00sbसाल २०२२.. भारत देश अखेर स्त्रीमुक्त झाला. स्त्रीमुक्तीवाल्यांना आता काही कामच उरलं नाही, कारण भारतात आता एकही स्त्री राहिली नाही. स्त्रीलिंगी शब्दसुद्धा वापरायची काही लोकांनी समाजावर बंदी घातलीय. शाळेतले धडेसुद्धा बदलले. भारतातील सर्व देवींची मंदिरे बंद करण्याची आज्ञा काही लोकांनी दिली. आता भारतात अंबा, महालक्ष्मी, सरस्वती, कालिमाता आणि कित्येक देवी दिसणार नाहीत. तेथेही पुरुष देवांची मंदिरं काही दिवसांत आपल्याला दिसतील. एक कृत्रिम गर्भ तयार केला जातोय, त्याची टेंडर्सही निघालीत. बीजं अशीच निर्माण केली जातायेत की, ज्यातून फक्त पुरुषांचा जन्म होईल. अहो, वंशाचा दिवा! लग्न ही संकल्पनाच मोडीत निघाली, कारण लग्न करणार कोणाशी? त्यामुळे प्रत्येक पुरुष आपल्या आवडत्या पुरुषाबरोबर राहायला लागलाय. चित्रपटातून, नाटकांमधूनसुद्धा पुरुषांच्या व्यक्तिरेखा दाखवायला पाहिजेत, अशी काही लोकांनी आज्ञा केलीय. अहो, स्त्रियांनी गायलेली गाणीसुद्धा पुन्हा पुरुषांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतली गेली आहेत.

भारताच्या इतिहासात ज्या ज्या स्त्रियांनी कर्तृत्व दाखवलं त्यांची चरित्रं नष्ट केली गेली किंवा कोठे तरी अडगळीत फेकून दिली गेली की ते परत कधीच नजरेस पडणार नाही. स्त्रियांशी संपर्क होऊ नये म्हणून काही लोकांनी परदेशी स्त्रियांना भारतात यायला बंदी घातलीय. भारतात फक्त पुरुषांना यायला परवानगी आहे. इतकंच काय, तर भारतातल्या पुरुषांना परदेशी जायला बंदी घातलीय. जे काही फिरायचं किंवा कामधंद्यासाठी जायचं असेल ते आपल्याच देशात. इंटरनेटवरून फक्त पुरुषांचीच माहिती दिली जाते. भारतात जन्मलेल्या नवीन पुरुष पिढीला ‘स्त्री’ म्हणजे काय याची जाणीवच नाही. कारण विचारताय? अहो, असं काय करता? भारत आता पुरुषसत्ताक देश झालाय.
हे सगळं घडत असताना भारतातील शेवटची स्त्री अत्यंत कडेकोट बंदोबस्तात शेवटच्या घटका मोजत होती. काही लोकांनी नवीन स्त्रीचा जन्मच होऊ न दिल्यामुळे आणि आधीच्या स्त्रिया एकेक करून गेल्यामुळे आता ती फक्त एकटीच उरली होती. तिच्या जाण्याबरोबर स्त्रियांच्या शेवटच्या खुणासुद्धा ती घेऊन जाणार होती. तिच्याबरोबरच अजूनही काही गोष्टी शेवटच्या घटका मोजत होत्या आणि विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी त्या सांभाळून ठेवणं कुठल्याही पुरुषाच्या हातात नव्हतं. माया, ममता, वात्सल्य, सर्जनशीलता, शालीनता, सात्त्विकता, सौंदर्य यांचीही जायची वेळ आली होती. पावसाच्या आगमनाने आता त्या धरणीवर कुठलंही रोप उगवणार नव्हतं, कारण ती धरित्रीच आता राहिली नव्हती. उरलं होतं फक्त उजाड रान. निर्मितीच्या कुठल्याही खुणा नसलेलं ओबडधोबड रान.
सुबोध भावे