विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
‘मी शिवडीतल्या चाळीत वाढलो. इथे गोविंदापासून सुरू होणारी उत्सवांची मालिका थेट शिवजयंती झाली की मगच खंडीत होते. नवरात्र, गणपती, दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली नाही, तर चुकल्यासारखं वाटतं. मागचं अख्खं वर्ष असंच सुनं सुनं गेलं. साथ आणखी किती र्वष राहणार माहीत नाही, मग सण साजरे करायचेच नाहीत का? सध्या रुग्ण कमी आहेत. अनेकांचं पोट उत्सवांवर अवलंबून आहे. त्यामुळे सण-उत्सव साजरे करायला परवानगी द्यायला हवी..’ शिवडीतल्या गणेश नार्वेकर यांची ही मागणी.

वर्षभर ज्यांच्या कानात ढोल-ताशा-बॅन्जो दणाणत असतो, प्रायोजक शोधण्यापासून, खुर्च्या मांडण्यापर्यंत सगळी कर्तव्य जे शाळकरी वयापासून इमानेइतबारे पार पाडत आले आहेत, मंडळाला बक्षीस मिळावं म्हणून प्राण पणाला लावून थर रचत शहरभर फिरले आहेत, पोरांना गोळा करून त्यांच्यातला कार्यकर्ता जागा करणं हे ज्यांच्या आयुष्यातलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण जे काही करतोय ते १०० टक्के समाजकारण आहे, यावर ज्यांचा पूर्ण विश्वास आहे, अशा सर्वाना आता घरात राहणं अशक्य झालं आहे. २०२०मध्ये साथ नवी होती, भीतीचं सावट होतं, एवढं र्वष कसंबसं ढकलूया, पुढच्या वर्षी सगळं दामदुपटीने साजरं करू असा विश्वास होता. पण र्वष सरलं, दोन लाटा येऊन गेल्या तरीही साथ आहेच. या काळात समाज साथीला सरावला. भीतीची धार बोथट होत गेली. घराबाहेर मुक्तपणे फिरण्याची ऊर्मी भीतीपेक्षा वरचढ ठरू लागली. मुख्य म्हणजे साथ लांबलचक मुक्कामासाठी आल्याची आता सर्वाची खात्री पटली आहे. करोनाविषयी रोज मरे त्याला कोण रडे, असा दृष्टिकोन निर्माण झाला आहे. पण हीच खरी धोक्याची घंटा असल्याचं मत वैद्यकीय क्षेत्रातून ठामपणे आणि एकमुखाने व्यक्त केलं जात आहे. थोडीशी निष्काळजी प्राणांशी गाठ ठरू शकते, याची जाणीव वैद्यकीय समुदाय सातत्याने करून देत आहे. तिसरी लाट वेळेआधी येऊ नये आणि तिची तीव्रताही कमी राहावी म्हणून या उत्सवी उत्साहाला वेसण घालण्याची भूमिका सरकार आणि वैद्यकीय समुदाय सातत्याने घेत आहे.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घालण्यात आल्याचं राज्य सरकारने नुकतंच जाहीर केलं. सलग दुसऱ्या वर्षी उत्सव साजरा करता येणार नसल्यामुळे मंडळांनी नाराजी व्यक्त केली. मंडळांपेक्षाही अधिक नाराजी राजकीय क्षेत्रातून व्यक्त झाली. उत्सवांच्या मुखवटय़ामागचं राजकारण, अर्थकारण सर्वज्ञात आहे. पण उत्सवी वातावरण आवडणारा, त्यात सक्रिय असणारा आणि नि:स्वार्थ भावनेतून सहभागी होणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गाला र्निबध पाळून उत्सव साजरे करायचे आहेत. पण थोडीशी मोकळीक दिली की तिचा कसा गैरफायदा घेतला जातो, हे वारंवार सिद्ध झाल्यामुळे सरकार नियम शिथिल करण्याच्या विचारात नसल्याचं दिसतं.

दहीहंडी तर रद्द करण्यात आली आहेच. आता सर्वाना चिंता आहे, गणेशोत्सवाची. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात साधारण लाखो शहरवासीय कोकणात जातात. गतवर्षी कोकणातल्या अनेक गावांतल्या रहिवाशांनी मुंबईकरांना गौरी-गणपतीसाठी गावी येऊ नका, असं आवाहन केलं होतं. काही गावांमध्ये मुंबईकर येऊन गेल्यानंतर रुग्णसंख्या वढली होती. यंदाही अनेकजण गावी जाण्याच्या तयारीत आहेत.

कोकणात जवळपास प्रत्येकच घरात गणपती असतो. त्यासाठी लोक एसटी, रेल्वे किंवा खासगी गाडय़ांत दाटीवाटीने बसून गावी येतात. अशा वाहनांमध्ये संसर्गाचा धोका असतो. गणपतीत आरती हा एक सोहळाच असतो. सर्वजण घोळक्याने एकमेकांच्या घरी आरतीला जातात. रात्री भजनी मंडळं या घरातून त्या घरात भजन करत फिरतात. त्यामुळे एखाद्या घरातली व्यक्ती किंवा भजनी मंडळातला एखादा सदस्य कोविडग्रस्त असेल, तर असे सामूहिक भजन आणि आरत्यांचे कार्यक्रम संसर्गसाखळी निर्माण करू शकतात. हे टाळण्यासाठी कितीही उत्साह असला, परस्परांना भेटण्याची ओढ असली, शहरातून नातेवाईक आले असले, तरीही सर्वानी आपापल्या घरीच राहून पूजाअर्चा करणं, योग्य ठरेल, असं मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कोकणात बाजाराला जाणं हा एक मोठा सोहळा असतो. शहरांतून आलेल्यांचं हे करमणुकीचं महत्त्वाचं साधन! पण कोकणातल्या बाजारपेठा अतिशय चिंचोळ्या आहेत. त्यामुळे गणपतीत बाजारात प्रचंड गर्दी उसळते. अशी गर्दी संसर्गासाठी पोषक ठरू शकते. त्यामुळे बाजारातली गर्दी नियंत्रित राहावी म्हणून काही उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. गावी येताना किमान आरटीपीसीआर चाचणी तरी करून यावं किंवा लसीकरण तरी पूर्ण झालेलं असावं, असंही मत व्यक्त होत आहे.

याविषयी रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातील रहिवासी अभिनय केळसकर सांगतात, ‘गेल्या वर्षी कोविड प्रसाराच्या भीतीने काही ठिकाणी गावकऱ्यांनी गौरी-गणपतीला गावी येऊ नका, असं आवाहन शहरातील नातेवाईकांना केलं होतं. काही ठिकाणी शहरवासीयांना गावात प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे. मुंबई-पुण्यात कोविड रुग्णसंख्या बरीच नियंत्रणात आली आहे. आमच्या दापोलीतही परिस्थिती सुधारते आहे. काही काळापूर्वी प्रत्येक पंचायत समितीत १५-१६ रुग्ण आढळत होते. आता संपूर्ण तालुक्यात मिळून १५-१६ रुग्ण आढळू लागले आहेत. सर्वाचं लसीकरण झालं असतं, तर उत्सव अधिक सुरक्षित वातावरणात साजरे झाले असते, पण लस मिळतच नाही, तर काय करणार? कोविडमुळे सर्वानाच कमी-अधिक प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्याचं सावटही यंदाच्या उत्सवांवर आहे. गणपतीचा सण धूमधडाक्यात साजरा करण्याची इच्छा सर्वानाच आहे. पण सरकार जे र्निबध घालेल त्यांचं पालन प्रत्येकाने करायला हवं. र्निबध आपल्या भल्यासाठीच आहेत.’

कोकणातल्या गणेशोत्सवाच्या परंपरा आणि कोविडकाळात निर्माण झालेली आव्हानं, याविषयी सिंधुदुर्गातले डॉ. मिलिंद कुलकर्णी सांगतात, ‘कोकणात गणपती हा सर्वात महत्त्वाचा सण! त्यामुळे मुंबई-पुण्यातून गावी येणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड मोठं असतं. कोकणातल्या घरांमध्ये खोल्या तुलनेने लहान असतात. गणपतीत हवेत आद्र्रता असते. अशा दमट वातावरणात लहान खोल्यांत गर्दी झाल्यास संसर्ग पसरण्याची भीती अधिक असते. कोकणातली आरोग्यव्यवस्था शहरांप्रमाणे सुसज्ज नाही. सिंधुदुर्गात केवळ ३८ व्हेन्टिलेटर्स आहेत. त्यापैकी चार बंद पडले आहेत. अशा स्थितीत उपचार मिळण्यात अनेक अडथळे येतात. काही आठवडय़ांपूर्वीपर्यंत जिल्ह्य़ात रोज ४०० ते ७०० कोविड रुग्णांची नोंद होत होती. आता हे आकडे ५०च्या आत येऊ लागले आहेत. त्यामुळे शहरांतून येणाऱ्यांनी मास्क, अंतराचे नियम पाळणं आणि एकमेकांच्या घरी जाणं टाळून स्वतच्याच घरी राहून सण साजरा करणं गरजेचं आहे.’

पुण्यातही गणेशोत्सवाचं मोठं प्रस्थ असतं. सार्वजनिक गणपतींचं दर्शन हा तिथला मोठा सोहळा असतो. मित्रपरिवाराबरोबर घोळका करून रात्रभर गणपती पाहत फिरणाऱ्यांचं प्रमाण तिथे मोठं आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात नेहमीच सक्रिय सहभाग असलेले आनंद सराफ सांगतात, ‘गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही. त्याला सामाजिक चेहराही आहे. या उत्सवातून विविध समाजकार्यासाठी निधी उभा राहतो. त्याशिवाय या उत्सवाच्या आर्थिक बाजूचाही विचार व्हायला हवा. मूर्ती, सजावट, मिठाई, वाहतूक, वाजंत्री अशी मिळून लाखो रुपयांची उलाढल या उत्सवाच्या निमित्ताने होते. त्यातून अनेकांच्या हातांना काम मिळतं. उत्सवकाळात अनेक उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होतं. गेलं वर्ष-दीड वर्ष साथीमुळे जी एक सार्वत्रिक मरगळ आली आहे, ती झटकण्याच्या दृष्टीने उत्सव साजरा व्हायलाच हवा. आता सर्वजण मास्क, अंतर आदी नियमांना सरावले आहेत. त्यामुळे उत्सवकाळात गर्दी होऊन प्रसाराचा वेग वाढण्याची शक्यता कमी आहे. कार्यकर्त्यांनाही जनहिताचं भान आहे, त्यामुळे ते देखील कुठेही अतिउत्साह दाखवणार नाहीत.’

उत्सवप्रेमींना मोकळीक हवी आहे, पण वैद्यकीय क्षेत्र मात्र आणखी काही काळ संयम बाळगण्याच्या सल्ल्यावर ठाम आहे. राज्यातच्या अनेक भागांतले र्निबध आता बऱ्याच प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. गाळात रुतून बसलेलं अर्थचक्र सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सण-उत्सवांसाठी परवानग्या देताना किंवा नाकारताना सरकार सावध भूमिका घेत आहे. र्निबध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. काही गोष्टी सुरू केल्याचा काय परिणाम झाला, याचा आढावा कोविड कृती दल दर आठवडा ते पंधरवडय़ाने घेत आहे. त्यानुसार सरकारला सल्ला दिला जात आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या काळात रुग्णसंख्या, प्रसाराचा वेग, विषाणूत झालेली उत्परिवर्तनं, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, तिसरी लाट सुरू झाली आहे की नाही या आणि अशा विविध निकषांवर निर्णय घेतले जाणार आहेत.

उत्सव सर्वानाच प्रिय आहेत. अनेकांच्या हाताला काम देणारे, अर्थकारणाला हातभार लावणारे, कलाकारांना व्यासपीठ देणारे, प्रियजनांच्या भेटी-गाठी घडवून आणणारे, समाजमनात चैतन्य निर्माण करणारे आहेत. साथ काहीशी नियंत्रणात येत असताना सण-उत्सव उत्साहात साजरे करायला काहीच हरकत नाही. फक्त उत्साहाच्या भरात आपण नकळत संसर्गात भर तर घालत नाही ना याचं भान जपलं पाहिजे. वेगाने पसरणाऱ्या डेल्टा विषाणूची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. तिसरी लाट उंबरठय़ावर आल्याचं वैद्यकीय यंत्रणा वारंवार सांगत आहेत. अनेक लहान शहरांत, गावखेडय़ांत वैद्यकीय सुविधा आजही अपुऱ्या आहेत. त्यामुळे उत्सव साजरे करताना विवेक सांभाळलाच पाहिजे. गर्दी केली, तर संसर्ग वाढणार हे गेलं वर्षभर घोकून झालं आहे, त्यामुळे यंदा तरी जे काही साजरं करायचं आहे, ते शिस्तबद्धपणे केलं पाहिजे. सण-उत्सव पुढच्या वर्षीही साजरे करता येतील. ज्यांच्याबरोबर ते साजरे करायचे आहेत, त्यांना जपण्यासाठी तरी एवढा संयम बाळगावाच लागेल.

संसर्गाची तीव्रता पाहून निर्णय

दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी १२ जिल्ह्य़ांतील रोगप्रसाराची स्थिती चिंताजनक होती. आता ही संख्या घटून पाच ते सातवर आली आहे. यात पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, नगरचा समावेश आहे. उर्वरित बहुतेक जिल्ह्य़ांत कोविडचा प्रादुर्भाव सध्या बराच कमी आहे. लस मिळण्यास थोडा विलंब होत आहे, मात्र सप्टेंबपर्यंत एका मोठय़ा वर्गाला लशीची दुसरी मात्राही मिळालेली असेल.

डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. कांजिण्यांचा संसर्ग ज्या वेगाने होतो तेवढय़ाच झपाटय़ाने या विषाणूचा संसर्ग होतो. या विषाणूचे अजूनही चार ते पाच हजार रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे काळजी घेत राहणं अतिशय गरजेचं आहे. दुहेरी मास्क आणि लशीच्या दोन मात्रा ही कोविडमधून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली आहे.

अर्थचक्र सुरू राहावं म्हणून र्निबध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जातील. घेतलेल्या निर्णयांचा काय परिणाम झाला, याचा अढावा टास्क फोर्स दर आठवडय़ाने किंवा पंधरवडय़ाने घेत आहे. येत्या काळातली परिस्थिती विचारात घेऊन गणेशोत्सव किंवा नवरात्रीतल्या र्निबधांविषयीचे निर्णय घेतले जातील.

तिसरी लाट येणार हे निश्चित! जगभर चार-पाच लाटा येऊन गेल्या आहेत. फक्त ही लाट नेमकी कधी येणार आणि किती तीव्र असणार हे आताच सांगता येणार नाही. दुसरी लाट २५ डिसेंबर ते २६ जानेवारी दरम्यान येईल, असा आमचा अंदाज होता. ती दोन महिने पुढे गेली, पण लाट आलीच. तिसरी लाट उत्सवकाळात आली तर उत्सवांवर र्निबध घातले जाऊ शकतात.
– डॉ. शशांक जोशी,  कोविड कृती दलाचे सदस्य

लाट न आल्यास र्निबध शिथिल

लसीकरणाचा वेग पाहता उत्सवकाळात र्निबध हे घालावेच लागतील. किती र्निबध घालावे लागतील किंवा किती मोकळीक देता येईल, हे त्या त्या वेळच्या स्थितीवर अवलंबून आहे. गणेशोत्सवाला अद्याप १५ दिवस आहेत. त्या वेळी कोणत्या जिल्ह्य़ात कशी स्थिती आहे हे पाहून त्यानुसार सरकारला सल्ला दिला जाईल. बाजारात सणासुदीलाच नव्हे तर एरवीही प्रचंड गर्दी होते. त्यामुळे गर्दीचं विभाजन व्हावं, यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. ती एक सामाजिक जबाबदारी समजून नागरिकांनीच वेळा विभागून घेतल्यास बाजारात गर्दीही होणार नाही आणि सर्वाना शांतपणे खरेदी करता येईल. लाट असो वा नसो गर्दी झाली की प्रसार वाढणारच आहे. फक्त तिसरी लाट सुरू झालेली नसेल, तर उत्सवकाळात र्निबध काही प्रमाणात शिथील केले जाऊ शकतात, मात्र लाट सुरू झालेली असेल, तर ते शक्य होणार नाही.
– डॉ. राहुल पंडित, डायरेक्टर क्रिटिकल केअर, फोर्टिस रुग्णालय, कोविड कृती दलाचे सदस्य

किमान तीन महिने संयम महत्त्वाचा

तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर सणांचा काळ सुरू झाला आहे. पण यंदा सण सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता, घरच्या घरीच सण साजरे करणं योग्य ठरेल. परदेशांत कोविडच्या चार-पाच लाटा येऊन गेल्या आहेत. पण नीट काळजी घेतल्यास भारतात तिसरी लाट अखेरची ठरू शकते. साधारणपणे कोणत्याही विषाणूजन्य साथीत एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के रहिवाशांमध्ये प्रतिपिंड निर्माण होतात तेव्हा समूह प्रतिकारशक्ती निर्माण झाली, असं म्हटलं जातं. मग ही प्रतिकारशक्ती लसीकरणामुळे मिळालेली असो, वा विषाणूचा संसर्ग होऊन गेल्यामुळे! भारतात आतापर्यंत ६० कोटी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. येत्या तीन-चार महिन्यांत २५-३० कोटी नागरिकांना लस देण्यात आली तर, तर चौथी लाट येण्याची शक्यात धुसर आहे, असा माझा कयास आहे. तिसऱ्या लाटेचीही तीव्रता तुलनेत कमी असेल.

सध्या नगरमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. संगमनेर आणि पारनेरला तर कोविडचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्सवकाळात खरेदीसाठी गर्दी होऊ न देणं ही ग्राहक आणि विक्रेते दोघांचीही जबाबदारी आहे. एकाच वेळी सर्व ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये. रांग लावून खरेदी करण्याची सवय ग्राहकांनी आणखी थोडा काळ कायम ठेवली पाहिजे. एक गाव एक गणपती सारख्या संकल्पना राबवाव्यात. शक्य असल्यास लग्नकरय तीन-चार महिने पुढे ढकलावीत. पुढचे तीन महिने संयम बाळगला, नियम पाळले, तर पुढच्या अनेक समस्या टाळता येतील.
– डॉ. अमोल कासार, संगमनेर, अहमदनगर</strong>

सण-उत्सवांपेक्षा आरोग्याला प्राधान्य हवं

कोल्हापुरातील कोविड रुग्णांची संख्या आता बरीच नियंत्रणात आली आहे. बाजार, मॉल्स, दुकाने, हॉटेल्सवरचे र्निबधही शिथिल करण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधाही पुरेशा प्रमाणात आहेत. पण तरीही सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास परवानगी देणं घातक ठरू शकतं. गणेशोत्सव, नवरात्रीसारख्या सणांमध्ये लोक मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत. मास्क आणि अंतराविषयीचे नियम पाळले गेले नाहीत तर अवघ्या १५ मिनिटांचा संपर्कही मोठय़ा प्रमाणात संसर्गास आमंत्रण ठरू शकतो. लस घेतली म्हणजे कोविडपासून पूर्णपणे आणि कायमचे अभय मिळाले, अशा भ्रमात वावरणं घातक ठरू शकतं. लशीमुळे शरीरात तयार झालेल्या प्रतिपिंडांचं (अ‍ॅन्टिबॉडीज) प्रमाण उतरणीला लागलं तर संसर्ग होण्याची शक्यता असते. शिवाय विषाणूंची उत्परिवर्तित रूपं लशींना दाद देत नसल्याचंही स्पष्ट झाले आहे. डेल्टासारख्या प्रकारांचा संसर्ग अतिशय वेगाने होत आहे.

र्निबध घालून, नियम पाळून सण साजरे करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात कितीही कडक र्निबध घातले, तरीही नागरिक त्यांचं पालन करत नाहीत. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा, आधीच्या लाटांचा अनुभव आणि लसीकरणाला झालेली सुरुवात याचा विचार करता या लाटेची तीव्रता कमी राहील, अशी अपेक्षा आहे. अतिउत्साहाच्या भरात आपण तीव्रता वाढवत तर नाही ना, याचा विचार नागरिकांनी करायला हवा. जोवर साथ सरत नाही, तोवर सण-उत्सवांपेक्षा आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे. कोविडबरोबर जगायला शिकणं म्हणजे हेच आहे!
– डॉ. अशोक जाधव, कोल्हापूर</strong>