lp84 * फॉर्मल्समध्ये योग्य टायची निवड महत्त्वाची असते असे म्हणतात. मी टाय निवडताना शक्यतो माझ्या शर्टच्या रंगाचा विचार करतो. सध्या तरी मी साधे रंगीत टाय वापरतो. पण मला पॅटर्न, प्रिंट्स असलेले टाय वापरायचे आहेत. तर प्रसंगानुरूप टाय कसा निवडावा?
– सुयोग शिंदे, २७
सुयोग, आपल्याकडे फॉर्मलवेअर्सना खूप कंटाळवाणं ड्रेसिंग मानलं जातं. पण या ड्रेसिंगमध्ये छोटे बदल करून तुम्हाला छान परिणाम साधता येतो आणि ड्रेसिंगमध्ये गंमतही आणता येते. आता, तुझ्या ऑफिसमधील वातावरण कसे आहे, हे मला माहीत नाही. पण तुम्हाला तुमच्या ड्रेसिंगमध्ये थोडे प्रयोग करता येत असतील, तर प्रिंटेड टाय नक्कीच वापर. छोटे प्रिंट्स टायवर छान दिसतात. पण अशा वेळी प्लेन शर्ट निवड. सुरुवात म्हणून तू एक किंवा दोन रंगांची प्रिंटेड टाय निवड. त्यानंतर रंगांची संख्या वाढव. फंकी प्रिंट्सचे टाय पार्टीजला घालायला उत्तम असतात. मित्रांसोबत पब, डिस्कोला जातानाही हे टाय छान दिसतात. कमी उंचीचे टायसुद्धा पार्टीला गंमत म्हणून वापरता येतात. सध्या टायच्या नेहमीच्या आकारापेक्षा बारीक टायसुद्धा बाजारात मिळतात. तेही ऑफिसला वापरू शकतोस.
lp86* ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसिंग बंधनकारक आहे. त्यामुळे आम्हाला हिल्स घालावे लागतात. पण दिवसभर हिल्स घातल्यामुळे पाय दुखतात. तर ऑफिसमध्ये हिल्सऐवजी काय घालू शकतो?
– प्रिया कंधारे, २३
प्रिया, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, हिल्स शूज हे ऑफिस कल्चरचा एक भाग आहेत. पण त्यामुळे फॉर्मल्स म्हटलं की, हिल्सच हवेत असं काही नाही. त्यावरही आपण वेगवेगळे पर्याय निवडू शकतो. त्यामुळे हा गैरसमज मनातून काढ. हिल्समुळे आपल्या बॉडी पोश्चरला उठाव येतो, त्यामुळे फॉर्मल्समध्ये हिल्सना पसंती दिली जाते. पण हिल्स घातल्यामुळे तुला त्रास होत असेल, तर हे बंधन तुझ्यावर ओढावून घेऊ नकोस. हिल्स शूजमुळे आपल्या पाठीच्या कण्याचे आजारही उद्भवतात. त्यामुळे अधिक काळ हिल्स घालणे चुकीचे असल्याचे डॉक्टर्ससुद्धा सांगतात. अर्थात, काही ऑफिसेसमध्ये हिल्स घालणे सक्तीचे असते तिथे हे नियम पाळावे लागतात. पण त्यातही काही मार्ग काढता येतो. प्रवासादरम्यान तुझ्याकडे चपलेची एक जोडी असू देत. ऑफिसमध्ये आल्यावर त्या बदलून तू हिल्स घालू शकते. याशिवाय lp87किटन हिल्सचा पर्याय वापरून बघ. या शूजच्या हिल्सची उंची दीड ते दोन इंच असते. त्यामुळे त्याने पायाला फारसा त्रास होत नाही. जास्त उंचीचे हिल्स हवेच असतील तर वेजेस वापर. त्यांना इतर प्लॅटफॉर्म हिल्सपेक्षा बॅलन्स जास्त असतो. तसेच तुला हिल्स वापरायचेच नसतील, तर बॅलेरिनाज वापरू शकतेस. त्याही ऑफिस कल्चरचा भाग आहेत. पण जास्त झगमगीत बॅलरिना निवडू नकोस. काळा, ब्राऊन, सफेद, नेव्ही अशा बेसिक रंगाचे बॅलरिनाज घालता येतील. सध्या युनिसेक्स किंवा मुलींचेही बूट्स येतात. ते ट्राऊझरसोबत घालता येतात.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात
‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत- response.lokprabha@expressindia.com