोगतं नाही मिळालं तरी प्रोसेस नीट केली असेल तर निराश व्हायला नको. हे सांगणारा धोनी हा काही संत नाही, विकारविलसित वगैरे अजिबातच नाही. आपल्यासारखाच सर्वसामान्य आणि चुकांतूनच शिकत मोठा होत गेलेला यशस्वी क्रीडापटू. धोनी सांगतोय त्यात नवीच काहीच नाही. भगवद्गीतेत फळाच्या अपेक्षेपेक्षा प्रयत्नांचं मोल उजवं असल्याचं म्हटलंय. धोनीचं पटतं. कारण तो आपल्या भाषेत सांगतो. त्याच्याशी रिलेट करू शकतो, युद्धाचं रणांगण- घोडे, रथ आणि त्यावर आरूढ असलेल्या कृष्णाशी आताच्या काळातला माणूस रिलेट करू शकेलच असं नाही.
आपला सभोवताल आपल्या व्यक्तिमत्त्वात प्रतिबिंबित होतो. प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्यामुळे घडण्याची, शिकण्याच्या प्रोसेससाठी असंख्य गुरू या सभोवतालातच दडलेले असतात. गुरुचरित्रामध्ये दत्तांनी २४ गुरू केल्याचा उल्लेख आहे. काळ बदलला आहे, साहजिकच गुरूच्या व्याख्येचं परिमाणही बदललं आहे. निसर्गाचा सगळ्यात विस्मयचकित करणारा आविष्कार म्हणजे लहान बाळ. कितीही शिष्ट, ढुढ्ढाचार्य माणूस असला तरी समोर इवलंसं गोजिरं बाळ आल्यावर त्याचा चेहरा बदलतो. या बाळाकडूनच कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या. कधीतरी आपणही या स्टेजमधून गेलेलो आहोत, म्हणजे कुठेतरी आपण आपलेच गुरू होतो तेव्हा याची जाणीव होते. सगळ्याच बाबतीत बाळाची पाटी कोरी असते. आई सोडली तर सगळीच माणसं नवीन. नवीन वातावरण, त्यांची भाषा, वागणंबोलणं हे सगळं पहिल्यापासून शिकावं लागतं. नोशन्स, पूर्वग्रह, आवडीनिवडी, सवयी, लकबी या सगळ्या भौतिक गोष्टी खात्यात नंतर जमा होतात. स्पर्श, चव आणि गंध या पातळ्यांवर शून्यापासून सुरुवात करावी लागते. ते सगळे अनुभव पटलावर नोंदवणं आणि ते साठवून त्याची सवय करून घेणं ही अवघड प्रक्रिया बाळ आपल्याला शिकवतं. सर्वस्वी नव्या ठिकाणी कसं रुळावं, गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तर लक्ष वेधून कसं घ्यावा याचा लाइव्ह डेमो बाळाकडूनच शिकावा.
आपण ज्या ठिकाणी राहतो ते घर आणि घरातली माणसं शिकण्याचा मोठाच ठेवा. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यानिमित्ताने बाहेर असण्यापूर्वी आपण घरात असतो. कितीही छोटं असलं, गैरसोयी असल्या तरी शेवटी आपल्याला घरी जायचं असतं. आपण बाहेर पडतो ते विशिष्ट वेळाने परतण्यासाठी. प्रत्येक घराचा एक पॅटर्न ठरलेला असतो. बाहेरच्यांसमोर आपण कसे असणार, वागणार आणि त्याहीपेक्षा घराची म्हणून एक ओळख असते. आपलं व्यक्तिमत्त्व तयार होण्यात घरातून मिळणाऱ्या वारशाची भूमिका निर्णायक असते. वाईट मार्गाला लागणं सोपं असतं पण चांगल्या मार्गाची कास धरायची असेल तर ती बैठक घर देतं. आणि ही बैठक पक्की करायचं काम घरातली माणसं करतात. कॉर्पोरेट टर्मिनॉलॉजीमध्ये कोअर टीम ही संज्ञा कळीची असते. घरातली माणसं म्हणजे आपली कोअर टीम. आईबाबा, बहीण, भाऊ, आजीआजोबा आणि अन्य कुटुंबीय. घरापरत्वे कोअर टीमची व्याप्ती कमी-जास्त. या मंडळींसमोर आपण थेट असतो. त्यांच्यासमोर मुखवटय़ानिशी वावरण्याची गरज नसते. तुमचं भावविश्व त्यांना ठाऊक असतं आणि त्यांचं तुम्हाला. सुखदु:ख, गमतीजमती हे सगळं हक्कानं शेअर करण्याची जागा म्हणजे कोअर टीम. कर्तृत्वाने मोठं होणाऱ्या माणसांची कोअर टीम मजबूत असते. सगळं आलबेल असताना जाणवत नाही, पण अडचणीच्या वेळी कोअर टीमची ताकद कळते.
शाळा म्हटलं की आठवणींचा मोठ्ठा पट डोळ्यासमोर तरळतो. मूल्यशिक्षणाच्या तासापासून बोरकुटापर्यंत आणि पायथागोरसच्या प्रमेयापासून स्काऊट गाइडच्या दोरीपर्यंत सगळ्याला उजाळा मिळतो. घरात आपण बंदिस्त कवाडात आपल्या माणसांमध्ये असतो. शाळेच्या निमित्ताने पहिल्यांदा बाहेरच्या जगाशी आपला संपर्क येतो. क्षितिजाचा एक कप्पा उघडतो आणि तोही दहा वर्षांकरता. शाळा आणि एकूणच ती दहा-अकरा वर्षे आपला पक्का गुरू आहे. मेकॉले शिक्षणपद्धत चांगली की वाईट हा मुद्दा वेगळा, पण मुळात या कालखंडात आपली विषयांची ओळख होते, झापड सुटते, अभ्यास करण्याची, समजून घेण्याची, ऐकण्याची, लिहिण्याची सुरुवात होते. कलेक्टिव्ह बिहेवियर म्हणजे इंट्रापासून इंटरकम्युनिकेशनची सवय रुजते. शाळेला गुरू म्हटलं म्हणून कॉलेज वाऱ्यावर असं नाही, पण कॉलेजमध्ये जाताना शिंगं फुटलेली असतात. बनचुकेपण आलेलं असतं. शाळेत शिरताना आपण निरागस सदरात मोडणारे असतो. निदान तशी अपेक्षा तरी असते. त्या वयात, विविध संकल्पना डोक्यात आणि मनात बसवून देण्याचं काम शाळा करते.
कोणतीही कलाकृती- सिनेमा, नाटक, मालिका, माहितीपट, पेंटिंग, जाहिरात, नृत्य, छायाचित्र- काहीही क्रिएटिव्ह आपल्यासाठी गुरू आहे. हे थोडंसं चिवित्र वाटू शकतं, कारण यादीपैकी पहिल्या तीन गोष्टी मनोरंजनासाठी बघतो आपण. पण या सगळ्यांमध्ये सूक्ष्म गुरू दडलेला असतो. चांगलं पाहिल्यावर बरं वाटतं, सुकून मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेरणा मिळते- आपल्याला चांगलं काम करण्याची. गुरू वेगळं काय करतो. सेव्हंटी एमएमच्या पडद्यामध्ये आपल्याला अंतर्मूख करण्याची ताकत आहे. काही सेकंदांची जाहिरात आपल्याला खिळवून ठेवते. चांगलं लिहिण्यासाठी चांगलं पाहावं लागतं, ऐकावं लागतं- त्यामुळे यादीतला प्रत्येकजण आपला गुरू आहे.
ट्रॅव्हलिंग इज लर्निग ही उक्ती अगदी खरी आहे. प्रत्येक प्रवास (अंतर किती हा मुद्दा गौण) आपल्याला शिकवतो. आणि हो पब्लिक ट्रान्सपोर्टने केलेला प्रवास. कधी राइट साइड विंडो मिळाल्यावर बाहेरचं जग पाहण्याची संधी, कधी आपल्या सीटवर लोकांनी केलेलं आक्रमण, मग भांडणं, कधी खोळंबा, गोंधळ- अनेक गोष्टी. प्रवासाने आपण गंतव्य स्थळी पोहचतो पण त्यापेक्षाही अनुभव समृद्ध करतो. सोशॉलॉजी अर्थात समाजाचा, सामाजिकतेचा अभ्यास करायचा असेल तर बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स ही उत्तम ठिकाणं. किती विविध प्रकारची माणसं असू शकतात याची कल्पना प्रवास आपल्याला देतो. वैयक्तिक गाडीने केलेल्या प्रवासाला चोचल्याची चौकट असते. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहे ते गोड मानून अ‍ॅडजस्ट कसं करावं याचे बाळकडू प्रवास देतो. टमटम-वडाप-डुक्कर-विक्रम अशा विविध गोंडस नावांनी परिचित सहा आसनी रिक्षा, मेटॅडोर, जीप-ट्रॅक्स यासारख्या वाहनांमध्ये निर्धारित संख्येपेक्षा तिप्पट माणसं कोंबून नेली जातात. थँक्यू, सॉरी आणि शिष्टाचारी वागणं तसंच कम्फर्ट जर्नीच्या नोशन्स पार बाजूला ठेऊन जावं लागतं. जेवढा विविधांगी प्रवास तेवढा माणूस मनाने घट्ट होतो. कदाचित म्हणूनच बारा गावचं पाणी प्यायलोय ही म्हण रूढ झाली असावी.
खेळांचं आपल्या आयुष्यातलं स्थान पाहणं आणि मनोरंजनापुरतं मर्यादित असतं. पण खेळाच्या माध्यमातून एक आयता गुरू आपल्याला मिळू शकतो. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, कोणताही खेळ असो- कस लागणारा कट्टर मॅच आपल्याही बरंच काही शिकवून जाते. रॉजर फेडरर-नोव्हाक जोकोव्हिच मुकाबला असो, जर्मनी-अर्जेटिना फुटबॉल लढत असो किंवा क्रिकेट वर्ल्डकपमधला दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंडमध्ये रंगलेला हाय व्होल्टेज गेम असो. पाहण्यातल्या आनंदाच्या बरोबरीने दडपण कसं हाताळावं, मोक्याच्या वेळी थंड राहून कामगिरी कशी उंचवावी, जबाबदारीने वाकून जाण्यापेक्षा ती कशी पेलावी, मॅन मॅनेजमेंट कसं करावं अशा असंख्य गोष्टी बसल्याजागी उमगतात.
डॉक्टरकडे आपण अनिच्छेनेच जातो. आपल्या शरीरातल्या व्याधीला बरी करण्याचं काम डॉक्टर करतात. कडू औषधं आणि वेदनादायी इंजेक्शन्समुळे डॉक्टरवर आपला राग असतो. पण आपल्या शरीराला समजून डॉक्टर काय चांगलं काय वाईट याचा सल्ला देतात. अर्थात हे काही धर्मादाय वगैरे नाही पण आपली तब्येत नीट राहावी यासाठी उपयुक्त गोष्टी ते निश्चितपणे सांगतात. वाईटावर टपलेल्या माणसांची संख्या वाढत असताना आपल्या भल्याचा विचार करणारा माणूस दुर्मीळ आणि म्हणूनच गुरू सदरात त्यांची वर्णी.
२४ तास ३६५ दिवस काम करणारी प्रत्येक सिस्टम आपल्याला गुरुस्थानी आहे. हॉस्पिटलं, अग्निशमन दल, पोलीस, प्रसारमाध्यमं, पब्लिक ट्रान्सपोर्ट, रोजच्या रोज कचरापेटी उचलणारी माणसं, वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी राबणारे हात या सगळ्यांशी आपला परिचय नसतो. कामानुसार आपण बस-ट्रेन पकडायला जातो. बस, ट्रेन मिळते पण ती सुरू राहण्यासाठी झटत असणारी असंख्य माणसांची साखळी आपल्याला दिसत नाही. पाऊस, थंडी काहीही असलं तरी सकाळी दारात पेपर येतोच. पेपर तयार करणाऱ्या कचेरीतल्या माणसांपासून- पेपर टाकणाऱ्या मुलांपर्यंतच्या प्रचंड मोठय़ा अहर्निश साखळीला आपण गृहीत धरतो. मंत्र्यांच्या सभेपासून, धार्मिक मिरवणुकांपर्यंत आणि दरोडय़ापासून बलात्काराच्या केसपर्यंत सगळ्या गोष्टींचा भार वाहणारे पोलीस. चिंचोळ्या गल्लीत आग लागल्यानंतरही ती सोडवण्यासाठी दहा मिनिटांत दाखल होणारी फायर ब्रिगेडची माणसं- सुट्टी न घेता, लोकांसाठी चालणारी सिस्टम असंख्य गोष्टी शिकवते.
आपलं जग टेक्नॉलॉजीने व्यापलं आहे. या प्रांतातला गुगल आपला गुरुमित्र. मनात योजलेली गोष्ट टाइप करण्याचा अवकाश.. पुढच्या मिनिटाला हजारो पानं उपलब्ध करून देणारा गुगल चमत्कारी आहे. माहितीची भूक चाळवणाऱ्या गुगलने आपलं आयुष्य सोपं केलंय. ऐतखाऊही बनवलंय पण त्याच्याइतका इन्स्टंट गुरू शोधून सापडणार नाही. याच टेक्नॉलॉजीचं प्रारूप असणारी उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स उदा- एम इंडिकेटर, जीपीआरएस, रिझव्‍‌र्हेशन साइट्स- एकदमच भारी. पत्ता विचारण्यासाठी खत्रूड लोकांच्या तोंडी लागण्यापेक्षा गाडीतल्या व्हीलला बसवलेलं जीपीआरएस डिव्हाइस, अवाढव्य मुंबईत एकटय़ाने फिरण्याचं धाडस देणारं एम-इंडिकेटर- हे आणि असे अनेक आपले आधुनिक यांत्रिक गुरू आहेत. कितीही टेक्नॉलॉजी आली तरी पुस्तकांचं आणि ग्रंथालयांचं महत्त्व कमी होत नाही. माहिती-ज्ञान यांच्याबरोबरीने शब्दांचं भांडार पुरवणारे विविध विषयांचे ग्रंथ-पुस्तकं आणि यांची जोपासना करणारी ग्रंथालयं आपले हक्काचे गुरू आहेत.
जास्त पावसाळे पाहणं म्हणजे अनुभव हा एक श्रेष्ठ गुरू आहे. अनुभवी व्यक्ती मग क्षेत्र कोणतंही असो आपल्यासाठी महत्त्वाची. अनेकदा उत्साहाच्या भरात आपण वाहत जातो पण अनुभवी व्यक्ती आपल्याला सल्ला देते आणि तो चपखल असतो आणि ठरतोही. अनुभवाला नाकारू नये. आपल्या सभोवताली असंख्य प्राणी-पक्षी वावरत असतात. कंडिशनिंग त्यांच्याकडून शिकण्यासारखं. दत्तांनी पंचमहाभूतांना गुरू मानलं होतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही मंडळी आजही आपल्याला गुरुस्थानी आहेत.
असं म्हणतात कृतीसाठी अंतप्र्रेरणा महत्त्वाची असते. यामुळे आपणच आपले गुरू होऊ शकतो. अर्थात हे सगळं गुरुपुराण प्रगतीची कास असणाऱ्यांना, हातून चांगली कृती घडावी अशी मनी इच्छा असणाऱ्यांसाठी, समोरच्या व्यक्तीला आणि व्यवस्थेला सन्मान देणाऱ्यांसाठी. मल्टीटास्किंगचा जमाना आहे त्यामुळे मल्टी गुरूही ओघानं आलंच. पण कसं आहे मल्टीटास्किंग आणि एक ना धड भाराभर चिंध्या यातला फरक धुसर असतो. रेषेच्या पल्याड जाऊ न देण्याची जबाबदारी आपली, बाकी गुरू देख लेगा!
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com