बीएस्सीच्या शेवटच्या वर्षांला असणारी चारुता आणि १२ वीला असलेला विनय दोघेही मनात असलेल्या असंख्य प्रश्नांचे अदृश्य भेंडोळे घेऊन आजोबांच्या शेजारी येऊन गप्प बसले तेव्हाच त्यांनाही लक्षात आले की, आपल्याला आता बऱ्याच प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. ते म्हणाले, बोला! दोघांनीही एकाच वेळेस तोंड उघडले, बहुधा दोघांनाही मनातील प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची घाई झालेली असावी. मनातला गोंधळ त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. चारुता म्हणाली, विषय आहे स्वातंत्र्य. त्यावर मतभेद, मतमतांतरं आहेत.. खूप प्रश्न आहेत डोक्यात, पण ते इतर कुणाला सांगितले तर ती ती माणसं त्यांच्या पिढीचंच घेऊन बसतात. आमच्या नजरेनं केव्हा पाहणार? का कोण जाणे आपल्यात अंतर खूप असलं तरी तुम्ही आम्हाला समजून घेऊ शकता, आजोबा म्हणून नाही तर माणूस म्हणून.. आणि म्हणूनच आलोय तुमच्याकडे. त्यावर विनय म्हणाला, माझ्या आणि चारुताच्या मित्रमैत्रिणींनाही हाच प्रश्न पडलाय.. त्यांनाही भेटायचंय तुम्हाला.
ठरलेल्या वेळेला सगळेच जमा झाले, चारुताच्या घरी. प्रश्न सांगा म्हटल्यावर सर्वानीच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, आम्ही कोणते कपडे घालायचे हे कोण ठरवणार इथपासून ते लग्न करायचं की नाही त्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे की नाही, असं विचारणाऱ्या अतिशपर्यंत सर्वानीच आपापले प्रश्न सांगितले. अतिश आणि गीतांजली दोघांच्याही घरात लग्नाची जमवाजमव सुरू होती. त्यांचे प्रश्न जरा वेगळे होते. मधोमध आजोबा बसलेले आणि त्यांच्याभोवती सगळे. मग रेल्वेतील भजनी मंडळींपासून ते गणेशोत्सवात रस्ता अडवून मंडप टाकणारे सर्वच आपल्या स्वातंत्र्यावर कशी गदा आणताहेत इतपत चर्चा झाली. गणेश आणि अदितीने तर कलेमधील स्वातंत्र्याबद्दलही चर्चा केली. विघ्नेशने पोर्नवर घातलेल्या बंदीच्या विषयाला हात घातला. तो कायद्याचा विद्यार्थी होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सरकार असे कसे करू शकते, असा प्रश्न त्याला पडला होता. स्वातंत्र्य म्हणजे अधिकार का, कर्तव्य म्हणजे जबाबदारी का इथपासून ते स्वातंत्र्याचा अतिरेक म्हणजे स्वैराचार मानायचा का, स्वच्छंद म्हणजे स्वातंत्र्य का, बंधनं येतात तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याची जाणीव होते का, परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे स्वत:वर बंधने किंवा नियमन लादणे म्हणजे स्वातंत्र्याचा अस्त मानायचा का, अशा सर्वच प्रश्नांचा भडिमार आजोबांच्या दिशेने झाला. मग वयाने मोठे असलेल्या अद्वैत, सुनिधी यांनी तर हा विषय व्यक्तिस्वातंत्र्यापासून ते आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत नेऊन ठेवला.. एक क्षण आला की, सगळेच गप्प झाले, आजोबांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.
आजोबा उठले. त्यांनी एक मोठा ड्रॉइंग पेपर घेतला, त्यावर एक मोठा त्रिकोण काढला. वरच्या टोकाला मुलगा/ मुलगी असे लिहिले. खालच्या दोन कोनांना आई-बाबा अशी नावे दिली. मग आजोबा म्हणाले, आता माझ्या प्रश्नांना उत्तरे द्या. आई की बाबा कोण आवडतं, अशा प्रश्नाला आतापर्यंत कुणाकुणाला सामोरे जावे लागले आहे? जवळपास सर्वानीच होकारार्थी उत्तर दिले. लहान मुलांना हा प्रश्न विचारलाच जातो. अनेक जण तारेवरची कसरत असलेले उत्तर देतात. मग आजोबा म्हणाले की, आपल्याला उत्तराचं स्वातंत्र्य असतंच, पण मग आपण कसरत का करतो, या प्रश्नामध्येच स्वातंत्र्याचं उत्तर दडलेलं आहे. स्वातंत्र्य हे अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या संदर्भामध्ये येतं. कधी समाजाच्या, कधी देशाच्या, तर कधी कुटुंबातील व्यक्तींच्या. इतरही अनेक संदर्भ त्याला स्थलकालपरत्वे येतात व काळानुरूप बदलतही जातात. आई आवडते, असे सांगताना आपण बाबांना नाकारत नसतो. आपण या त्रिकोणाप्रमाणे दोघांनाही दोन बाजूंनी घट्ट जोडलेले असतो. फक्त त्या वेळेस संदर्भानुसार उत्तर देतो. प्रश्न गोष्ट कोणी सांगितलेली आवडते, याचं उत्तर बाबा असतं तेव्हा आईला नाकारत नसतो. नातं दोघांशीही असतं आणि आई-बाबा यांचंही वेगळं नातं असतं. त्यांना पती-पत्नी म्हणून त्यांचं स्वातंत्र्य असतं तेव्हा ते मुलांना नाकारत नसतात. आई-मुलाच्या नात्यात बाबा अध्याहृत असतातच. हेच आपण नेमकं समजून घेतलं, तर स्वातंत्र्य समजून घेणं सोपं जाईल. आपण त्रिकोण, चौकोन किंवा वर्तुळामध्ये असतो. आपण कोणत्या आकृतीत आहोत, त्यावर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरतो. म्हणजेच त्रिकोणाला बाजू असतात, पण वर्तुळाला त्या नसतात, पण त्याला परिघ असतो. स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण बोलतो त्या वेळेस आपल्याला आपण नेमके कोणत्या संदर्भात बोलतोय ते समजून घ्यावे लागते. म्हणजे संदर्भ आपल्या पिढीच्या वर्तुळाचा आहे, त्रिकोणी कुटुंबाचा आहे, की चौकोनी समाजाचा आहे आणि प्रत्येक वेळेस आपण नात्यांमध्ये करत असलेली तडजोड म्हणजे स्वीकारलेले बंधन असे मानण्याचे काही कारण नाही. कारण ते कदाचित परिस्थितीशी जुळवून घेणे असते. दर खेपेस तसे करताना आपल्या स्वातंत्र्याचा बळी जायलाच हवा, असे नाही आणि मुळात ते आपल्या हातात असते. शिवाय आपण स्वातंत्र्याची अपेक्षा इतरांकडून करणार असू, तर ते आपल्याला इतरांनाही देताही आले पाहिजे. म्हणजेच त्या त्रिकोण, वर्तुळ किंवा चौकोनात असलेल्या सर्वासाठी स्वातंत्र्याचा नेम सारखाच असला पाहिजे. आपले ते स्वातंत्र्य आणि इतरांचा तो स्वैराचार असे नसते. स्वातंत्र्य तुमच्या हाती निर्णयाचा अधिकार देतानाच, ते पेलण्याची जबाबदारीही खांद्यावर देत असतं, पण आपण केवळ अधिकाराच्याच बाजूचा विचार करतो..
सर्व जण कान लावून ऐकताहेत हे पाहून आजोबा म्हणाले, स्वच्छंद ही केवळ एकटय़ापुरती, व्यक्तिकेंद्री अशी कल्पना आहे. कुण्या एकटय़ाच्या मनात आले की, कपडे न घालता राहावे, तर तो त्याच्या घरातील इतरांना पटले तरच तसे करू शकतो. अन्यथा घरामध्येदेखील त्याला वाटले म्हणून त्याचे स्वातंत्र्य त्याला मिळणार नाही. त्रिकोण, चौकोन किंवा वर्तुळ आहेच. कारण आपण कुटुंब, समाज, देश यांच्यामध्ये राहत असतो. मग बहुसंख्येने आपल्याला जे सांगितले जाईल ते ऐकायचे का? आपला स्वातंत्र्याचा अधिकार वापरायचा नाही का? तर त्या त्या वेळेस स्थलकालपरिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा. अनेकदा आपण योग्य किंवा बरोबर असतो. परिस्थिती बहुसंख्येने आपल्या विरोधात असते. अशा वेळेस काही आगळीक होऊ शकते, याचेही भान ठेवा. स्वातंत्र्याची किंमत काही वेळेस मोजावी लागते. अशा वेळेस ती तयारीही आपण ठेवावी लागते.
आजवरचा अनुभव असे सांगतो की, अनेकदा बंधने आली की, माणसाला स्वातंत्र्याचं मोल कळतं, पण प्रत्येक वेळेस बंधनं येण्याची गरज नाही. आपल्याला स्वातंत्र्याचं मोल कळलेलं असेल, तर बंधन घालण्याइतपत परिस्थिती जाणारही नाही, कदाचित. एखाद्याला आपले वर्चस्व हवे असते तेव्हा कुटुंबात, समाजात किंवा देशात सत्ताकांक्षा अस्तित्वात येते. मग ठिणग्या पडायला सुरुवात होते, पण एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर केला, तर कदाचित ही वेळ येणार नाही. म्हणजेच स्वातंत्र्य हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या परिप्रेक्ष्यामध्ये, दृष्टिकोनातून पाहावे लागते. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू, चौकोनाच्या चारही बाजू किंवा अधिक कोन असलेल्या आकृतीच्या सर्व बाजू न्याहाळून पाहा, त्यात दृष्टिकोन सापडेल किंवा मग तो वर्तुळाच्या परिघातही सापडेल. त्या वेळेस हेही लक्षात ठेवा की, या बाजू कधी कधी काळानुरूप लहान, मोठय़ा होत असतात. वर्तुळाचा परिघही तेवढाच राहत नाही, तो वाढू शकतो. मग समीकरणे बदलत जातात, स्वातंत्र्याची. निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असणं आणि तो घेताना ते वापरणं यात अंतर आहे. स्वातंत्र्य वापरलं की, त्याचं अस्तित्व सिद्ध होतं, पण त्याच वेळेस त्याच्याशी निगडित कर्तव्य आणि जबाबदारीच्या बाजूही स्पष्टपणे अस्तित्वात येतात, हेही लक्षात ठेवावं लागतं. राज्यघटना असं सांगते की, तुमचं स्वातंत्र्य तोपर्यंत अबाधित असतं जोवर तुम्ही इतरांच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप करत नाही! म्हणजे इथे पुन्हा ते कोणत्या तरी संदर्भात येतं. स्वातंत्र्याचं हे संदर्भमूल्य जपलंत, पाळलंत, तर त्या संदर्भातील प्रश्न कमी पडतील आणि पडले तरी उत्तराचा मार्ग निश्चितच सापडेल!
01vinayak-signature
विनायक परब